'भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अटक करा', रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

  • पिंपरी चौकात आंदोलन

पिंपरी :  भीमा कोरेगाव घटनेतील आरोपी ‘संभाजी भिडे’ हे म्हणजे भगवा दहशतवाद आहेत. त्यांच्यावर 2 जानेवारी 2018 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात कलम 307 व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आजपर्यंत त्यांना व त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली नाही. तसेच या प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले इतर गुन्हे मागे घेण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीतील आरोपी असणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी अॅट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी (ता.14) सत्याग्रह आंदोलन रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे, तसेच रवी सावळे, प्रमोद क्षिरसागर, सचिन वाघमारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आपले निवेदन दिले.

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

डंबाळे म्हणाले, की आंबेडकरी चळवळ ही नेहमी नक्षलवाद विरोधी आहे. भीमा कोरेगाव हे आंबेडकर चळवळीचे प्रेरणास्थान आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे म्हणाले, की पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत विराज जगताप व संतोष अंगद यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करावी. 

पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 

कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, की पुरोगामी विचाराने चालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आगामी काळात या विषयावर रिपब्लिकन युवा मोर्चा बरोबरच कष्टकरी कामगार रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest the accused in bhima koregaon riots demand by the Republican Youth Front in pimpri