esakal | 'देशप्रेमासाठीच तिरंगी झेंडे बनवतोय', काळेवाडीतील कलाकार महंमद शेख यांची भावना 
sakal

बोलून बातमी शोधा

'देशप्रेमासाठीच तिरंगी झेंडे बनवतोय', काळेवाडीतील कलाकार महंमद शेख यांची भावना 

दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला बहुतांश ठिकाणी कागदी झेंडे विक्रीसाठी ठेवलेले असतात. शाळांच्या परिसरात हमखास हे चित्र दिसते.

'देशप्रेमासाठीच तिरंगी झेंडे बनवतोय', काळेवाडीतील कलाकार महंमद शेख यांची भावना 

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या शुक्रवारी (ता. 14) दुपारचे चार वाजलेले. रिमझिम पाऊस सुरूच होता. अशा वातावरणात काळेवाडीतील पवनानगरमध्ये पोचलो. दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त कागदी तिरंगा ध्वज (झेंडे) बनविणाऱ्या कलाकाराच्या घरी. महंमद शेख उर्फ राजू झेंडेवाले असे त्यांचे नाव. सत्तर वर्षांच्या आजीपासून पाच वर्षाच्या मुलापर्यंतचे पाच जण झेंडे बनवत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने झेंड्यांना मागणी आहे का? याबाबत उत्सुकता होती. सर्व माहिती जाणून घेतली आणि परत जायला निघालो. त्यावेळी शब्द कानी आले, 'वंदे मातरम'. 'सकाळ' प्रतिनिधींचा निरोप घेताना झेंडे बनविणाऱ्या आजी व त्यांच्या नातवंडांचा हा आवाज होता. त्यांच्याकडे पाहिले तर, राष्ट्रध्वजाला प्रणाम करतानाची कृती अर्थात उजवा हात कपाळावर घेत त्यांनी 'वंदे मातरम' शब्द उच्चारला होता. "देशप्रेमासाठीच तिरंगी झेंडे बनवतोय,' अशीच भावना त्यांची होती. 

पिंपरी-चिंचवड शहरात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन 

दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला बहुतांश ठिकाणी कागदी झेंडे विक्रीसाठी ठेवलेले असतात. शाळांच्या परिसरात हमखास हे चित्र दिसते. त्यामुळे मुलांच्या हातात झेंडे असतात. काही जण वाहनांवर लावतात. परंतु, यंदा स्वातंत्र्यदिनाला शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय ध्वजवंदन केले जाणार आहे. परिणाम विद्यार्थ्यांच्या हाती ध्वज दिसणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. 

निगडीतील 107 मीटर उंचीच्या ध्वज स्तंभावर ध्वज फडकविणार की नाही, जाणून घ्या

या पार्श्‍वभूमीवर झेंड्यांची निर्मिती करणारे राजू झेंडेवाले म्हणाले, "गेल्या तीस वर्षांपासून झेंडे बनवितो. यामागे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू होता. परंतु, मुलांकडून अनेकदा ध्वज फेकून दिला जातो. त्याचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे सध्या निर्मितीचे प्रमाण कमी केले आहे. ध्वजाच्या माध्यमातून राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त केले जात असल्याने अनेकदा पालक मुलांना ध्वज घेऊन देतात. मात्र, ध्वज हाताळताना त्याचा अवमान होणार नाही याची, दक्षता पालकांनी घ्यायला हवी. मुलांना ध्वजाचे महत्त्व समजवून सांगायला हवे. कारण, झेंडा ही खेळण्याची वस्तू नाही, तर देशप्रेम जागविण्याचे माध्यम आहे. लोकांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे, हा एक हेतू झेंडे निर्मितीमागे आहे. परंतु, त्याचे प्रमाण आता कमी केले आहे. प्लॅस्टिकचे झेंडे बंद केले आहेत.'' 

पिंपरीतील 'या' बँकेचं तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन; नागरिकांना मनस्ताप 

कच्चा माल 

तिरंगा ध्वज बनविण्यासाठी बांबू, तार, भिंगरीसाठी कागद, कागदी किंवा प्लॅस्टिक नळी, ध्वज पताका असा कच्चा माल आवश्‍यक असतो. तो पुण्यातील बाजारपेठेत उपलब्ध आहे. 

असे आहे झेंड्यांमागील अर्थकारण 

एक झेंडा बनविण्यासाठी खर्च : 1 रुपया 
बाजारपेठेत व्यापाऱ्यांना विक्री : 5 रुपये 
व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्री : 10 ते 20 रुपये