बोपखेलचा विकास होईल

बोपखेल - मुळा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे सुरू असलेले काम.
बोपखेल - मुळा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे सुरू असलेले काम.

पिंपरी - मुळा नदीवर बोपखेल येथे महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे सुमारे आठ ते दहा किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. त्यामुळे प्रवास खर्च व वेळेतही बचत होईल. गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. मात्र, त्यासाठी पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे, अशी अपेक्षा बोपखेलमधील नागरिकांनी व्यक्त केली. 

तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदी यांच्यामध्ये वसलेले गाव म्हणजे बोपखेल. सध्या पुणे-आळंदी पालखी मार्गावरील बोपखेल फाटा हा एकमेव गावासाठीचा रस्ता. कारण, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) आवारातून जाणारा व पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी गावाला जोडणारा रस्ता लष्कराने पाच वर्षांपूर्वी बोपखेलमधील नागरिकांच्या रहदारीसाठी बंद केला. तेव्हापासून नागरिक पर्यायी रस्त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, संरक्षण विभागाच्या खडकीतील जागेतून खडकी बाजार व पुण्याशी जोडण्यासाठी बोपखेल येथील स्मशानभूमीजवळ मुळा नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या पुलाचे बोपखेलकडील रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. नदीवरील दोन खांब व तीन स्पॅन टाकण्याचे काम बाकी आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावाचा विकास होईल - संतोष घुले
बोपखेल येथील ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संतोष घुले म्हणाले, ‘‘गाव महापालिकेत असले तरी शहरीकरणाशी कनेक्‍ट नाही. पुलामुळे अवघ्या पाच-सात मिनिटांत पुण्यात पोचता येईल. लगतच्या दिघी, चऱ्होली, आळंदीतील नागरिकांचीही पुणे, खडकी, बोपोडी भागात जाण्यासाठी सोय होईल. गावाचा विकास होईल. दळणवळण वाढेल. बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. गावाची कनेक्‍टिव्हिटी वाढेल. सध्या सोयीचा मार्ग नसल्याने गावांतील अनेकजण बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशे ते चारशे रिक्षा गावात होत्या. त्या आता सत्तरच्या जवळपास राहिल्या आहेत. कामाचे ठिकाण लांब पडत असल्याने अनेक कामगार भाडेकरू स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे चाळी रिकाम्या पडल्या आहेत. गावाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, पुलामुळे पुन्हा चालना मिळून आर्थिक स्थिती सुधारेल, हे नक्की. त्यासाठी पुलाचे काम लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे.’

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महापालिकेने संरक्षण विभागाला २५ कोटी ८१ लाख ५१ हजार रुपये मोबदला दिला आहे. येरवडा येथील ४.३८ हेक्‍टर अर्थात सात हजार ३६७.०३ चौरस मीटर जागा दिली आहे. बाधित होणाऱ्या ५०२ झाडांचा ६२ लाख ९७ हजार रुपये मोबदला दिला आहे. सध्या पुलाचे तीस टक्के काम झाले आहे.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस, महापालिका

नागरिक म्हणतात...
मुळा नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. आम्हाला गणेशनगर, बोपखेल फाटामार्गे पुणे किंवा पिंपरी-चिंचवडला जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर झाल्यास खडकी बाजारमार्गे लवकर जाता येईल. नागरिकांची सोय होईल.
- पांडुरंग झपके

सध्या पुणे किंवा पिंपरीला जाण्यासाठी विश्रांतवाडी किंवा दिघीमार्गे पाऊण ते एक तास लागतो. अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याने अधिक वेळ लागतो. लॉकडाउनपूर्वी शाळा सुरू असताना, मुलांना किमान एक तास अगोदर स्कूलबससाठी जावे लागत होते. पुलामुळे वेळ व पैसे वाचणार आहेत. मुलांना वेळेवर शाळेत जाता येईल. 
- वैशाली झपके

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com