
पिंपरी - दि सेवा विकास बॅंकेतून महत्त्वाची माहिती व कागदपत्रे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरून नेल्याप्रकरणी पिंपरी व चिंचवड पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बॅंकेचे माजी चेअरमन यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
रिकव्हरी ऑफिसर रश्मी महेश मंगतानी (वय 52, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि सेवा विकास बॅंकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी (वय 63, रा. पिंपरी), माजी अतिरिक्त सीईओ निखिल शर्मा (वय 35, रा. पिंपळे सौदागर), हितेश ढगे (वय 32, रा. काळेवाडी) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मूलचंदानी व शर्मा यांच्या सांगण्यावरून आरोपी हितेश ढगे आणि त्याचा साथीदार सोमवारी (ता. 1) सकाळी पावणे बारा वाजता दि सेवा विकास को ऑप बॅंक लिमिटेड चापेकर चौक, चिंचवड येथे बॅंकेच्या रिकव्हरी विभागात खासगी साहित्य घेऊन जाण्यासाठी येथे आले. रिकव्हरी विभागातील संगणकातून बॅंकेचा डाटा स्वतःच्या पेन ड्राइव्हमध्ये विनापरवानगीने कॉपी करून घेतला. रिकव्हरी विभागातील फाईलमध्ये बॅंकेची कागदपत्रे घेऊन जात असताना बॅंकेच्या स्टाफने त्यांना हटकले. तेव्हा आरोपी हितेश व त्याच्या साथीदाराने पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी आणि सेवा विकास बॅंकेचे नाव असलेला नकाशा फाडून पुरावा नष्ट केला. तसेच, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सुरू असलेली गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शनची फाइल त्यांनी चोरून नेली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पिंपरी पोलिस ठाण्यात मनोज लक्ष्मणदास बक्षाणी (रा. साईचौक, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमर मूलचंदानी, निखिल शर्मा यांच्यासह एचआर मॅनेजर डॉली मुकेश सेवानी (रा. वैभवनगर, पिंपरी), लोन डिपार्टमेंट ऑफिसर निकिता महेश चांदवानी (रा. पिंपरी), ड्रायव्हर सागर खेडकर (रा. श्रीनगर, रहाटणी), गोविंद श्रीनिवास (रा. नढेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सेवा विकास बॅंक, पिंपरी येथे 30 जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास सेवानी, चांदवानी, खेडकर व श्रीनिवास यांनी मूलचंदानी व शर्मा यांच्याशी संगनमत केले. तसेच मूलचंदानी व शर्मा यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबतचे महत्त्वाचे पुरावे असलेले बॅंकेचे दस्तऐवज पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सेवानी, चांदवानी, खेडकर व श्रीनिवास यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.