पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा उतरता आलेख

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळल्याच्या घटनेला रविवारी (ता. १०) दहा महिने पूर्ण झाले. या कालावधीत रुग्णांची संख्या ९८ हजारापर्यंत पोचली असली तरी, गेल्या ऑक्‍टोबरपासून संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पिंपरी - कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळल्याच्या घटनेला रविवारी (ता. १०) दहा महिने पूर्ण झाले. या कालावधीत रुग्णांची संख्या ९८ हजारापर्यंत पोचली असली तरी, गेल्या ऑक्‍टोबरपासून संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 

परदेशवारीवरून आलेले तीन रुग्ण दहा मार्च रोजी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर महिनाअखेरपर्यंत १२ रुग्ण झाले. त्यातील नऊ जण बरे होऊन घरी गेले होते. केवळ तीन रुग्णांवरच उपचार सुरू होते. मात्र, दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले. शिवाय, परदेशातील एका लग्नसमारंभाला गेलेल्या वऱ्हाडातीलही काही जण पॉझिटिव्ह आढळले होते. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढतच गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहा महिन्यात म्हणजेच १० सप्टेंबरपर्यंत संख्या ६३ हजार ४६३ झाली. पोलिस व महापालिका प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. सप्टेंबरमध्ये तब्बल २९ हजार ७६३ रुग्ण आढळले. ऑक्‍टोबरच्या मध्यापासून रुग्णसंख्येत घट होत गेली. १० नोव्हेंबर ते १० जानेवारी या दोन महिन्यात आठ हजार ७४१ रुग्ण आढळले. मात्र, हेच प्रमाण ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वाधिक होते. 

रस्त्यावर शतपावली करीत असताना तरुणावर झाला गोळीबार

सर्वाधिक तरुणांना संसर्ग
गेल्या दहा महिन्यांत सर्वाधिक संसर्ग तरुणांना झाला आहे. ९७ हजार ९७३ जणांमध्ये २२ ते ३९ वयोगटातील तरुणांची संख्या ३९ हजार ६७४ आहे. त्या खालोखाल ४० ते ५९ वयोगटातील २९ हजार ७६७ प्रौढांना संसर्ग झाला आहे. १२ वर्षाखालील सात हजार ८६ मुलांना व १३ ते २१ वर्ष वयोगटातील आठ हजार ११७ किशोरवयीन युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या १३ हजारावर आहे.

घरात राहू दिले नाही म्हणून माय लेकराचा खून 

यूके स्ट्रेनचे तीन रुग्ण
यूके स्ट्रेन अर्थात नवीन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २५ नोव्हेंबरनंतर शहरात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत १८८ प्रवाशांची तपासणी केली आहे. पैकी १८१ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने घेऊन यूके स्ट्रेन तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील तीन जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह व तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एक रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.

यूके स्ट्रेनचे तीन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, १४ दिवस रुग्णालयात ठेवून त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Descending graph of corona infection in Pimpri Chinchwad city