वर्षपूर्ती होण्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या बदलीची जोरदार चर्चा

मंगेश पांडे
Thursday, 3 September 2020

  • संदीप बिष्णोई यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश अद्यापही काढलेले नाहीत 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच झालेली बदली चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेशही अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. 

Breaking : शरद पवार अचानक पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; जम्बो हॉस्पिटलची केली पाहणी

पिंपरी-चिंचवडचे पहिले आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदली झाल्यानंतर मुंबई येथे वैधमापन शास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले बिष्णोई यांची 20 सप्टेंबर 2019 रोजी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी विधानसभा निवडणूक, अयोध्या प्रकरणाचा निकाल अशा महत्त्वाच्या वेळी शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखली. अपुरे मनुष्यबळ असतानाही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना संकटात पोलिसांनी रस्त्यावर उतरून अहोरात्र काम केले. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना धीर देत सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. 

पिंपरी-चिंचवडकरांनो! महापालिका आयुक्तांनी लागू केली नवीन नियमावली

पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय कचरा वाढतोय; सहा महिन्यांत कोविडचा 'एवढा' कचरा जमा

गणपती विसर्जनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये 'हा' झाला बदल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविल्या. कोरोनाबाधित पोलिसांना दर्जेदार उपचार मिळण्यासाठी योग्य नियोजन केले. यासह आयुक्तालयाकडील वाहनांची कमतरता लक्षात घेऊन विविध कंपन्यांकडे पाठपुरावा केला आणि वाहने उपलब्ध केली. दरम्यान, पहिल्या आयुक्तांप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा न लावता उपलब्ध अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले. अगोदरपासून सुरू असलेले विविध विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला. अशातच त्यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तपदाची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. बुधवारी (ता. 2) रात्री उशिरा सरकारकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. मात्र, त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश अद्याप काढलेले नाहीत. अवघ्या अकरा महिन्यातच झालेल्या बदलीमुळे पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. 

कृष्णा प्रकाश यांच्या नावावर शिक्कामोर्तब 

पोलिस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णा प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी वर्णी लागणार याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. अखेर बुधवारी रात्री 45 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये कृष्णा प्रकाश यांच्याकडे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion on transfer of pimpri chinchwad police commissioner sandeep bishnoi