Video : आपलं घर समजून राबणाऱ्यांवरचं उपासमार; घरेलू महिला कामगारांच्या काय आहेत व्यथा...वाचा

सुवर्णा नवले
शुक्रवार, 22 मे 2020

- तब्बल बारा हजार महिला कामाच्या प्रतीक्षेत

पिंपरी : दुसऱ्याचं घर आपलं समजून हक्काने राबणाऱ्या आणि हातावरचं पोट असणाऱ्या घरेलू कामगार महिलांवर सलग तीन महिने हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 'आम्हीच आमचं काम करू' या निश्‍चयावर ठाम असलेल्या मालकींणींकडून घरेलू कामगारांना विश्‍वासाची साद हवी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल बारा हजारांवर महिला सद्य:स्थितीत घरकामाच्या प्रतीक्षेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात 17 हजार घरेलू कामगार आहेत. त्यातील चार ते पाच हजार महिला कामगारांना चौथ्या लॉकडाउननंतर कसेबसे धुण्या-भांड्याचे व लादी पुसण्याचे काम मिळाले आहे. यात बागकाम, सुरक्षारक्षक, कचरा गोळा करणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे. मात्र, स्वयंपाकाचे काम देण्यास अद्यापही बऱ्याच घरांमध्ये टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांत या महिलांवर दारोदार फिरून उसनवारी पैशावर कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. काही घर मालकींनीने मार्च व एप्रिल महिन्याचा पगार दिला आहे. तर काही घर मालकीणींनी अद्यापपर्यंत दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात तरी हाताला काम मिळेल की नाही, अशा विवंचनेत या महिला अडकल्या आहेत. मात्र, लॉकडाउन वाढविल्यामुळे ती देखील आशा मावळली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे नेमकी परिस्थिती

कामगार उपायुक्तांनी घरकाम करणाऱ्या महिलांना कामासाठी मुभा दिली आहे. मात्र, हा सर्वस्वी निर्णय घरमालक व घरेलू कामगारांवर अवलंबून आहे. बरेच घरेलू कामगार झोपडपट्टी भागातील आहेत. याच भागात कोरोनाने शिरकाव केल्याने संसर्गाच्या भीतीपोटी घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीधारकांनी ठरवून प्रवेश नाकारला आहे. कंटेन्मेंट झोनमधील महिला कामगारांना घराबाहेर पडता येणे अवघड झाले आहे. नोकरदार महिलांना या कामगारांची गरज भेडसावत आहे. मात्र, त्यांनी देखील स्वत:च काम करण्याची तयारी दर्शविली आहे. लहान मुले, गर्भवती महिला व ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्या मावशांचा थेट संबंध हा स्पर्शाशी येत असल्याने या कामासाठी सोसायटीतील सदस्यांनी पूर्णत: बंदी घातली आहे. कुटुंबातील मंडळीच एकमेकांचे काम हलके करत असल्याचे चित्र काही ठिकाणी आहे.

घरेलू कामगार म्हणतात...

आम्ही सोसायटीत जाताना काळजी घेऊ. सॅनिटायझर वापरू. घर मालकीण ज्या सूचना देतील त्या नियमांचे पालन करू. ज्येष्ठ नागरिक व नोकरदार महिलांना आमची खरी गरज आहे. आम्हाला विश्‍वासाने दिलेल्या असणाऱ्या घराच्या चाव्यादेखील मालकीणींनी जमा करून घेतल्या आहेत. सध्या पतीलादेखील काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आमचा देखील विचार करावा.'

घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला काम हवं. त्यासाठी महापालिकेने त्वरीत नियमावली सादर करण्याची गरज आहे. जवळपास दोन महिने झाले यांना आम्ही जेवण पुरवीत आहोत.

- आशा कांबळे, घरकाम महिला संघटना, पिंपरी-चिंचवड

आमच्या परिसरात बऱ्यापैकी महिला धुण्या-भांड्यांची कामे करत आहेत. अद्यापपर्यंत स्वयंपाकाची कामे दिली जात नाहीत. नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे लॉकडाउन नंतरच बहुतेक महिलांना कामावर बोलवतील. मात्र, जवळच्या परिसरात महिला राहत असेल, तर आम्ही कामावर बोलवत आहोत. शिवाय सर्व घरमालकांनी यांचे पगारही दिले आहेत.

- सुनीता कुलकर्णी, आकुर्डी प्राधिकरण, घरमालकीण

सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणतायेत...

घरेलू कामगार हे बऱ्यापैकी कंटेन्मेंट झोनमधले आहेत. त्यामुळे ते कामावर येऊ शकत नाहीत. त्यांचे घरभाडे व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळेत पगार मिळायला हवा. सोसायटीमधील कचरा उचलणे व सुरक्षेची कामे सोसायटी सदस्यांनी स्वत: पुढाकार घेऊन करायला हवीत. त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी. अन्यथा या कामगारांना घरी न पाठवता सोसायटी धारकांनीच त्यांच्या परिसरात जेवणाची व इतर व्यवस्था करायला हवी. अन्यथा धान्याचे कीट पुरवायला हवेत. सोसायटीतील सर्व सदस्यांच्या परवानगीशिवाय बाहेरील घरेलू कामगार काम करू शकत नाही. कारण बऱ्याच सोसायटीत ज्येष्ठ, गर्भवती महिला व लहान मुले यांचे स्वास्थ्य जपण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यामुळे कोणालाही कामावर घेण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. घरेलू कामगारांबद्दल तसे कोणतेही नियम बंधनकारक नाहीत.

- तेजस्विनी ढोमसे, अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था

हेही वाचापीएमपी बससेवा सुरू करण्याबाबत झाला मोठा निर्णय

असा दिवस सुरू होतो अन् मावळतो

दोन वेळची जेवणाची भ्रांत असल्याने घरेलू कामगार कामाच्या शोधात आहेत. मालकीणीला कॉल करून कामावर येण्याची विनंती करतात. बऱ्याच जणींना रेशनकार्ड नसल्याने घरात अन्नधान्य नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अन्नाची पाकिटे मिळतात तिथे जाऊन कसेबसे दिवस काढले जात आहेत. काही स्वयंसेवी संस्थांनी दोन वेळचे जेवण त्यांना पुरविले आहे. काही परिसर कंटेन्मेंट झोन असल्याने सध्या बाहेर पडणेही अवघड झाल्याने या महिलांची कोंडी झाली आहे.

हेही वाचा - Video : 'त्यांनी' गावी जाण्यासाठी 267 किलोमीटर पायपीट केली अन् पिंपरीत

या योजनेचा घेऊ शकतात लाभ

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 15 हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या असंघटित कामगारांना या योजनेचा व पेन्शनचाही लाभ घेता येणार आहे. यासाठी आधारकार्ड व जनधन योजनेचे खाते आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Domestic workers need for work at pimpri chinchwad city