कर्मचारी महासंघ कार्यकारिणीला मुदतवाढ; आक्षेप घेत विरोधकांची निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे होते. काही सभासदांनी प्रत्यक्ष, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला.

पिंपरी : विद्यमान कार्यकारिणीला तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत शनिवारी घेण्यात आला. तसेच नव्याने विशेष लेखापरीक्षण करून त्यामधील त्रुटींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या विषयांसह विविध विषयास मंजुरी देण्यात आली. मात्र, गणपूर्ती नसतानाही घेतलेली सभा बेकायदेशीर आहे, असा मुद्दा लावून धरत विरोधी गटाच्या सभासदांनी जोरदार निदर्शने केली. त्यांना सभागृहात जाण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे होते. काही सभासदांनी प्रत्यक्ष, तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला. नवीन कार्यकारिणीस मुदतवाढ देणे, संघटनेच्या मागील लेखापरिक्षणातील निर्णयाबाबत विशेष लेखापरीक्षण करणे, महासंघ मासिक वर्गणी दहा रुपये कपात करणे आदी विषय विषयपत्रिकेवर होते. त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने सर्व विषय मंजूर झाले. 

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​
 

दरम्यान, अनेक सभासद गेटच्या बाहेर उभे होते, आम्हाला प्रेक्षागृहामध्ये प्रवेश करण्यास बंदी केली, असा आरोप त्यांनी केला. सभास्थळी जाण्यास केलेला अटकाव यासह विविध मागण्यांसाठी विरोधी गटाने निदर्शने केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे थंब कधी बंद होणार? मेडिकलचे मालक आता तुम्ही कसे? 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचे काय? प्रोत्साहन भत्ता 300 ऐवजी 150 का केला?, अशा मजकुराचे फलक हातात घेतले होते. 

रोगानं नाही डॉक्टरनंच केला घात; कॅन्सरच्या नावाखाली उकळले दीड कोटी!​

''कार्यकारिणीच्या मुदतवाढीबाबत घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यानुसार हा विषय सभेपुढे होता. विरोधक खोटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सभा शासनाने घालून दिलेल्या सूचनांनुसार पार पडली आहे. सभेला अनेक सभासद उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वांना उपस्थित राहता येणे शक्‍य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिगची व्यवस्था केली होती.''
- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, कर्मचारी महासंघ 

''महासंघाची सभासद संख्या सात हजार असताना केवळ सहाशे लोकांची आसनव्यवस्था असणाऱ्या प्रेक्षागृहामध्ये सभा आयोजित केली. सत्ताधाऱ्यांनी स्वतःची मते ऐकून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये बसवून आपल्या विरोधातील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला नाही. गणसंख्या पूर्ण नसताना घेतलेली ही सभा बेकायदेशीर आहे. महासंघाच्या निवडणूक घटनेप्रमाणे कार्यकारिणी एक वर्ष कालावधीसाठी असताना तीन वर्षाचा कार्यकाळ वाढवून घेतला.'' 
- विशाल भुजबळ, माजी कार्यकारिणी सदस्य 

धुमशान ग्रामपंचायतीचं : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार बेनके​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension of staff federation executive but Opposed by protesters in PCMC