महाराष्ट्रीयन बांधवांचे गुजरातींकडून मनोरंजन 

महाराष्ट्रीयन बांधवांचे गुजरातींकडून मनोरंजन 

पिंपरी - सनईचे सूर, संबळ व ढोलकाचे बोल आणि गुंगरांच्या तालावर गुजरातमधील आदिवासी बांधवांनी नृत्य केले. तेही पारंपरिक वेशभूषेत. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आदिवासी बांधव भारावून गेले. अनेकांनी नाट्यगृहातच ठेका धरला. निमित्त होते, भाजप अनुसूचित जमाती आणि आदिवासी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी व कार्यसमितीची बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. 22) भाजप अनुसूचित जमाती आणि आदिवासी मोर्चाचा प्रदेश पातळीवरील मेळावा झाला. दरवर्षी मुंबईत होणारा मेळावा, यंदा प्रथमच मुंबईच्या बाहेर तोही उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये घेतल्याचे मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. उद्‌घाटनापूर्वी गुजरातमधील सापुतारा जवळील मालेगाव (ता. आहवा, जि. डांग) येथील आदिवासी लोकनृत्य कला मंडळाने विविध नृत्य सादर केले. त्याअंतर्गत विविध नाट्यछटा, विजयरथ, कृष्णरथ, राधा नृत्य, लोकनृत्य, भिंगरी नृत्यही त्यांनी सादर केले. त्याचे संगीत व नृत्य संयोजन केसर चौथवा, वसंत दळवी, भास्कर गवळी यांनी केले. नाट्यगृहातील व्यासपीठासह कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशद्वारावरही त्यांनी नृत्य केले. राज्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये नृत्यछटा टिपत आनंद लुटला. 

आदिवासी कल्याणासाठी ठराव 
मेळाव्याच्या उद्‌घाटनापूर्वी प्रदेश पदाधिकारी व कार्य समितीची बैठक झाली. भाजप राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी प्रदेश महामंत्री तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रकाश गेडाम यांनी, केंद्र सरकार व राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकार यांनी केलेल्या आदिवासी विकास कार्याबाबत अभिनंदनाचा ठराव मांडला. केंद्र सरकारच्या सुधारित कृषी विधेयकाच्या समर्थनाचा ठराव खासदार डॉ. भारती पवार यांनी मांडला. तर, भगवान बिरसा मुंडा जयंती दिन अर्थात 15 नोव्हेंबर हा राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस घोषित करणे, या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करणे व त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे, असा ठराव खासदार अशोक नेते यांनी मांडला. तीनही ठराव मंजूर करण्यात आले. मेळाव्याचा समारोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

सरकारने नोकर भरती थांबवू नये - फडणवीस 
आदिवासी मेळाव्याचे उद्‌घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'महिलेने तक्रार का मागे घेतली, हे माहीत नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करावा.'' राज्य सरकारने नोकर भरती थांबवू नये. मराठा समाजाला विचारात घेऊन लवकरात लवकर नोकरभरती करावी, असे त्यांनी सांगितले. 

मुंडे प्रकरण संस्कृतीशी घातक - पाटील 
धनंजय मुंडे यांच्यावर शोषणाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने माघार घेतल्याचा ढोल राष्ट्रवादीचे नेते वाजवत आहेत. तिच्यावर दबाव आहे किंवा नाही, याचा तपास निष्पक्षपातीपणे पोलिसांनी करावा. नैतिकता काही आहे की नाही. हे प्रकरण महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी घातक आहे. त्यांच्यासारखी आमची संस्कृती नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्यांच्या उपस्थित मेळाव्याचा समारोप झाला. त्यानंतर पत्रकारांशी पाटील बोलत होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जाणार आहेत. त्याबाबत ते म्हणाले, ""विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अण्णांची भेट घेणार आहेत.'

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com