मेट्रोच्या कॉन्ट्रॅक्टरने कामगारांना आणले विमानाने; राहिलेल्यांसाठी स्पेशल बस, ट्रेनची व्यवस्था!

Metro_Workers
Metro_Workers

पिंपरी : परप्रांतीय कामगार मूळगावी परतल्याने पुणे मेट्रोच्या कामकाजात शिथिलता आली होती. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे कठीणाईचा सामना करावा लागला. महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन) प्रशासनही हतबल झाले होते. मात्र, कामगारांनी परतीची वाट धरली. मेट्रोमधील कामकाजाचा अनुभव गाठीशी असलेल्या कुशल कामगारांचा तुटवडा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत भरून निघाला आहे. सध्या 6 हजार कामगारांपैकी साडेचार हजार परप्रांतीय कामगार कामावर हजर झाले आहेत. हे सर्व कामगार कंत्राटदाराने विमानाने आणले असून उर्वरीत कामगार स्वतंत्र बस आणि ट्रेनची व्यवस्था करून आणले असल्याचे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

कोरोनाच्या फटक्‍यामुळे पहिल्या लॉकडाउननंतर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मेट्रोसह भुयारी कामकाज ठप्प झाले होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानगीनंतर एक महिना बंद असलेले काम सुरु झाले. या कामात भूमिपुत्रांनाही काम करण्याची संधी होती. मात्र, हळूहळू परप्रांतीय कामावर परतू लागले. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या भागातून कामगार कामावर आले आहेत. पहिल्या लॉकडाउनपर्यंत 800 मजूर कामावर उरले होते. या सर्वांचा भार मेट्रोने पेलला. कामगारांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर मजुरांची संख्या हळूहळू वाढली.

जून महिन्यात मेट्रोच्या कामात कुशल असलेल्या कामगारांसाठी कंत्राटदाराने विमानाची तिकिटे पाठवण्याची सोय केली. जवळपास शंभर कामगारांना ही तिकिटे दिली. यामध्ये क्रेन ऑपरेटर, गार्डरचा समावेश आहे. स्वतंत्रपणे बस व रेल्वेने आणलेल्या कामगारांमध्ये फिटर, टर्नर, सेंट्रिग कामगार, कार पेंटर, वेल्डर, क्रेन ऑपरेटर, गवंडी, टाईल्स मेकर, प्लंबरचा समावेश आहे.

मेट्रोच्या कामगारांची हवाई सफर
कधी नव्हे ते आकाशातून हवाई सफर करण्याचा अनुभव मेट्रोच्या कामगारांनी घेतला. स्वप्नातही या कामगारांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळेल असे वाटले नाही. विमान सफरीनंतर सर्वजण नेटाने कामाला लागल्याचे कामगारांनी सांगितले.

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या पाच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क साधावा लागला. त्यांच्यासोबत पत्रव्यवहार महामेट्रोने केला. संसर्गजन्य परिस्थितीमुळे लॉकडाउनची नियमावली वेगळी असल्याने मनुष्यबळाची मागणी करण्यात आली. त्यानंतरच या कामगारांना त्यांचे राज्य सोडता आले. सदर राज्यात त्यांना काम न मिळाल्याने त्यांनी मेट्रोच्या कामासाठी तत्काळ येण्याची तयारी दर्शविली.
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com