चिंताजनक : मावळात कोरोनाबाधितांनी ओलांडला हजाराचा टप्पा

चिंताजनक : मावळात कोरोनाबाधितांनी ओलांडला हजाराचा टप्पा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शुक्रवारी (ता. ७) दिवसभरात ५० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्ण संख्येने आज हजाराचा टप्पा ओलांडला असून, एक हजार २९ एवढी संख्या झाली आहे. मात्र, त्यातील ६२४ जण बरे झाले आहेत.

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५० जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक २०, तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील आठ, गहुंजे येथील पाच, लोणावळ्यात तीन, वडगाव, कामशेत, ब्राम्हणवाडी, परंदवडी, कडधे, कान्हे, सुदुंबरे, शिरगाव, सुदवडी, देवघर व पारवडी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार २९ झाली असून, त्यात शहरी भागातील ५०७; तर ग्रामीण भागातील ५२२ जणांचा समावेश आहे. तळेगावात रुग्ण संख्येचा ओघ वाढत असून, तेथील संख्या ३४५ झाली आहे. लोणावळा येथे ९४, तर वडगावातील रुग्ण संख्या ६८ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी सहा जणांना घरी सोडण्यात आले. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात सध्या ३७५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २५६ जण लक्षणे असलेले व ११९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २५६ जणांपैकी १८६ जणांमध्ये सौम्य, तर ५८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १० जण गंभीर, तर दोन जण अत्यवस्थ आहेत. सध्या ३०३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, ७२ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com