प्राणी अंत्यविधीसाठी एक हजार रुपये शुल्क; "स्थायी'चा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

पाळीव प्राणी अर्थात कुत्रा व मांजर मृत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी (दहन) मालकांकडून प्रतिप्राणी एक हजार रुपये शुल्क आकारण्यास महापालिका स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली.

पिंपरी - पाळीव प्राणी अर्थात कुत्रा व मांजर मृत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी (दहन) मालकांकडून प्रतिप्राणी एक हजार रुपये शुल्क आकारण्यास महापालिका स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. हा विषय अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आला. दरम्यान, अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्याचा मूळ प्रस्ताव होता. उपसूचनेद्वारे ही रक्कम एक हजार रुपये करण्यात आली. 

महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी मृत झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी नेहरूनगर येथे 2007 पासून दफनभूमी कार्यान्वित आहे. याच ठिकाणी दोन वर्षांपासून मृत प्राणी दहन यंत्र सुरू केले आहे. त्यासाठी दरमहा सरासरी 20 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र, देखभाल- दुरुस्ती, इंधन व कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढत असल्यामुळे शुल्क आकारणीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. 

हेही वाचा : पाण्यासाठी आणखी किती पैसे मोजायचे?

86 कोटींच्या कामांना मंजुरी 
तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास कामांसाठीच्या सुमारे 86 कोटी 44 लाख रुपये खर्चासही स्थायी समिती सभेने मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. निगडीतील जलशुद्धीकरण प्रकल्पासह शहरातील पाण्याच्या टाक्‍यांसाठी कार्यान्वित स्काडा प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी सात कोटी 13 लाख; प्रभाग 15 मधील कामांसाठी 24 लाख 87 हजार, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र दुरुस्ती कामांसाठी 88 लाख 66 हजार, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी 16 कोटी 28 लाख, तसेच रावेत, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी, पुनावळे, काळाखडक, वाकड, रहाटणी, थेरगाव, लक्ष्मणनगर, सेक्‍टर 10, 22, गवळीमाथा, कृष्णानगर, जाधववाडी, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली व बोपखेल येथील टाक्‍यांमधून पाणी पंपिंगसाठी दोन कोटी 81 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. 

Coronavirus: नव्या कोरोना रुग्णांसाठी भोसरी रुग्णालय

पुलासाठी 25 लाख अनामत 
पवना नदीवर पिंपरीगाव व पिंपळे सौदागर यांना जोडण्यासाठी नवीन समांतर पूल बांधण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाटबंधारे विभागाला 25 लाख रुपये अनामत देण्यात येणार आहे. नदीपात्रातील राडारोडा उचलल्यानंतर ही रक्कम महापालिकेला परत मिळणार आहे, त्यासही मंजुरी देण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Standing Committee has approved to charge Rs.1000 per animal from the owners for their cremation