मावळात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय, तर मृतांमध्ये 'या' रुग्णांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच चालली आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी (ता. 23) दिवसभरात ५२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ५५ वर्षीय पुरुष, शिरगाव येथील ७२ वर्षीय व कामशेत येथील ७० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७०७ आणि मृतांची संख्या ६५ झाली आहे. आतापर्यंत एक हजार २५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांचा आकडा 42 हजारांच्या दिशेने

Video : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मूर्ती विसर्जनाचा 'घाट' 

रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ५२ जणांमध्ये तळेगाव येथील सर्वाधिक २१, लोणावळा येथील नऊ, कुसगाव बुद्रुक येथील सहा, कामशेत व टाकवे बुद्रुक येथील प्रत्येकी चार, कुरवंडे येथील दोन; तर शिरगाव, कुणे नामा, वाकसई, कार्ला, महागाव व मळवंडी पमा येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ७०७ झाली असून, त्यात शहरी भागातील ८८० व ग्रामीण भागातील ८२७ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ५६६, लोणावळा येथे १९४ तर वडगाव येथील रुग्ण संख्या १२० झाली आहे. 

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी इंग्रजी शाळांची अशी 'दुकानदारी'

तालुक्यात आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार २५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी ३३ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३८३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २२८ जण लक्षणे असलेले व १५५ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २२८ जणांपैकी १४१ जणांमध्ये सौम्य, तर ६८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जण गंभीर आहेत. 

सध्या ३८३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यात मृतांची संख्या वाढत असून, मृतांमध्ये वृद्ध व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याने अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. लोहारे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 52 corona positive patients found in maval taluka on sunday 23 august 2020