पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आणखी एका अधिकाऱ्याचा कोरोनाने बळी

CoronaVirus
CoronaVirus

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका. सर्वात श्रीमंत. वायसीएम, भोसरी, जिजामाता, तालेरा अशा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांसह अन्य चार सुसज्ज रुग्णालये. वैद्यकीय सुविधा चांगल्या. शिवाय, खासगी रुग्णालये आहेतच. पण, या सर्व यंत्रणेवर कोरोना मात करतोय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक साईनाथ लाखे यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. यापूर्वी 21 जुलैला वायसीएमच्या कार्यालयातील उपलेखापाल सिद्धार्थ जगताप यांचे निधन झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विरुद्धची लढाई महापालिकेच्या माध्यमातून वायसीएम रुग्णालयाच्या अंतर्गत लढली जात आहे. संपूर्ण रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्याच्या जोडीला भोसरी नवीन रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता व चिंचवडमधील तालेरा रुग्णालय कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. त्यांना महापालिकेचे अन्य चार रुग्णालये, 28 दवाखान्यांची फौज आहे. शिवाय, विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. तसेच, चिंचवडचे ऑटोक्‍लस्टर, पिंपरीतील बालनगरी व नेहरूनगर येथील मगर स्टेडियम येथे जम्बो फॅसिलिटी सेंटर उभारले जात आहे. गंभीर रुग्णांसाठी ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडही वाढविण्यात आले आहेत. तरीही मृतांची संख्या वाढतेच आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 514 झाली होती. त्यात वायसीएमच्या कार्यालयीन अधीक्षकांचाही समावेश आहे.

वायसीएम कार्यालयातील जगताप व लाखे यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शिवाय, येथील सुमारे 23 कर्मचाऱ्यांनाही आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. यात डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. यातील एक डॉक्‍टर, नर्स बरे झाले आहेत. तसेच, महापालिका मुख्यालयासह अन्य कार्यालयांतील सुमारे 35 अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झालेला आहे. त्यातील काही जण कोरोनावर यशस्वी मात करून बरे झाले आहेत. यात दोन अभियंते, एका सहायक आयुक्तांचाही समावेश आहे.

नगरसेवकांचाही बळी 
कोरोनाने साने चौक चिखली येथील नगरसेवक दत्ता साने व आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांचाही बळी घेतलेला आहे. यापूर्वी एका आमदारासह कुटुंबातील पाच जणांना संसर्ग झाला होता. शिवाय, पिंपरी मतदारसंघातील एका नगरसेवकाच्या घरातील आठ जण व माजी नगरसेविकेसह कुटुंबातील अन्य सदस्यांनाही बाधा झाली होती. तसेच, चिंचवड मतदारसंघातील एका नगरसेविकेसह त्यांचे पती व माजी नगरसेवक आणि कुटुंबीयांनाही संसर्ग झाला होता. हे सर्व जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com