'पीएमआरडीए'चा 'कारभार' चक्क अभियंत्याकडे 

सुवर्णा नवले
Monday, 28 September 2020

अनेक दिवसांपासून नियमबाह्य प्रकार; नियमावली काढली मोडीत 

पिंपरी : पीएमआरडीएमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असतील, तर त्या दर्जाच्या किंवा लगतच्या अधिकाऱ्यांकडे प्रशासनाची जबाबदारी सोपवायची असते. मात्र, चक्क बांधकाम विभाग अधिकाऱ्याकडे पदभार दिला आहे. प्रशासन किंवा महसूल विभागातील संबंधित दर्जाचा अधिकारी पीएमआरडीएमध्ये असतानाही लागेबांधे असलेल्या या अधिकाऱ्याच्या हाती कारभार सोपवण्यामागे काय कारण असावे? याची चर्चा रंगली आहे. असा नियमबाह्य प्रकार कित्येक दिवसांपासून सुरू असून, यापूर्वीही नियमावली मोडीत काढली असल्याचे बोलले जात आहे. 

कोरोना रुग्ण संख्येबाबत पिंपरी-चिंचवडकरांना आज दिलासा

पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरण लागलंय कामाला; तीनशे ट्रान्सफॉर्मर्सना लावणार सेफ्टी कव्हर

'पीएमआरडीए'मध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने अधिकारी रजेवर गेले. आयुक्त सुहास दिवसे देखील सुटीवर होते. कामाचा बोजवारा उडाला होता. अशावेळी प्रशासनाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्या आयएएस म्हणून पदोन्नती मिळालेल्या कविता द्विवेदी यांनी अधीक्षक अभियंता मिलिंद बोंगाळे यांच्याकडे प्रशासनाचे कामकाज सोपवले. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पीएमआरडीएमध्ये नाराजीचा सूर आहे. ज्या त्या विभागाची सूत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. कामकाजातील अनुभव गाठीशी असणे अपेक्षित आहे. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त पदभार दिल्यास कामकाज सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पंधरा दिवसांसाठी अधीक्षक अभियंता यांना पदभार सोपविण्यात आला. त्या कालावधीत कोणताही निर्णय घेणे त्यांना अशक्‍य होते. हे कामाकाजावेळी दिसून आले. अशा किरकोळ मात्र महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबींमध्ये देखील आयुक्तांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. 

प्रशासनाने काम दिले ते प्रामाणिकपणे मी स्वीकारले. शांत बसणे योग्य असते. मंगळवारी अतिरिक्त आयुक्त कामावर रुजू होणार आहेत. 
- मिलिंद बोंगाळे, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए 

यापूर्वी काय घडले? 

पीएमआरडीएमध्ये यापूर्वी देखील अधिकाऱ्यांचा पदभार, कामांची अतिरिक्त जबाबदारी यामध्ये हेवेदावे व लागेबांधे होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ठराविक अधिकारी व अभियंते दिवसरात्र मेट्रोसह इतर कामात अडकतात. तर काही अधिकारी रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे. विकास कामांच्या बाबतीतही काही अधिकाऱ्यांकडून आलेल्या फाइलींचे कामकाज जाणीवपूर्वक प्रशासनातून वेठीस धरले जात आहे. टेबलावरील फाइल देखील बराच कालावधीपर्यंत तशाच पडून राहत आहेत. अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे फाइलींचा निपटारा वेळेत लागत नसल्याचा प्रकार पीएमआरडीएमध्ये सुरूच आहे. फाइलवर शेरे किंवा अनावश्‍यक त्रुटी काढून ती रंगविण्यामध्येच धन्यता मानले जात आहे. याचा सर्व परिणाम पीएमआरडीएच्या विकासकामांवर होत आहे. प्रभारी म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विकासकामांमध्ये राजकारण अधिकारी करीत असल्याने हाताशी असलेला कंत्राटी कर्मचारीही मेटाकुटीला आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMRDA's responsibility lies to engineer