कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई; दोन दरोडेखोरांनी दिली 21 गुन्ह्यांची कबुली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

चार मोटार, चार दुचाकी, सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड व घरफोडीचे साहित्य असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

पिंपरी - पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने हडपसर येथून भोसरी परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या टोळीचा पाठलाग करून त्यातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोटार, चार दुचाकी, सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड व घरफोडीचे साहित्य असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

पुण्यात डेटींग अॅपवरून ओळख;आईची औषधे वापरून 16 तरुणांना लुटले

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 32), जितसिंग राजपालसिंग टाक (वय 26, रा. बिराजदारनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात हडपसर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी मोटारीतून येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडपातून पळाले. तर, दोघे जण पोलिसांच्या हाती लागले. दोघांना ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता दोन कटर, स्क्रू ड्रायव्हर, कोयते, कटावणी आढळली. इंद्रायणीनगर येथे दरोडा टाकण्यासाठी हडपसर येथून आल्याची आरोपींनी कबुली दिली. 

भाजप नगरसेविकेच्या पतीवर चोरी प्रकरणी गुन्हा

कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरातील घरफोडी व वाहन चोरीचे 17 गुन्हे, पुणे शहर व हद्दीतील वाहन चोरीचे प्रत्येकी दोन असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आले. आरोपी सुरजितसिंग टाक याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी आणि वाहनचोरीचे 25 गुन्हे दाखल आहेत. तर, जितसिंग टाक याच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत. अन्य एक आरोपी सनी सिंग दुधानी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे आणखी दोन साथीदार अद्याप पसार आहेत. हे सर्व आरोपी नातेवाईक आहेत. दरम्यान, या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी या पथकाला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

ऍपद्वारे तपासणार तडीपार आरोपींचे लोकेशन 
तडीपार आरोपींनी पुन्हा गुन्हे करू नयेत, यासाठी एस ट्रॅकर हे ऍप विकसित करण्यात येणार आहे. आरोपीला मोबाईलवर दररोज लोकेशन पाठविणे बंधनकारक करणार आहे. यात लोकेशन बदलल्यास कारवाई केली जाणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. 

राडा... धुरळा! अखेर सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर! ​

चारचाकी वाहन चोरल्यानंतर ते सार्वजनिक पार्कीगमध्ये किंवा झाडाझुडपांत पार्क करायचे. काही दिवसानंतर दुचाकीवरून पार्क केलेल्या वाहनापर्यंत जायचे. तिथे दुचाकी लावून चोरीचे चारचाकी वाहन घेऊन दरोडा अथवा घरफोडी करायचे. दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी पुन्हा चोऱ्या करतात. त्यामुळे ज्या ठाण्यात या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत, त्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देणार असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police commissioner action two arrested 21 criminal cases