पितृपक्षामुळे भाज्या महागल्या; घाऊक, किरकोळ बाजारात जादा भावाने विक्री

आशा साळवी
Sunday, 6 September 2020

पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, लाल भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच, अळूच्या पानांना मागणी वाढली आहे.

पिंपरी : पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, लाल भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच, अळूच्या पानांना मागणी वाढली आहे. त्यातच आवक घटल्यामुळे भाज्यांचे भाव 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात जादा भावाने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव पाण्याअभावी होतोय 'पाणी-पाणी'

पिंपरी-चिंचवड शहरात येणारा भाजीपाला नाशिक, सातारा या जिल्ह्यातील आसपासच्या गावांतून आणि इंदुर, आग्र्यातून येत असतो. गणेशोत्सवात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाला-फळभाज्यांच्या आवकेवरही त्याचा परिणाम झाला. गेल्या चार-पाच दिवसात पावसाने उघडीप दिली असली, तरी अजूनही भाजीपाल्याची आवक वाढलेली नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव वधारले आहेत. बहुतेक भाज्या 70 रुपये किलोच्यावर आहे. त्यातच सध्या पितृपक्ष सुरू असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे.

शैक्षणिक संस्थाचालक म्हणतायेत, 'खर्च भागवायचा तरी कसा?' 

पिंपरी महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण?, राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

विशेषतः पितृपक्षात नैवेद्यासाठी विविध प्रकारच्या भाज्या लागतात. या भाज्यांची आवक कमी होत असल्याने प्रत्येक भाज्यांच्या किलोमागे 30 ते 40 टक्के भाव वाढले आहेत. मेथीला 20 ते 30 रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात हिरवी मिरची 80 रुपये, कोथिंबीर 30, टोमॅटो 80, शिमला मिरची 60, काकडी 40, आले 80, लसूण 180, फुलकोबी 80, फ्लॉवर 80 रुपये प्रतिकिलो विक्रीला आहे. या भाववाढीचा फटका ग्राहकांबरोबरच किरकोळ उपहारगृह विक्रेत्यांना बसला आहे. 

बाजारात भाज्यांचे भाव प्रतिकिलो रुपयात 

गवार- 120, मटार- 140, कारली- 70, दोडके- 70, वांगी- 70, भेंडी- 50, लाल भोपळा- 50, कांदा- 30, चवळीच्या शेंगा- 70 

नागरिकांना येणाऱ्या दिवसात या भाववाढीचा फटका बसणार आहे. किरकोळ बाजारातील काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत, तर काहींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. कांद्याचे भाव अजूनही उतरले नसून किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपयेप्रमाणे त्याची विक्री केली जात आहे. बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील बजेट विस्कळीत झाले आहे. 
- धनश्री मारणे, गृहिणी 

एक महिन्यापासून बाजारात भाज्यांचे भाव तसेही वाढलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यातच आता पितृपंधरवडा सुरू असल्याने काही भाज्यांचे भाव 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. 
- सागर गरूड, उपाध्यक्ष, अखिल मंडई मित्र मंडळ, चिंचवडगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable prices increase in pimpri chinchwad