AYODHYA PARVA
AYODHYA PARVA

आचरणातून आदर्श विचार

Summary

प्रभू श्रीरामचंद्रांच्या आचरणातून निर्माण झालेले विचार हे जगाला दीपस्तंभासारखे ठरले आहेत. सत्तेसाठी होणारे गृहयुद्ध कसे टाळता येते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या सन्मानासाठी कोणतीही साधने हाती नसताना बलाढ्य राक्षसांशीही लढून विजय कसा मिळविता येतो. हे श्रीरामचंद्रांच्या आचरणातून आपण शिकतो.

वेद आणि उपनिषदे यांमधील गहन तत्त्वज्ञान ज्या कोणा एका व्यक्तीमध्ये पूर्ण रूपाने व साकल्याने दिसून येते, ती व्यक्ती म्हणजे रामायणाचे नायक प्रभू श्रीरामचंद्र! सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय हे श्रीरामांच्या जीवनावरून कळू शकते. श्रीराम म्हणजे मूर्तिमान धर्म.

(रामो विग्रहवान् धर्म:।)

साऱ्‍या विश्वाचा ठेवा

रामायण हा भारताचाच नव्हे तर अखिल मानव जातीचा अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आहे. धर्माचा अधर्मावर, सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवर व सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय याचा हा इतिहास आहे. सत्तेसाठी होणारे गृहयुद्ध कसे टाळता येते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या सन्मानासाठी कोणतीही साधने हाती नसताना बलाढ्य राक्षसांशीही लढून विजय कसा मिळविता येतो, हे श्रीरामचंद्रांच्या आचारणातून आपण शिकतो. श्रीरामचंद्रांच्या आचारणातून निर्माण झालेले हे विचार ऐकूनच छत्रपती शिवराय लहानाचे मोठे झाले. आदर्श अशा रामराज्याची कल्पना यातूनच साकारली.

बालकांडात लिहिल्याप्रमाणे नारदांनी वाल्मीकी ऋषींना श्रीरामांचे गुण सांगितले आहेत ते असे... आत्मसंयमी, वीर्यवान, धैर्यवान, जितेंद्रिय, बुद्धिमान, नीतिज्ञ, वक्ता, वैभवसंपन्न, शत्रुनाशक, शुभलक्षणी, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहिततत्पर, ज्ञानसंपन्न, विनयशील, धर्मरक्षक, वेदविद्यापारंगत, धनुर्विद्यापारंगत, शस्त्रास्त्र निपुण, सौम्य प्रकृतीचा, उदार, सर्वांशी समभावाने वागणारा इ.

कुटुंबव्यवस्थेचा आदर्श

एक वाणी, एक पत्नी, एक बाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी स्वत:च्या आचारणातून भारतीय संस्कृतीत जे अनेक वैचारिक सिद्धांत होते, ते दृढमूल केले आहेत. अथर्ववेदात (३.६.३०, १-३) म्हटले आहे, “हे कुटुंबीयांनो, तुमचे हृदय घरातील सर्वांच्या हृदयांशी एकजीव होईल व तुमचे मन घरातील सर्व माणसांच्या मनांशी जुळते राहील, असे मी करतो. पुत्र आपल्या पित्याचे व्रतपालन करणारा होवो. भावाने भावाचा कधीही द्वेष करू नये.” या विचारांचे तंतोतंत पालन प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवनात केले आहे. त्यामुळे हेच विचार समाजात प्रस्थापित झाले. लक्ष्मण आणि नंतर अयोध्येत आलेला भरत हे कैकेयीवर व मंथरेवर भयानक संतप्त होतात. पण श्रीरामांनी कैकेयीचा ना कधी द्वेष केला ना कधी राग केला!

षड्रिपूंवर मात

काम (लैंगिक अथवा अन्य कोणतीही इच्छा), क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर हे अनादी काळापासून सर्व मानवांचे सहा शत्रू आहेत. श्रीरामचंद्रांनी या षड्रिपूंवर मात केली आहे. एकपत्नी व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावले आहे. वास्तविक, त्या काळी बहुपत्नीत्व रूढ होते. माता कैकेयीने जेव्हा राजा दशरथाकडून श्रीरामचंद्रांना वनात पाठविण्याचा निर्णय वदवून घेतला, तेव्हा लक्ष्मण भयंकर संतापतो; पण श्रीराम मात्र शांत असतात. क्रोधाचा अंशही नाही! लक्ष्मणाला उपदेश करताना श्रीराम म्हणतात, (अयोध्याकांड/ ९७/ ५, ६, १६) “हे लक्ष्मण, मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ती मिळणार असेल, ती मी कधीही घेणार नाही. विषमिश्रित अन्नाप्रमाणे ती मला सर्वस्वी त्याज्य आहे. धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वीदेखील मला हवी आहे ती तुमच्यासाठी. बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावे, एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करेन. आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावे किंवा आपल्या प्राणासारख्या प्रिय बंधूवर कोणी प्राणघातक वार करावा का?”

AYODHYA PARVA
अयोध्या : रामराज्याचे द्वार

नास्तिक मतवादी मुनी जाबाली यांनी श्रीरामांना राज्य स्वीकारण्याचा सल्लाही दिला. जाबालीला उत्तर देताना श्रीराम म्हणतात, “प्रथम सत्यपालनाची प्रतिज्ञा करून आता लोभ, मोह अथवा अज्ञानाने विवेकशून्य होऊन मी पित्याच्या सत्याच्या मर्यादेचा भंग करणार नाही.” या विचारांप्रमाणेच श्रीरामांचे आचरण आहे. त्यांच्या विचारात व आचरणात क्रोधाला स्थान नाही. सत्तेच्या मोहाने भल्या भल्या माणसांना ग्रासले आहे. श्रीरामचंद्रांच्या जीवनात सत्तेलाच स्थान नाही, तर सत्तेचा मोह कुठून येणार? सत्तेमुळे अनेक पराक्रमी माणसांना मद म्हणजे माज चढतो. रावण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. रावणवध हा काही सामान्य पराक्रम नाही. त्या वेळी आकाशातून देवही पुष्पवृष्टी करतात व श्रीरामचंद्रांना विष्णूचा अवतार म्हणू लागतात. तेव्हा श्रीराम नम्रपणे म्हणतात, “मी स्वत:ला दशरथचा पुत्र असलेला माणूस समजतो आहे.’’ (आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् । युद्धकाण्ड- ११७. ११). रामाला जर भरताचा मत्सर वाटला असता तर कोणालाही आश्चर्य वाटले नसते, कारण राजसिंहासनावरील वैध हक्क तर गेलाच आणि तो सावत्र भावाला म्हणजे भरताला न मागताच मिळाला! तरीही श्रीरामांचे भरतावरील असलेले प्रेम अद्भुतच म्हटले पाहिजे. श्रीराम आपल्या निर्धाराप्रमाणे वनात जातात, तर भरत श्रीरामांना परत राजसिंहासनावर बसविण्यासाठी चित्रकूट पर्वतावर जातो. दोघेही थोरच! श्रीराम उलट भरतालाच राज्य कसे करावे, याचा उपदेश करून परत पाठवितात. राज्यासाठीच्या लढाया व रक्तपात यांनीच जगाचा इतिहास भरला असताना श्रीरामचंद्रांच्या आचरणातून हा नवीनच विचार संपूर्ण जगाला मिळाला.

भरत आणि श्रीराम यांच्यातील वाद जर काही असेलच तर तो हा आहे की, दोघेही एकमेकांना आग्रह करत आहेत की, मी नाही तू राजा हो... रामायण जगभर पसरले ते हा नवा विचार घेऊन. म्हणूनच मंदोदरीने श्रीरामचंद्रांना महान योगी, विष्णूचा अवतार (युद्धकाण्ड / १११/११) इ. विशेषणांनी संबोधले आहे, ते योग्यच आहे.

क्रियासिद्धिः सत्वे भवति।

श्रीरामचंद्रांनी कोणतीही साधन सामग्री नसताना रावणाला ठार मारले, हेही अद्भुत आहे. सीतेचे हरण झाले, तेव्हा फक्त दोनच योद्धे होते. राम आणि लक्ष्मण! पण नंतर असंख्य वानरांना जोडून समुद्रावर अशक्यप्राय वाटणारा पूल बांधून रावण व अन्य राक्षसांचा वध केला. सफलता व यश हे साधनांवर अवलंबून नसते; तर ते आपल्यातील सत्त्व गुणांवर अवलंबून असते.

सत्तेचा अजिबात मोह नाही

श्रीरामांना सत्तेचा अजिबात मोह नाही. श्रीरामांनी अयोध्येला परत यावे व सिंहासनावर बसावे, असा आग्रह वास्तविक भरतच करत असतो. पुढे वालीचा वध केल्यावर श्रीरामांनी किष्किंधेचे राज्य सुग्रीवालाच दिले. स्वत: बळकावले नाही. लंकेवर विजय मिळविल्यावर ते राज्य वास्तविक श्रीरामांचेच होते. पण त्यांनी बिभीषणालाच राज्याभिषेक केला.

AYODHYA PARVA
देवनागरीतील पहिल्या भगवद्‌गीतेची छपाई कोठे व कशी झाली?

पुरी केली प्रतिज्ञा

राज्याभिषेकच्या दिवशीच दशरथ श्रीरामांना त्यांच्या महालात बोलवितात. धूर्त कैकेयी म्हणते, “महाराजांना तुला काही सांगायचे आहे. पण तू नक्की त्यांच्या आज्ञेचे पालन करशील ना?” दशरथ काहीही सांगण्यापूर्वीच श्रीराम घोर प्रतिज्ञा करतात, “मी वडिलांच्या आज्ञेने आगीतही उडी घेईन, विषही खाईन. महाराजांनी काहीही सांगावे. मी प्रतिज्ञा करतो की मी ते पूर्ण करीन. राम एकदाच बोलत असतो.” नंतर भरताला राज्य देणे व श्रीरामांनी वनवासात जाणे, हा विषय दशरथ व कैकेयी काढतात. श्रीरामांनी पुरी केलेली हीच ती प्रतिज्ञा. सिंहासनाचा एका क्षणात त्याग करून चौदा वर्षे वनवासात राहण्याची श्रीरामांनी प्रतिज्ञा केलेली असते. याचे त्यांनी शब्दश: पालन कसे केले, ते बघण्यासारखे आहे. वाटेत श्रुंगवेरपूर हे गुह नावाच्या राजाचे राज्य लागते. हा गुह तर श्रीरामांचा प्राणासमान प्रिय असा मित्र असतो. अर्थातच तो श्रीरामांना नगरीत बोलावून उत्तमोत्तम भोजन व विश्रांतीला गाद्या देऊ करतो. श्रीराम ते नाकारतात. का? तर, फळे आणि कंदमुळे खाऊन वनात राहण्याची प्रतिज्ञा असते! असेच पुढे किष्किंधा नगरीत व लंकेच्या नगरीत जायचा प्रसंग येतो तेव्हा घडते. वालीवधांनंतर सुग्रीवाला आणि रावणवधानंतर बिभीषणाला राज्याभिषेक करण्यासाठीही श्रीराम स्वत: राजधानीच्या नगरीत गेले नाहीत. या दोन्ही राज्याभिषेकांना उपस्थित राहण्यासाठी श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणालाच राजधानीच्या नगरात पाठवले आहे. राज्याभिषेकांच्या या सर्व प्रसंगी श्रीरामांचा किती आदर सत्कार झाला असता बरे! पण नाही, वनवास म्हणजे वनवास!

प्रजेवर अद्‍भुत प्रेम

श्रीरामांचे प्रजेवर व प्रजेचे श्रीरामांवर किती प्रेम असावे? श्रीराम वनवासाला जायला निघाले तेव्हा अयोध्येची प्रजाही त्यांच्याबरोबर वनवासात जायला निघाली. श्रीरामांनी लोकांना परोपरीने विनविले व सांगितले की, जी प्रीती माझ्यावर करता ती भरतावर करा. पण लोक माघारी फिरेचनात! शेवटी पहिल्या मुक्कामात प्रजाजन झोपले असतानाच श्रीरामांना कर्तव्यबुद्धीने त्यांना सोडून देऊन पुढील प्रवासासाठी जाणे भाग पडले. राजा व प्रजा यांचे एकमेकांवर किती प्रेम असू शकते हे जगाने श्रीरामचंद्रांच्या आचारणातूनच शिकावे!

समरसतेचे अग्रदूत

वनवासाला जाताना वाटेत श्रुंगवेरपूर हे गुह नावाच्या राजाचे राज्य लागते. या गुहाचा जन्म निषाद कुळात म्हणजे आजच्या भाषेत समाजाच्या वंचित घटकात झाला होता. तो श्रीरामांचा प्रिय मित्र असतो. श्रीरामांनी ज्यांना स्वत:च्या बरोबरीचे स्थान दिले, त्यात गुहाचे स्थान श्रेष्ठ आहे. श्रीरामांनी पुढे वानर, अस्वल, गृध्र इ. समाजाला जोडले. वानर म्हणजे चार पाय व शेपूट असलेले प्राणी नव्हेत, तर ते वनात राहणारे लोक होते. ते आर्यच होते. आजही मातंग समाज स्वत:ला वाली, सुग्रीव, हनुमंत यांचे वंशज मानतो. शबरी याच समाजाची असून ती मतंग ऋषींची शिष्या होती. तिच्या हातची उष्टी बोरेही श्रीरामांनी खाल्ली.

AYODHYA PARVA
गांधीजींच्या मनातील रामराज्य

स्त्री सन्मान सुसंस्कृतीचे प्रतीक

श्रीरामांनी क्षणिक सुखाचा त्याग करून कर्तव्यापासून आपले पाऊल तिळमात्रही ढळू दिलेले नाही. श्रीरामांच्या जीवनात सुखाचा पेला ओठांजवळ यावा आणि कुणीतरी तो सांडून टाकावा, असे नेहमीच घडले. थोर पुरुष नेहमीच संकटांवर मात करून पुढे येत असतात. जगात असलेल्या अशा उदाहरणांमध्ये श्रीरामांचे उदाहरण क्रमांक एकवर आहे. सीतेला शोधून काढून रावण वधापर्यंतचे केलेले कार्य हे स्त्रीला सन्मान मिळवून दिल्याचे दुर्मिळ उदाहरण आहे.

मदत करणाऱ्यांविषयी कृतज्ञता

सीता सापडल्याचे वृत्त हनुमानानेच श्रीरामांना सांगितले. तेव्हा श्रीराम म्हणतात, “आज तुला पुरस्कार देण्यासाठी माझ्याजवळ योग्य वस्तू नाही, याचे मला वाईट वाटते. मी केवळ प्रगाढ आलिंगन देऊ शकतो.” श्रीरामांनी हनुमंताला सारे काही दिले. बिभीषण रावणाचा पक्ष सोडून श्रीरामांकडे येतो, तेव्हा त्याला सामावून घ्यायला वानरश्रेष्ठी तयार नसतात. कारण खरे खोटे कळायला काहीही मार्ग नसतो. परंतु जो कोणी मला शरण आला आहे, त्याला मी अभय देणार, हे खरोखर केवळ परमेश्वरच घेऊ शकेल, अशी भूमिका घेऊन श्रीराम त्याला आश्रय देतात.

AYODHYA PARVA
सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार

शत्रूनेही केली स्तुती

शूर्पणखेचे नाक व कान कापल्यावर ती रावणाकडे श्रीरामांची तक्रार घेऊन जाते. त्यावेळी ती रामाच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणते, “ते महाबली राम युद्धस्थळी केव्हा धनुष्य खेचतात, केव्हा भयंकर बाण हातात घेतात आणि केव्हा त्यांना सोडतात, हे मी पाहू शकत नाही. श्रीराम एकटे आणि (विनावाहन) अनवाणी पायाने उभे होते, तरीही त्यांनी दीड मुहूर्तामध्येच (तीन घटकामध्येच) खर आणि दूषणसहित चौदा हजार भयंकर बलशाली राक्षसांचा तीक्ष्ण बाणांनी संहार करून टाकला. आत्मज्ञानी महात्मा श्रीरामांनी स्त्रीचा वध होईल, या भयाने एकमात्र मला कुठल्या तरी रीतीने केवळ अपमानित करूनच सोडून दिले.” सीतेचे (अप)हरण करण्यासाठी सुवर्णमृग हो, असा दबाव मारीच राक्षसावर रावण आणतो. त्यावेळी मारीच रावणाला या दुष्कृत्यापासून परावृत्त हो, असा उपदेश तर करतोच, शिवाय श्रीरामांच्या पराक्रमाचे वर्णनही करतो. जसे इंद्र समस्त देवतांचे अधिपति आहेत, त्याच प्रकारे श्रीरामही संपूर्ण जगताचे राजे आहेत. त्याही पुढे जाऊन श्रीराम म्हणजे मूर्तिमान धर्म आहेत. (रामो विग्रहवान् धर्म:।) असे प्रशस्तिपत्रकही मारीच देतो.

मृत्युशय्येवर पडलेल्या रावणाला त्याची पत्नी मंदोदरी विलाप करताना म्हणते, “निश्चितच हे श्रीरामचंद्र महान योगी तसेच सनातन परमात्मा आहेत, त्यांना आदि, मध्य आणि अंत नाही. हे महानाहून महान, तसेच सर्वांना धारण करणारे परमेश्वर आहेत. जे आपल्या हातात शङ्‌ख, चक्र आणि गदा धारण करतात, त्या सत्यपराक्रमी भगवान्‌ विष्णूंनीच समस्त लोकांचे हित करण्याच्या इच्छेने मनुष्याचे रूप धारण करून आपला वध केला आहे.” (युद्धकाण्ड सर्ग १११/ ११- १४) मरणान्तानि वैराणि हे तत्त्व आपण श्रीरामांच्या आचारणातून शिकतो. रावणवध झाल्यावर श्रीरामचंद्रानी बिभीषणास म्हटले, “रावणाच्या या स्त्रियांना धीर द्या आणि आपल्या भावाचा दाहसंस्कार करा.” पण बिभीषण एकदम तयार होत नाही. तो श्रीरामांना म्हणतो, “ज्याने धर्म आणि सदाचाराचा त्याग केलेला होता, जो क्रूर, निर्दयी, असत्यवादी तसाच परस्त्रीला स्पर्श करणारा होता, त्याचा दाहसंस्कार करणे मी उचित समजत नाही.” त्यावर श्रीरामांनी दिलेल्या उत्तरात खूप काही शिकण्यासारखे आहे. श्रीराम म्हणतात, “वैर मरणापर्यंतच राहाते. मरणानंतर त्याचा अंत होतो. आता आपले प्रयोजनही सिद्ध होऊन चुकले आहे. म्हणून यासमयी जसा हा तुमचा भाऊ आहे तसाच माझाही आहे; म्हणून याचा दाहसंस्कार करा. (युद्धकांड /१११ /१००) केवढे हे विशाल मन! प्रभू श्रीरामचंद्रांच्या आचरणातून निर्माण झालेले विचार हे जगाला दीपस्तंभासारखे ठरले आहेत.

-डॉ. गिरीश आफळे

(लेखक अयोध्या व रामजन्मभूमी विषयाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com