

Election Forecasting Methodology
esakal
नव्वदीच्या दशकात निवडणूक निकालाच्या अंदाजात अचूकता नसली तरी सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांची विश्वासार्हता होती; पण यथावकाश निवडणूकपूर्व सर्वेक्षण, जनमत चाचणी आणि मतदानोत्तर कलचाचणी ही राजकारणाच्या रणांगणातील महत्त्वाची शस्त्रे ठरली.
निवडणुकांमधील एक्झिट पोल आणि अॅथलेटिक्समधील पोल व्हॉल्ट (बांबू उडी) यांच्यात एक ठळक साधर्म्य आहे. अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर दूर अंतरावर उंच पोलवरील आडवा बार अलगद उडी मारून पार करण्यासाठी हातात फायबर ग्लासचा बांबू घेऊन धावत सुटणारा अॅथलिट आणि निवडणुकांमध्ये मतदान करून बाहेर पडणाऱ्या असंख्य मतदारांचा कल समजून घेत त्याआधारे संख्याबळाचा निष्कर्ष काढणारा निवडणूकतज्ज्ञ यांचे काम अतिशय कौशल्याचे आणि तेवढेच जोखमीचे असते. निश्चित केलेली उंची पार करण्यासाठी अॅथलिटला अंगी भौतिकशास्त्र भिनवावे लागते, तर समूहाच्या मानसशास्त्राचे आकड्यात रूपांतर करण्यासाठी निवडणूकतज्ज्ञाला अनुभव आणि कसब पणाला लावावे लागते. अॅथलिट आणि निवडणूक तज्ज्ञ नेमके काय साध्य करतील याच्या प्रतीक्षेत प्रेक्षकांची उत्कंठा ताणली जाते. उंच पोलवर लागलेला आडवा बांबू सहजतेने ओलांडणारा अॅथलिट सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरतो, तसाच निवडणूक निकालाचे अचूक भाकीत वर्तविणारा निवडणूक तज्ज्ञही राजकीय वर्तुळात एका रात्रीतून प्रतिष्ठा मिळवितो. पण पोलवर लागलेला आडवा बांबू धक्का लागून पडताच प्रेक्षकांचे त्या ॲथलिटविषयीचे स्वारस्य संपुष्टात येते. अंदाज वर्तविल्याप्रमाणे निवडणूक निकाल लागला नाही की निवडणूकतज्ज्ञाचीही समाजात अपयशी ॲथलीटसारखीच अवस्था होते. कौशल्याच्या या दोन्ही प्रकारांमध्ये यशाइतकीच अपयशाची शक्यताही समान असते. प्रत्येकवेळी कौशल्याच्या कसोटीला नव्याने सामोरे जाताना मागची कामगिरी दोघांच्याही कामात येत नाही. दोघांमध्ये फरक एवढाच की बांबू उडीत निष्णात अॅथलिटचे यशापयश निर्भेळ मानले जाते. पण एक्झिट पोलमध्ये तरबेज निवडणूक तज्ज्ञाचे निष्कर्ष चुकले की त्याने वर्तविलेल्या अंदाजामागच्या राजकीय हेतूंविषयी शंका उपस्थित केल्या जातात.