

Mi Savitribai Jotirao Phule Serial
esakal
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेची कथा येथे संपत नाही. उलट, या मालिकेने दाखवून दिले आहे, की विचारांना टीआरपीची मर्यादा नसते. समाजाच्या मनात घर करणारे विचार नव्या माध्यमांतून अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचत राहतात. फुले दांपत्याच्या विचारांवर असलेले जनतेचे प्रेम आणि यूट्यूबवरील अभूतपूर्व प्रतिसाद हेच या प्रवासाचे खरे यश आहे.
स्टार प्रवाह’वरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका प्रसारणातून थांबली असली, तरी तिच्याभोवती निर्माण झालेली सामाजिक चळवळ आणि जनभावना अधिक ठळकपणे समोर येत आहेत. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याचे समजताच राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिक्रिया उमटल्या.
या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ मनोरंजनाचा भाग नव्हती. फुले दांपत्याचा संघर्ष, शिक्षणासाठीचा लढा, स्त्री-मुक्तीची चळवळ आणि सामाजिक समतेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम या मालिकेने केले. त्यामुळे तिची किंमत केवळ दैनंदिन टीआरपीच्या आकड्यांमध्ये मोजता येत नाही. उलट, ही मालिका भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्त्वाचा दृश्य दस्तऐवज किंवा ‘अर्काइव्ह व्हॅल्यू’ असलेला सांस्कृतिक ठेवा ठरू शकते.