काय आहे TReDS? सुमारे ४५,००० व्यावसायिकांनी ‘टीआरईडीएस’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन का केले?

२०१८ पासून रिझर्व्ह बँकेने ‘एमएसएमई’ उद्योजकांसाठी ‘टीआरईडीएस’ ही सुविधा सुरू केली आहे..
TREDS
TREDSesakal

सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com


आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असून, नजीकच्या भविष्यात ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत.

त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचेही दिसून येत आहे. देशाच्या आर्थिक विकासात मोठ्या उद्योगांप्रमाणे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचादेखील (मायक्रो, स्मॉल व मीडियम एंटरप्रायजेस- एमएसएमई) मोठा सहभाग असणे गरजेचे असते.

‘एमएसएमई’ क्षेत्राचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी २००६ मध्ये ‘एमएसएमई’ (मायक्रो, स्मॉल व मीडियम एंटरप्रायजेस) कायदा संमत करून त्यानुसार ‘एमएसएमई’साठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले.

या खात्यामार्फत केंद्र व राज्य सरकारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देतात. सध्या भारतात सुमारे ६३५ लाख सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योजक असून, यातील सुमारे ५१ टक्के ग्रामीण भागात आहेत.

‘एमएसएमई’च्या माध्यमातून आपल्या देशात सुमारे ३.७५ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. मात्र, ‘एमएसएमई’ उद्योगांना आवश्यक असणारे पुरेसे अर्थसाह्य वाजवी दरात व सहजगत्या वेळेवर मिळतेच असे नाही आणि मिळाले, तरी ते उत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते.

‘एमएसएमई’ आपले उत्पादन अथवा सेवा सर्वसाधारणपणे मोठ्या उद्योगांना विकत असले, तरी ही विक्री रोखीने न होता उधारीवर करावी लागते. ही उधारी साधारणपणे ३० दिवसांपासून ते ९० दिवसांपर्यंत असू शकते.

व्यावसायिक गरज म्हणून ‘एमएसएमई’ उद्योजक रोखीने विक्री करण्याबाबत आग्रही राहू शकत नाहीत, परिणामत: खेळत्या भांडवलात सातत्य ठेवणे त्यांना कठीण होते.

यावर उपाय म्हणून २०१८ पासून रिझर्व्ह बँकेने ‘एमएसएमई’ उद्योजकांसाठी ‘टीआरईडीएस’ (TReDS) अर्थात ‘ट्रेड रीसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीम’ ही सुविधा सुरू केली आहे.

‘टीआरईडीएस’(TReDS) म्हणजे?

‘टीआरईडीएस’ (TReDS) हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, इथे ‘एमएसएमई’ उद्योजक आपल्या उधारीवर विकलेल्या मालाची किंवा सेवेची बिले ‘डिस्काउंट’ करून घेऊ शकतात, यामुळे ‘एमएसएमई’ उद्योजकास माल विकताना देऊ केलेल्या उधारी काळापर्यंत रक्कम मिळण्यासाठी थांबावे लागत नाही व व्यवसायातील खेळत्या भांडवलाची सातत्यता राखता येते आणि उत्पादन अव्याहतपणे सुरू ठेवता येते.

‘एमएसएमई’ उद्योजकाने मोठ्या उद्योजकास उधारीवर विकलेल्या मालाची बिले डिस्काउंट करून आपले उत्पादन चालू ठेवावे, हा या प्लॅटफॉर्ममागचा मूळ उद्देश आहे.

इनव्हॉईस डिस्काउंटिंग

आता आपण बिल किंवा इनव्हॉईस डिस्काउंटिंगबाबत सविस्तर माहिती घेऊ. एखादा उत्पादक आपले उत्पादन किंवा सेवा दुसऱ्या कंपनीस उधारीवर विकत असतो, तेव्हा त्याचे बिल खरेदीदाराच्या नावाने काढत असतो व सोबत ‘इनव्हॉईस’ व डिलिव्हरी चलन किंवा ट्रान्स्पोर्ट रीसीट जोडत असतो.

‘इनव्हॉईस’मध्ये मालाचा तपशील (जसे, दर, क्वांटिटी, जीएसटी नंबर आदी) दिलेला असतो; तसेच बिलामध्ये किती दिवसांची उधारी देऊ केलेली आहे, याचाही उल्लेख असतो.

असे बिल विक्रेता आपल्या बँकेकडे देऊन त्याच्या मोबदल्यात बँकेकडून डिस्काउंट वजा करून मिळणारी रक्कम लगेचच घेत असतो.

देय तारखेला खरेदीदाराकडून बँकेला पेमेंट केले जाते व यातून बँकेने दिलेले अल्प मुदतीचे कर्ज (बिलाच्या तारखेपर्यंतचे) बँक वसूल करून घेते. थोडक्यात, विक्रेता, खरेदीदार व बँक असे तीनजण या व्यवहारात सहभागी असतात.

‘टीआरईडीएस’ची (TReDS) वैशिष्ट्ये

- ‘एमएसएमई’ विक्रते, खरेदीदार मोठ्या कंपन्या, बँका या ‘टीआरईडीएस’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संलग्न असतात.
- बिल किंवा इनव्हॉईस डिस्काउंटिंगचा संपूर्ण व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होतो.
- कोणतीही कागदपत्रे प्रत्यक्षात द्यावी लागत नाहीत.
- बँकांतील स्पर्धेमुळे डिस्काउंट रेट परवडणारे असतात.
- कार्यप्रणाली बँकेनुसार बदलत नाही. (स्टॅंन्डर्ड प्रोसिजर)
- २४ ते ७२ तासांत विक्रेत्याच्या खात्यात रक्कम जमा होते.
- या खेळत्या भांडवलास तारण द्यावे लागत नाही.

- बिलाचा उधारी कालावधी (क्रेडिट पिरियड) जितका कमी असेल, त्याप्रमाणात जास्त वेळा डिस्काउंटिंगचा फायदा घेता येतो. याचा फायदा व्यवसायाचा ‘टर्नओव्हर’ वाढविण्यासाठी होतो.


‘टीआरईडीएस’ प्लॅटफॉर्मवरील डिस्काउंटिंग

सध्या भारतात रीसिव्हेबल एक्स्चेंज ऑफ इंडिया लि., ट्रेडस लि. (इनव्हॉईस मार्ट) व माइंड सोल्युशन प्रा. लि. असे तीन रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त ‘टीआरईडीएस’ (TReDS) प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत.

‘एमएसएमई’ क्षेत्रातील उद्योजकास वरीलपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे लागते; तसेच ज्या कंपनीला माल विकला आहे, ती कंपनीसुद्धा याच प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असणे आवश्यक असते. अनेक बँकासुद्धा या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असतात.


समजा, ‘एबीसी’ नावाची एक मध्यम उत्पादक कंपनी टाटा मोटर्सला मोटारीसाठी लागणारे इलेक्ट्रिकल मटेरियल पुरवित आहे. नुकतेच म्हणजे २१ डिसेंबर २०२३ रोजी २५ लाख रुपयांच्या किमतीचे इलेक्ट्रिकल मटेरियल या कंपनीने टाटा मोटर्सला पुरविले आहे व तसे बिल टाटा मोटर्सला दिले आहे.

त्यासोबत इनव्हॉईस व टाटा मोटर्सने मटेरियल स्वीकारले असल्याची पोचपावतीही (डिलिव्हरी चलन) जोडली आहे. बिलाचा क्रेडिट पिरियड (उधारी कालावधी) ४५ दिवस आहे.

कंपनी ‘एबीसी’ व ‘टाटा मोटर्स’ या दोन्ही कंपन्या रीसिव्हेबल एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (RXIL) या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर आहेत, तर कंपनी ‘एबीसी’ हे टाटा मोटर्सवर काढलेले बिल रीसिव्हेबल एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (RXIL) या प्लॅटफॉर्मवर अपलोड करेल व लगेचच प्लॅटफॉर्मवर रजिस्टर असलेल्या बँकांना हे बिल नजरेस येईल व यातील ज्या बँकांना हे बिल डिस्काउंट करावयाचे असेल, अशा सर्व बँका आपण काय दराने डिस्काउंट करू याचा कोट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात.

आता कंपनी ‘एबीसी’ कमीतकमी दराने डिस्काउंट करण्यास तयार असलेल्या बँकेस आपला होकार कळविते. होकार दिल्यापासून ७२ तासांच्या आत कंपनी ‘एबीसी’च्या बँक खात्यात डिस्काउंट वजा जाता येणारी रक्कम जमा होते.

समजा, स्टेट बँकेने १० टक्के दराने डिस्काउंटचा कोट दिला व तो कंपनी ‘एबीसी’ने स्वीकारला, तर कंपनीच्या बँक खात्यावर २४ लाख ६९ हजार ३७२ रुपये ही रक्कम स्टेट बँकेकडून जमा केली जाईल.

थोडक्यात, डिस्काउंटपोटी कंपनीचे ३०,६२८ रुपये स्टेट बँकेला मिळाले. देय तारखेआधी एक-दोन दिवस (या बिलाच्या बाबतीत ता. ०४/०२/२०२४) स्टेट बँक याची नोटीस टाटा मोटर्सला देऊन देय तारखेस बिलाचे पेमेंट करण्यास सांगेल. देय तारखेस टाटा मोटर्सने २५ लाख रुपयांचे पेमेंट केल्यावर स्टेट बँकेचा हा अल्पकालीन कर्जव्यवहार वसूल होईल.

डिस्काउंटचा रेट हा ज्या कंपनीसाठी बिल काढले आहे, त्या कंपनीचे बाजारातील स्थान व आर्थिक सक्षमता यावर अवलंबून असते; तसेच संबंधित बँकेच्या धोरणावर अवलंबून असते.

असे असले, तरी बँकांतील स्पर्धात्मक वातावरणामुळे ग्राहकांना कमी दराने डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो.

TREDS
संधी नोकरीची : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील वाट 

‘टीआरईडीएस’चे (TReDS) लाभ

विक्रेत्यास होणारा फायदाः

- बिलाच्या तारखेपर्यंत (जो कालावधी ३० ते ९० दिवस इतका असू शकतो.) पैशासाठी थांबावे लागत नाही. डिस्काउंटची किरकोळ रक्कम वजा जाता, बिलाची उर्वरित रक्कम लगेचच मिळत असल्याने
- खेळत्या भांडवलाची समस्या राहात नाही.
- सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने कालापव्यय होत नाही व व्यवहार पारदर्शी असतात.
- स्पर्धात्मक वातावरणामुळे डिस्काउंट रेट परवडणारा असतो.

खरेदीदारास होणारा फायदाः

- खरेदीदार ‘टीआरईडीएस’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संलग्न असल्याने डिस्काउंटिंगचा व्यवहार सुलभरित्या होतो; तसेच देय तारखेला पेमेंटही सुरळीतपणे होत असल्याने पुढील मालसुद्धा वेळेत मिळत राहतो व यामुळे उत्पादनात खंड पडत नाही.
- खरेदीदारास आपल रोखीचा प्रवाह (कॅश फ्लो) मॅनेज करता येतो.
- होणारा व्यवहार ऑनलाइन व पारदर्शी होत असल्याने वेगळे रेकॉर्ड ठेवावे लागत नाही.

बँका/‘एनबीएफसीं’ना होणारा फायदाः

- अल्प मुदतीचा व सेल्फ लिक्विडेटिंग फायनान्स मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो. अशा कर्ज व्यवहारात तुलनेने जोखीम कमी असते व यातून डिस्काउंटच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न नफा वाढविण्यास उपयोगी पडते.
- होणाऱ्या व्यवहारांची संख्या जास्त असली, तरी ऑपरेशनल कॉस्ट कमी असते.
- व्यवसायवाढीस चालना मिळते.
- यामुळे बोगस; तसेच डुप्लिकेट बिले डिस्काउंट होऊ शकणार नाहीत.

सध्या सुमारे ४५,००० ‘एमएसएमईं’नी ‘टीआरईडीएस’ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन केले असून, नजीकच्या भविष्यात यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. थोडक्यात, ‘टीआरईडीएस’ (TReDS) ऑनलाइन प्लॅटफॉर्म ही ‘एमएसएमईं’साठी एक उपयुक्त सुविधा आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत. मोबाईल ९४२३००२०१४)
--------

TREDS
महाराष्ट्राच्या नारीशक्तीचा देशात डंका! सर्वाधिक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजिका आपल्या राज्यात;

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com