Mahesh Bardapurkar writes about TET scam
Mahesh Bardapurkar writes about TET scam Sakal

टीईटी गैरव्यवहार : कहांसे शुरू करू!

मध्य प्रदेशातील व्यापम गैरव्यवहारात हेच उघड झालं होतं आणि आता महाराष्ट्रातील पेपर फुटीची प्रकरणं आणि टीईटी गैरव्यवहार याच दिशेनं जातं आहे.

शिक्षण ही देशातील सर्वांत मोठी ‘इंडस्ट्री’ आहे आणि तिथून बाहेर पडलेलं ‘प्रॉडक्ट’, म्हणजे विद्यार्थी देशाची सर्वांत मोठी संपत्ती आहे. मात्र, या संपत्तीच्या जोरावर संपत्ती उभी करणारे, गैरव्यवहार करणारे आणि ही इंडस्ट्री भ्रष्ट करणारे अनेक आहेत व त्यात शिक्षण संस्था, शिक्षक, पोलिस, राजकारणी आणि विद्यार्थीही आहेत! मध्य प्रदेशातील व्यापम गैरव्यवहारात हेच उघड झालं होतं आणि आता महाराष्ट्रातील पेपर फुटीची प्रकरणं आणि टीईटी गैरव्यवहार याच दिशेनं जातं आहे. अशा गैरव्यवहारांतील मोडस ऑपरेंडी आणि त्याचा ‘अपेक्षित’ शेवटाबद्दल...

शिक्षण हा पवित्र क्षेत्र मानलं जातं. शिक्षकांना गुरुजन म्हटलं जातं. विद्यार्थी आज्ञाधाकरपणे शिक्षकांचं म्हणणं शिरसावंद्य मानत शिक्षण घेतात, प्रगती साधतात, शिक्षण पूर्ण करीत नोकरी स्वीकारतात अथवा एखाद्या व्यवसायात पडतात. शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांना फीच्या बदल्यात चांगल्या सेवा देतात व काही चांगल्या संस्था प्लेसमेंटद्वारे नोकरीची द्वारंही खुली करून देतात. हा सगळा व्यवहार देशभरात सर्वत्र होतो आणि यात कोणताही गैरप्रकार होत असेल, याबद्दल कोणत्या मनात कधी शंकाही येत नव्हती आणि तसं कोणतंही कारणही नव्हतं.

Mahesh Bardapurkar writes about TET scam
स्मार्ट लोकांसाठी स्मार्ट मीटर! प्री पेड मीटरचा इतिहास, जाणून घ्या

मोठे गैरप्रकार-

शिक्षण व्यवस्था स्वच्छ आहे, असं गृहित धरलं तरी सर्वकाही अलबेल होतं असंही म्हणायची सोय नाही. पेपर फुटणं, कॉप्या करणं, पैसे देऊन मार्क वाढवून घेणं, शिक्षकांनी खासगी क्लासेस घेऊन आपल्या क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देणं या गोष्टी कमी-अधिक प्रमाणात घडतच होत्या. शिक्षणाचं खासगीकरण झाल्यानंतर हे प्रकार वाढले. काही ठिकाणी परीक्षा व उत्तीर्ण होण्याचे ‘पॅटर्न’ही तयार झाले. दुसरीकडं शिक्षणाच्या बाजारात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आणि गैरव्यवहारांना धुमारे फुटू लागले.

भरमसाट फी आणि स्पर्धा-

शिक्षणाचं खासगीकरण झालं, तसं शैक्षणिक शुल्क (फी) हा प्रकार सामान्यांच्या हाताबाहेर गेला. इंजिनिअरिंग व मेडिकलच्या फी भरणं सामान्यांना मोठं कर्ज काढल्याशिवाय शक्यच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आधी भरमसाट फी भरायची, जिवापाड मेहनत घेऊन अभ्यास करायचा...मात्र, बाहेर मोठी स्पर्धा असल्यानं नोकरीची शाश्‍वती नाही. त्यात एकेका मार्कासाठी स्पर्धा आणि बाजारात त्याचं मूल्य अत्यंत कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अधिक मार्क मिळावेत म्हणून काही गैरप्रकार होऊ लागले, पेपर फोडणं, कॉप्या करणं, पैसे देऊन मार्क वाढवून घेणं, काही ठिकाणी तर दुसऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसवणं हेही प्रकार सर्रास घडू लागले. त्याच्या जोडीला उत्तीर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी लागावी म्हणून पैसं देणं, हाही प्रकार बळ धरू लागला. आता हे दुष्टचक्र शिक्षण व्यवस्थेचा भागच बनून गेलं आहे.

Mahesh Bardapurkar writes about TET scam
दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

व्यापम गैरव्यवहार-

मध्य प्रदेशात उघड झालेला (अर्थात, इतर राज्यांत तो उघड झाला नाही इतकंच, सुरू सर्वत्रच आहे.) ‘व्यापम’ गैरव्यवहार शिक्षण व्यवस्थेच्या बाजारीकरणाचं आदर्श उदाहरण ठरलं आणि महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यांतील पेपरफुटीपासून शिक्षण भरतीपर्यंतच्या अनेक गैरव्यवहारांची दिशा तीच असल्याचं दिसून येतं आहे. नुकतीच ‘व्यापम’ गैरव्यवहारावर आधारित ‘व्हिसलब्लोअर’ ही वेबसिरीज ‘सोनी लिव्ह’ या ‘ओटीटी’ प्लॅफॉर्मवर प्रदर्शित झाली. या गैरव्यवहाराची सुरवात अर्थातच सर्वाधिक कमाई असलेल्या वैद्यकीय शिक्षणापासून सुरू झाली व नंतर ती सर्वच क्षेत्रांत पसरली. आधी मेडिकलला प्रवेश मिळण्यासाठी लॉबिंग, गैरव्यवहार. त्यासाठी प्रवेश परीक्षेत मार्क वाढवून मिळण्यासाठी क्लृप्त्या लढवायच्या, आपल्या जागी दुसऱ्याच विद्यार्थ्याला परीक्षेला बसवायचं व परीक्षा पास होऊन प्रवेश मिळवायचा, हे मध्य प्रदेशात सर्रास होत राहिलं, अगदी २००४ पासून. खासगी महाविद्यालयात पैसे देऊन प्रवेश मिळतो, मात्र मेडिकलचा अत्यंत अवघड अभ्यासक्रम झेपत नाही म्हणून पुन्हा गैरव्यवहार. आपल्या जागी दुसऱ्याच विद्यार्थ्याला परीक्षेला बसवणं, पेपर तपासणाऱ्याला पैसे देणं असे प्रकार. अशा पद्धतीनं उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरकारी दवाखान्यांत आणि खासगी प्रॅक्टिस करू लागल्यावर आरोग्यव्यवस्थेची दैना न उडाल्यासच नवल. मध्य प्रदेशात हाच प्रकार सबइन्स्पेक्टर भरतीसाठीही होऊ लागला. खासगी संस्थांनी मुलांना ट्रेनिंग देणं आणि त्यात पास करून घेण्यासाठी स्वतःचे कॅम्प सुरू करण्यापर्यंत मजल केली. राजकारणी, पोलिस यांच्या मदतीच्या हाताशिवाय हे शक्यच नव्हतं. डॉक्टर होण्यासाठी ५० लाख आणि सबइन्स्पेक्टर होण्यासाठी ३५ लाखाचं दरपत्रकच छापलं जाऊ लागलं. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन व्यवस्थेचा भाग बनू लागले व ही साखळी वाढतच गेली. गैरव्यवहार हजारो कोटी रुपयांच्या घरात गेला. एका वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या मालकाला याची कुणकूण लागली आणि त्यानं आवाज उठवताच त्याची हत्या झाली. त्याच्या मुलानं व्हिसलब्लोअर बनत या घटनेविरूद्ध आवाज उठवला. प्रकरण संस्थाचालकांकडून पोलिसांपर्यंत व नंतर यथावकाश राजकारण्यांपर्यंत जाऊन पोचलं. चौकशीचं फार्स रंगला. आवाज उठवू पाहणाऱ्यांना तंबी दिली जाऊ लागली व तरीही गप्प न बसणाऱ्यांचे संशयास्पद मृत्यू होऊ लागले. असे ७०पेक्षा अधिक मृत्यू झाले, मात्र कोणालाही थेट शिक्षा होऊ शकली नाही!

Mahesh Bardapurkar writes about TET scam
पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र-

मध्य प्रदेशातील ‘व्यापम’ गैरव्यवहाराबद्दल वाचताना तुम्हाला महाराष्ट्रात सध्या परीक्षा आणि शिक्षण भरतीमध्ये घडत असलेल्या गैरव्यवहारांची नक्कीच आठवण येईल. राज्यात दररोज बाहेर येणारे परीक्षेतील शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार, त्यात सापडणारी बडी नावं, त्यातून शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांवरही जाणारी संशयाची सुई हे वातावरण अगदी ‘व्यापम’ सारखंच. टीईटी (टिचर्स इलिजिबिलिटी टेस्ट) या परीक्षेतील गैरव्यवहारानं महाराष्ट्र हादरला आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यापर्यंत ही साखळी जाऊन पोचली आहे. सुमारे ७८०० पात्र नसलेल्या विद्यार्थांना पास करून शिक्षणव्यवस्थेत आणलं गेलं आहे! हे पात्रता नसलेले शिक्षक आता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहेत, हा यातील सर्वांत गंभीर भाग. पेपर फुटीला जसं खासगी संस्थेला जबाबदार धरलं जात आहे, तसंच इथंही होत आहे. मात्र, व्यापम गैरव्यवहारात दिसून आलं, तसं या जोडीला पोलिस आणि राजकारण्यांचा हात नसल्यास असं मोठे गैरव्यवहार करणं अशक्य असतं. राज्यातील टीईटी गैरव्यवहाराबाबत सरकारला उत्तर देता येत नाही आणि विरोध पक्ष आवाज उठवत नाही, ही परिस्थिती नक्की काय दर्शवते? या गैरव्यवहाराची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत, यात कोण कोण सहभागी आहे, किती पैसे मोजले गेले आहेत याचं उत्तर मिळायला हवीतच. त्याच्या जोडीला उत्तीर्ण होऊन शिक्षण व्यवस्थेत आलेल्या या शिक्षकांचं नक्की काय करायचं, हेही सरकारला ठरवावं लागणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात गैरव्यवहार करून डॉक्टर झालेल्यांमुळं आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली जातात, पोलिस व्यवस्थेत आलेल्यांमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजतात. मात्र, थेट भावी पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांचं व्यवस्थेत येण्यानं त्याचा परिणाम पुढील अनेक पिढ्यांवर होऊ शकतो, याची दखल सरकारनं ताबडतोब घेण्याची गरज आहे. फक्त हिमनगाचं टोक असलेल्या अधिकाऱ्यांना अटक आणि निलंबन करून हा प्रश्‍न नक्कीच सुटणार नाही. ‘व्यापम’प्रमाणं हा गैरव्यवहार किती ‘व्यापक’ आहे, हे खणून काढलं तरच व्यवस्थेला लागलेली कीड निपटून निघंल.

एकंदरीतच, राज्य कोणतंही असो, गैरव्यवहारात सहभागी लोक, त्यांची मोडस ऑपरेंडी काही बदलत नाही...आणि अर्थात या गैरव्यवहारांचा संपूर्ण तपास आणि दोषींना शिक्षा हेही कधीच पूर्ण होत नाही. या गैरव्यवहारांना सुरुवात नसते आणि शेवटही...त्यामुळं ‘व्हिसलब्लोअर’चा नायक म्हणतो त्याप्रमाणं ‘कहांसे शुरू करू...’ असं सर्वच गैरव्यवहरांच्या बाबतीत म्हणता येतं...राज्यातील टीईटी गैरव्यवहार त्याच दिशेनं जाणार, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com