

Nuclear Power Generation
esakal
खासगी क्षेत्रातील उद्योजकांना लहान, सुरक्षित आणि आटोपशीर अणुभट्टी उभारून अणुऊर्जानिर्मिती करण्यात रस आहे. लहान भट्टी उभारण्यासाठी कमी वेळ आणि कमी भांडवल लागते. हे शक्य करण्यासाठी १९६२ मध्ये केलेल्या काही कायद्यांत बदल आवश्यक आहेत. यासंबंधित विधेयक लवकरच संसदेत येत आहे. ते मंजूर होण्यासाठी अणुऊर्जेच्या बाबतीत असणारे गैरसमज दूर व्हायला पाहिजेत.
लहान अणुभट्टी उभारून अणुऊर्जानिर्मितीत खासगी क्षेत्रातील उद्योजकांना परवानगी देण्यासंबंधीचे विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येणार आहे. त्यासंदर्भात या विषयाकडे साक्षेपाने पाहण्याची गरज आहे. आपल्याला ज्ञात असलेले ब्रह्मांड अणू-रेणूंनी बनलेले आहे. आपण स्वतःच अणूंनी तयार झालेलो आहोत. तरीही अणू हा शब्द कुठे ऐकण्यात किंवा वाचण्यात आला की, अनेकांच्या मनात नकारात्मक भावना उमटतात. कारण अणूचा संबंध अणुबॉम्ब, अणुस्फोट, अणुसंहार या ‘इतरेतर द्वंद्व’ समासाबरोबर येतो. तथापि अणुऊर्जा किंवा अणुशक्ती या ‘वैकल्पिक द्वंद्व’ समासाचा आपल्याला विसर पडतो. शेती, वैद्यकशास्त्र, औषधनिर्मिती, वीजनिर्मिती आदी क्षेत्रात अणूंच्या अंतरंगातील क्षमता उपयुक्त असल्याचे तंत्रज्ञांच्या पूर्वीच लक्षात आले होते. साहजिकच शांततेच्या कार्यासाठी अणुऊर्जा वापरण्यासाठी संशोधन सुरु झाले. त्यात यश मिळू लागले. सध्या वीजनिर्मितीकरीता अणुइंधनाचा वापर ३१ देशांमध्ये केला जातोय.