Job Burnout : ऑफिसच्या कामामुळे तुम्हीही तणावात आहात का?

कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होणाऱ्या आपल्या देशात या घडीला बर्नआउट एक मोठा ‘सायलेंट किलर’ आहे.
Job Burn Out
Job Burn OutEsakal

डॉ. वृषाली रामदास राऊत

शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दिलेले लक्ष तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबीयांसाठी आणि पर्यायाने समाजासाठीही सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे. ह्या फायदेशीर गुंतवणुकीचा गांभीर्याने विचार करायलाच हवा.

आशिष ((नाव बदललेले आहे) एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला होता. इंजिनिअरिंग होताच कॅम्पस प्लेसमेंटमधून कंपनीत निवड झालेल्या आशिषचे आयुष्य कुणालाही हेवा वाटेल असेच होते.

नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासूनच हुशार व मेहनती स्वभावाच्या आशिषने नोकरीत छान प्रगती केली होती. लहान वयात पैसा, परदेश प्रवास, मनासारखे कौटुंबिक सुख मिळालेल्या आशिषला गेले काही महिने मात्र स्वतःच्या स्वभावातले बदल जाणवत होते.

उत्साही व आनंदी असणारा आशिष ऑफिसात व घरी चिडचिड करायला लागला होता, मूड स्विंग वाढले होते, ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटत होती, वजन नियंत्रणाबाहेर जायला लागले होते.

कामातील चुका, क्लायंट व टीमसोबत कुरबुरी वाढत होत्या. घरीदेखील या सर्वांचा परिणाम व्हायला लागला होता.

आशिषच्या पत्नीने जेव्हा मला फोन केला तेव्हा तिच्या आवाजात आशिषला काय झाले असावे याची चिंता जाणवली. सॉफ्टवेअर उद्योगातील कामाचा अनुभव असल्याने मला या गोष्टीची कल्पना होती.

दीर्घकाळ अतिताणात काम केल्याने आशिषला बर्नआउटची प्राथमिक लक्षणे जाणवत होती. बर्नआउट ही प्रदीर्घ काळ ताणात काम केल्यावर येणारी अवस्था आहे. या अवस्थेत व्यक्तीची शारीरिक व मानसिक ऊर्जा संपून जाते.

बर्नआउटला तोंड देणारी व्यक्ती स्वतःला ओढत काम पूर्ण करते; मात्र कार्यक्षमता, सर्जनशीलता या घटकांवर प्रचंड परिणाम होत असतो.

बर्नआउटकडे वेळेवर लक्ष न दिल्यास व्यक्ती इतरही अनेक शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडते.

बर्नआउट ही अवस्था शरीर व मेंदू यांचे एवढे नुकसान करते, की अनेक वेळा ते नुकसान भरून काढणे शक्य होत नाही.

बर्नआउट समजून घ्यायचे असेल तर एक मेणबत्ती दोन्ही बाजूला वाती ठेवून जाळून बघा. ती मेणबत्ती लवकर जळून विझेल.

Job Burn Out
Work From Office बाबत महत्त्वाची माहीती आली समोर, WFH आहे का फायदेशीर?

अनावश्यक ताणाखाली वर्षानुवर्षे काम केल्याने एखाद्या व्यक्तीची जी ऊर्जा एरवी ३०-४० वर्षे वेगवेगळ्या कामांसाठी हळूहळू वापरणे अपेक्षित असते; ती ऊर्जा १५-२० वर्षात, कधी कधी पाचच वर्षात वापरून होते.

अशा वेळेस काय होईल? आपल्याकडे असलेला ऊर्जेचा साठा मर्यादित आहे. ही ऊर्जा कमी झाली किंवा संपली तर आपले शरीर आणि मनही योग्यरितीने कसे चालणार?

जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकरण (ICD-11) - रोगांच्या अधिकृत संग्रहानुसार बर्नआउटचे आता ‘लक्षण’ म्हणून वर्गीकरण केले गेले आहे.

Burnout is now categorized as a ‘syndrome’ that results from ‘chronic workplace stress that has not been successfully managed’

असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. ‘यशस्वीरित्या व्यवस्थापित केला न गेलेला कामाच्या ठिकाणचा तीव्र ताण,’ हे लक्षणाचे मूळ आहे.

आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकरणात रोजगार किंवा बेरोजगारीशी संबंधित समस्यांमध्ये बर्नआउट दिसून येते. या हँडबुकनुसार बर्नआउटचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे:

  • ऊर्जा कमी होणे किंवा थकवा जाणवणे.

  • नोकरीशी/ कामाशी बांधिलकी तसेच भावनिक ओढ कमी होणे व त्यासंबंधित नकारात्मकतेची भावना वाढीस लागणे.

  • व्यावसायिक कार्यक्षमता कमी होणे.

प्रत्येक व्यक्तीनुसार ही लक्षणे कमी जास्त होऊ शकतात. मात्र सततचा थकवा, काम किंवा कामाच्या ठिकाणाबद्दल नावड असणे, कामासाठी योग्य प्रेरणा न मिळणे, कामात चालढकल करणे या सर्व गोष्टी बर्नआउटची चिन्हे आहेत.

बर्नआउटचे निदान करताना नैराश्य व चिंता या दोन मुद्द्यांची सरमिसळ व्हायला नको कारण बर्नआउट ही अवस्था म्हणजे नैराश्य व चिंता या मानसिक आजारापेक्षा वेगळी अवस्था आहे.

याव्यतिरिक्त, हे लक्षण कामाच्या वातावरणापुरते मर्यादित आहे आणि ते एखाद्या व्यक्तीच्या एकूण जगण्याशी जोडले जाऊ नये.

बर्नआउटची स्थिती व्यक्तींच्या कार्यकुशलतेशी संबंधित नसून ज्या वातावरणात ती व्यक्ती काम करते त्या वातावरणातील तणावाशी संबंधित आहे.

त्यामुळे बर्नआउटवर उपाय करताना कामाच्या ठिकाणी वातावरण योग्य ठेवणे यावर भर असायला हवा.

कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होणाऱ्या आपल्या देशात या घडीला बर्नआउट एक मोठा ‘सायलेंट किलर’ आहे.

मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूटच्या २०२३मधील सर्वेक्षणानुसार भारतातील प्रतिसाददात्यांनी बर्नआउट लक्षणे सर्वाधिक म्हणजे ५९ टक्के नोंदवली आहेत.

भारतीय कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सर्वाधिक थकवा (६२ टक्के) नोंदविला, त्यानंतर जपान (६१ टक्के) आहे. स्वित्झर्लंडमध्ये कामाच्या ठिकाणी कमीत कमी २२ टक्के थकवा नोंदविला गेला.

Job Burn Out
AI Jobs: AIच्या जगात नोकरी शोधताय? चक्क देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या...

GOQii या हेल्थ अॅपने मध्यंतरी एक सर्वेक्षण केले. दहा हजारांहून अधिक लोक या सर्वेक्षणात सहभागी होते.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष विचार करायला लावणारे आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी २६ टक्के लोक त्यांच्या कामाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे आणि १७ टक्के लोक आर्थिक अस्थिरतेमुळे तणावात आहेत.

त्याशिवाय १४ टक्के लोक नात्यांतील अडचणींमुळे तणावात आहेत. कोरोना महासाथीच्या काळात अनुभवलेल्या अस्थिरतेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या आजारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अतिकाम झोपेवर वाईट परिणाम करते. अपुरी झोप, कामाचा ताण व जेवणाकडे दुर्लक्ष यामुळे हृदय व मेंदूवर ताण येऊन तरुणांमध्येही हृदयविकार, स्ट्रोक यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

हर्बर्ट फॉइनबर्गर (Herbert Freudenberger, १९२६-९९) ह्या जर्मन-अमेरिकी मानसशास्त्रज्ञाने बर्नआउट ही संकल्पना पहिल्यांदा वापरली. काही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये त्याने ही लक्षणे बघितली होती.

हे आरोग्य कर्मचारी अतिकामामुळे थकलेले असायचे, त्यांच्यात ऊर्जा अत्यंत कमी असायची. ते जिथे काम करायचे त्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर मग ते चिडचिड करायचे.

‘जास्त काम किंवा तणावामुळे शारीरिक किंवा मानसिक आरोग्य कोसळते’, ह्या एका वाक्यात फॉइनबर्गरनी बर्नआउटचे वर्णन केले आहे.

नॉट वर्किंगः व्हाय वुई हॅव टू स्टॉप (Not Working: Why We Have to Stop) ह्या २०१८मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक जॉश कोहेन (Josh Cohen) मिलेनियल पिढी ही बर्नआउट झालेली पिढी आहे, असे म्हणतात.

कान्ट इव्हनः हाऊ मिलेनियल्स बिकेम द बर्नआउट जनरेशन (Can’t Even: How Millennials Became the Burnout Generation) ह्या २०२०मधील पुस्तकाच्या लेखिका अॅनी हेलन पिचरसनही मिलेनियल पिढी ही बर्नआउट झालेली पिढी आहे, असे सांगतात.

जेव्हा आयुष्य हे कधीच न संपणाऱ्या कामांची यादी बनते, त्यावेळेस काम म्हणजेच आयुष्य बनते, मग त्यातून बर्नआउटची अवस्था येणे अटळ असते.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे बर्नआउट म्हणजे औदासिन्य (डिप्रेशन) नाही. ती अशी एक मानसिक स्थिती आहे, ज्यात अविरत काम करून एखाद्या व्यक्तीतील सर्व ऊर्जा संपून जाते.

तरीही ती व्यक्ती स्वतःला ओढत, ढकलत कामातून मिळणाऱ्या समाधानाची पर्वा न करता काम करत राहते.

मिलेनियल पिढीसाठी ही मानसिक स्थिती सवयीची झाली असून अधिकाधिक कर्मचारी व कामगार ह्याचा अनुभव घेत आहेत.

पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या या स्थितीची जाणीव नाही व असली तरी उपाययोजना करणे जमतेच असे नाही. आपल्या कामाशी आपले सर्वस्व जोडणारी मिलेनियल पिढी काम-केंद्रित आयुष्य जगते.

भारतातील जवळजवळ ५६ टक्के मिलेनियल आणि जेन-झीमधील (Generation-Z) ५३ टक्के कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या काळात नियमित स्वरूपात ताणतणाव अनुभवत असतात, असे डेलॉइट मिलेनियल सर्व्हे-२०२० सांगतो.

लेखक जॉश कोहेन ह्यांच्या मते सतत कामात गढलेल्या व्यक्तीला सर्जनशीलतेची नस सापडत नाही.

वर्ष २०००च्या सुरुवातीला अडखळणारी अर्थव्यवस्था, नंतर २००८मध्ये आलेली मंदी; या सगळ्या काळात शिक्षणासाठी, लग्नासाठी घेतलेली कर्जे, घरासाठीचे खर्च अशा गोष्टींच्या मागे धावत मिलेनियल पिढी या घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगते.

Job Burn Out
Mental Health : मानसिक आरोग्याकडे भारतीयांचे दुर्लक्षच!

वर उल्लेख केलेला आशिष हादेखील याच मिलेनियल पिढीचे प्रतिनिधित्व करतो. वर्ष २०००पासून बऱ्याचशा क्षेत्रांमधील कामात दाखल झालेली ही पिढी बव्हंशी बौद्धिक कामगार म्हणता येईल अशी आहे.

कारण नव्या सहस्रकाच्या सुरुवातीपासून तंत्रज्ञानाच्या प्रभावाने सर्वसाधारणपणे बैठे म्हणता येईल असे बौद्धिक काम वाढले. या कामात शारीरिक श्रम अत्यंत कमी असतात, पण भावनिक श्रम खूप असतात व कामाचे स्वरूप २४x७ असते.

उदाहरण घ्यायचे तर आरोग्य, कायदा, माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, आदरातिथ्य अशा क्षेत्रांत काम करणारी तज्ज्ञ आणि इतरही अनेक मंडळी आहेत.

अशा ठिकाणी बर्नआउटचे प्रमाण जास्त तीव्र असल्याचे आढळून येते. तंत्रज्ञानामुळे संवाद सोपा झाला असला, तरी अनेकजण कामाशी २४x७ बांधले गेलेले दिसतात आणि काम व वैयक्तिक आयुष्य यातील सीमारेषा धूसर झालेल्या दिसतात.

सध्याच्या परिस्थितीत कामाशी जोडलेली अनेक कारणे अनेकांना सहजासहजी डिसकनेक्ट होऊ देत नाहीत.

त्यांचा मेंदू २४x७ कामातच असतो. असे सांगतात, की विनोबा भावे जितका वेळ बौद्धिक काम करायचे तेवढाच वेळ उतारा म्हणून शारीरिक कष्ट करून घाम गाळायचे.

सध्याच्या काळात शारीरिक श्रम अजिबात होत नसल्याने मानसिक त्रास आणखी वाढले आहेत.

तुम्हाला जॉब बर्नआउट आहे का, हे शोधण्यासाठी स्वतःला खालील प्रश्न विचारून पाहा.

  • तुमचे काम तुम्हाला महत्त्वाचे वाटते का?

  • रोज काम सुरू करण्यात तुम्हाला अडचण येते का व काम करताना तुमची ओढाताण होते का ?

  • तुम्हाला तुमच्या कामापासून आणि तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्या लोकांपासून तुटल्यासारखे वाटते का?

  • तुमचे सहकारी, ग्राहक किंवा क्लायंट यांच्यासोबत तुम्ही जुळवून घेऊ शकत नाही का?

  • काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ऊर्जा कमी पडते, असे तुम्हाला जाणवते का?

  • कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते का?

  • तुम्ही जे काम करता त्यातून पुरेसे समाधान मिळत नाही, असे वाटते का?

  • तुम्हाला तुमच्या कौशल्यांविषयी आणि क्षमतांविषयी शंका येते का?

  • तुम्हाला बरे वाटण्यासाठी किंवा तुम्हाला जाणवणाऱ्या भावना बधिर करण्यासाठी तुम्ही औषधे, दारू, तंबाखू, सिगारेट, गुटखा यापैकी एक किंवा अधिक प्रकार वापरत आहात का?

  • तुमच्या झोपेच्या सवयी बदलल्या आहेत का? (गरजेपेक्षा जास्त झोप आवश्यक वाटते किंवा झोप कमी झाली आहे.)

  • तुम्हाला डोकेदुखी किंवा ज्यांचे नेमके निदान होऊ शकलेले नाही अशा पोट वा आतड्यांसंबंधीच्या काही समस्या अथवा इतर शारीरिक तक्रारी आहेत का?

  • यापैकी एकापेक्षा जास्त प्रश्नाची उत्तरे होकारार्थी असतील तर तुम्हाला बर्नआउटची लक्षणे असू शकतात.

  • मग बर्नआउटची ही अवस्था अचानक येते, की या अवस्थेपर्यंत जायला काही टप्पे असतात?

    मानसशास्त्रज्ञांनी बर्नआउटचे काही टप्पे सांगितले आहेत.

हनीमूनचा काळ : वैवाहिक जीवनातील सुरुवातीच्या काळासारखेच व्यावसायिक आयुष्यातही कोणतेही नवीन काम सुरू केल्यानंतर जाणवणारा उत्साह व त्यामुळे वाढणारी उत्पादकता काम करणाऱ्याला प्रोत्साहन देते.

ताणाचा काळ : हनीमूनचा काळ संपून ताण जाणवायला लागतो. या टप्प्यात शारीरिक व मानसिक कुरबूर सुरू होऊन कार्यक्षमतेवर परिणाम व्हायला सुरुवात होते. असे काही जाणवल्यास तातडीने स्वतःला वेळ द्या. बहुतेक वेळा बहुतेक लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करत पुढच्या टप्प्यात जातात.

चिवट ताणाचा काळ : या काळात शारीरिक, मानसिक त्रासासोबत वर्तणुकीवर परिणाम दिसायला लागतात. उदाहरणार्थ उदासीनतेची भावना, काम वेळेवर पूर्ण न करणे, सहकाऱ्यांशी वाद, सामाजिक संबंध कमी होणे, वजन व झोपेच्या तक्रारी वाढणे इत्यादी.

बर्नआउट अवस्था : या अवस्थेत पोटाचे विकार, तीव्र डोकेदुखी, कामाच्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे मतभेद किंवा क्वचित हिंसादेखील घडू शकते. भावनिकरित्या कामाशी संबंध न राहणे व चालढकल करत टिकून राहण्यासाठी दिवस घालविणे असे प्रकार घडू शकतात. कौटुंबिक सुखावरही कामाच्या ताणाचा परिणाम दिसतो.

सवयीचा बर्नआउट : या अवस्थेत आल्यावर मात्र औदासिन्य व चिंता जाणवू लागते, कामातून मन उडते आणि कोणत्याही प्रेरणेशिवाय, सकारत्मकतेशिवाय एखादे ओझे वाहिल्यासारखे आयुष्य सरकत राहाते.

Job Burn Out
ऑफिसमधल्या Groupism वर उपाय काय?

दीर्घकाळ तणावात राहून काम केल्याने आशिष बर्नआउटच्या तिसऱ्या टप्प्यावर होता. नेमके काय झाले आहे/ होते आहे, ते आशिषला समजावून सांगताना थोडे अवघड गेले.

पण हळूहळू आशिषच्या ते लक्षात येऊ लागले. मग त्याने विचारले, यावर काय उपाय करता येईल? त्याच्या पिढीच्याच भाषेत सांगायचे तर कोणतीही कार वेळेवर देखभाल न करता खूप चालवली तर ती जशी बिघडेल, तसेच मानवी शरीराचेही आहे.

गरजेपेक्षा ते जास्त वापरले, त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपले शरीरही काम करायला नाही म्हणू शकते. म्हणून खेळाडूंचे तंत्र समजावून घ्यायला पाहिजे. जेवढी ऊर्जा वापरली जाते त्याची भरपाई होण्यासाठी विश्रांतीची गरजही तेवढीच असते.

क्रीडा जगतातली यशाची शिखरे पादाक्रांत करणारे खेळाडू योग्य त्या प्रमाणात विश्रांतीही घेतात, त्यांचे खाणेदेखील वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या प्रमाणात असते. हाच नियम कोणतेही काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीलाही लागू आहे.

म्हणूनच ८ तास काम, ८ तास विश्रांती व ८ तास मनोरंजन अशी दिवसाच्या २४ तासांची विभागणी ठरविण्यात आली आहे.

बर्नआउटवर काही उपाय आहे का ?

बर्नआउट हा कामाच्या संबंधित अवस्था असल्याने कामातून काही काळ ब्रेक घेणे गरजेचे ठरते. शक्य तेथे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कामाचा भार काही काळापुरता कमी करण्याचा किंवा काही दिवसांची सुट्टी घेऊन नेहमीच्या कामापासून डिस्कनेक्ट होण्याचादेखील विचार करता येऊ शकतो.

हे शक्य नसेल तर सर्व त्या काळजीसह काही काळ ब्रेक घेऊन कामात बदल करण्याची विचार करणेही श्रेयस्कर ठरते. यासोबत रिचार्ज होण्यासाठी -

  • ताणाचे योग्य व्यवस्थापन करणे.

  • थेरपी, समुपदेशन घेणे.

  • शरीराला आराम मिळेल व मन शांत होईल अशा काही गोष्टी दैनंदिन जीवनात सुरू करणे. उदाहरणार्थ वेळेवर व पुरेशी झोप, पौष्टिक खाणे व झेपेल इतका व्यायाम करणे.

  • नात्यांना वेळ देणे.

  • आवडी/ छंद जोपासणे.

  • मनःशांतीसाठी निसर्गात वेळ घालविणे, संगीत ऐकणे, शरीराचा मसाज करणे या गोष्टी उपयुक्त ठरतात.

  • डिजिटल डिटॉक्स म्हणजे आठवड्यात एक संपूर्ण दिवस मोबाईल व लॅपटॉपपासून लांब राहणे.

  • आठवड्याला व महिन्याला सुट्टी घेणे आवश्यक आहे, अनेक कर्मचारी सुट्ट्यांचे पैसे मिळतात म्हणूनही सुट्ट्या घेणे टाळतात. गरजेनुसार वेळोवेळी आराम केल्याने शरीर व मन रिचार्ज होऊन आरोग्याचा अनेक तक्रारी टाळता येतात.

  • गरज भासल्यास मानसोपचार संबंधित औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. अशा काही उपाय योजना गरजेच्या ठरतात.

हे झाले वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न. कंपन्यांनीदेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत असले प्रकार घडू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वेलबिइंग प्रोग्रॅम सारख्या कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याची काळजी घेणे सोपे जाते.

कंपनी आपल्यासाठी पैसे खर्च करते या जाणिवेमुळेही कामाशी बांधिलकी वाढून उत्पादकता व सर्जनशीलता वाढते. कामाच्या ठिकाणी वादविवाद, तक्रारी कमी होऊन सलोखा वाढतो.

आशिषची बदललेली मनःस्थिती त्याच्या पत्नीच्या लक्षात आली, आणि त्याला वेळेवर मदत मिळाली त्यामुळे त्याचे पुढचे आयुष्य सुकर झाले. या संकटातून बाहेर पडल्यानंतर आशिषला वर्क लाइफ बॅलन्सचे महत्त्व पटले आणि आता तो इतरांनाही वर्क लाइफ बॅलन्सचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यातील गुंतवणूक ही तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबीयांसाठी आणि पर्यायाने समाजासाठीही सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे. ह्या फायदेशीर गुंतवणुकीचा गांभीर्याने विचार करायलाच हवा.

-----------------

Job Burn Out
Office Politics : ऑफिसमधील पॉलिटिक्स शिकून घेणे ही मूलभूत गरज?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com