Asparagus: शतावरीची अजबच कहाणी!

shatavari
shatavariesakal

डॉ. बाळ फोंडके

संशोधन करताना दोन वेगवेगळ्या पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक होतं. कोणाच्या अंगी त्या दुर्गंधीचा कारक निर्माण करण्याची क्षमता आहे, हा एक पैलू.

दुसराही तितकाच महत्त्वाचा होता. तो म्हणजे कोणाच्या घ्राणेंद्रियाला त्या दुर्गंधीचा वास लागू शकत होता. काहींच्या अंगी एकच पैलू असण्याची शक्यता होती, तर काहींकडे दोन्ही पैलू अस्तित्वात होते.

शतावरी हे अतिशय पौष्टिक असलेलं खाद्य आहे. त्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. इंग्रजीत यालाच ॲस्पॅरेगस (Asparagus) म्हणतात. त्याचा समावेश ‘गुरमे’ पदार्थांच्या, म्हणजेच उच्च दर्जाच्या पदार्थांमध्ये केला जातो. जेवणात त्याचा समावेश असणं मानाचं मानलं जातं.

पण काहीजणांना त्याचा त्रास होतो. बेब रुथ (babe ruth) नावाचा एक आघाडीचा बेसबॉलपटू होता. आपल्याकडे क्रिकेटवीरांना जो मानसन्मान मिळतो, तोच अमेरिकेत बेसबॉल खेळाडूंना दिला जातो. त्यांच्या वक्तव्याला अनेक जण भुलतात.

त्याला या ॲस्पॅरेगस खाण्याचा त्रास होत होता. वास्तविक तो त्रास चारचौघात सांगणं तसं कठीणच होतं. पण बेब रुथसारख्या मंडळींना समाजनियमांचं तसं वावडंच असतं. त्यामुळं त्यानं सरळसरळ सांगून टाकलं. ‘यू नो, इट्स जस्ट दॅट इटिंग ॲस्पॅरेगस मेक्स माय युरिन स्मेल फनी.’

shatavari
Millet food: भरडधान्यांचे स्नॅक्स: पौष्टिक आणि रुचकर देखील..!

तसं जाहीरपणे सांगणारा बेब रुथ कदाचित पहिलाच असेल. पण असा अनुभव त्यापूर्वीही अनेकांना आलेला होता. इंग्लंडची एकेकाळची राणी ॲन हिचा डॉक्टर जॉन अर्बुथनॉट यानं आपल्या एका लेखात म्हटलं होतं, की ॲस्पॅरेगसमुळं लघवीला कुबट दुर्गंधी येते.

तरीही ज्या एका भोजनसमारंभाच्यावेळी बेब रुथनं ते उद्‍गार काढले होते, त्यात सहभागी झालेल्या अनेकांना रुथला नेमकं काय म्हणायचंय याचा उलगडा होत नव्हता. कारण त्यांनी त्यापूर्वीही अनेकदा ॲस्पॅरेगसचा आस्वाद घेतला होता.

अर्थात रुथशी सहमत होणाऱ्यांची संख्याही नगण्य नव्हती. त्यांना ॲस्पॅरेगसचे एक दोन दांडे खाल्यानंतर तासाभरातच त्यांच्या लघवीला तो कुबट वास येत असल्याचं लक्षात आलं होतं. त्याचं कारण शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी त्या लघवीचं रासायनिक विश्लेषणही केलं होतं.

त्यातून त्यात मर्कप्टॅनच्या जातकुळीतली रसायनं असल्याचं स्पष्ट झालं होतं. इतरही काही पदार्थ छोट्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यातल्या काहींचा संबंध थेट ॲस्पॅरेगसच्या पचनातून तयार झालेल्या रसायनांशी असल्याचंही आढळलं होतं.

तरीही फक्त काही जणांच्या पचनक्रियेत तसं का व्हावं आणि इतरांच्या पचनातून ते नतद्रष्ट पदार्थ का तयार होऊ नयेत, याचा उलगडा करणं आवश्यक होतं.

त्यासाठी जनुकवैज्ञानिकांनी त्या शोधकार्यात उडी घेतली. त्या दुर्गंधांची निर्मिती करण्याची किंवा त्यांची गंधसंवेदनेतर्फे ओळख पटवण्याची क्षमता त्या त्या व्यक्तींच्या जनुकांमध्ये असते की काय याचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न करण्यात आले.

साहजिकच ज्यांच्या अंगी असं एखादं जनुक, किंवा काही जनुकांचा समूह असतो जो ॲस्पॅरेगसच्या पचनक्रियेवर प्रभाव टाकून त्या दुर्गंधीकारक रसायनांची निर्मिती करतो असं गृहीतक धरून प्रयोग केले गेले.

उलटपक्षी ज्यांच्या लघवीला ॲस्पॅरेगसचं सेवन केल्यानंतर तशी दुर्गंधी येत नाही, त्यांच्या अंगी ते जनुक नसावं किंवा असलं तरी कार्यान्वित होत नसावं, असाही त्या गृहीताचा व्यत्यास धरण्यात आला.

shatavari
Ayurveda : जपानी विद्यार्थी पुण्यात गिरवताहेतआयुर्वेदाचे धडे!

त्यात एक अडचण होती. तसा दुर्गंधीकारक पदार्थ लघवीमध्ये आहे की नाही याची छाननी करायची कशी? कारण ती कोणत्याही यंत्राद्वारे करण्याची सोय नव्हती.

तो कुबट वास ओळखण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींकडूनच ती करावी लागणार होती. थोडक्यात ती वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असणार होती. पण ही मर्यादा पाळूनच संशोधन करण्यावाचून पर्याय नव्हता.

त्यासाठीच मग कौटुंबिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आलं. कारण अशा दूषित जनुकाचा वारसा वाडवडिलांकडूनच मिळत असल्यामुळं त्याची पाळंमुळं कौटुंबिक पाहणीतूनच स्पष्ट झाली असती. आधीच्या तीन पिढ्यांपर्यंत तशी तपासणी करता आली.

खरं तर ती पाळंमुळं त्याच्याही पूर्वी रुजली असण्याची शक्यता होती. पण त्या पिढ्यांमधील व्यक्ती आता हयात नव्हत्या.

या अनुभवाच्या दोन वेगवेगळ्या पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक होतं. कोणाच्या अंगी त्या दुर्गंधीचा कारक निर्माण करण्याची क्षमता आहे, हा एक पैलू.

दुसराही तितकाच महत्त्वाचा होता. तो म्हणजे कोणाच्या घ्राणेंद्रियाला त्या दुर्गंधीचा वास लागू शकत होता. काहींच्या अंगी एकच पैलू असण्याची शक्यता होती, तर काहींकडे दोन्ही पैलू अस्तित्वात होते.

ॲस्पॅरेगसचं पचन होत असताना ज्यांच्याकडून ते दुर्गंधीजनक पदार्थ निर्माण होत होते, त्यांना त्या कारक जनुकाचा वारसा मिळाला होता. ज्यांना तो मिळाला नव्हता त्यांनी कितीही ॲस्पॅरेगसचा फन्ना उडवला तरी त्यांच्या लघवीला त्या दुर्गंधीचा वासही लागत नव्हता.

कोणालाही जनुकाची एक प्रत मातेकडून आणि एक पित्याकडून मिळते. त्या दोन्ही प्रती एकसारख्या असू शकतात किंवा भिन्न असू शकतात.

ज्यांना दोघांकडूनही सारख्याच प्रती मिळाल्या होत्या, त्यांच्या अंगी वारशाचा डबल डोस मिळाला होता. मेन्डेलच्या नियमानुसार ज्यांच्या अंगी एकच प्रत होती ते तो वारसा चारापैकी एकाच वंशजाला बहाल करू शकत होते. उरलेले तिघे त्यापासून मुक्त राहणार होते.

shatavari
Ayurveda Tips:आयुर्वेदानुसार दूधासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये...

आठशेजणांची याबाबतीत तपासणी केल्यावर त्रेचाळीस टक्के लोकांमध्ये त्या जनुकाचं अस्तित्व असल्याचं आढळलं होतं. त्यावरून गणित केल्यास साधारण सहा टक्के व्यक्तींना डबल डोस मिळायला हवा होता. प्रत्यक्षात बर्मिंगहॅम इथं केलेल्या सर्वेक्षणात नेमक्या सहा जणांच्या लघवीला तशी दुर्गंधी येत असल्याचं दिसून आलं.

याचा अर्थ ही खरोखरीच एका दूषित जनुकाच्या वारशाची करामत असल्याचा पुरावा मिळत होता. त्रेचाळीस टक्के म्हणजे निम्म्याहून कमीजण ॲस्पॅरेगसच्या सेवनानंतर त्या दुर्गंधीयुक्त पदार्थांची निर्मिती करत होते. तरीही त्या सर्वांच्याच नाकांना ते झोंबत होते की नाही, याचाही छडा लावायला हवा होता.

कारण काहीजणांना आपल्या लघवीला त्या दुर्गंधीनं पछाडलेलं आहे याचा सुगावाच लागलेला नव्हता. थोडक्यात ती किमयाही कोणत्या तरी जनुकाचीच असण्याची शक्यता होती.

त्याचा वेध घेण्यासाठी इस्राईलमधील जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठानं काही प्रयोग केले. त्यांनी ती दुर्गंधी निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला गाठलं. त्याला तब्बल अर्धा किलो ॲस्पॅरेगस खायला दिलं. सहा तासांनंतर त्याची लघवी गोळा करण्यात आली.

तिची विभागणी अनेक परीक्षानलिकांमध्ये केली गेली. एकीत ती तशीच्या तशीच ठेवली होती. उरलेल्यांमध्ये निरनिराळ्या मात्रेचं पाणी घालून ती पातळ करण्यात आली होती.

सर्वात जास्त पातळ केलेल्या लघवीत एका भागास ४०९६ भाग इतकं पाणी घालण्यात आलं होतं. नंतर दोनशे व्यक्तींना त्यांचा वास घेऊन त्यांना त्या दुर्गंधीची जाणीव होते की काय याची परीक्षा घेण्यात आली.

प्रयोगाचे निष्कर्ष वैज्ञानिकांनाही चकित करून गेले. काही पठ्ठ्यांना पहिल्या नळीतील म्हणजे जिच्यात अजिबात पाणी घातलं गेलं नव्हतं तिच्यातही त्या दुर्गंधीचा वास आला नव्हता. त्यांना त्या दुर्गंधीची जाणीवच होत नव्हती.

दुसऱ्या टोकाला काही मंडळी होती ज्यांचं नाक जास्तीत जास्त पातळ केलेल्या नलिकेतील नमुना समोर आल्याबरोबर वाकडं होत होतं. साहजिकच त्यांना कारक जनुकांचा डबल डोस मिळाला असावा.

जनुकतपासणीतून तो वारसा किती निरनिराळ्या प्रक्रियांवर आणि वर्तणुकीवर आपला प्रभाव गाजवतो हेच दिसून आलं होतं.

-----------

shatavari
Ayurveda Health Tips: तुम्हाला तंदुरूस्त राहायचं का? आयुर्वेदातील पंचसूत्रीचा अवलंब करा; स्वत:साठी वेळ द्या, वाचेल दवाखान्याचा खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com