कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आवाक्यात नसलेले एकच क्षेत्र आहे ते म्हणजे प्रतिभेचे..

खरा प्रश्न प्रतिभेला (Intuition) बुद्धीपेक्षा (Intellect) एक वेगळी ‘फॅकल्टी’ मानायचे की बुद्धीचाच भाग समजायचे हा आहे.
Brain Health
Brain Healthgoogle

खरा प्रश्न प्रतिभेला (Intuition) बुद्धीपेक्षा (Intellect) एक वेगळी ‘फॅकल्टी’ मानायचे की बुद्धीचाच भाग समजायचे हा आहे. तो बुद्धीचा भाग असेल तर त्याला कृबुच्या कक्षेत आणता येईल. मात्र नसेल तर त्याची स्वायत्तता मान्य करावी लागेल.

डॉ. सदानंद मोरे

मानवाला शक्य असलेल्या कृत्यांना एकामागून एक पादाक्रांत करीत विजयाची घोडदौड चालू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आवाक्यात नसलेले एकच क्षेत्र आहे ते म्हणजे प्रतिभेचे.

खरा प्रश्न प्रतिभेला बुद्धीपेक्षा एक वेगळी ‘फॅकल्टी’ मानायचे की बुद्धीचाच भाग समजायचे हा आहे. तो बुद्धीचा भाग असेल तर त्याला कृबुच्या कक्षेत आणता येईल. मात्र नसेल तर त्याची स्वायत्तता मान्य करावी लागेल.

ज्या ॲलन ट्युरिंगमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला चालना मिळाली, त्याने १९५१ मधील एका व्याख्यानात असे भाकीत केले होते, की It seems possible that once the machine, thinking machine had started; it would not take long to outstrip our feeble powers. At some stage therefore we should have expect the machines to take control...

पुढील काळात ट्युरिंगकडून खूप अपेक्षा होत्या. तथापि, त्याच्या अकाली दुर्दैवी मृत्यूमुळे त्या फलद्रूप होण्याचा मुद्दाच निकालात निघाला.

त्याच्या पश्चात या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळायला फार दिवस लागले नाहीत. इतकेच काय पण या संशोधनाचे नेमके स्वरूप आणि व्याप्ती काय असू शकते याविषयीही स्पष्टता लवकर आली.

त्याचे श्रेय १९५६मध्ये इंग्लंडमधील न्यू हॅम्पशायर परगण्यातील हॅनोवरला डर्टमाऊथ कॉलेजमध्ये झालेल्या शिबिराला द्यावे लागते, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (कृबु) हा एक अभ्यासविषय नसून विविध विषयांच्या अभ्यासाचे एक क्षेत्र आहे, हेसुद्धा याच वेळी स्पष्ट झाले.

Brain Health
नवोदित गायकांच्या प्रतिभेला फुटू लागले अंकुर

मुळात `आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (Artificial Intelligence) हा शब्दप्रयोगच या अभ्यास शिबिराच्या प्रस्तावातून निघाला. त्यामुळे त्याविषयी काही सांगणे आवश्यक ठरावे.

अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याची कल्पना मुळात डर्टमाऊथ कॉलेजच्या जॉन मकार्थीची. त्यासाठी त्याने प्रस्ताव तयार केला.

रॉकफेलर फाउंडेशनच्या वेगवेगळ्या संस्थांकडून आर्थिक मदतही मागितली. या परिषदेचा कालावधी साधारण दोन महिन्यांचा राहणार असून, तिच्यात भाग घेण्यासाठी दहा तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार होते.

‘The study is to proceed on the basis of the conjecture that every aspect of human learning or any other feature of intelligence can in principle be so precisely described that machine can be made to simulate it.’ त्याचप्रमाणे ‘An attempt will be made to find how to make machine language form abstractions and concepts, solve kinds of problems now reserved for humans and improve themselves,’ असा मकार्थीच्या प्रस्तावाचा आशय होता.

हा प्रस्ताव करण्यात मॅकार्थीबरोबर मार्विन मिन्स्की, नथॅनिअल रोचेस्टर आणि क्लॉड शॅनन यांचा सहभाग होता.

१९५६च्या या परिषदेनंतर कृबुच्या अभ्यासक्षेत्राने बरेच चढउतार पाहिले. २००६मध्ये या घटनेला ५० वर्षे झाली. त्याचे निमित्त करून डर्टमाऊथ कॉलेजमध्येच AI@50 या नावाने एक परिषद भरवून १९५६च्या परिषदेचा सुवर्णमहोत्सव केला गेला.

या परिषदेत कृबुक्षेत्राच्या गेल्या २५ वर्षांतील प्रगतीचा वेधही घेण्यात आला. या बाबी विचारात घेतल्या तर ही एकमेवाद्वितीय गोष्ट मानावी लागेल.

Brain Health
प्रतिभेला कुठलाही धर्म नसतो

या प्रकल्पासाठी एकत्र आलेले विद्वान एका साच्यात बसणारे नव्हते. त्यांच्यात लक्षणीय असे वैविध्य होते. तथापि, माणूस जे-जे करू शकतो ते-ते कृबुला करता यावे अशा प्रकारे कृबुला कसे विकसित करता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते.

या प्रयत्नाने कृबुने माणसाची भाषा आत्मसात करून तिचा उपयोग करावा हा भाग ओघाने आलाच. त्यासाठी काहींच्या समोर माणसाच्या मेंदूचे प्रारूप होते. मेंदूमधील चेतापेशींच्या अनुकरणाने (Simulation) हे शक्य होईल, असे त्यांचे मत होते व त्यांचे संशोधन त्याच दिशेने पुढे जात होते, जाणार होते.

त्यासाठीच ‘Artificial Neural Network’ची रचना करण्यात आली. त्यांचा भर अर्थातच तर्कशास्त्रावर होता. तर्कशास्त्र आकारीक (Formal) असून, रसेल आणि व्हाईटहेड या तत्त्वज्ञांनी त्याची पूर्ण व्यवस्था तयार केली होती.

या व्यवस्थेतील प्रमेये कृबुकडून सिद्ध करता येणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार होता. काही प्रमेयांची सिद्धी रसेल व्हाईटहेडप्रणित प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (Principia Mathematica-PM) प्रणालीतील पायऱ्यांपेक्षा कमी पायऱ्यांनी करणे कृबुला शक्य झाले तेव्हा रसेलही आनंदला असल्याचे नमूद आहे.

काहींना मनाच्या कार्यपद्धतीचे अधिक आकर्षण होते. मनाचे व्यवहार पूर्णपणे तर्काला व तार्किक विचारपद्धतीला धरून आकारिकपणाने चालतात असे म्हणता येत नाही.

तेथे व्यावहारिक (Practical) बुद्धीला म्हणजेच ह्यूरिस्टिकला (Heuristic) महत्त्व असते. या विद्वानांचा कल तर्कशास्त्रापेक्षा संभाव्यतेकडे (Probability) झुकलेला होता. काहींना दोघांचा मेळ अपेक्षित होता.

२००६च्या परिषदेचा उद्देश केवळ पुनःप्रत्यय नसून पुढील दिशांची चर्चा हाही होता. या परिषदेसाठी १९५६च्या परिषदेतील पाच विद्वान उपस्थित होते.

स्वतः मॅकार्थीच्या अंदाजाप्रमाणे कृबुला मानवी बुद्धीचा स्तर गाठण्यासाठी आणखी ५० वर्षे लागतील. म्हणजे तेव्हा डर्टमाऊथ घटनेला शंभर वर्षे पूर्ण झालेली असतील.

रे कुर्झविलच्या मतानुसार यासाठी इतकी वाट पाहायची गरज नाही, पंचवीस वर्षे पुरेशी होतील. खरे तर त्याने दिलेल्या कालमर्यादेतील पंधरा वर्षे उलटून गेली आहेत. उरलेल्या दहा वर्षांत हे शक्य होईल, असे आज तरी वाटत नाही.

अर्थात, या क्षेत्रातील संशोधन काही प्रमाणात तरी गोपनीयरितीने चालत असते. त्यामुळे दरम्यानच्या काळात अमेरिका किंवा चीनमधील तज्ज्ञांना मुसंडी मारून ही बाब शक्यतेच्या कोटीत आणता येणारच नाही, अशी खात्री देता येत नाही.

Brain Health
Research on Human : तुमच्या शरीरातल्या ११ अवयवांचे वय रक्तचाचणीने मोजता येणार

१९५६मध्ये भरलेल्या परिषदेच्या प्रस्तावामध्ये कृबुच्या; १) स्वयंचलित संगणक, २) संगणकाला भाषेच्या उपयोगाची आज्ञावली (Programme) कशी देता येईल? ३) संकल्पनांच्या निर्मितीसाठी चेतापेशींचे जाल (Neuron Nets) कसे सिद्ध करता येईल? ४) मापनाच्या (Calculation) व्याप्तीचा सिद्धांत म्हणजे अर्थात मापनपद्धतीच्या व्याप्तीचा आणि क्षमतेचा सिद्धांत, ५) स्वयंसुधारणा (Self Improvement), ६) अमूर्तिकरण (Abstraction) आणि ७) यादृच्छिकपणा आणि सर्जनशीलता (Randomness and Creativity) अशा पैलूंची नोंद करण्यात आली होती.

ती पाहिली तर त्यानंतर आजतागायतच्या काळात कोणत्या पैलूची किती प्रगती झाली हे कोणालाही तपासता येईल.

१९५६ नंतरचा इतिहास पाहिला तर कृबुचा विकास याच मुद्द्यांच्या अनुषंगाने झालेला दिसतो. संगणकाची अंकीय कार्यपद्धतीची मर्यादा ओलांडून त्याला सामान्य भाषेसारख्या (Ordinary Language) अंकेतर व्यवस्थांमध्ये कसा प्रवेश करता येईल, हा नंतरच्या काळातील एक कळीचा मुद्दा होता.

माणसाने निर्मिलेल्या आज्ञावलींच्या आधारे संगणकाची क्षमता वाढवत त्याची सुधारणा करण्याऐवजी अशा प्रकारची सुधारणा त्याचा तोच करीत गेला पाहिजे या दृष्टीने चाललेले संशोधनही महत्त्वाचे ठरले. याचा संबंध अध्ययन प्रक्रियेशी येतो.

माणूस ज्याप्रमाणे स्वतःच चुका करीत शिकतो (Trial and Error) ते शिकण्याची क्षमता संगणकात आली तर तो माणसाची बरोबरी करू शकेल हे वेगळे सांगायची गरज नाही.

माणूस स्वबुद्धीच्या बळावर जे काही करू शकतो ते सर्व कृबुला करता आले पाहिजे, ही डर्टमाऊथ परिषदेची भूमिका होती. तिला अनुसरून जो शेवटचा म्हणजे सातवा मुद्दा आला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

याअगोदरचे बहुतेक मुद्दे आकार, आकृती, रचनाबंध यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्यात नियमितपणा आहे व त्यामुळे त्यांचा ‘कॅल्क्युलस’ (Calculas) करता येईल. भाकिते करता येतील. हे सर्व चाकोरीबद्ध असल्याने यंत्रांमार्फत करवून घेता येईल. सातवा मुद्दा मात्र काहीतरी वेगळेच सुचवितो.

Brain Health
Artificial Intelligence : गाड्याही एकमेकींशी ‘बोलू’ लागल्या आहेत

या मुद्द्याची चर्चा करताना स्वतः प्रस्तावकांनी याबाबतीत काय म्हटले आहे, ते पाहायला हवे.

“A fairly attractive and yet clearly incomplete conjecture is that the difference between creative thinking and unimaginative competent thinking lies in the injection of some randomness. The randomness must be guided by intuition to be efficient. In other words, the educated guess or the hunch include controlled randomness in otherwise orderly thinking.”

या मुद्द्यामध्ये सर्जनशील प्रतिभाजन्य विचारप्रक्रिया आणि चाकोरीतील नियमबद्ध विचारप्रक्रिया यांच्यातील भेद मान्य करण्यात आला आहे. प्रतिभा ही एक निसर्गदत्त देणगी आहे. ती फारच थोड्या लोकांमध्ये आढळते आणि याला विज्ञानाचाही अपवाद करायचे कारण नाही.

क्रमबद्ध नियमितता हा नियम आहे आणि अकस्मात अथवा याच्छिक आणि अनपेक्षित अवतरण हा अपवाद आहे. सगळेजण चाकोरीतून विचार करायला लागले तर नवनिर्मिती होणारच नाही. नवनिर्मितीसाठी रुळलेली मळवाट सोडून गतानुगतिक न होता स्वयंप्रज्ञ होऊन स्वतःचा नवा मार्ग शोधावा लागतो.

उदाहरण द्यायचे झाले तर संगीताच्या क्षेत्रातील कुमार गंधर्वांचे देता येईल. त्यांनी एकदा भूप राग गाताना मध्यम लावला होता. (हे अर्थातच मुद्दा समजण्यासाठी दिलेले उदाहरण आहे. कुमारांची नवनिर्मिती सर्वच जाणतात.) थॉमस कुन्ह यांची विज्ञानातील संशोधनासंबंधीची मांडणीही येथे उदाहरण म्हणून वापरता येईल.

बहुतेक सर्व वैज्ञानिक प्रस्थापित अशा प्रचलित नियामक प्रारूपाचेच (Paradigm) संशोधन करीत असतात. ते आवश्यकही असते. त्यामुळे एखाद्या सिद्धांतामधील सर्व क्षमतांचे प्रकटीकरण शक्य होते. हा त्या वैज्ञानिक सिद्धांताचा एक प्रकारचा संख्यात्मक विकास होय.

मात्र विज्ञानात क्रांती घडवून आणणारा अपवादभूत प्रतिभावंत वैज्ञानिक हे नियामक प्रारूप झुगारून लावतो व त्यात न बसणारा नवा सिद्धांत (Theory) मांडतो.

हीच वैज्ञानिक क्रांती. हिलाच कुन्ह प्रारूपपरिवर्तन (Paradigm Shift) म्हणतो. यासाठी अर्थातच प्रतिभाशक्तीची गरज असते हे वेगळे सांगायला नको. आता हादेखील मानवी बुद्धिमत्तेचाच आविष्कार म्हणावा लागतो.

ही प्रज्ञाच, पण ‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा’ असे भारतीय साहित्यशास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे तिची व्यवस्था व व्यवस्थापन हेदेखील कृबुच्या कक्षेत आणायला हवे, अशी डर्टमाऊथच्या बुद्धिमंतांची इच्छा होती. स्फुरण किंवा उन्मेष या घटिताला नियमांत बसवता येत नाही हे त्यांना मान्यच आहे.

तथापि, जेथे नियमच नाही तेथे कृबुची मात्रा चालत नाही. म्हणून या चौघा चमत्कारकांनी (इंग्रजीत त्यांना ‘Fantastic Four’ असे म्हटले आहे) प्रतिभावंतांच्या यादृच्छिकतेला अजिबात स्वैर सोडता कामा नये, अशी भूमिका घेतलेली दिसते. थोडक्यात सांगायचे म्हणजे येथे अपवादांचे नियम शोधण्याचा प्रयत्न दिसतो!

Brain Health
AI Tools : ‘एआय टूल्स’ म्हणजे नेमकं काय?

वस्तुतः कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रतिभेची कामेसुद्धा करता आली, की ती आणि मानवी स्वाभाविक बुद्धी यांच्यातील भेदरेषाच पुसून गेली असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

मानवाला शक्य असलेल्या कृत्यांना एकामागून एक पादाक्रांत करीत विजयाची घोडदौड चालू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आवाक्यात नसलेले एकच क्षेत्र आहे ते म्हणजे प्रतिभेचे. डर्टमाऊथ प्रस्तावात त्यालाही अंकित करायची महत्त्वाकांक्षा दिसते.

ती पूर्णत्वाला गेली तर एखाद्या कवयित्रीला मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी असे म्हणायची सोय नाही. कारण तसे सांगणे म्हणजे कविता स्फुरण्याचे नियम सांगितल्यासारखे होईल!

खरा प्रश्न प्रतिभेला (Intuition) बुद्धीपेक्षा (Intellect) एक वेगळी ‘फॅकल्टी’ मानायचे की बुद्धीचाच भाग समजायचे हा आहे. तो बुद्धीचा भाग असेल तर त्याला कृबुच्या कक्षेत आणता येईल. मात्र नसेल तर त्याची स्वायत्तता मान्य करावी लागेल.

हेसुद्धा मान्य करावे लागेल, की मधल्या काळात कृबुची कथा, कादंबऱ्या, कविता इतकेच काय सांगीतिक बंदिशी रचण्यापर्यंत प्रगती झाली आहे. बाखने किंवा बिथोव्हेनने रचलेली सिंफनी कृबु रचू शकते. याच मुद्द्यावरून हॉलिवूडचे कलाकार नुकतेच संपावर गेले होते.

त्यांच्यात लेखकांचाही समावेश होता. कृबुच्या कंपन्या अशा लेखकांच्या रचनांचे भरपूर ‘इनपूट’ देऊन कृबुकडून बेमालूम त्यांच्याच भासणाऱ्या रचनांचे ‘आऊटपूट’ काढून घेताना दिसतात. लेखकांच्या मते हे स्वामित्व हक्काचे उल्लंघन आहे.

अखेर शेवटी त्यांच्या संपाला यश आले व या कंपन्यांनी त्यांना योग्य तो वाटा द्यायचे मान्य केले, असे ऐकिवात आहे.

हा मुद्दा शेक्सपिअरच्या संदर्भात अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. शेक्सपिअरने इंग्लंडच्या हेन्‍री, रिचर्ड इत्यादी नामधारी राजांवर नाटके लिहिल्याचे आपण जाणतो.

आता या सर्व नाटकांचे, इंग्रजी भाषेच्या शब्दसंग्रहाचे, व्याकरणाचे व इंग्लंडच्या इतिहासाचे इनपूट कृबुला दिले तर शेक्सपिअरच्या मृत्यूनंतर जे गादीवर आले अशा राजांवरील शेक्सपिअरला शैलीची नाटके आऊटपूट म्हणून मिळण्याची व्यवस्था असलेली आज्ञावली (Programme) सिद्ध करणे अशक्य नाही; पण त्या नाटकांना प्रतिभेचा सर्जनशील आविष्कार म्हणता येईल काय?

डर्टमाऊथच्या पहिल्या परिषदेत भाग घेतलेल्या सर्वच तज्ज्ञांनी आपापल्या रुचीच्या विषयात संशोधन करून कृबुक्षेत्र समृद्ध केले यात शंका नाही.

तथापि प्रवर्तक चार चमत्कारकांनी प्रस्तावातून आपापले शोधप्रकल्प सादर केले होते. ते त्यांच्या हातून कितपत व कसे सिद्धीला गेले याविषयी कोणीतरी स्वतंत्रपणे संशोधन करायला हरकत नाही.

----------------

Brain Health
Art Day : चिंता, हुरहूर, अस्वस्थता.... सर्व मानसिक आजार दूर करते आर्ट थेरपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com