"नववधू प्रिया मी बावरते.." लग्नात वाजणारे हे गीत आहे नादमधुर पण गर्भित अर्थ काळजात कळ उठवणारा

घरंदाज प्रेमकविता लिहिणारे कवी भा. रा. तांबे
B R Tambe song
B R Tambe songesakal

हेमंत गोविंद जोगळेकर

त्यांची गेय भावमधुर गीते आजही आपल्याला मोहवितात. असेच एक गीत आहे, नववधू प्रिया मी बावरते... ही कविता मधुराभक्तीची आहे; पण त्याची निवेदिका तिने घेतलेल्या भूमिकेत पूर्णपणे विरघळून गेलेली आहे. वेगळी निघतच नाही. ती आहे एक नववधू आणि कविताभर तिचे विविध विभ्रम प्रत्ययाला येतात.

ही आहे एक त्या काळाची नववधू. विलक्षण संकोचलेली, बावरलेली आणि लाजलेली. ही पतीच्या घरी आल्यावर ती नुसतीच मागेपुढे करते आहे.

तिचे पाऊल पुढे येते आहे आणि मागेही जाऊ पाहत आहे. तिला मनातून हे माहीत आहे, की तिचा पती हाच आता तिचा आधार आहे - प्राणसखा आहे. त्याच्याशिवाय तिला संसारच नाही; पण त्याच्याजवळ जाण्याचे एक अनामिक भय तिला वाटते आहे.

हे एखाद्या नववधूला साजेसेच आहे. माहेरघराचा तिला लळा लागलेला होता. ते सुटल्याने तिचे मन चरचरते आहे. मनातून पतीची ओढ तर वाटते आहे; पण त्याच्याजवळ कसे जायचे ते समजत नाही.

शेवटी ती त्यालाच विनवते, की ‘तूच मला घेऊन चल. माझी लाज भीती तूच घालव. माझे डोळे भरून येतील. आतून कळ उठेल; पण शेवटी माझे खरे घर तुझ्या सन्निधच आहे’.

वरवर पाहता हे नववधूची लाडिक भावावस्था आणि तिच्या मोहक हालचाली यांचे वर्णन करणारे सुमधुर गीत वाटते.

पूर्वीच्या काळी ते विवाहासारख्या मंगल प्रसंगी नववधूला चिडवण्यासाठीही गायले जायचे; पण या गीतातला गर्भित अर्थ खरोखरच आपल्या काळजात कळ उठवणारा आहे.

B R Tambe song
Bride Age : वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

शेवटच्या कडव्याचा विचार केल्यावर लक्षात येते, की आपली भीती आणि लाज हरण्यासाठी निवेदिकेने केलेली विनवणी त्या हरीला आहे, जो जगन्नियंता आहे आणि जीव हरण करून जीवात्म्याला मुक्ती देणार आहे.

त्या हरीशी मीलन व्हावे अशी निवेदिकेची आस आहे. येथे पती हा ईश्वर आहे आणि नववधू आत्मा. जगात गुंतलेल्या जिवाला या जगाचा मोह पडला आहे, मृत्यूचे भय वाटते आहे. पण आतून परमेश्वर प्राप्तीची ओढही आहे.

शेवटी परमेश्वरानेच आपल्याला त्याच्या घरी घेऊन जावे अशी या आत्म्याची प्रार्थना आहे, कारण शेवटी हे जग नश्वर आहे आणि कायमची मुक्ती ईश्वरच देणार आहे. आपण मरणाला घाबरत असतो.

त्याला अमंगल समजत असतो; पण तांब्यांनी त्याला मंगल केले आहे, सुंदर केले आहे. मोठ्या नाट्यपूर्णरितीने.

भा. रा. तांबे हे गीतकाव्याचे प्रवर्तक मानले गेलेले आहेत. ते विशुद्ध आनंदवादी होते. त्यांना आपल्या कवितेतून कोणाला काही उपदेश करायचा नव्हता. समाज प्रबोधन करायचे नव्हते. त्यांच्या स्त्री-पुरुष प्रेमाच्या कवितांमुळे त्यांना ‘शृंगार मधुमिलिंद’ म्हटले गेले.

त्यांच्या गीतांतील स्त्री-पुरुष हे पती-पत्नीच असतात; पण या गीतातील स्त्री-पुरुष त्यांनी असे आत्मा-परमात्म्याच्या अत्युच्च पातळीवर नेले आहेत.

त्यांची शब्दकळा कुणालाही कळावी अशी साधी सोपी आहे आणि शैली चित्रदर्शी आहे. लाजऱ्या बुजऱ्या नववधूला त्यांनी आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभे केलेले आहे.

स्त्री अशी मूर्त झालेली असताना, ज्याला उद्देशून ती हे गीत म्हणत आहे तो तिचा प्राणसखा अदृश्य आहे- ईश्वरासारखाच!

B R Tambe song
Jhimma 2 Marathi Pori Song: "मराठी पोरी दुनियेला दाखवतील माज" झिम्मा 2 मधलं पहिलं धम्नाल गाणं बघाच

हे गीत जेवढे नादमधुर आहे तेवढेच भावमधुर आहे. या गीताचा प्रकट अर्थ आणि अप्रकट अर्थ दोन्हीही वाचकांना आणि श्रोत्यांना भुरळ घातल्यावाचून राहत नाहीत. हेच तांब्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे!

नववधू प्रिया मी, बावरते;

लाजते, पुढे सरते, फिरते.

कळे मला तू प्राण-सखा जरि,

कळे तूच आधार सुखा जरि,

तुजवाचुनि संसार फुका जरि,

मन जवळ यावया गांगरतें.

मला येथला लागला लळा,

सासरि निघता दाटतो गळा,

बागबगीचा, येथला मळा,

सोडिता कसे मन चरचरते!

जीव मनीचा मनी तळमळे

वाटे बंधन करुनि मोकळें

पळत निघावे तुजजवळ पळें

परि काय करूं? उरिं भरभरते

अता तूच भयलाज हरी रे!

धीर देउनी ने नवरी रे

भरोत भरतिल नेत्र जरी रे!

कळ पळभर मात्र! खरे घर तें!

-----------------

B R Tambe song
"शालेय अभ्यासाची उजळणी | ८ वी हिंदी - कविता - सुनो और गुनो | संगीतबद्ध कविता Musical Poem

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com