वर्ण-जाती-धर्म असल्या सर्व गोष्टी आणि भक्ती यांचा काडीमात्र संबंध नाही, असे परखडपणे सांगणारे संत कोण?

भक्ती एकांत शोधण्यासाठी वनाकडे जाणारी नसून माणसांमध्ये राहून अंतर्मनातील एकांतात मानवी स्वभावाचा आणि वर्तनाचा अन्वयार्थ लावणारी..
sant kabir
sant kabiresakal

डॉ. राहुल हांडे

वर्ण-जाती-धर्म असल्या सर्व गोष्टी आणि भक्ती यांचा काडीमात्र संबंध नाही, असे प्रतिपादन करण्यात उत्तर भारतीय संतपरंपरेत कबीर साहेबांइतके स्पष्ट व परखड असणारे संत सहसा सापडत नाहीत.

बडा भया तो क्या भया,जैसे पेड खजूर ।

पंथी को छाया नहीं,फल लागे अति दूर ।।

एखादा वृक्ष उंच वाढलेला आहे, जसे खजुराचे झाड. त्याचे मोठेपण सर्वांच्या नजरेत भरणारे आहे; परंतु हा खजूर वृक्ष कोण्या पांथस्थाला सावली देऊ शकत नाही.

त्याच्यावर फळे आलेली दिसत असली तरी ती खूप दूर असतात. थोडक्यात खजुराचे मोठेपण कोणाला सावली देऊ शकत नाही की कुणाची भूक भागवू शकत नाही. मोठेपण मिरविणाऱ्या तथाकथित संत-महात्म्यांचे व माणसांचे असेच असते.

आपल्या दोह्यांत कबीर साहेब माणसाच्या मोठेपणाऐवजी त्याच्या समाज उपयोगितेला प्राधान्य देतात. भक्ती मार्गावर चालणारा माणूस हा इतरांसाठी सावलीसारखा असावा आणि समाजाच्या प्रत्यक्ष जगण्यात त्याचा उपयोग व्हावा.

समाज आणि भक्ती यांचा थेट संबंध जोडणारे कबीर साहेब यामुळेच उत्तर भारतीय भक्ती आंदोलनाला सामाजिक प्रबोधनाशी जोडण्यात अग्रणी ठरतात. त्यांची भक्ती आणि सामाजिक प्रबोधन हे दोन्ही घटक एकमेकांपासून विलग करता येत नाहीत.

कबीर साहेबांच्या सामाजिक प्रबोधनात आपल्याला दैनंदिन जीवनात वावरणारा माणूस केंद्रवर्ती असलेला दिसून येतो. महाराष्ट्रात हाच माणूस आपल्याला तुकोबांमध्ये भेटतो.

कबीर साहेब आणि तुकोबा यांनी प्रत्यक्ष जे भोगले, पाहिले आणि अनुभवले तेच त्यांच्या शब्दांमध्ये उतरले आहेत.

त्यांची भक्ती एकांत शोधण्यासाठी वनाकडे जाणारी नसून माणसांमध्ये राहून अंतर्मनातील एकांतात मानवी स्वभावाचा आणि वर्तनाचा अन्वयार्थ लावणारी आहे.

भोवतालाच्या कोलाहलात माणसाचे सर्वार्थाने भरकटलेपणदेखील ह्या दोघांच्या चिंतनाचा विषय आहे. माणसाचे अंतर्मन त्याचे बाह्य वर्तन ठरवत असते आणि बाह्य बेगडीपण त्याच्या अंतर्मनाला व्यथित करत असते याची पक्की जाण कबीर साहेब आणि तुकोबांमध्ये होती.

त्यामुळे हे दोघे अंतर आणि बाह्य अशा दोन्ही जगातील परस्पर कार्यकारण भाव शोधतात आणि एवढेच नाही तर त्यावर उपचारदेखील करतात.

सामान्य माणसाला भक्तीच्या वाटेवर चालवताना सर्वप्रकारच्या कृत्रिम सामाजिक भेदभावांकडे केवळ पाठ करून चालणार नाही, तर त्यांची अनावश्यकतादेखील समाजाला निःसंदिग्धपणे समजावणे आवश्यक आहे, हाच कबीर साहेबांचा आणि तुकोबांचा परमार्थ मार्ग आहे.

त्यामुळे माणसावर आणि माणसाच्या जीवनात प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे हे सांगताना कबीर साहेब म्हणतात -

sant kabir
Sant Nivruttinath Palkhi : अवघ्या जनालागी केला नमस्कार, उठावले भार वैष्णवांचे! पारणे फेडणारा सोहळा...

पोथी पढि पढि जग मुआ, पंडित भया न कोय ।

ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय ।।

पोथी, शास्त्र, सिद्धांत यांची घोकंपट्टी केल्याने कोणी पंडित अथवा ज्ञानी होऊ शकत नाही. केवळ अडीच अक्षरांचा आणि अखिल विश्वाला कवेत घेणारा ‘प्रेम’ हा शब्द ज्याला समजला तो खरा पंडित. पांडित्य माणसाला रुक्ष बनवत असते, माणसातील प्रेम आटवत असते.

आपल्यासोबत जगाला बदलावयाचे असेल तर जगावर प्रेम करता आले पाहिजे. प्रेम हा जग बदलणारा महामंत्र होय. अशा प्रेमाला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या कबीर साहेबांचा जीवनप्रवास म्हणजे अखंड वणव्यातील वाट आहे.

बुद्ध-महावीर यांच्यासारखे राजपुत्र अध्यात्माच्या वाटेवर चालतात आणि ज्ञानाची प्राप्ती करतात तेव्हा त्यांची अभिव्यक्ती राजवाड्यातील उद्यानाप्रमाणे सुंदर व नीटनेटकी असते. त्यामध्ये शालीनता आणि सिद्धांताची जटिलता असते. कबीरांची अभिव्यक्ती मात्र निबिड, अस्पर्श, अव्यवस्थित जंगलासारखी असते.

भयावह विक्राळ असले तरी उद्यानापेक्षा जंगलाचे सौंदर्य माणसाच्या अंगावर येणारे असते. अगदी अशीच अभिव्यक्ती कबीर साहेबांची दिसून येते.

जन्मजात अनाथपण, शिक्षणाचा, शास्त्रशुद्ध ज्ञानाचा अभाव, सामाजिक अवहेलना, पोट भरण्यासाठी आयुष्यभर करावी लागलेली अविश्रांत धडपड यामुळे माणूस आणि त्याचे गुणदोष कबीर साहेबांना नेमके समजले होते. असंख्य ग्रंथ व शास्त्र यापेक्षा त्यांनी माणूस वाचलेला होता.

रैदास आणि चोखोबांच्या वाट्यालादेखील हेच आले होते. असे असले तरी माणूस आणि समाज यांच्यातील दांभिकता व विकृती यांचे वर्णन करण्यात ते कबीर साहेबांची व तुकोबांची उंची गाठू शकले नाही. त्या त्यांच्या सौम्य स्वभावाच्या व अभिव्यक्तीच्या मर्यादा असू शकतात.

कबीर साहेब मात्र मिळालेला मानवी जन्म जगाच्या कल्याणासाठी सर्वार्थाने कारणी लावण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेताना दिसतात.

आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म परत परत मिळणारा नाही. झाडाच्या फांदीवरून एकदा तुटलेले पान त्या फांदीशी पुन्हा जोडले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्राणाने शरीराचा त्याग केल्यानंतर काहीच करणे शक्य नाही.

यासाठीच मिळालेला मानवी जन्म स्वतःच्या उत्थानाकरिता व जगाच्या प्रबोधनाकरिता सार्थकी लावणे आवश्यक आहे, हे सांगताना कबीर साहेब म्हणतात -

sant kabir
Sant Tukaram Maharaj : तुका म्हणे धावा...पंढरी विसावा

मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारम्बार ।

तरवर से पत्ता टूट गिरे, बहुरि न लागे डार ।।

मानवी जीवन हे सुख व दुःख ह्या दोन ध्रुवांमध्ये कायम दोलायमान राहत असते. माणसाच्या जीवनाचा लोलक जेव्हा सुखाकडे वाटचाल करत असतो तेव्हा सुखाला स्पर्श करून तो पुन्हा दुःखाच्या ध्रुवाकडे वाटचाल करणार आहे, याचा माणसाला विसर पडतो.

सुखाचा आस्वाद घेताना माणसाला परमेश्वराचा म्हणजे चांगल्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडत असतो.

दुःखात मात्र तो परमेश्वराचे आणि समाजाचे स्मरण करतो. सुखातही ज्याला चांगल्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडणार नाही त्याच्या जीवनाचा लोलक सुखाच्या ध्रुवावर कायमचा विसावेल, कारण दुःख ही भावनाच त्याच्या जीवनातून नष्ट झालेली असेल. असे सुविचारांचे आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सांगताना कबीर साहेब म्हणतात -

दुःख में सुमिरन करे, सुख में करे न कोय ।

जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काहे को होय ।।

हिमालयाच्या पर्वतरांगातील अस्पर्श व अपरिचित जंगलाचे सौंदर्य आणि संगीत म्हणजे कबीर साहेब. औपचारिक शिक्षणाच्या, शास्त्रांच्या आणि ज्ञानाच्या छिन्नी-हातोड्याने पैलू न पडलेला अनघड हिरा म्हणजे कबीर साहेब, असे कबीर साहेबांचे वर्णन करता येते.

त्यांच्या जीवनदृष्टीची कक्षा माणसापासून प्रारंभ होते आणि माणसाजवळ पूर्ण होते. धर्म-जात, शास्त्र-तत्त्वज्ञान, प्रथा-परंपरा इत्यादी सर्व कृत्रिम बाह्य आवरणे न मिळाल्यामुळे समाज आणि माणूस त्यांना निखळपणे पाहता आला.

सतत धर्मशास्त्राच्या, त्यातील सिद्धांतांच्या, धार्मिक कर्मकांडाच्या, माळा-मुद्रांच्या गदारोळात राहणारा माणूसच खरा धार्मिक अथवा खरा भक्त असतो, ह्या बाह्य व बनावटी चेहऱ्याचे वस्त्रहरण अत्यंत नेमक्या शब्दांत करताना कबीर साहेब म्हणतात -

नहाये धोये क्या हुआ, जो मन मैल न जाए ।

मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए ।

माणसाने कितीही स्नान केले तरी केवळ शरीराचा मळ नष्ट होऊ शकतो, मनातील मळ मात्र दूर होऊ शकत नाही. मासा तर पाण्यातच जन्मतो आणि संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो तरी त्याचा दुर्गंध दूर होत नाही.

आयुष्यभर काशीत राहणाऱ्या कबीर साहेबांच्या मनात काशीचे वातावरण आणि गंगास्नान यावरून हे विचार आले असावेत.

काशीत राहणारे पंडित आणि पाप धुण्यासाठी आलेले लोक यांच्या गर्दीत मनातील मळ दूर करणे, ही खरी भक्ती हा भाव निर्माण होणे कबीर साहेबांना अपेक्षित आहे.

अशावेळी नाही निर्मळ जीवन। काय करील साबण, असे म्हणणारे तुकोबा त्यांच्या एका बाजूला उभे असलेले दिसतात, तर दुसऱ्या बाजूला मन चंगा, तो कठौती में गंगा म्हणणारे रैदासजी उभे दिसतात.

काम, क्रोध, मद, मत्सर, उच्च-नीच भाव, भेदाभेद आदींनी भरलेल्या मनाने भक्ती करण्यात अर्थ नाही. अशा सर्व अवगुणांचा त्याग म्हणजेच भक्ती.

माणसांच्या मनात खऱ्या भक्तीचे बीजारोपण करण्यासाठी कबीर साहेब म्हणतात भक्तीचे बीज असे आहे, की ज्याची अंकुरण क्षमता अनंत युगांपर्यंत नष्ट होऊ शकत नाही.

खऱ्या भक्तीत रममाण असलेला जीव समाजाने ठरवलेल्या कोणत्याही उच्च-नीच वर्णात-जातीत-कुळात जन्माला आला तरी तो संतच राहतो.

त्याच्या संतत्वात काहीच अंतर पडत नाही. सोप्या शब्दांमध्ये संतत्व आणि माणसाने आपापसांत निर्माण केलेले कृत्रिम भेद यांचा काही एक संबंध नाही.

sant kabir
Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

भक्ति बीज पलटै नहीं, जो युग जाय अनन्त ।

ऊच नीच घर अवतरै, होय सन्त का सन्त ।।

कबीर साहेबांनी आपल्या दोह्यांमधून केलेली भक्तीची व्याख्या परमेश्वर संकल्पना, परमेश्वर मूर्ती, गुरू माहात्म्य यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी कायम अग्रेसर होताना दिसते.

वर्ण-जाती-धर्म असल्या सर्व गोष्टी आणि भक्ती यांचा काडीमात्र संबंध नाही, असे प्रतिपादन करण्यात उत्तर भारतीय संतपरंपरेत कबीर साहेबांइतके स्पष्ट व परखड असणारे संत सहसा सापडत नाहीत.

भाव म्हणजे प्रेमाशिवाय भक्ती शक्य नाही. भक्तीशिवाय भाव म्हणजे प्रेम अशक्य. त्यामुळे भक्ती आणि भाव (प्रेम) ही एकाच रूपाची दोन नावे आहेत, कारण दोन्हींचा स्वभाव एक आहे.

असे असले तरी जाती-पातीचा अभिमान कायम ठेवून जर तुम्ही भक्ती करायला निघालात तर भक्ती अशक्य आहे. सगळ्या अहंकारांचा त्याग करून गुरुसेवा केली तर भक्त देखील गुरू म्हणून ओळखला जाऊ शकतो. हे स्पष्ट करताना कबीर साहेब म्हणतात -

भाव बिना नहिं भक्ति जग, भक्ति बिना नहीं भाव ।

भक्ति भाव एक रुप हैं, दोऊ एक सुभाव ।।

जब लग नाता जाति का, तब लग भक्ति न होय ।

नाता तोडे गुरु बजै, भक्त कहावै सोय ।।

जन्म, जात, वर्ण, धर्म अशा सर्वच बाबतीत आयुष्यभर अवहेलना वाट्याला आलेल्या कबीर साहेबांनी अशा सर्व बेगडी व कृत्रिम धारणांना व मान्यतांना शरण न जाता, त्यांच्या मागील पाखंड आणि स्वार्थ यांना उघडे पाडण्यात हयगय केलेली नाही.

कबीर साहेबांचा स्वभाव परिस्थितीशरण नव्हता, तर परिस्थितीला आव्हान देणारा होता. भगवान बुद्ध-महावीर ते महायोगी गोरक्षनाथ यांच्यापर्यंत भारताच्या वर्णव्यवस्थेला व जातिव्यवस्थेला देण्यात आलेले आव्हान संयत शब्दांत होते.

कबीर साहेबांचे आव्हान हे वर्णव्यवस्थेवर, जातिव्यवस्थेवर आणि धर्माधर्मातील भेदांवर आसुडाप्रमाणे बरसणारे होते. कबीर साहेबांचा भक्ती मार्गी विद्रोह समजण्यासाठी जात, वर्ण आणि कुळ यांचा अहंकार मिटवत मनःपूर्वक भक्ती करण्याची तयारी करावी लागते.

असे केल्यावरच सद्‌गुरूची प्राप्ती होऊन जन्म-मरणाच्या फेऱ्यांतील दुःखाचा विनाश होऊ शकतो.

जाति बरन कुल खोय के, भक्ति करै चितलाय ।

कहैं कबीर सतगुरु मिलै, आवागमन नशाय ।।

----------------

sant kabir
Kabir Jayanti 2022: जयंतीनिमित्य वाचा कबीरांचे अनमोल दोहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com