Vijayadashami :काय सांगता? असाही दसरा..??

dasra
dasraesakal

प्रा. शैलजा सांगळे

पावसाळा संपल्यानंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे दसरा किंवा विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीचा दिवस शुभदिवस मानला जातो. भारतात सर्वच राज्यात दसरा धुमधडाक्यात व उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक राज्यात तेथील परंपरांप्रमाणे लोक हा सण साजरा करतात, त्यामुळे साजरीकरणांमध्ये थोडाफार फरक दिसतो. दक्षिण भारतातील, विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दसरा हा एक महोत्सवच असतो.

भारतभरात सगळीकडेच दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मात्र दहा दिवस साजऱ्या होणाऱ्या म्हैसूरच्या दसरा उत्सवाने ‘नाड हब्बा’ म्हणजे राज्योत्सव म्हणून पर्यटन नकाशावर स्थान मिळवले आहे.

खरं म्हणजे दसऱ्याच्या या उत्सवाची सुरुवात झाली ती चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याच्या काळात. विजयनगरच्या पाडावानंतर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून म्हैसूरच्या वडियार घराण्याने ही परंपरा सुरू ठेवली.

सन १६१० पासून म्हैसूरमधील दसऱ्याच्या शानदार सोहळ्याची शाही पद्धतीने सुरुवात झाली. शाही दसऱ्याचा हा सोहळा अत्यंत मनोहारी व नेत्रदीपक असतो.

सजवलेल्या हत्तींवरून निघणारी देवी चामुंडेश्वरीची अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारी शानदार मिरवणूक, विद्युत रोषणाईने झळाळून उठणारा म्हैसूरचा राजवाडा व इतर इमारती हा नयनरम्य सोहळा पाहण्यास केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटन येतात.

'जम्बो सवारी' या नावाने प्रसिद्ध असणारी ही शाही मिरवणूक हे म्हैसूरच्या दसऱ्याचे खास वैशिष्ट्य. सजवलेले घोडे, हत्ती, उंट, बँड पथक व रंगीबेरंगी रेशमी कपड्यात सजलेले व नटलेले नगरजन अशी ही दिमाखदार मिरवणूक.

या मिरवणुकीचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सोंड व पाठीवर जरतारी वस्त्राने सजवलेल्या हत्तीवरील अडीचशे किलो वजनाच्या सोनेरी अंबारीतील चामुंडी देवीची भव्य व साजशृंगार केलेली मूर्ती.

dasra
Dussehra Vijayadashami festival : दसऱ्याला का वाटतात आपट्याची पाने ! सीमोल्लंघन, सरस्वती आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व

म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरीच्या देवळातील चामुंडेश्वरी देवीच्या पूजनाने उत्सवाची सुरुवात होते. देवीची मूर्ती अंबारीत ठेवण्यापूर्वी वडियार घराण्यातील राजदांपत्याकडून देवीची यथासांग पूजा होते. मिरवणुकीची सुरुवात मात्र म्हैसूरच्या राजवाड्यापासून होते व शमीच्या झाडाजवळ त्या मिरवणुकीची सांगता होते.

महाभारतातील उल्लेखानुसार पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात त्यांची शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. तसेच कोणत्याही मोहिमेवर निघण्यापूर्वी जयप्राप्ती व्हावी म्हणून म्हैसूरचे राजे शमीच्या वृक्षाची पूजा करत असत. त्यामुळे शमीच्या वृक्षाजवळ मिरवणूक संपते. या वृक्षाजवळ मोठा मंडप उभारतात त्याला ‘बनी मंडप’ म्हणतात.

या मंडपात पारंपरिक शस्त्रांची पूजा होते, मशालींचे संचलन होते. भारतीय सैन्य दलाच्या जवानांची थरारक प्रात्यक्षिके, पोलिस बँडचे वादन, शोभेच्या दारूची आतषबाजीही होते. दसऱ्याच्या संध्याकाळी म्हैसूरचा राजवाडा लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. केवळ राजवाडाच नव्हे तर म्हैसूरमधील अन्य ऐतिहासिक वास्तू, स्मारके, मोठी दुकानेही दिव्यांच्या रोषणाईने झगमगत असतात.

दसऱ्याच्या दिवशी वडियार घराण्यातर्फे राजवाड्यात खास दरबार भरवण्यात येतो. त्यासाठी राजघराण्यातील मंडळी, उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असतात. विशेष म्हणजे या दिवशी राजघराण्याचे जवळजवळ २०० किलो वजनाचे सोन्याने मढवलेले सिंहासन लोकांना बघण्यासाठी ठेवलेले असते.

दुसरे आकर्षण म्हणजे राजवाड्यासमोरच्या मैदानात भव्य प्रदर्शन भरवले जाते. या दिवशी अनेक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. निरनिराळ्या राज्यातील गायक, वादक, नर्तक इत्यादींना कला सादर करण्याची संधी मिळते.

dasra
Dussehra Vijayadashami festival : प्रदूषणमुक्तीचा शुभमुहूर्त दसऱ्याला जिल्ह्यातून इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी

आंध्र प्रदेशात घरातील लहान मुले थोरांना नमस्कार करून एकमेकांना शमीची पाने देतात. महिला या दिवशी गौरीचे हळदी कुंकू करतात, त्याला ‘बोम्यल कोलेवू’ म्हणतात. रंगीबेरंगी फुलांनी तबक सजवतात व त्यात मध्यभागी हळदीचा उभ्या आकाराचा गोळा किंवा भोपळ्याचे फूल ठेवतात. त्या तबकाची पूजा करतात व त्याभोवती फेर धरून नृत्य केले जाते.

याला ‘बथकम्मा’ म्हणतात. दुसऱ्या दिवशी या बथकम्माचे विसर्जन केले जाते. अनेक ठिकाणी ’तेप्पाउत्सवम, म्हणजे बोट उत्सव साजरा करतात. कृष्णा आणि तुंगभद्रेच्या संगमावर हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. तेथे फुले व दिव्यांची आरास केलेल्या बोटीत सजवलेली दुर्गेची प्रतिमा ठेवतात. ही बोट नदीतून नेताना ती बघण्यासाठी लोक खूप गर्दी करतात.

तमिळनाडूमध्ये ‘गोलू’ किंवा ‘कोलू’ अशा नावाने दसऱ्याचा उत्सव साजरा होतो. या उत्सवात तेथे बाहुल्या सजवून ठेवण्याची पद्धत आहे. घरातल्या देवघरात लाकडाच्या पाच, सात किंवा अकरा पायऱ्या बनवतात, त्या पायऱ्या रंगीबेरंगी कापडाने सजवतात. त्यांना ‘गोम्बे हब्बा’ म्हणतात. पायऱ्यांच्या आजूबाजूची जागासुद्धा फुले व दिव्यांची आरास करून सजवतात.

गौरी गणपतीपुढे आपण जशी सजावट करतो तशी सजावट करतात. एकूण नऊ बाहुल्या देवीच्या रूपात सजवतात. इतर बाहुल्यांमध्ये नऊ दिवस रोज याप्रमाणे देवीच्या रूपातली बाहुली नऊ पायऱ्यांवर ठेवतात. या देवीच्या रूपातल्या बाहुल्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करतात, अशी धारणा आहे.

या सणाच्या निमित्ताने तयार केलेल्या बाहुल्या विवाहानंतर मुलीला दिल्या जातात. काही पायऱ्यांवर देवतांच्या छोट्या प्रतिकृती ठेवतात. सर्व देवतांनी आपली शस्त्रे देवी दुर्गेला महिषासुराचा वध करण्यासाठी दिली होती.

या सर्वांचा आदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिकृती मांडल्या जातात. अगदी शेवटच्या पायरीवर मुले स्वतःची खेळणी सजवून ठेवतात. काहींच्या मते ब्रह्माने निर्मिलेली संपूर्ण सृष्टीच जणू तेथे अवतरते.

dasra
Vijayadashami Dasara 2022 : दसऱ्याला विजयादशमी अन् दशहरा का म्हणतात माहितीये? जाणून घ्या महत्व

केरळमधील ठक्केग्रामच्या प्रसिद्ध मंदिरात मूर्ती नसते तर एक मोठा आरसा ठेवलेला असतो. दसऱ्याच्या दिवशी लोक त्यासमोर झुकून उभे राहतात व स्वतःचीच झुकलेली प्रतिमा बघतात. त्याचा अर्थ देव आमच्यातही आहे असे मानणे.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला लहान मुले देवळात, घरात किंवा शाळेत पुस्तकांची पूजा करतात. आपल्याकडे जशी लहान मुले दसऱ्याला पाटीपूजन करतात तशी केरळातही शिकायला सुरुवात करणारी मुले अक्षर गिरवण्याची सुरुवात या दिवशीच करतात.

त्याला ‘विद्याआरंभम्’ असे म्हणतात. एका ताटात तांदळाचे पीठ पसरून ठेवतात व मुले मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर बोटाने अक्षरे गिरवतात.

केरळमध्ये ही प्रथा इतकी प्रसिद्ध आहे की २००४ सालापासून तेथील चर्चमध्येसुद्धा ही प्रथा सुरू झाली. हिमाचल प्रदेशातील कुलू परिसरातल्या ढालपूर दानात दसऱ्यापासून पुढे सात दिवस मोठा उत्सवच असतो. या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक लोक या उत्सवात सहभागी होतात.

याशिवाय जगातील चार ते पाच लाख लोक दरवर्षी येथे येतात त्यामुळे कुलू येथील दसरा आता आंतरराष्ट्रीय सोहळा झाला आहे. इतिहासातील नोंदीनुसार सतराव्या शतकात कुलू येथील स्थानिक राजा जगतसिंग याने रघुनाथाची मूर्ती सिंहासनावर ठेवून प्रशिक्षण घेतले व त्यानंतर रघुनाथ हाच कुलूचा राजा म्हणून लोक मानू लागले व तेव्हापासून रघुनाथाच्या स्मरणार्थ दसऱ्याचा हा उत्सव सुरू झाला.

दसऱ्याच्या दिवशी सजवलेल्या रथातून अनेक देवदेवतांच्या उभ्या मूर्तींची मिरवणूक काढतात. या मूर्तींना सन्मानाने मैदानात आणतात व रघुनाथ यांच्या प्रति आदर व्यक्त करतात. उत्तर प्रदेशात रामाच्या विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी किंवा दसरा साजरा करतात.

रामाने रावणाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक बळ व शक्ती प्राप्त करण्यासाठी नऊ दिवस दुर्गा मातेची आराधना केली होती, त्यामुळेच श्रीराम रावणाचा वध करू शकले, अशी त्या भागातील लोकांची धारणा आहे. बऱ्याच ठिकाणी रामलीलांचे आयोजन केले जाते. श्रीरामाच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित चित्र रेखाटली जातात.

dasra
Navratri Festival 2023: मनातील अशा पूर्ण करणारी नरकोळची आशापुरी!

दसऱ्याच्या दिवशी उत्तरेकडील अनेक गावा-शहरांमध्ये रावण, त्याचा मुलगा मेघनाथ व भाऊ कुंभकर्ण यांच्या प्रचंड मोठ्या प्रतिकृतींमध्ये फटाके भरून मोठ्या मैदानात उभ्या करून जाळतात. सुष्टाच्या अनिष्टावरील विजयाचे हे प्रतीक मानले जाते. अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी होम करतात.

काम, क्रोध, मोह,मद, मत्सर, लोभ,चिंता, अहंकार व दुष्ट विचार या नऊ वाईट प्रवृत्ती जळून होमात नष्ट झाल्या असे मानतात. लोकांनी आपल्या वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात व सत्य व चांगुलपणाचा रस्ता धरावा हाच होम करण्यामागचा हेतू असतो. आसाममध्येबिहू नंतर दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दसरा.

आसाम मधील लोकांची अशी धारणा आहे, की दसऱ्याच्या दिवशी शंकराची पत्नी उमा प्रथम माहेरी आली. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना दसऱ्याच्या दिवशी माहेरी बोलावतात.

इतिहासातील दाखल्यानुसार आसाममधील राजा प्रताप सिंग यांनी पश्चिम बंगाल येथील दुर्गा पूजेबद्दल खूप ऐकले व मूर्तिकला शिकण्यासाठी आसाममधून पश्चिम बंगालमध्ये माणूस पाठवला व आसाममध्ये दुर्गा पूजा सुरू झाली.

ओडिशामध्ये दसऱ्याच्या दिवशी शारदीय दुर्गा पूजा असते. दसऱ्याच्या दिवशीच्या पूजेला ‘अपराजिता पूजा’ असे म्हणतात. या दिवशी देवीला दहीपरवाल म्हणजे दही घालून केलेला भात, पिठा म्हणजे भाजलेला केक, मिठाई आणि तळलेला मासा यांचा नैवेद्य दाखवतात.

त्यानंतर लग्नानंतर मुलीला जसा निरोप देतात तसा साश्रू नयनांनी देवीला निरोप देण्याचा कार्यक्रम असतो. मूर्तीचे विसर्जन केल्यावर लोक रावणाची प्रतिकृती जाळून ‘रावण पोडी’ साजरी करतात.

--------

dasra
Keral floods: भारत आभारी आहे, केरळसाठी परदेशी मदत नाकारली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com