Physiotherapy : ज्येष्ठ नागरिकांच्या व्याधी फिजिओथेरपीने दूर होतात का?

स्नायू बळकट करणे, सांध्यांची हालचाल वाढवणे यासाठी छोटे छोटे व्यायाम प्रकार..
Physiotherapy  for Senior Citizen
Physiotherapy for Senior Citizen Esakal

डॉ. सुकन्या दांडेकर

आरोग्यशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आयुष्यमान वाढले आहे. पण हे वाढलेले आयुष्य तंदुरुस्त आणि आनंदी ठेवण्यात फिजिओथेरपीची मोलाची साथ मिळू शकते.

एक फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करताना माझा अनेक वयस्कर लोकांशी खूप जवळून संबंध येतो. प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असली तरी एका बाबतीत मात्र साम्य असते.

अनेकदा ही ज्येष्ठ मंडळी कुठल्यातरी व्याधीने ग्रस्त असतात किंवा कुठल्यातरी शस्त्रक्रियेनंतर आमच्याकडे आलेली असतात. बऱ्याचदा त्यांच्या मनात, ‘मी आत्तापर्यंत सगळं करू शकत होतो, अचानक मला असं कसं व्हायला लागलं?’ असे विचार येत असतात.

थोडीशी निराशा येऊ लागलेली असते. परिस्थितीचा स्वीकार करणे अवघड जात असते. अशावेळी एक फिजिओ म्हणून त्यांना समजून घेणे आणि समजावणे खूप महत्त्वाचे. ‘Your body can do anything, it’s your mind you have to convince.’ हे आम्हाला त्यांच्या मनावर बिंबवावे लागते.

आमच्या क्लिनिकमध्ये पंचाहत्तर वर्षांच्या एक आजी यायच्या. तरुणपणापासून अत्यंत सक्रिय अशी त्यांची जीवनशैली होती. पण कालांतराने गुडघे दुखू लागले. जिने चढ-उतार करणे अवघड जाऊ लागले. डॉक्टरांनी अर्थरायटिस आहे असे निदान केले होते.

गुडघे बदलायची शस्त्रक्रिया करायची का फिजिओथेरपी सुरू करायची असे पर्याय त्यांच्यासमोर होते. शस्त्रक्रियेची भीती म्हणा किंवा खर्च म्हणा, म्हणून त्यांनी फिजिओ ट्रीटमेंट घ्यायचे ठरवले.

प्रथम त्यांची संपूर्ण फिजिओ असेसमेंट केली. असेसमेंट करायला साधारणपणे एक ते दीड तास लागतो. या असेसमेंटमध्ये पेशंटचे नुसते गुडघेच नाही, तर पूर्ण पायातील ताकद, सांधे आणि स्नायूंची क्षमता तपासली जाते.

यावरून ट्रीटमेंट किती काळ घ्यावी लागेल ते ठरवले जाते. स्नायूंची क्षमता मोजण्यासाठी आता अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीनही आहेत. ट्रीटमेंटच्या पहिल्या भागात मुख्यत्वे वेदना कमी करण्यावर भर दिला जातो.

यासाठी विविध इलेक्ट्रिकल करंट वापरले जातात किंवा हॉट ॲण्ड कोल्ड थेरपी वापरली जाते. एकदा का वेदना कमी झाल्या, की स्नायू बळकट करणे, सांध्यांची हालचाल वाढवणे यासाठी छोटे छोटे व्यायाम प्रकार करून घेता येतात. नंतर हेच व्यायाम त्यांना घरी करण्यासाठी नेमून दिले जातात.

अशा प्रकारे ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांना महिन्यातून एकदा फॉलोअपसाठी बोलावत असू. फॉलोअपला येताना त्या खूप खूश असायच्या.

‘आता मी कसं पूर्वीप्रमाणे बागकाम करू शकते, ट्रिपलापण जाऊ शकते,’ असे खूप त्यांना सांगायचे असायचे. आणि मुख्य म्हणजे ऑपरेशन करावे लागले नाही याचा आनंद ओसंडून वाहत असायचा.

कधीकधी एखाद्या अपघातामुळे ऑपरेशन करायला लागलेले वयस्कर पेशंटही येतात. पडल्यामुळे हिप फ्रॅक्चर झालेल्या एक सत्तर वर्षांच्या आजी आमच्याकडे आल्या. हिप फ्रॅक्चरमुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली होती.

शस्त्रक्रियेपूर्वी त्या अत्यंत ॲक्टिव्ह होत्या, वाहन चालवत होत्या. पण एकाएकी हालचालींवर निर्बंध आल्यामुळे चिडचिडेपणा आला होता. आणि त्या कोणतीही ट्रीटमेंट करून घ्यायला तयार नव्हत्या.

खुब्याची हालचाल न झाल्यामुळे स्नायू कडक झाले होते. त्यांना समजावून सांगितले, की हा आजार नाहीये. तुम्हाला फक्त दुखापत झाली आहे आणि दुखापत बरी होऊ शकते. अत्याधुनिक फिजिओ मशीन वापरून प्रथम हा कडकपणा कमी केला.

हळूहळू सांध्याची हालचाल सुरू केली. नंतर थोडे वेट ट्रेनिंग चालू केले. आधार घेऊन चालायला सुरुवात केल्यावर मात्र त्यांचा मूड पूर्ण बदलला. चेहरा हसरा झाला. हा बदल काही एका रात्रीत घडला नव्हता. त्यांनी खूप सोसले होते, खूप कष्ट घेतले होते. फिजिओच्या आणि त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते.

न्यूरोफिजिओथेरपची एक केस माझ्याकडे आली होती. ऐंशी वर्षांचे आजोबा होते. त्यांना खूप जोराचा स्ट्रोक आला होता.

बरेच दिवस आयसीयूमध्ये होते. घरी आल्यावर दैनंदिन कामेही करता येत नव्हती. घरच्यांच्या मदतीने क्लिनिकला येऊ लागले. सुरुवातीला थोडे उदास, कंटाळलेले असत. हे आव्हान माझ्यासाठीही मोठे होते.

कधी मशीनच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल स्टिम्युलस वापरून, तर कधी मॅन्युअल थेरपी देऊन, कालांतराने ते आता काठी घेऊन आपापले चालू लागले. हा टप्पा त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता.

त्यामुळे आता त्यांच्या मनानेही उभारी घेतली आणि आपण आता स्वावलंबी आहोत, या कल्पनेनेच त्यांची पुढची प्रगती खूप झपाट्याने झाली. आजोबांनी फिजिओ ट्रीटमेंटच्या बरोबरीने औषधपाणी आणि इतर पथ्येही नीट पाळली होती.

या सगळ्यात त्यांच्या घरच्यांची साथही खूप मोलाची होती. पुढचा टप्पा होता फंक्शनल ट्रेनिंगचा, म्हणजेच खऱ्या अर्थाने रिहॅबिलिटेशनचा.

आपापले कपडे नीट घालणे, केस विंचरणे, पांघरुणाची घडी घालणे, छोट्या पायऱ्यांवरून वर-खाली करणे, खडबडीत रस्त्यावरून चालणे वगैरे. एका अर्थाने लहानपणच हे! लहान मुलाला जसे शर्टाची बटणे लावता आली तरी आनंद होतो, तसेच आजोबांचे होते.

पण एकदा का हे जमू लागल्यावर आजोबा इतके खूश होते, की सुरुवातीला गप्पगप्प असणाऱ्या आजोबांना माझ्याशी खूप गप्पा मारायच्या असायच्या. नीट आवरून क्लिनिकला यायची वाट बघायचे, असे त्यांच्या घरचे सांगत.

Physiotherapy  for Senior Citizen
Health Insurance :आरोग्य विम्याचा दावा का नाकारला जातो?

ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारी अजून एक तक्रार म्हणजे पार्किन्सन! ऐंशी टक्के लोकांमध्ये याचे कारण असते मेंदूमध्ये डोपामिन तयार होण्याचे प्रमाण कमी होणे.

असे झाले की मेंदूकडून अवयवांना हालचाली करण्यासाठी मिळणाऱ्या सूचना कुठेतरी चुकायला लागतात. रोजची कामे करताना सुसूत्रता येईनाशी होते. छोट्या छोट्या वस्तू उचलता येत नाहीत किंवा हातातून पडतात.

नीट सरळ चालता येईनासे होते किंवा चालताना थोडा तोल जाऊ लागतो. कधीकधी हातापायांना कंप येतो.

हाताला थोडा कंप येतोय आणि वस्तू हातातून पडतायत, अशी तक्रार घेऊन ब्याऐंशी वर्षांचे आजोबा माझ्याकडे येत होते. पार्किन्सनची नुकतीच सुरुवात होती. स्नायू कडक होऊ लागले होते. थोडा कंप येत होता आणि हालचालींमध्ये सुसूत्रता नव्हती.

चालताना कधीकधी तोल जात होता. प्रथम त्यांची तपासणी करून ते काय काय करू शकतात व कोणती कामे करायला त्यांना अवघड जाते ते बघितले. मग त्यांचे कडक झालेले स्नायू लवचिक करण्यासाठीचे व्यायाम सुरू केले.

कंप कमी करण्यासाठीचे उपाय सुरू केले. या सर्व क्रिया घोटून घोटून करून घ्याव्या लागतात, कारण यात नुसत्या हातापायाचे नाही तर मेंदूचेही ट्रेनिंग करावे लागते. आता काही फिजिओथेरपीची मशीनही आहेत, जी या ‘ट्रेन द ब्रेन’साठी उपयुक्त आहेत.

ह्युबर ३६० मशीनवर तोल संभाळण्याचेही ट्रेनिंग दिले. याबरोबरच अनेक क्रिया एकाच वेळी करून घेतल्या; बरोबर एका रेषेत चालणे, पिशवी खांद्याला लावून बोलत बोलत चालणे, खाली न बघता जिना चढणे इत्यादी. वेळेत सुरू केलेल्या उपायांमुळे आजोबांचा आजार बळावला नाही.

पार्किन्सन होण्याचे मुख्य कारण म्हणजे झोपेच्या अनियमित वेळा, टीव्ही, मोबाईलचा जास्त वापर यांमुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही.

खाणपिण्याच्या वेळा सांभाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच झोपेच्या वेळा पाळणेही गरजेचे आहे. पूर्वी हा आजार साधारणपणे ७०-७५ वयानंतर दिसून यायचा. पण आजकाल पन्नाशीतही दिसून येतो.

पार्किन्सन होऊ नये म्हणून काही खबरदारी आपण नक्कीच घेऊ शकतो. झोपेच्या वेळा पाळणे, टीव्ही-मोबाईलचा वापर कमी करणे याबरोबच नियमित व्यायाम करणे.

आपल्या मेंदूत तयार होणारे डोपामिन आणि व्यायाम याचाही खूप जवळचा संबंध आहे.

नियमित व्यायामामुळेही डोपामिन तयार होण्यास मदत होते. डोपामिनमुळे केवळ हालचाली नीट होतात असे नाही, तर मूड सुधारतो, मन आनंदी राहते. म्हणजे केवळ शारीरिक नाही, तर मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

आरोग्यशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आयुष्यमान वाढले आहे. पण हे वाढलेले आयुष्य तंदुरुस्त आणि आनंदी ठेवण्यात फिजिओथेरपीची मोलाची साथ मिळू शकते.

---------------------

Physiotherapy  for Senior Citizen
Physiotherapy: फिजिओथेरपी म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील थेरपीबद्दल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com