Galileo : पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओला आयुष्याच्या उत्तरार्धात नजरकैदेत का राहावं लागलं?

Galileo
Galileoesakal

‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...२२ जून १६३३ या दिवशी सकाळी गॅलिलिओला शिक्षा ऐकायला बोलावण्यात आले होते. प्रथेप्रमाणे पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून तो आला. शिक्षा ऐकण्यासाठी गुढगे टेकून बसल्यावर त्याला १७ मुद्दे असलेली शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्याकडून एक लांबलचक शपथही वदवून घेण्यात आली...

अरविंद परांजपे

गॅलिलिओने वयाच्या २८व्या वर्षी पादुआ विद्यापीठात भूमिती, यांत्रिकी आणि खगोलशास्त्र शिकविण्यास सुरुवात केल्यानंतर तिथेच संशोधन करून अनेक शोध लावले. आपल्या गणिती शोधांचा वापर व्यवहारात कसा होऊ शकेल, याकडे त्याचे विशेष लक्ष असे.

निरीक्षणांनुसार तो आपले मत बदलण्यास तयार असे, ही गॅलिलिओची एक मोठी खासियत होती. म्हणजे, त्याने जर एखादा सिद्धांत मांडला पण निरीक्षणे मात्र काही वेगळेच दर्शवत असतील तर तो आपला सिद्धांत बदलायला तयार असे. हा गुण शास्त्रज्ञांसाठी खूपच महत्त्वाचा आहे.

त्याने (किंवा इतर कोणीही) केलेल्या प्रयोगांचा निष्कर्ष सर्वमान्य असण्याकरिता काही मानके हवीत हे गॅलिलिओच्या लक्षात आले होते. त्याप्रमाणे त्याने वेळ आणि लांबीचे मानक तयार केले, जेणेकरून त्याने वेगवेगळ्या वेळी केलेल्या प्रयोगातून अपेक्षित उत्तर मिळत आहे किंवा कसे हे तपासता येईल. एखादी वस्तू फेकली असता जमिनीवर पडण्याचा तिचा मार्ग हा सरळ रेषेत नसतो तर तो पॅराबोलिक असतो, असा शोधही त्याने अनेक प्रयोगांतून लावला.

त्याकाळी अॅरिस्टॉटलची शिकवण सगळ्या विज्ञानाचा आधार होती. जर दोन शास्त्रज्ञांमध्ये वादविवाद झाला आणि दोघेही एकमेकांना आपले मत पटवून देऊ शकेल नाहीत, तर ते अॅरिस्टॉटलला शरण जात असत, आणि त्याने सांगितलेले ग्राह्य मानत असत. गॅलिलिओने या परिस्थितीला छेद दिला.

Galileo
स्टीफन हॉकिंग.. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि गॅलिलिओ!

या संदर्भात गॅलिलिओने केलेला एक प्रयोग सांगण्यात येतो. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे पदार्थ एकाच उंचीवरून टाकले तर त्यांना जमिनीवर पडायला लागणारा वेळ सारखाच असेल. म्हणजे एक लोखंडाचा गोळा आणि एक हलकसं पीस जर उंचावरून जमिनीवर टाकले तर दोघांना जमिनीपर्यंत पोचायला लागणारा वेळ सारखाच असेल.

त्या पिसाला हवेच्या दाबावर लोखंडाच्या गोळ्यासारखी मात करता येत नाही, म्हणून आपल्याला पीस हळूहळू तरंगत जमिनीपर्यंत येताना दिसते. पीस हलके असल्याने त्याला जमिनीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, असं अॅरिस्टॉटलचं मत होतं.

पुढे अपोलो-१५ चांद्रमोहिमेत अंतराळवीर डेव्हिड स्कॉटने चंद्रावर असताना एक हातोडा आणि एक पीस एकच वेळी चंद्रभूमीवर टाकले आणि ते दोन्ही एकाच वेळी खाली पडले. हे दाखवले.

आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे (गॅलिलिओ गॅलीली –सकाळ साप्ताहिक, प्रसिद्धीः ३० सप्टेंबर) गॅलिलिओने असे अनेक विविध शोध लावले, पण वयाच्या सुमारे ४०-४५ वर्षी त्याच्या मनात एक खंत निर्माण होत होती. पुढच्या अनेक पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील असा कोणताही शोध आपण लावलेला नाही, असे त्याला वाटू लागले होते.

१७ व्या शतकापर्यंत काच आणि काचेपासून भिंग बनवण्याची कला खूप विकसित झाली होती. या भिंगांपासून दुर्बीण कशी तयार झाली हे आपण पुढे बघणार आहोत. हान्स लिपरहॉय (Hans Lipperhey.

इंग्रजी भाषेतील स्पेलिंग प्रमाणे अनेकजण याचा उच्चार लिपर्शे असाही करतात) या जर्मन-डॅनिश व्यक्तीने दुर्बीण तयार केली होती. आणि २ ऑक्टोबर १६०८ यादिवशी त्याने पेटंटसाठी अर्जही केला होता. असे यंत्र कोणीही तयार करू शकते, असे कारण देऊन तो अर्ज नाकारला गेला. जत्रेत विकल्या जाणाऱ्या लिपरहॉयच्या दुर्बिणी इतरांसाठी घर सजावटीचे एक साधन होते. पण गॅलिलिओला मात्र या यंत्राच्या उपयुक्ततेची खरी जाणीव झाली होती.

लिपरहॉयच्या दुर्बिणीच्या रचनेचा अभ्यास करून त्याने त्यापेक्षाही श्रेष्ठ दुर्बीण तयार केली. हा काळ होता जून १६०९च्या आसपासचा. पावलो सार्पी या त्याच्या मित्रामुळे गॅलिलिओला लिपरहॉयची एक दुर्बीण मिळाली. गॅलिलिओने सलग ४०- ५० तास अभ्यास करून दूरची वस्तू दिसते त्यापेक्षा तिप्पट मोठी दिसेल अशी दुर्बीण तयार केली.

Galileo
आइन्स्टाइन, गॅलिलिओ अन्‌ हॉकिंग

गॅलिलिओला आता आणखी चांगल्या प्रकारच्या दुर्बिणी तयार करायच्या होत्या, त्यावर संशोधन करायचे होते पण त्याच्याजवळ त्यासाठी लागणारे आर्थिक बळ नव्हते. २५ ऑगस्ट १६०९ रोजी त्याने दूरची वस्तू ८ ते ९ पट मोठी दाखवणारी आपली दुर्बीण व्हेनिसच्या श्रेष्ठींना दाखवली. युद्धकाळात शत्रूच्या हालचाली आधीच टिपण्यासाठी अशा यंत्राचा उपयोग होऊ शकतो, असे त्याने श्रेष्ठींना सांगितले.

अनेकदा असं म्हणतात, की तुम्हाला संशोधनासाठी पैसा हवा असेल तर लष्कराला उपयोगी पडेल असा शोध लावा. त्यासाठी तुम्हाला लगेच आर्थिक साहाय्य मिळेल. गॅलिलिओने पुढे आपल्या दुर्बिणी समुद्री व्यापाऱ्यांनाही विकल्या.

आपल्या या दुर्बिणीतून त्याने ३० नोव्हेंबर १६०९ पासून चंद्राच्या निरीक्षणास सुरुवात केली, चंद्राचे रेखाचित्र काढून त्याचा नकाशा तयार केला. चंद्राचा पृष्ठभाग सपाट नसून त्यावर डोंगर दऱ्या आहेत हेदेखील त्याने सांगितले. गॅलिलिओची ही निरीक्षणेही पुन्हा एकदा अॅरिस्टॉटलच्या मताला छेद देणारी होती.

अॅरिस्टॉटलच्या मते चंद्र हा अर्धपारदर्शक आणि एक परिपूर्ण गोल आहे. गॅलिलिओने चंद्राचा नकाशा केला असला तरी दुर्बिणीतून चांद्रनिरीक्षणांची सुरुवात करण्याचे श्रेय मात्र इंग्रज गणितज्ञ थॉमस हॅरियटचे आहे. त्याने जुलै १६०९मध्येच निरीक्षणांना सुरुवात केली होती.

पुढे १६१०च्या जानेवारी महिन्यात गॅलिलिओने गुरू ग्रहाच्या निरीक्षणांना सुरुवात केली. ७ जानेवारी रोजी त्याला गुरूच्या शेजारी तीन तारे दिसले होते. तो आपल्या नोंदवहीत लिहितो, ‘हे तारे एकाच रेषेत होते. यातील दोन तारे गुरूच्या पूर्वेकडे तर एक त्याच्या पश्चिमेस होता. दुसरे दिवशी तिन्ही तारे गुरूच्या पश्चिमेस होते.’

पुढच्या काही रात्री त्याला या ताऱ्यांची जागा बदलताना दिसली पण ते सतत गुरूबरोबरच होते. मग १३ जानेवारी रोजी त्याला त्यांच्याबरोबर आणखीन एक तारा दिसला. हे गुरूचे उपग्रह आहेत, हे त्याला उमगले होते. लगेचच मार्चमध्ये त्याने आपला शोध ‘ताऱ्यांचा दूत’ (Sidereus Nuncius) या नावाने एक पत्रक काढून प्रसिद्ध केला. त्याने छापलेल्या पत्रकाच्या पाचशे प्रती हातोहात विकल्या गेल्या.

या पत्रकाने युरोपमध्ये एकच खळबळ उडवून दिली. या पत्रकाचे पुनर्मुद्रण करावे लागले. त्याने हे पत्रक टस्कनीच्या ग्रॅण्ड ड्यूक कोसिमो दे मेडीचीला (Cosimo I de' Medici, Grand Duke of Tuscany) समर्पित केले. आणि गुरूच्या उपग्रहांना ‘मेडिचीचे तारे’ असे नाव दिले. ही खुशामत गॅलिलिओच्या खूपच कामी आली.

त्याला ग्रॅण्ड ड्यूकचा मुख्य गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून नेमण्यात आले. त्याने पादुआ विद्यापीठाला रामराम ठोकला व तो फ्लोरेन्सला आला. एवीतेवी त्याला शिकवण्यात रस नव्हताच. शिवाय आता तो पूर्ण वेळ आपल्या संशोधनाला देऊ शकत होता आणि पगारही चांगला होता.

Galileo
वयाच्या ४५ वर्षापर्यंत कोणताच शोध न लावल्याची गॅलिलियोला होती खंत

साधारणपणे याकाळापर्यंत गॅलिलिओ कोपर्निकसच्या सिद्धांताच्या बाजूने नव्हता. पण आता त्याला सूर्यकेंद्रित विश्वाची जाणीव होऊ लागली होती. जर गुरूभोवती त्याचे तारे फिरू शकतात तर इतर ग्रह सूर्याभोवती का फिरू शकणार नाहीत, असा प्रश्न तो विचारू लागला. या निरीक्षणांनंतर गॅलिलिओच्या एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, की जर ग्रह सूर्याभोवती फिरत असतील तर आपल्याला त्यांच्या कलाही दिसायला पाहिजेत.

मुख्य म्हणजे शुक्राच्या चंद्रासारख्या कला दिसायला पाहिजेत. दुसरी बाब अशी, की जेव्हा शुक्र पृथ्वीच्या जवळ असेल तेव्हा जवळ असल्यामुळे तो मोठा आणि प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखा दिसेल. आणि जेव्हा तो दूर जाईल तेव्हा त्याचा आकार लहान दिसेल पण तो पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसेल. अशा प्रकारचे निरीक्षण पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेत शक्य नाही. त्यात आपल्याला शुक्र कधीच पूर्ण दिसू शकणार नाही.

त्यावेळी शुक्र पहाटेच्या आकाशात होता आणि तो सूर्याच्या जवळ जात होता. गॅलिलिओला शुक्राचे निरीक्षण करण्याची संधी सप्टेंबर १६१०मध्ये मिळाली आणि जे अपेक्षित होते तेच त्याला दिसले. पण यावेळी मात्र त्याने आपला शोध प्रसिद्ध करण्याची घाई केली नाही. अनेक दिवस शुक्राचे निरीक्षण केल्यावर जेव्हा शुक्र सूर्याची परिक्रमा करत आहे अशी त्याची खात्री पटली त्यानंतरच त्याने आपला शोध प्रसिद्ध केला.

कोपर्निकसच्या सिद्धांताला आता निरीक्षणांची जोडही लाभली होती. ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत यात आता कुठलीच शंका उरली नव्हती.

सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना तत्कालीन धार्मिक विश्वाला मात्र मान्य नव्हती. गॅलिलिओशी आधीपासूनच मैत्रीचे संबंध असणाऱ्या पोप अर्बन ७कडून गॅलिलिओला एक पुस्तक लिहून सूर्यकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेच्या बाजूने आणि विरुद्ध असा युक्तिवाद करायला सांगितले गेले. गॅलिलिओने Dialogue Concerning the Two Chief World Systems हे पुस्तक लिहिले. यात तीन पात्र आहेत.

एक गुरू आणि त्याचे दोन शिष्य. पैकी एकाचे नाव असते सिम्पिलीशियो. याचा एक अर्थ भोळसट किंवा मूर्ख असाही होतो. हे पात्र अॅरिस्टॉटलवर बेतले आहे. हे पात्र कधी बावळट प्रश्न विचारून आपलं हसं करून घेतं.

Galileo
‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...

मात्र, या पुस्तकातील सिम्पिलीशियो म्हणजे तुम्हीच आणि गॅलिलिओने या पुस्तकात तुमची टिंगल केली आहे, असे गॅलिलिओच्या विरोधकांनी पोपला सांगितले. परिणामी गॅलिलिओला चौकशीस सामोरे जावे लागले. पृथ्वी स्थिर आहे, हे जर तू मान्य केले नाहीस तर तुला छळ आणि यातना सोसाव्या लागतील अशी धमकीही त्याला दिली गेली. सत्तरीच्या गॅलिलिओला ही धमकी पुरेशी होती.

२२ जून १६३३ या दिवशी सकाळी गॅलिलिओला शिक्षा ऐकायला बोलावण्यात आले होते. प्रथेप्रमाणे पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून तो आला. शिक्षा ऐकण्यासाठी गुढगे टेकून बसल्यावर त्याला १७ मुद्दे असलेली शिक्षा सुनावण्यात आली.

त्याच्याकडून एक लांबलचक शपथही वदवून घेण्यात आली, की त्याने आतापर्यंत चुकीच्या कल्पनांचा प्रसार केला होता आणि यापुढे तो तसे करणार नाही. पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्याभोवती फिरत नाही.

शपथेवर विधान हे केल्यानंतर गॅलिलिओ जेव्हा उभा राहिला तेव्हा तो पुटपुटला, पण ती तरीही फिरतेच.. (E pur si muove), अशी आख्यायिका आहे.

यानंतर मृत्यूपर्यंतचा उर्वरित काळ त्याला फ्लॉरेन्सच्या जवळच्या आरचेत्री गावात एका घरात नजरकैदेत काढावा वागला. सूर्यमालेच्या शोधातल्या एका महान नायकाचा शेवट असा झाला.

---------------

Galileo
Earth : पृथ्वीने महाविस्फोटक तापमानात केला प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com