Global Warming : तर भविष्यात या समस्यांना तोंड द्यावे लागेल

भविष्यात गोडे पाणी मिळण्यातले सातत्य, त्याचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होत जाणे ही या प्रदेशाची मुख्य समस्या असेल.
Global Warming
Global Warmingesakal

शेकडो तज्ज्ञांनी संकलित केलेल्या एका अगदी नवीन अहवालानुसार, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात बर्फाळ प्रदेशांपैकी एक वेगाने वितळू लागला आहे. तो आहे पृथ्वीचा ‘तिसरा ध्रुव’!

डॉ. श्रीकांत कार्लेकर

आपण जेव्हा पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा आपल्यासमोर दोनच ध्रुव येतात- उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तथापि, भारताच्या उत्तरेला आणि चीनच्या दक्षिणेला एक असाच बर्फाच्छादित प्रदेश आहे जो ‘तिसरा ध्रुव’ म्हणून ओळखला जातो.

हिमनद्यांनी आच्छादलेला हा हिंदुकुश हिमालयीन प्रदेश. पृथ्वीवरील गोठलेल्या पाण्याचे हे तिसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे.

जरी ते उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशांपेक्षा खूपच लहान असले तरीही ते ‘प्रचंड’ म्हणावे असेच आहे. सुमारे ४६ हजार हिमनद्यांसह १ लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र या तिसऱ्या ध्रुवाने व्यापलेले आहे.

या भागात सध्या सुरू झालेले हिम विलयन असेच चालू राहिले तर त्यामुळे या प्रदेशात वास्तव्य करीत असलेल्या १.३ अब्ज लोकांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे भाकीत हवामान बदल आणि हिम विलयन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

असे असूनही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवामान अहवालामध्ये मात्र ह्या प्रदेशाला कमी महत्त्व दिल्याचे दिसून येते.

कॅनडाच्या नॉर्दर्न ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील हिम तज्ज्ञ आणि अहवालाचे सह-लेखक जोसेफ शी यांच्या मताप्रमाणे इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (IPCC) शेवटच्या अहवालात तिसरा ध्रुव हे माहितीचे एक मोठे ‘कृष्णविवर’ मानले जात होते.

आता मात्र या क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे आणि ह्या अहवालाद्वारे त्यातील काही माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न होत आहे.

पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात हिमालय-हिंदुकुश पर्वतरांगा आणि तिबेटी पठार यांचा समावेश होतो. आशियातील सर्वात मोठ्या अशा दहा नद्या येथून उगम पावतात.

चीनमधील पिवळी नदी आणि यांगत्झी नदी, म्यानमारमधील इरावती व मेकाँग नदी, भारतातील गंगेच्या घागरा आणि कोसी या उपनद्या, कैलास पर्वतात उगम पावणाऱ्या सिंधू आणि सतलज व तिबेट पठारावरील यारलुंग सानपो -ब्रह्मपुत्रा नदी अशा दहा प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांचे आणि काराकोरम पर्वत शृंखला, कैलास, कांचनजुंगा आणि एव्हरेस्ट अशा हिमालयातील काही सर्वोच्च पर्वतशिखरे याच परिसरात आहेत.

हवामानाचे सतत निरीक्षण आणि नियमन करण्याच्या दृष्टीने पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेश महत्त्वाचे आहेत, कारण तापमान वाढीच्या संदर्भात ते विशेष संवेदनशील आहेत.

तिसरा ध्रुव, समुद्रसपाटीपासून ४,५०० मीटर इतक्या उंचीवर असल्यामुळे तापमानातील बदलांसाठी हा प्रदेशदेखील संवेदनशील आहे.

तिसरा ध्रुव प्रदेशात असलेली बर्फाची स्थिती हवामान बदलाचा सुस्पष्ट पुरावा मानला जातो. इथला बर्फ जेव्हा वेगाने वितळतो तेव्हा पृथ्वी गरम होत असल्याचे संकेत मिळतात.

आघाडीचे संशोधक प्रोफेसर किन झियांग यांनी एबीसी या ऑस्ट्रेलियन टीव्हीच्या चमूला नुकतेच तिसरा ध्रुव प्रदेशातील एका अतिदूरच्या संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी निमंत्रित केले होते.

अनेक शास्त्रज्ञ पन्नास वर्षांहून अधिक काळ या दुर्गम भागातून माहिती गोळा करत आहेत आणि त्यांना मिळालेले अलीकडील निष्कर्ष धक्कादायक आहेत.

त्यापैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे तेथील तापमान १.५ अंशांनी म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वाढले आहे.

Global Warming
World Environment Day : दीडशे वर्षे जुन्या झाडाचा आज साजरा होणार वाढदिवस

वर्ष २००५पासून तिसऱ्या ध्रुवावरील हिमनद्या वितळण्याचा दर जवळजवळ दुप्पट झाला आहे. या परिसरातील ५००हून अधिक लहान हिमनद्या पूर्णपणे गायब झाल्या आहेत आणि मोठ्या हिमनद्या वेगाने आक्रसत आहेत, असेही या संशोधनात आढळून आले आहे.

तिसऱ्या ध्रुवावरून वाहणारे पाणी थेट सिंचन प्रणालींद्वारे १२० दशलक्ष लोकांना आणि चीन, भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील नदी खोऱ्यांमधून एकूण मिळून १.३ अब्ज लोकांना अप्रत्यक्षपणे मदत करते, असा अंदाज आहे. हे प्रमाण जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास एक पंचमांश इतके आहे.

जगभरातल्या राष्ट्रांनी हवामान नियंत्रणाची त्यांची त्यांची सर्वात महत्त्वाकांक्षी लक्ष्ये पूर्ण केली तरीही अफगाणिस्तान ते म्यानमारपर्यंत दक्षिण आशियातील आठ देशांमध्ये पसरलेल्या हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातील सध्याच्या हिमनद्या या शतकाच्या अखेरीस एक तृतीयांशापेक्षा जास्त आक्रसू शकतात आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन त्यांच्या सध्याच्या पातळीच्याही वर राहिले तर हा प्रदेश दोन तृतीयांश बर्फ गमावू शकतो.

हे निष्कर्ष हिंदुकुश हिमालयातील पर्यावरणीय आणि सामाजिक बदलांवर अभ्यास करणारी एक आंतरसरकारी संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटच्या (ICIMOD) ६००-पानांच्या एका अहवालात नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या अहवालात, या प्रदेशातील अन्न आणि पाणी सुरक्षेपासून ते वायू प्रदूषण आणि ऊर्जेची मागणी अशा विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र या अहवालातील हवामान बदलाच्या परिणामांवरचे निष्कर्ष सर्वात महत्त्वाचे आहेत.

Global Warming
Global Warming | मराठवाडा आणखी तापणार, पाऊसही वाढणार !

तिसरा ध्रुव प्रदेश जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने गरम होत आहे आणि त्यामुळेच नजीकच्या भविष्यात इथल्या हिमनद्या पूर्णपणे वितळून जाण्याचे अतितीव्र संकट येऊ शकते, असे हे संशोधन सूचित करते.

इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटचे हवामान बदल विशेषज्ञ आणि नवीन अहवालाच्या संपादकांच्या मते केवळ १.५ अंश सेल्सिअसच्या सरासरी वैश्विक तापमान वाढीमुळे (पॅरिस हवामान कराराचे सर्वात महत्त्वाकांक्षी लक्ष्य) हिंदुकुश हिमालयात सुमारे १.८ सेल्सिअस तापमानवाढ होण्याची शक्यता आहे आणि पर्वतांच्या उंचीमुळे हे तापमान २ डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढू शकते.

इतका हा प्रदेश अतिशय संवेदनशील आहे.

या वितळणाऱ्या बर्फाचे केवळ वैश्विक तापमान वृद्धी (Global Warming) हेच कारण नाही. वाहनांचा धूर आणि कोळशाच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण बर्फावर साठत असल्याने सूर्यकिरण बर्फावरून परावर्तित होण्याऐवजी ते शोषले जातात आणि बर्फ वितळू लागते.

या भागांतील काही ठिकाणी स्थानिक आणि प्रादेशिक वायू प्रदूषणामुळे बर्फ वितळण्याची गती अजूनही वाढू शकते, असेही अलीकडील संशोधन सुचविते.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या हवामान शास्त्रज्ञ आणि तिथल्या तिसरा ध्रुव पर्यावरण कार्यक्रमाच्या सह-अध्यक्ष लोनी थॉम्पसन यांच्या मते, तिसऱ्या ध्रुवावरील सिंधू नदी ही पावसाळ्याचा काळ वगळता संभाव्यतः सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.

कोरड्या हंगामात हिमनदीच्या वितळलेल्या पाण्यापासून या नदीप्रवाहाला सुमारे चाळीस टक्के पाणी मिळते. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या पश्चिम हिमालयात ज्या भागांत उगम पावतात त्या भागांतील तापमानात अलीकडेच मोठी वाढ नोंदवली गेली आहे आणि तेथील पर्जन्यमानही कमी झाले आहे.

Global Warming
World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सुला'तर्फे पर्यटकांना रोपे भेट

सर्वसाधारणपणे, जगातल्या कुठल्याही प्रदेशातील आकुंचित होत जाणाऱ्या पर्वतीय हिमनद्या जवळपासच्या मानवी समुदायांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबद्दल नेहमीच चिंता निर्माण करतात.

उन्हाळ्याच्या उबदार महिन्यांत हिमनद्यांचे वितळलेले पाणी खाली प्रवाहात वाहून जाते आणि जवळपासच्या प्रवाहांतील आणि नद्यांतील पाणीपातळी वाढविण्यास मदत करते. हिवाळ्याच्या महिन्यांत होणारी बर्फवृष्टी पुन्हा बर्फ तयार करण्यास मदत करते.

परंतु हिमनद्या जर वेगाने आकुंचन पावत असतील, तर त्यातून पुरवले जाऊ शकणारे एकूण ताजे पाणी कालांतराने कमी होईल आणि ते पुरवणाऱ्या नद्याही कमी होऊ शकतात.

हिंदुकुश हिमालयातील काही ठिकाणे मान्सूनमुळे इतर ठिकाणांपेक्षा जास्त प्रभावित होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे भविष्यात खरोखरच जोरदार पाऊस होऊन शकतो, व त्यामुळे अर्थातच नष्ट होणाऱ्या बर्फाची थोडीफार भरपाई करण्यात मदत होऊ शकते, असेही यासंदर्भातील काही संशोधनांनी सुचवले आहे.

मॉन्सूनच्या पावसाच्या मोठ्या योगदानामुळे संपूर्ण प्रदेशातील पाण्याच्या प्रवाहात प्रत्यक्षात फारसा बदल होणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

मेकाँगसारख्या काही मोठ्या नद्यांची खोरी तुलनेने स्थिर राहू शकतात. परंतु हिमनद्यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी हिंदुकुश हिमालयातील विशिष्ट ठिकाणे अडचणीत येऊ शकतात.

Global Warming
Fire Crackers : फटाके तुमच्या शरीरासाठी किती घातक?

या बाबतीत विचार करण्यासारखे इतर मुद्देदेखील आहेत. वितळणाऱ्या पर्वतीय हिमनद्यांमुळे काहीवेळा पाण्याचे मोठे तलाव तयार होतात. ते तलाव आकुंचन पावतात, कधी कधी फुटू शकतात किंवा पाण्याने ओसंडून वाहू लागतात.

उतारांवरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून जाते आणि मोठ्या प्रमाणावर आलेले पूर जवळपासच्या वस्त्या उद्ध्वस्त करू शकतात.

या घटना वारंवार घडतात असे नाही; पण त्या घडतात, आणि जेव्हा त्या घडतात तेव्हा त्या खूप हानिकारक असू शकतात. हिमनद्या वितळण्याचा वेग वाढल्याने हे तलाव मोठ्या संख्येने आणि वारंवार निर्माण होऊ लागले आहेत याबद्दलही काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

हवामान बदलाचा हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातल्या बर्फावर आणि कायम स्वरूपी गोठलेल्या बर्फावरही (पर्माफ्रॉस्ट -Permafrost) परिणाम होऊ लागला आहे. या प्रदेशातील कायम स्वरूपी गोठलेला बर्फ वितळत असताना जमीन ओलसर आणि मऊ होते.

त्यामुळे भूस्खलन होण्याची किंवा दरडी कोसळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या भागात दळणवळणाच्या नवीन पायाभूत सुविधा निर्माण करणेही कठीण होऊ शकते.

तिसऱ्या ध्रुवाचे हे पैलू नेमके कसे बदलत आहेत, हे समजून घेण्यासाठी तिथे जाऊन अधिक निरीक्षणे करण्याची आणि संशोधनाची गरज आहे.

परंतु जगाच्या या दुर्गम, पर्वतीय भागांमध्ये सातत्याने मोजमापे करून माहिती गोळा करणे खूप कठीणही आहे.

तिसऱ्या ध्रुवाचे पर्यावरण (थर्ड पोल एन्व्हायर्न्मेंट, TPE) हा एक आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रम आहे. ह्या उपक्रमाचा प्रारंभ २००९मध्ये झाला आणि त्यातून तिबेट पठार आणि आसपासच्या पर्वत रांगांवर लक्ष केंद्रित केले गेले.

भविष्यात गोडे पाणी मिळण्यातले सातत्य, त्याचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होत जाणे ही या प्रदेशाची मुख्य समस्या असेल. तिसऱ्या ध्रुवाच्या आसपासच्या क्षेत्रापेक्षा खूप दूरवरही हिम विलयनाचे परिणाम जाणवतील.

सुरुवातीला बर्फ वितळून नदीपात्रात जास्त पाणी येईल व पूरस्थिती निर्माण होईल, हे अपेक्षित असले तरी पाणी संपल्यावर शेवटी नदीपात्रे कोरडी पडतील आणि परिणामी या प्रदेशांना दुष्काळ आणि वाळवंटीकरणाला तोंड द्यावे लागेल.

सध्या तरी हरितगृह वायूंमध्ये घट आणि काजळीच्या उत्सर्जनातील घट अशा गोष्टीच या प्रदेशातील हिमनद्या नष्ट होण्यापासून वाचवू शकतील यात शंका नाही.

--------------------

Global Warming
Environment : नवीन वर्षात तुमची पर्यावरणीय जबाबदारी काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com