माणसाकडे बुद्धी असल्याने तो सर्वश्रेष्ठ बनला हे सर्वच सांगतात.. पण ती कोणत्या प्रकारची बुद्धी?

बुद्धिमत्ता हीच माणसाची खरी ‘मत्ता’ आहे. ते मानवाने व्यवच्छेदक लक्षण आहे असे एकदा मान्य केले, की मग माणसाचा प्रत्येक व्यवहार बुद्धीला अनुसरूनच व्हायला हवा तरच त्याला खऱ्या अर्थाने मानवी व्यवहार म्हणता येईल, असा आग्रह आपोआपच निष्पन्न होतो
brain
brainesakal

पिकोने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. गणित आणि इतर विषयांचे ज्ञान यांच्यातील संबंध तो स्पष्ट करतो. ज्याला अधिक चांगले मोजता येते, तो अधिक ज्ञाता.

माणसाकडे बुद्धी नावाची गोष्ट असल्याने तो सर्वश्रेष्ठ बनला हे सर्वच सांगतात. पण ती कोणत्या प्रकारची बुद्धी? तर, गणिती बुद्धी असेच पिकोला येथे अभिप्रेत असावे. मात्र ही झाली प्लेटोची परंपरा.

याबाबतीत ॲरिस्टॉटलला काय म्हणायचे आहे? ते जर प्लेटोच्या म्हणण्यापेक्षा वेगळे असेल, तर त्यांचा मेळ कसा घालायचा? असे प्रश्न उपस्थित होतात.

डॉ. सदानंद मोरे

बुद्धिमत्ता हीच माणसाची खरी ‘मत्ता’ आहे. ते मानवाने व्यवच्छेदक लक्षण आहे असे एकदा मान्य केले, की मग माणसाचा प्रत्येक व्यवहार बुद्धीला अनुसरूनच व्हायला हवा तरच त्याला खऱ्या अर्थाने मानवी व्यवहार म्हणता येईल, असा आग्रह आपोआपच निष्पन्न होतो.

राज्यव्यवहार हा मानवी व्यवहाराचाच एक पैलू आहे. त्याचा अपवाद कसा करता येईल? हा प्रश्‍न रास्तच आहे. इंग्लडच्या साम्राज्यातून फुटून निघालेल्या अमेरिकी वसाहतवाद्यांनी आपली राज्यव्यवस्था व राज्यघटना बुद्धीला अनुसरून बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

त्यामुळेच त्यांचे राज्य राजेशाही, उमरावशाही असे न होता खऱ्या अर्थाने लोकसत्ताक झाले.

बुद्धीची किंवा तर्काची कुऱ्हाड समाजजीवनाच्या सर्वच अंगांवर सारखेपणाने चालवायचा निश्‍चय केला तर ती धर्मसंस्थेवरही कोसळल्याशिवाय राहणार नाही, हे उघड आहे.

युरोपातील लोकांनी त्यांच्या ख्रिस्ती धर्मावर ही कुऱ्हाड पहिल्यांदा चालवली तेव्हा त्यातून प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला.

त्यानंतर ही कुऱ्हाड पुन्हा चालली आणि त्यातून ज्याला डेइझम (Deism) म्हणतो तो पंथ पुढे आला. विशेष म्हणजे इंग्लंडच्या मूळ सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून स्वतंत्र होणाऱ्या अमेरिकनांमधील अनेकांना या डेइस्ट म्हणजे ईश्‍वरनिर्मातृत्व मानणाऱ्या विचारांची पार्श्‍वभूमी लाभली होती.

थॉमस पेन हा या विचारसरणीचा प्रवक्ता होय. महात्मा फुले यांच्या विचारांवर पेनच्या विचारसरणीच्या सखोल परिणाम झाला होता एवढे सांगितले तरी पेनचे महत्त्व लक्षात येईल.

brain
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

ही नवी विचारसरणी पुढे येण्याचे तत्कालिक कारण म्हणजे न्यूटनने मांडलेले नवे वैज्ञानिक सिद्धांत हे होय. विश्‍व हे नियमबद्ध आहे एवढे सांगून न्यूटन थांबला नाही.

विश्‍वामधील नियमितता नियमबद्धतेचे सूचन करते हे स्पष्ट आहे, तथापि जोपर्यंत हे नियम ज्ञात होत नाहीत तोपर्यंत तरी ईश्‍वर हाच विश्‍वाचा चालक आहे, असे समजायला प्रत्यवाय नसतो.

आता न्यूटनने हे नियमच शोधून काढल्यामुळे ईश्‍वराला विश्‍वाचा चालक मानायची गरज उरली नाही. फारतर ईश्‍वराने विश्‍व नियमांसह निर्मिले आणि मग ते स्वयंचलित पद्धतीने चालतच राहिले असा मधला मार्ग काढता येतो. डेइस्टांनी नेमके तेच केले.

आता जे ईश्‍वराचे महत्त्वही कमी करायला मागेपुढे पाहात नाहीत ते चर्च, धर्मग्रंथांतील मिथ्यकथा यांची मातब्बरी राखतील हे होणे नाही.

डेइस्टांनी या सर्व गोष्टी लक्ष्य केल्या. स्वतः पेनने या संदर्भात दी एज ऑफ रिझन (The Age of Reason) हे पुस्तक लिहिले. त्याच्यावर इंग्लंडमध्ये बंदी घालण्यात आली होती हे लक्षात घेतले म्हणजे ते किती स्फोटक असणार याची कल्पना येऊ शकेल.

बुद्धीचे हेच पद्धतिशास्त्र राज्यसंस्थेला लाभले तर पहिल्यांदा सर्व माणसे सारखी असून राजा वगैरेची काही गरज नाही असे आपोआपच निष्पन्न होते. या संदर्भात पेनचा गाजलेला ग्रंथ म्हणजे द राइट्स ऑफ मॅन (The Rights of Man).

आता अशा लोकांच्या प्रयत्नांतून अमेरिका (USA) राष्ट्राची निर्मिती झाली असेल तर त्याला ‘एम्पायर ऑफ रिझन’ (Empire of Reason) म्हणायचा मोह कोणाला झाला तर ते समजून घेता येते.

साध्या सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘अमुक एक गोष्ट का चांगली’ किंवा ‘तमुक एक कृती का करावी’ अशा प्रश्‍नांचे उत्तर म्हणजे ‘ती बुद्धीला तशी वाटते म्हणून’ असे मानायला हवे. याला स्थूल मानाने बुद्धिवादी भूमिका म्हणता येते.

धर्म आणि राज्य यांना आपापले अस्तित्व टिकवायची गरज असते. त्या गरजेच्या आड अशी बुद्धिवादी भूमिका येत असेल तर त्यांचा आणि या भूमिकेचा संघर्ष अटळ ठरतो.

brain
Healthy Food : वाळूत भाजलेले पौष्टिक पदार्थ

या संघर्षाची कहाणी सांगायचे हे स्थळ नाही व त्याचे येथे काही प्रयोजनही नाही. येथे मुद्दा हा आहे, की बुद्धी नावाची जी चीज मानवाला मिळाली तिचा असा सर्वंकष उपयोग करून तिलाच सार्वभौम मानणे फक्त माणसालाच शक्य आहे.

बुद्धीच्या अशा स्थानाची जाणीव ग्रीक तत्त्ववेत्त्यांना झाली. काही प्रमाणात ती यहुदी आणि ख्रिस्ती या धर्मांना झाली. पुढे संजीवन (Renaissance) काळात ही जाणीव ठसठशीत झाली.

त्यानंतर आलेल्या उद्‌बोधन (Enlightenment) काळात ती अधिक टोकदार झाली. तिला धर्माशिवाय, धर्माच्या निरपेक्षपणे नांदणे शक्य झाले.

प्लेटो आणि ॲरिस्टॉस्टल यांना ग्रीक कलांचे, जिओवन्नी पिको डेल्ला मिरांडोला (Giovanni Pico della Mirandola) याला संजीवन काळाचा, तर इमॅन्युअल कांटला उद्‌बोधन काळाचा प्रवक्ता मानता येईल.

या तिघांनी मानवाचे स्थान आणि महत्त्व अधोरेखित केले हा त्यांच्यातील साम्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्या मागचे कारण म्हणजे त्याची बुद्धी हा दुसरा. यहुदी व ख्रिस्ती धर्मांच्या समजुतीप्रमाणे ईश्वराने मानवाला आपल्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले असल्यामुळे, बुद्धी ही त्याचीच देणगी मानावी लागते.

ग्रीकांना देव वर्ज्य नसला तरी ख्रिस्ती धर्माप्रमाणे ते देवावर भर देत नाहीत. असेच काही कांटच्या बाबतीतही म्हणता येईल.

पिको डेल्ला याची भूमिका काहीशी वेगळी मानावी लागते. वस्तुतः पिकोला संजीवन मानववादाचे प्रवर्तक मानण्यात येते व म्हणून त्याची तुलना प्रत्यक्ष कांटशी करण्यात येते. त्यामुळे त्याचे विवेचन करणे आवश्‍यक ठरते.

ग्रीकांच्या काळात विश्‍वातील मानवाच्या मध्यवर्ती स्थानाचा पुरस्कार करणारा एक संप्रदायच अस्तित्वात होता. या संप्रदायातील लोकांना ‘सोफिस्ट’ असे म्हणत. ही मंडळी उत्तम वादपटू असत. प्रोटॅगोरस (Protagoras) या त्यांच्या प्रवक्त्याचे, ‘मनुष्य हा सर्व गोष्टींचा मापदंड आहे’ (Man in measure of all things), हे वचन प्रसिद्ध आहे.

पिको जेव्हा आपले विचार मांडीत होता त्या पंधराव्या शतकात ग्रीकांचे राज्य नव्हते. मात्र ख्रिस्ती धर्माच्या पुरेसा प्रसार युरोपात झाला होता व रोमच्या कॅथलिक चर्चला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले होते. संजीवन काळातील इटालियन विचारावंतांपैकी एक असलेल्या पिकोला ख्रिस्ती धर्माबरोबर यहुद्यांचे, त्यांच्या हिब्रू भाषेचे व धर्माचे पुरेसे ज्ञान होते.

दरम्यानच्या काळात, विशेषतः अरबी मुसलमानांनी लुप्तप्राय पारंपरिक ग्रीक ग्रंथांचे अरबीत भाषांतर करण्याची जणू मोहीमच उघडली होती. पिकोला अरबी भाषा येत होतीच शिवाय ग्रीक व लॅटिनवरही त्याचे प्रभुत्व होते.

या वेगवेगळ्या परंपरांचे सखोल अवगाहन करून पिकोने ९०० सूत्रे किंवा Thesesची रचना केली. त्यात अनेक गोष्टी असल्या तरी मानवाची प्रतिष्ठा आणि तत्त्वज्ञानांच्या समन्वय ही महत्त्वाची मूल्ये त्याने पुढे आणली होती.

पारंपरिक इस्लामी, ग्रीक (कर्मठांसाठी हेदेन) आणि ज्यूच्या विचारांचे त्याला वावडे नव्हते. केवळ ९०० निष्कर्षसूत्रे संकलित करूनच तो थांबला नाही तर त्याने समकालीन विद्वानांना ती वाचून त्यावर चर्चा करण्यासाठी यायचे आवाहन केले.

त्यासाठी होणारा खर्च सोसायची तयारीही त्याने दाखवली. त्याचे हे कृत्य तेव्हाच पोप तिसरा इनोसंट याला अजिबात रुचले नाही. पिकोच्या ग्रंथाच्या प्रती जप्त वगैरे झाल्या.

brain
"महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे" सुप्रिया सुळे यांनी 'या' चार विधेयकाचा केला उल्लेख

पिको विशेष प्रसिद्ध झाला तो त्याच्या ओरेशन ऑन द डिग्निटी ऑफ मॅन (Oration on the Dignity of Man) या ग्रंथामुळे. या ग्रंथातील त्याच्या विवेचनामुळे Enlightenment - उद्‍बोधकाळातील कांटचा पूर्वसूरी म्हणून त्याच्याकडे पाहता येणे शक्य झाले.

ईश्वराने सृष्टी निर्माण केली तेव्हा इतर प्राण्यांचे स्वरूप आणि मर्यादाही त्याने ठरवून दिल्या. मानवाला मात्र निवडीचे स्वातंत्र्य दिल्यामुळे तो आपणाला काय व्हायचे व काय करायचे हे ठरवू शकतो. त्यामुळेच तो सर्वश्रेष्ठ बनला.

यासंदर्भात ईश्वराने आदमची निर्मिती केल्यावर त्याला जे सांगितले ते पिकोच्याच शब्दांतः ‘The nature of all other beings is limited and constrained within the bounds of laws prescribed by Us. Thou, constrained by no limits, in accordance with thy free will, in whose hand We have placed thee, shalt ordain for thyself the limits of thy nature. We have made thee neither of heaven nor of earth, neither mortal nor immortal, so that with freedom of choice and with honor, as though the maker and molder of thyself, thou mayest fashion thyself in whatever shape thou shall prefer.’

पिकोच्या काळातील रोमन कॅथलिक चर्च म्हणजे अर्थातच लॅटिन भाषा धर्मभाषा मानणाऱ्यांचा समूह होता. त्याला पिकोचा पुढील प्रश्न चांगलाच झोंबत असणार यात शंका नाही. ‘What were the gains if only the philosophy of Latins were investigated, that is, that of Albert, Thomas, Scouts, Aegidius, Francis, and Henry, if the Greek and Arabian philosophers were left out - since all the wisdom has flowed from the East to the Greeks and from the Greeks to us?’

पिकोने हातात घेतलेला सर्वात साहसी प्रकल्प म्हणजे प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या ग्रीक गुरुशिष्यांच्या विचारांचा समन्वय करून मेळ घालण्याचा. कोणाचीही दमछाक होईल अशीच या ‘मेळ’घाटाची चढण होती.

‘I have proposed, first of all, a harmony between Plato and Aristotle, believed to exist by many ere this but adequately proved by no one.’

अशा समन्वयाचे प्रयत्न बोएथिअस, सिंप्लिकस आणि कदाचित ऑगस्टिनसारख्यांनी केले असण्याची नोंद घ्यायला पिको विसरत नाही. या संदर्भात जॉन या व्याकरणकाराचे मतही तो उधृत करतो, ‘Plato differs from Aristotle only in the minds of those who do not understand Plato's words.’

पिकोच्या नव्वद सूत्रांपैकी अठरा सूत्रे प्लेटो ॲरिस्टॉटलचा मेळ घालण्यात खर्च झाली आहेत. हे एकवेळ समजण्यासारखे होते. पण उरलेल्या बहात्तर सूत्रांचे काय? ती तर यहुदी, इस्लामी अशा वेगवेगळ्या प्रकारची गंगाजमनी होती!

तत्कालीन ख्रिस्ती पंडितांसाठी ही मात्रा पचायला जडच असणार. विशेष म्हणजे या विचारात यहुदी परंपरेतील ‘कब्बाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूढवादी अंकमीमांसेचाही समावेश होता!

brain
Dr. Sadanand More : ‘लावणीकडे तुच्छतेने पाहणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक’; डॉ. सदानंद मोरे

आता या गूढ ज्ञानाचा ग्रीकांसारखा बुद्धिप्राधान्यवादी जमातीच्या विचारांशी पिकोने संबंध कसा लावला असणार? त्याचे उत्तर याच ‘ओरेशन’ प्रकरणात सापडते.

There is, furthermore, still another method of philosophizing through numbers, which I have introduced as new, but which is in fact old, and was observed by the earliest theologians, principally by Pythagoras, by Aglaophamos, Philolaus, and Plato, and by the first Platonists... Plato writes in the ‘Epinoinis’ that, of all the liberal arts and theoretical sciences, the science of computation is the chief and the most divine. Likewise, inquiring, “Why is man the wisest of animals?” he concludes, “Because he knows how to count.”

येथे आपल्याला व्यापारी लोकांची हिशेबातील आकडेमोड अभिप्रेत नसल्याचे पिकोने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे गणित अभिप्रेत आहे, स्पष्ट व सिद्ध करण्याची जबाबदारीही तो घेतो,

‘I therefore promised, when I seemed after much nocturnal labor to have discovered that arithmetic which is so highly extolled, that I myself would (in order to make trial of this matter) reply in public through the art of number to seventy-four questions considered of chief importance in physics and metaphysics.’

मला वाटते, पिकोने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. गणित आणि इतर विषयांचे ज्ञान यांच्यातील संबंध तो स्पष्ट करतो. ज्याला अधिक चांगले मोजता येते, तो अधिक ज्ञाता. माणसाकडे बुद्धी नावाची गोष्ट असल्याने तो सर्वश्रेष्ठ बनला हे सर्वच सांगतात.

पण ती कोणत्या प्रकारची बुद्धी? तर, गणिती बुद्धी असेच पिकोला येथे अभिप्रेत असावे. मात्र ही झाली प्लेटोची परंपरा. याबाबतीत ॲरिस्टॉटलला काय म्हणायचे आहे? ते जर प्लेटोच्या म्हणण्यापेक्षा वेगळे असेल, तर त्यांचा मेळ कसा घालायचा? असे प्रश्न उपस्थित होतात.

आणखी एक मुद्दा याच ‘ओरेशन’मध्ये पिको ‘रिझन’ आणि ‘इटेलिजन्स’ यात भेद करताना दिसतो. ‘इंटेलिजन्स’चा संबंध देवदूतांशी, तर ‘रिझन’चा साक्षात देवाशी असा हा मामला आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा व त्यातून काय निष्पन्न होते?

-----------------

brain
Human Brain : माणसाचा मेंदू किती GB चा असतो माहितीये? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com