कथा : रियाज

‘‘येरी आली पिया बिन सखी, कल न परत मोहे घडी पल छिन दिन
Indian classical music
Indian classical musicEsakal

कविता मेहेंदळे

‘‘अयाई गं, वाचवाऽऽ वाचवाऽऽ’’ कुणीतरी कळवळत होतं. हो, हा भास नव्हता. मुलीचा आवाज होता. जिकडून तिकडून मंडळी आवाजाच्या दिशेनं धावली.

शेजारच्या बंगल्यात भांडी घासणारी रेवतीची आई, लेकीचा आवाज ओळखून तिथं पोहोचलीसुद्धा. ‘‘काय झालं? कुनी मारलं गं तुला?’’ खिडकीखाली बसकण मारलेल्या लेकीच्या दुमडलेल्या पायावरून हात फिरवत आईनं विचारलं.

हातात काठी घेतलेले वॉचमनकाका शेजारीच उभे होते. ‘‘अधूनमधून या खिडकीबाहेर घोटाळत असते ही पोरगी. वाकून आत बंगल्यामध्येही पाहते. काहीतरी चोरी करण्याचा तिचा इरादा लक्षात आल्यावर मी तिच्या पाठीवर काठी टेकवली.

पोरगी एकदम मागे झाली. भुरटे चोर असं करतात. मग मात्र मी एक रट्टा मारला पाठीत.’’ वॉचमनकाका आपण योग्य तेच केल्याच्या आविर्भावात होते. केविलवाण्या झालेल्या रेवतीनं आईकडे पाहिलं.

बंगल्यातून बाहेर आलेल्या रश्मीताईनं रेवतीला उठवलं. तिचा हात स्वतःच्या खांद्यावर घेऊन तिला बंगल्याच्या पडवीत नेलं आणि खुर्चीमध्ये बसवलं.

बंगल्यातल्या उर्मिलाबाई पाणी घेऊन बाहेर आल्या. वॉचमकाकांना म्हणाल्या, ‘‘चोर कशी असेल? काहीही बोलता तुम्ही.’’

Indian classical music
'वर्क फ्रॉम ऑफिस' मुळे कंपन्यांना खरंच फायदा होतो का? पहा, संशोधन काय सांगते

‘‘माझी रेवी गुणाची हाय. बाई, शपथेवर सांगते, असलं वंगाळ काम ती करणारच न्हाय ओ. आमी कष्टकरी, गरीब माणसं म्हणून निस्ता संशय घेऊ नकासा.’’ रेवतीच्या आईनं वॉचमनवर जळजळीत कटाक्ष टाकत रेवतीची बाजू घेतली.

‘‘तेच तर म्हणतेय. कुठे मारलंत काका?’’

‘‘बाई, पोरीचा कांगावा काठीपरीस मोठा! जरा कंबरेवर लागली काठी.’’ वॉचमनकाका आता जरा निवळले होते.

‘‘तरी बरं पोरीची शुध गेली नाय. हा कसला वॉचमन??’’

‘‘चल आई, घरी चल,’’ म्हणत रेवती उठली. रश्मीताईकडे तिनं असहाय्यपणे पाहिलं.

‘‘मुली, खिडकीपाशी तू काय करत होतीस गं? म्हणजे काम होतं का काही?’’ बाईंनी विचारलं.

‘‘बाई, रश्मीताई आणि मी एकाच शाळेत आहोत,’’ असं सांगून रेवतीनं मान खाली घातली. रेवती काहीतरी सांगायचं टाळते आहे हे बाईंच्या लक्षात आलं, तरी ‘‘बरं, बरं,’’ म्हणून त्यांनी विषय संपवला. लेकीकडे मात्र संशयानं पाहिलं.

रेवतीच्या आईनं तिला फर्मावलं, तू पुढं हो. मी अर्धवट टाकलेली भांडी आणि धुणं आवरून घरी येते. मग वॉचमनकडे वळून म्हणाली, ‘‘हतं कशापायी उभा तू? गेटवर कामाला जाय. ती काठी एकाद दिवस सोताच्या डोस्कीवर बसनार नाय ना बघ!’’ यानंतर नीटपणे चालत रेवती तिच्या घराकडे गेली.

जो-तो आपापल्या कामाला गेला. बाईंनीही हॉलमधल्या शिष्यवर्गाला निरोप दिला. झाला प्रकार बाईंना आवडला नव्हता. त्यांच्या स्वभावाला मानवणारा नव्हता. आतमध्ये वळताना बाईंनी लेकीला विचारलं, ‘‘ओळखतेस तू त्या मुलीला? तुझ्या वर्गातली वाटत नाही.’’

‘‘खरंय. आई, रेवती सातवीत आहे. थोडी लहान आहे. संमेलन वा १५ ऑगस्टच्या दिवशी आम्ही मिळून शाळेत जातो.’’

‘‘हंऽऽ’’

Indian classical music
Office Politics : ऑफिसमधील पॉलिटिक्स शिकून घेणे ही मूलभूत गरज?

‘‘पुढच्या वर्षी तिची शाळा दुपारची होईल. मला ताई म्हणते. आमचं छान जमतं,’’ म्हणत रश्मीनं तिची गाण्याची वही नि पेन उचललं. ‘‘आज बागेश्रीचे आलाप राहिले,’’ ती स्वतःशी पुटपुटली.

गेली अकरा वर्षं बाई शास्त्रीय संगीताचे क्लास घेत होत्या. सकाळी दहा ते अकराची बॅच संपली, की त्या रश्मीचा डबा भरायच्या.

गेली तीन वर्षं त्यांनी रश्मीलाही क्लासला बसायला लावलं होतं. ‘कानावर पडलं की गाणं आपोआप येतं’, यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्या रश्मीला रागवायच्या, ‘‘तुला मेहनत करायला नकोय. स्वर गळ्यात बसावे लागतात.’’

‘‘आत्ता निदान ‘उभे’ तरी आहेत स्वर!’’

‘‘सगळी गंमत वाटते गं तुला. फी भरायची नाहीये की अंतर तुडवायचं नाहीये. गाण्याचं महत्त्व तुला आत्ता कळणारच नाहीये. आपल्या चालण्या-बोलण्यात हे ‘लय-सूर-ताल’ भरून राहिलेत.’’

‘‘पटतंय मला. सॉरी आई. एक सांग, ‘भीमपलास’सारखं ‘मार खाशील’ या रागाचं नाव काय आहे?’’ रश्मीनं हसू दाबत विचारलं.

‘‘त्याचं ना, ‘फसक् टॉम्या’ नाव आहे. अर्थही सांगते, तुझ्या डोक्यात कुजक्या कांदे-बटाट्यांप्रमाणे नासलेले टोमॅटो भरलेत. मशीनमध्ये धुऊन झालेले कपडे दोऱ्यांवर वाळत घाल, म्हणजे सगळी ‘फसक्’ बाहेर पडेल. कळलं?’’

‘‘होय आई. डबल सॉऽऽरी गं! चुकलं माझं.’’

‘‘आई गं, मला काहीतरी सांगायचंय तुला. रागावणार नाहीस ना?’’ कपडे झटकून वाळत घालून झाल्यावर रश्मीनं हळूवारपणे विचारलं.

तव्यावरचा फुगलेला फुलका दाबत बाई उत्तरल्या, ‘‘नांदी झालीये. बोला!’’

‘‘आई, रेवतीचा आवाज खूप छान आहे.’’

‘‘ओऽऽ! एवढंच सांगायचंय?’’

‘‘नाही. शाळेला सुट्टी असली, की रेवती आपल्या खिडकीबाहेर उभं राहून तू शिकवतेस ते ऐकते.’’

‘‘अच्छा! म्हणजे तुझी फूस आहे तर!’’

‘‘तिनंच एकदा विचारलं म्हणून मी तिला स्वरालंकार आणि पलय्यांची वही दिली. सुरेख जमतं तिला. सही सही म्हणून दाखवते कधीतरी.’’

‘‘रेवती अभ्यासातही पुढे आहे. स्वभावाने गोड आहे. होय ना? असंच ना?’’

‘‘होय, तसंच आहे.’’

‘‘कळलं. पण तू हे सगळं मला...’’

आईचं वाक्य तोडत रश्मी म्हणाली, ‘‘आई, तूच तर नेहमी सांगतेस की गरजूंना शक्य तितकी मदत करावी. तुझी फी रेवतीला परवडणार नाही.’’

‘‘रश्मी, हे सगळं तू आधी का नाही सांगितलंस?’’

‘‘रेवतीनं तसं प्रॉमिस घेतलं होतं माझ्याकडून!’’

‘‘हो काऽऽ? अरे वाऽ’’ असं आईनं म्हणताच रश्मी अभ्यासाला निघून गेली. तेवढीच पळवाट शिल्लक होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाई अजून तंबोरा लावीत होत्या, तेव्हा दारातून येणाऱ्या मनालीनं रश्मीला विचारलं, ‘‘रेवतीला काल फार लागलं नाहीये ना?’’

‘‘नाही गं. रेवतीचा लपूनछपून चाललेला रियाज बंद केला गेलाय, इतकंच.’’

‘‘हं. चांगली आहे बिच्चारी,’’ मनाली पुटपुटली.

इतक्यात बाईंनी सांगितलं, ‘‘गप्पा नकोत. बागेश्रीच्या आरोह-अवरोहाला सुरुवात करा.. हं..

नीऽ सा ग् म ध नी सा...

सा नी ध म प ध म ग रे सा...’’

बाईंच्या पाठोपाठ मुलींना गायला सुरुवात केली, ‘‘पायल बाजे मोरी झांझर प्यारीऽऽ...’’

Indian classical music
छोट्याश्या मुंग्या जेव्हा सिंहांना त्यांची शिकारीची पद्धत बदलायला भाग पाडतात..

क्लास संपल्यावर तंबोऱ्याला गवसणी घालताना बाईंनी रश्मीला सांगितलं, ‘‘शनिवारी रेवतीला घेऊन ये.’’ रश्मीला अंदाज येत नव्हता.

मनातून ती थोडी घाबरली होती. शनिवारी सकाळी बरोबर दहा वाजता रेवती हजर झाली. ती सारखे ओठ दुमडून आत घेत होती. बाईंनी रेवतीला ‘यमन’चे आरोह-अवरोह आणि चीज गायला सांगितली.

‘‘येरी आली पिया बिन सखी

कल न परत मोहे घडी पल छिन दिन

जबसे पिया परदेस गवकीन

रतियाँ करत मोहे तारे गीऽन गीऽन...’’

बाई खूश झाल्या. ‘‘गळ्यात फिरत आहे तुझ्या’’ म्हणाल्या. रेवतीनं बाईंना वाकून नमस्कार केला. तिला खाली बसण्याची खूण करत बाई म्हणाल्या, ‘‘जूनपासून सकाळी क्लासला यायचं. तोपर्यंत जमेल तेव्हा ये.

तुझ्या दैवी गळ्याला फी आकारता येणार नाहीये. तुझी कला, तुझी आवड तुला खूप आनंद देईल. लवकरच आपण ‘प्रथम पूर्ण’ परीक्षेचा फॉर्म भरूया.’’ रेवती गोड हसली.

‘‘आता हिला खिडकीबाहेरून शिकायला नको,’’ म्हणत रश्मीनं जीभ चावली.

‘‘मात्र माझी एक अट आहे,’’ बाईंचा आवाज बदलला.

‘‘कोणती अट?’’

‘‘रियाज म्हणजे गाण्याचा अभ्यास रोज मनापासून करायचा. बाईंचं शिष्यत्व पत्करणं अवघड आहे.’’

‘‘खरंय रेवती. दहावीचा अभ्यास असूनही पुढच्या वर्षी माझी सुटका नाहीये.’’

‘‘लक्षात घ्या. आवडती कृती केली की उत्साह दुणावतो. एकाग्रता वाढते. शालेय अभ्यासासाठी ती पूरक आहे.’’

रश्मीला आपल्या आईचा अभिमान वाटला. तर, रेवतीला काय करावं ते कळेना. गोंधळून तिनं रश्मीला घट्ट मिठी मारली.

-----------------

Indian classical music
Routine Break : स्वतःला वेळ देणं स्वार्थीपणा नाही; रुटीनमधल्या कामातून ब्रेक हवाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com