Mahatma Gandhi :गांधीजींनी त्या वृद्ध मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले...

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi esakal

“अरे, एकदा खुद्द गांधीजींचीच पेन्सिल हरवली होती. तेव्हा ते फार अस्वस्थ झाले होते. खूप वेळ ते ती पेन्सिल शोधत राहिले; पण ती सापडतच नव्हती. त्यांची ती अस्वस्थता पाहून एका कार्यकर्त्याने स्वतःजवळची पेन्सिल गांधीजींना दिली. आणि तो कार्यकर्ता गांधीजींना म्हणाला, ‘एवढीशी तर ती पेन्सिल...! त्यासाठी एवढा आटापिटा कशाला?’ त्यावर गांधीजी त्याला म्हणाले..

एकनाथ आव्हाड

जीवनात जो छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व जाणतो; तोच पुढे मोठा होतो.

“मालू, अगं काल मी एक नवीन एचबीची पेन्सिल विकत आणली होती चित्रं काढायला. तू पाहिलीस का?” माधवने आपल्या धाकट्या बहिणीला, मालतीला विचारलं.

“दादा, मी नाही बघितली बरं तुझी पेन्सिल बिन्सिल. तूच कुठंतरी डाव्या हातानं तुझ्या वस्तू ठेवत असतोस आणि मग घरभर शोधत बसतोस.”

बाबा तिथेच होते. ते हसून म्हणाले, “मालू, अगं आपल्या माधवचं हे नेहमीचंच आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा.”

माधव म्हणाला, “जाऊ दे, काय त्या एवढ्याशा एका पेन्सिलची बात? मी उद्या नवीन विकत आणेन. मालू, मला आतापुरती दे बरं तुझी पेन्सिल. चित्र काढायचा सराव करतो थोडावेळ.”

मालती म्हणाली, “मधेच काय हुक्की आलीय तुला चित्र काढायची?”

“अगं, शाळेत आंतरशालेय चित्रकला स्पर्धा भरवलीय. आणि त्या स्पर्धेसाठी शाळेतर्फे निवड झालीय माझी. मग स्पर्धेचा सराव नको का करायला? यावेळची स्पर्धा फार वेगळी आहे. गांधीजींच्या जीवनातील एखादा प्रेरक प्रसंग चित्रातून रेखाटायचाय.”

बाबांना चित्रकला स्पर्धेचा विषय ऐकून विशेष वाटलं.

Mahatma Gandhi
Rahul Gandhi : भाजपचा अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका

कपड्यांना इस्त्री करण्याचं काम सुरू होतं त्यांचं. काम हातावेगळं झाल्यावर सर्व वस्तू जागच्याजागी ठेवून ते माधवकडे आले. म्हणाले, “माधवा, अरे गांधीजींच्या जीवनातील एखादा प्रसंग तू चित्रातून रेखाटणार आहेस ना? मग पेन्सिल हरवली तर हरवू दे, नवीन विकत घेईन, असं कसं काय म्हणतोस?”

माधवला बाबांचं बोलणं कळेना. तो म्हणाला, “म्हणजे काय हो बाबा?”

“अरे, एकदा खुद्द गांधीजींचीच पेन्सिल हरवली होती. तेव्हा ते फार अस्वस्थ झाले होते. खूप वेळ ते ती पेन्सिल शोधत राहिले; पण ती सापडतच नव्हती. त्यांची ती अस्वस्थता पाहून एका कार्यकर्त्याने स्वतःजवळची पेन्सिल गांधीजींना दिली. आणि तो कार्यकर्ता गांधीजींना म्हणाला, ‘एवढीशी तर ती पेन्सिल...! त्यासाठी एवढा आटापिटा कशाला?’

त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, ‘जर मी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागलो तर माझ्या आयुष्यात पुढे मोठमोठ्या चुका होतच राहतील.’ गांधीजी पेन्सिल शोधतच राहिले. शेवटी एकदाची त्यांची पेन्सिल त्यांना सापडली तेव्हा कुठे जिवात जीव आला त्यांच्या.

माधव, गांधीजींच्या जीवनातली ही छोटीशी गोष्ट. पण त्यात दडलेला विचार बघ केवढा मोठा आहे. बाळा, जीवनात जो छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व जाणतो; तोच पुढे मोठा होतो. अरे, वस्तूंची, माणसांची काळजी घेतली की मग काळजी करावी लागत नाही.”

बाबांच्या बोलण्यातला मथितार्थ आता कुठे माधवला समजला. त्याला वाटलं, खरंच आपण आपली पेन्सिल नीट काळजीपूर्वक शोधली पाहिजे. त्यात बेफिकिरी नको.

बाबा म्हणाले, “बरं मला सांग, गांधीजींच्या जीवनातला कोणता प्रसंग रेखाटणार आहेस तू?”

“बाबा, अजून नक्की नाही ठरलं माझं. बहुतेक मिठाच्या सत्याग्रहाचंच चित्र काढेन मी. तोच मला विशेष करून ठाऊक आहे.”

“अरे माधव, गांधीजींचं जीवन म्हणजे मिठाचा सत्याग्रह... एवढंच नाही काही. त्यांच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. आधी तू गांधीजींचं कार्य नीट समजून घे बाळा. मग त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग चित्रातून तू अधिक छान रेखाटू शकशील.” असं म्हणून बाबा उठले आणि पुस्तकांच्या कपाटातून माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक काढून माधवच्या हातात देत ते म्हणाले, “माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधीजींची आत्मकथा आहे.

गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजीमध्ये आणि जगातल्या इतरही अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत, बरं का या पुस्तकाचे. तू हे पुस्तक वाच. मग बघ, तुला तुझं चित्र अधिक सशक्तपणे रेखाटायला या पुस्तकाची छान मदत होईल.”

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi Jayanti : साधी टोपी सुद्धा क्रांती करून गेली.. 'इन्फ्लुएन्सर बाप्पू'

बाबांचं बोलणं माधवला पटलं. आधी त्याने त्याची पेन्सिल शोधून काढली. मग बाबांनी दिलेलं पुस्तक त्याने उत्साहाने वाचायला घेतलं. दोन दिवसांतच त्याने संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. गांधीजींच्या जीवनातील कितीतरी नवीन गोष्टी त्याला नव्याने समजल्या.

ते पुस्तक वाचल्यानंतर माधव जणू गांधीमयच झाला होता. आता गांधीजींच्या जीवनातील कितीतरी प्रसंग चित्रासाठी त्याच्या मनात ताजे होते. एका विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयासाठी कसा उपयोगी पडतो, हेही त्याला आता उमगलं होतं.

अखेरीस स्पर्धेचा दिवस उजाडला. माधवच्या डोक्यात आता पक्कं होतं; स्पर्धेसाठी कोणतं चित्र काढायचं ते.

माधव स्पर्धेला जायला निघणार तेवढ्यात रेडिओवर लागलेलं गाणं त्याच्या कानावर पडलं. आशा भोसलेंचा आवाज, जागृती सिनेमातलं गाणं. आईचं अतिशय आवडतं...

दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल

साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल

आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल

साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल

रघुपति राघव राजा राम

माधवने शांतपणे संपूर्ण गाणं ऐकलं. त्याला वाटलं, काय सुंदर आहे हा योगायोग ..! गाणं ऐकून त्याला खूप भारी वाटलं. स्पर्धेसाठीचं सर्व साहित्य व्यवस्थित बरोबर घेतलं की नाही याची खात्री करून त्याने आई-बाबांना वाकून नमस्कार केला. मालूच्या शुभेच्छा घेतल्या. आणि प्रसन्न मनाने तो स्पर्धेसाठी निघाला.

संध्याकाळी बरोबर चार वाजता माधव घरी आला तो उत्साहातच. मालतीने लगेच विचारलं, “दादा, कशी रे झाली तुझी स्पर्धा? काय चित्र काढलंस?” आई बाबांच्याही मनात हाच प्रश्न होता.

माधव म्हणाला, “आई, बाबा, मालू, मी गांधीजींच्या जीवनावर आज जे चित्र काढलं ना, त्याला मी नाव दिलं होतं.... शतायुषी.”

कुणालाच काही कळेना. त्यांचे चेहरे वाचून माधव म्हणाला, “थांबा. मी नीट फोड करून सांगतो तुम्हाला. गांधीजींच्या जीवनावरील पुस्तक वाचताना त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी माझ्या मनाचा ठाव घेतला. एक प्रसंग तर माझ्या मनात घर करून राहिला. मग तोच प्रसंग मी कागदावर रेखाटला.

मालती उत्सुकतेने म्हणाली, “कोणता प्रसंग? आम्हाला कळेल असं सांग ना...!”

“आई -बाबा, तुम्हाला माहीतच असेल, महात्मा गांधीजींनी आपल्या देशात पहिली चळवळ सुरू केली ती बिहारच्या चंपारण्यात. तिथल्या गोऱ्या मळेवाल्यांनी चंपारण्यातील शेतकऱ्यांवर अपरंपार जुलूम चालवला होता. म्हणून गांधीजींनी सत्याग्रह पुकारला.

या सत्याग्रहींवर इंग्रजांनी लाठीमार केला आणि त्या लाठीहल्ल्यात डोक्याला लाठीचा जबर मार लागून एक तरुण शेतकरी जागीच मरण पावला. त्या तरुणाची वृद्ध आई रडत रडत गांधीजींकडे आली. आणि म्हणाली, “मला एवढा एकच मुलगा होता... माझ्या म्हातारपणाची काठी. तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करून द्या.”

गांधीजी गहिवरले. त्या वृद्ध महिलेला म्हणाले, ‘तुमच्या मुलाला तर मी जिवंत करू शकत नाही. पण मी दुसरा मुलगा तुम्हाला देतो.’

‘दुसरा मुलगा?’... ती वृद्धा विचारात पडली.

तेवढ्यात गांधीजींनी त्या वृद्ध मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, ‘या लढ्यात गांधी मेला आणि तुमचा मुलगा जिवंत आहे, असं आजपासून समजा.’

त्या मातेला रडू आवरेना. ती म्हणाली, ‘ऊठ बाबा..! तुला शंभर वर्षं आयुष्य आहे. शतायुषी हो...!’

बाबा, हाच प्रसंग मी आज रेखाटला. आणि आई, गांधीजींच्या कार्यातून मला एक गोष्ट कळलीय, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय! गांधीजी नेहमी म्हणत, क्रोधाला प्रेमाने जिंका; वाईटाला चांगल्याने जिंका; लोभाला उदारतेने जिंका आणि असत्याला सत्याने जिंका.”

माधवचे बोलणे ऐकून मालूने टाळ्याच वाजवल्या.

“दादा, किती छान सांगितलंस रे.”

आई, बाबांना आपल्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याला बक्षीस मिळेल की नाही हे त्यांना माहीत नव्हतं. पण त्यांच्या मुलाने त्यांचं हृदय केव्हाच जिंकलं होतं.

Mahatma Gandhi
Rahul Gandhi Birthday : 'मुहब्बत की दुकान...!' उर्मिलाकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com