The joy of swimming in winter
The joy of swimming in winteresakal

Marathi Article : जवा एका बुडत्या मुलाला वाचवायला माझा छंद कामाला आला, तवा मला खूप आनंद झाला.

आपण आपल्या छंदामुळे एका लहान मुलाचा जीव वाचवू शकलो, ही गोष्ट यशवंताला पुरस्काराहूनही खूप मोठी वाटत होती!!

जेव्हा त्याला विचारलं की एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतंय? तेव्हा यशवंतने खूप छान उत्तर दिलं. तो म्हणाला, “पुरस्काराचा आनंद तर हायच मला. पण खरं सांगू का? मला जास्त आनंद कवा झाला ते? जवा एका बुडत्या मुलाला वाचवायला माझा छंद कामाला आला, तवा मला खूप आनंद झाला.”

एकनाथ आव्हाड

“यशवंता, आरं एकच गोष्ट कितीदा सांगायची रं पोरा तुला? तुझ्या टकुऱ्यात काय शिरतं का न्हाय? तिकडं तू तास तास पवायला जातोस आन इकडं माज्या जिवाला नुसता घोर लागतो बघ.

आरं, आग आनि पानी याच्यापासून दूर राहायचं, हे कितीदा सांगितलंय तुला. पण तुझ्या ध्यानात येईल तर शप्पथ,” सारखं सांगूनही पोरगं ऐकत नाही म्हणून यशवंताची आई आज रागानंच त्याच्याशी बोलली. यशवंताची तिला काळजी वाटत होती.

“आगं आयं, तू कशाला घाबरतीयास. आगं, पान्याची भीती मला बिलकूलसुद्धा न्हाय. उलट पवायला जाम मजा येतीय बघ. तू नगं काळजी करूस. आगं, आपल्या गोदावरी नदीचा पैलतीर एका दमात आता गाठतोय मी.

मला चांगलं पवायला शिकवलंय आपल्या गावातल्या शिरपाकाकांनी. अगं मलाच काय, पण गावातल्या कितीतरी पोरांना पवायला शिकवत्यात ते... शिरपाकाका म्हनत्यात, आपन भाग्यवान आहोत. कारण आपल्या गावात गोदावरी नदीमाय हाय.

तिच्यामुळे गावात बरकत हाय. आयं, मग या नदीमायशी दोस्ती करायची तर तिच्यापासून लांब राहून कसं चालंल. आगं, पवणं हीसुद्धा मोठी कलाच हाय. भले भले पवायला कचरत्यात. ज्याला जी कला जमल त्यानं ती कला जोपासायची, वाढवायची आन् फुलवायची, असं शिरपाकाका म्हनत्यात.

आता मला पवणं चांगलं जमतं तर मी पवण्याची कला वाढवणार. म्हणूनशान मी आणि माझे दोस्त शाळा सुटल्यावर पवायला जातो. शिरपाकाका असतात की तिथं आमची काळजी घ्यायला. आता शिरपाकाका पवण्यात किती तरबेज हाय, हे समद्या गावाला ठाऊक.

म्हणूनशान मी तुला सांगतोय, तू नगं माजी काळजी करूस. शाळा तर मी कधीच बुडवतच न्हाय... पाण्यात डुंबण्यासाठी, पवण्यासाठी.

शाळा सुटल्यावर जातो पवायला. आन घरी आल्यावर शाळेचा अभ्याससुदीक करतो. साळंतसुद्धा येऊन इचार सरांस्नी, मी दिलेला अभ्यास येळच्यायेळी करतो का न्हाय ते.”

The joy of swimming in winter
DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता (CRISPR Genes Editing)

मुलाच्या या बोलण्यावर आईला काय बोलावं हे सुचेना. विचारी की बिचारी झाली ती. एखादी गोष्ट पटवून देण्यात यशवंता अगदी त्याच्या बापावर गेलाय हा विचार मात्र तिच्या डोक्यात पटकन चमकून गेला.

मग यशवंताला जवळ घेत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती म्हणाली, “बरं बाबा, जात जा पवायला. तास तास टीव्हीत डोकं खुपसून पाहण्यापरीस तासभर पवणं चांगलंच. पण तू लहान हायेस पोरा म्हणून काळजी वाटते तुझी.

एकटादुकटा कधी जाऊ नगंस बरं नदीवर. तुझा शिरपाकाका सोबत आसल्याबिगर नदीत उतरायच न्हाय बघ, आधीच सांगून ठेवतेय.”

आईचा हात हातात घेत यशवंत म्हणाला “बरं बरं, तू म्हणशील तसं. हे बघ दिलं तुला वचन. आता तासभर पवल्यामुळं मला लय भूक लागलीय. मला जेवायला वाढ की आये.”

माय लेकरांचा हा हृद्य संवाद ऐकायला घरात कुणीच नव्हतं. यशवंताचे वडील वावरात गेले होते. आणि यशवंताची धाकटी बहीण सुमा अभ्यासाला सारिकाच्या घरी गेली होती.

दिवसामागून दिवस जात होते. यशवंतचा पोहण्याचा सराव वाढत होता. आता तोही गावच्या शिरपाकाकासारखा पोहण्यात तरबेज झाला होता. एका दमात आता तो नदीचा पलीकडचा काठ गाठायचा. माशासारखा सुळकन पाण्यात सूर मारायचा.

चपळाईने पोहायचा. पोहण्याचे केवढेतरी प्रकार तो युट्यूबवर बघून तर कधी शिरपाकाकाकडून शिकला होता. त्याच्या पोहण्यातला सराईतपणा दिवसेंदिवस वाढत होता. फ्री स्टाइल, बॅक स्ट्रोक, साइड स्ट्रोक, बटरफ्लाय... केवढेतरी पोहण्याचे प्रकार त्याने शिकून घेतले होते.

पोहण्याच्या व्यायामामुळे हृदय, फुप्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण व्यवस्थित होते. शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते... असे केवढेतरी फायदे तो आपल्यापरीने शाळेत मित्रांना येता जाता सांगायचा.

The joy of swimming in winter
ऑफिसमधल्या Groupism वर उपाय काय?

ज्या गोदावरी नदीत तो पोहायचा त्या नदीचा इतिहास, भूगोल साराच त्याने तोंडपाठ केला होता. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी आहे आणि गंगेनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे.

दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे... गोदावरीची अशीच आणखी बरीच माहिती त्याने गोळा केली होती. आणि त्या माहितीत रोज थोडी थोडी भर पडत होती.

नाशिक जिल्ह्यात पोहण्याची स्पर्धा आयोजित केली होती. शिरपाकाकाच्या आग्रहामुळे यशवंतने त्या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. जिल्ह्यात त्याचा जंगी सत्कार झाला. त्याचं हे यश पाहून आईवडिलांना अभिमान वाटला आपल्या मुलाचा.

एकदा त्याच्या गावात एक अघटित घटना घडली. झालं काय, यशवंतची सहामाही परीक्षा नुकतीच सुरू झाली होती. तो सकाळी दहा वाजता शाळेत जायला निघाला होता. गोदावरीच्या काठाकाठानेच त्याचा शाळेत जायचा मार्ग ठरलेला असे.

शाळेत जाताना नेहमी मित्रमंडळी सोबत असायची पण त्यादिवशी नेमकं कोणीच नव्हतं सोबतीला. अकरा वाजता पहिलाच पेपर होता मराठीचा. त्यानं पाहिलं, नदीच्या एका काठाला एक बाई कपडे धूत बसली होती.

तिच्यासोबत तिचा सात-आठ वर्षाचा मुलगाही होता. यशवंत परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी झपझप चालला होता. अचानक त्याला, ‘वाचवा वाचवा’ असा आवाज ऐकू आला.

The joy of swimming in winter
नोकरीसाठीच्या मुलाखतीत छंदाविषयीच्या प्रश्नावर उत्तर काय द्यावे?

आवाजाच्या दिशेने त्याने वळून पाहिले तर ती कपडे धूत बसलेली बाईच मोठ्या आकांताने ओरडत होती. तिथं तिचा मुलगा मात्र दिसत नव्हता. यशवंतच्या पटकन लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न लावता तो धावतच त्या बाईजवळ आला.

त्या बाईच्या आवाजाने आणखी काही माणसं तिथं गोळा झाली होती. पण यशवंतने मागचा पुढचा विचार न करता पाठीवरचं दप्तर काठावर टाकून पटकन नदीत उडी मारली. आणि मोठ्या शिकस्तीने त्या बाईच्या नदीत बुडणाऱ्या मुलाला त्याने वाचवले.

अजून थोडा वेळ गेला असता तर मुलगा वाचणं कठीण झालं असतं, अशी भवतालची माणसं म्हणायला लागली. त्या बाईच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धाराच वाहत होत्या. काय बोलावं तिला सुचेना. हात जोडून फक्त ती यशवंतचे मनोभावे आभार मानत राहिली.

यशवंतचं धाडस पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं. आता कुठे यशवंतच्या लक्षात आलं, त्याचा शाळेचा गणवेष पूर्ण ओला झाला होता. परीक्षेची वेळही जवळ येऊन ठेपली होती. मग तसाच तो दप्तर पाठीला लावून शाळेच्या दिशेने पळत निघाला.

परीक्षेला यायला उशीर का झाला? असं थोरात सरांनी विचारताच त्याने घडलेली सगळी हकिगत सांगितली. सरांना, शाळेतील इतरांना यशवंतचे विशेष कौतुक वाटले. नदीत पडलेल्या मुलाचा जीव वाचवण्याची यशवंतची कामगिरी वाऱ्यासारखी नाशिकभर पोहोचली. वर्तमानपत्रातूनही त्याचं कौतुक झालं.

शाळेनं त्याचं खास अभिनंदन केलं. त्यावर्षीचं राष्ट्रपतींचं शौर्य पदकही त्याला मिळालं. जेव्हा त्याला विचारलं गेलं की एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतंय तुला? तेव्हा यशवंतने खूप छान उत्तर दिलं.

तो म्हणाला, “पुरस्काराचा आनंद तर हायच मला. पण खरं सांगू का? मला जास्त आनंद कवा झाला ते? जवा एका बुडत्या मुलाला वाचवायला माझा छंद कामाला आला, तवा मला खूप आनंद झाला.”

यशवंताचं बोलणं ऐकून साऱ्यांचेच डोळे लकाकले. आपण आपल्या छंदामुळे एका लहान मुलाचा जीव वाचवू शकलो, ही गोष्ट यशवंताला पुरस्काराहूनही खूप मोठी वाटत होती!!

---------

The joy of swimming in winter
Post Office Bill 2023: १२५ वर्षांनी बदलणार कायदा, पण होतोय प्रायव्हसीचा भंग? काय आहे वादग्रस्त 'पोस्ट ऑफिस विधेयक २०२३?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com