लग्नघरात भरलेली गणगोतांची जत्राच ही..!

एकेकजण जमायला लागतात. सगळे गणगोणातलेच. भाच्याच्या/ भाचीच्या, पुतण्याच्या/ पुतणीच्या लग्नासाठी चांगली पाच-सात दिवसांची रजा टाकून आलेले.
wedding
wedding esakal

मंगेश साखरदांडे

ताल, सूर, नाद, संगीतापेक्षा संगीतमध्ये बांधला जातो जिव्हाळा!

खरं सांगायचं तर आज्जीला ‘संगीत’ म्हणजे नेमकं काय होणारे त्याचा अंदाज आलेला नसतो.

लग्नाची हातघाई सुरू होण्याआधी मुलगा त्याच्या ऑफिसमधल्या गडबडी संपवण्याच्या मागे असतो, मीटिंगा वगैरे उरकत आणलेल्या असतात, एक-दोन क्लायंटना त्यानं तसंही फुटवलेलंच असतं; पण तरी आणखी एक-दोघांना भेटावं लागणार असतं.

सूनबाई म्हणजे पूर्ण लग्नमय झालेली असते. तिचं नव्यानेच ‘होऊ घातलेली सासू’ असं अपग्रेडेशन झालेलं असतं, आणि (मुख्य म्हणजे) तिला सासूचा फूल दर्जा मिळायला आता फक्त आठ-दहा दिवस राहिलेले असल्याने तिच्यातली सूनबाई नाही म्हटलं तरी बॅकसीटवर गेलेली असते. अक्षता पडायच्या अगोदर उरकायलाच हवीत अशी हीऽऽऽ कामं असतात तिच्यासमोर.

उत्सवमूर्तींच्या वडिलांचे वडील या भूमिकेत शिरलेले आजोबा त्यांच्याच मूडमध्ये... तसंही याआधीसुद्धा लग्नाबिग्नासारख्या ‘महत्त्वाच्या’ मुद्द्यांवर त्यांनी प्रत्येकवेळी आज्जीला जमेला धरलेलं असतंच असं नाही.

उत्सवमूर्ती असणाऱ्या नातीला किंवा नातवाला विचारायची सोय नसते कारण ती किंवा तो तशीही/ तसाही जमिनीवर नसतोच. मधूनच, ‘मस्त चाललीय प्रॅक्टिस,’ असं काहीतरी तिच्या कानावर आलेलं असतं. आज्जी चाचपडत असते.

‘काही नाही गं नुसता धांगडधिंगा घालतात पोरंपोरं मिळून,’ तिच्याच वयाची पण आधीचा (नातवाच्या) लग्नाचा अनुभव असणारी बागेतली/ देवळातली/ मॉर्निंग वॉकला भेटणारी/ ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावरली मैत्रीण आज्जीला माहिती देते.

‘मजा असते अगं पण,’ या तिच्या पुढच्या शब्दांनी आज्जीला थोडा दिलासा मिळतो.

अर्थात आज्जीला अगदीच कल्पना नसते असं नाही. तसं तिनं हम आपके हैं कौन टायपातल्या सिनेमांत वधू आणि वरमायेला आणि त्यांच्या भल्यामोठ्या सख्ख्या-चुलत-आणि-एक्स्टेन्डेड कुटुंबातल्या तिच्या वयाच्या आज्ज्यांना लग्नाच्या आधी ढोलकी वाजवत गाणंबिणं म्हणताना (आणि तोंडी लावण्यापुरता वाह्यातपणा करतानाही) पाहिलेलं असतं.

पण लग्न ठरल्यावर संगीतबिंगीत, मेंदीबिंदीपासून तीन तीन रिसेप्शनांपर्यंत (लग्नाला न बोलावलेले थोडे लांबचे म्हणजे मधे तीन-चार चुली असणारे नातेवाईक आणि कॉम्प्लेक्समधले, बाबाच्या बिझनेस सर्कलमधले, बाबा-आई-खुद्द नवऱ्या मुलाची किंवा मुलीची मित्रमंडळी, कॉन्टॅक्ट, माहेरच्या गावात एक, सासरच्या गावात एक वगैरे) फुल्ल आठवडाभर लग्न चालणार असं जेव्हा आज्जीला कळतं तेव्हापासून या ‘संगीत’नं तिचा पिच्छा पुरवलेला असतो.

लग्नाचा व्हेन्यू, मेन्यू, डेकोरेशन, दागिने, साड्या वगैरेंच्या ठरवाठरवीसाठी व्याह्यांबरोबर आणखी कोणीकोणी मंडळी घरी येत असतात, त्यातच एका संध्याकाळी कोरिओग्राफर अशा पूर्ण अपरिचित नावाची एक कन्या अवतरते.

मग लग्न म्हटल्यावर कानावर साधारणपणे ज्या चर्चा येत असतात त्यापेक्षा वेगळ्या चर्चा आज्जीच्या कानावर यायला लागतात. गाणी, डान्स, परफॉर्मन्स, रीहर्सल वगैरे.

मधेच तो अमका मामा किंवा ती तमकी काकू छान गाते... आणि आपली ती ही... अहो भरतनाट्यम नाहीये का शिकलीय... असेही काही तुकडे तिच्या कानावर येत असतात. नातवंडाच्या मित्रमैत्रिणींनी तिसऱ्याच एका मित्राच्या घरी रीहर्सलचे डाव मांडलेले असतात.

‘आज्जी तुम्हालापण इन्व्हॉल्व्ह करणारोत बरं का आम्ही,’ असं ती कोरिओग्राफर नावाची कन्या एकदा सांगून गेलेली असते. तेवढंच!

आणि मग ती संध्याकाळ उजाडते...

एकेकजण जमायला लागतात. सगळे गणगोणातलेच. आता कामाधंद्यानिमित्त कुठेकुठे पांगलेले. भाच्याच्या/ भाचीच्या, पुतण्याच्या/ पुतणीच्या लग्नासाठी चांगली पाच-सात दिवसांची रजा टाकून आलेले.

एका कोपऱ्यात चहा-कॉफी-वेलकम ड्रिंक-इव्हिनिंग स्नॅक्स. तिथे थोडी गर्दी. हाय... कसा आहेस...? डोक्यावरचं छप्पर उडायला लागलं की रे तुझ्याही...? काय तुझे लाडू कधी आता...? किती तोळ्यांचा आहे गं...? मी म्हटलं बाई हल्ली डायमंडची क्रेझच आहे म्हणून... नाही रे यंदाही पाण्याचा प्रॉब्लेमच होता... वगैरेंची देवाणघेवाण सुरू असताना व्हेन्यूचा एक कोपरा उजळतो.

एका प्रकाशझोतातून विघ्नहर्त्या गजाननाचं चित्र उमटतं; कुठलीतरी धून छेडली जाते आणि त्या तालावर गणेश वंदना सुरू होते. अगं ती विजूची मोठी ना...? आणि ही दुसरी कोण...? आज्जीचा हलक्या आवाजातला प्रश्न इव्हेंटची अनाउन्समेंट करणाऱ्या ड्रमच्या दणदणाटात विरून जातो.

आता इव्हेंट मास्टर ऑफ सेरेमनीच्या हातात असतो.

वेलकम वगैरेंचे सोपस्कार पार पडल्यानंतर ती एखाद्या आत्या –काकांना स्टेजवर पाचारण करते.

काकांचा पाय खरं म्हणजे आदल्याच दिवशी मुरगळलेला असतो, गेला आठवडाभर सर्दीही असते त्यांना. व्हेन्यू गाठेपर्यंत उत्साहात असलेले काका मग खूपच आढेवेढे घेतात.

आत्या आग्रह करतात. समोरूनही आग्रह होतो. मग मास्टर ऑफ सेरेमनी काकांना चक्क धमकीच देते, अर्धा मिनिट तरी डान्स करायचाय हं काका आज तुम्हाला... ‘काय काका लाजताय आज एवढे... होऊन जाऊ दे.

काकूंकडे नका बघू... त्या काही म्हणणार नाहीत आज...’ समोरून कोणीतरी काकांची फिरकी घेतं.

कार्यक्रमात आता रंग भरायला लागलेला असतो. संध्याकाळ पुढे सरकत असते.

मुलाचे वर्गमित्र, मुलीच्या मैत्रिणींचे धम्माकेदार परफॉरमन्स होतात. आज्जींच्या ओळखीचे त्यातले काही चेहरे आज चमचमत्या नव्या कपड्यांत चमकत असतात.

अलीकडची बरीचशी गाणी कानावरून गेली नसल्याने बऱ्याचजणांच्या डोक्यावरून जात असली तरी त्या गाण्यांचा वाद्यमेळ आज्जींसह सगळ्याच लहान-थोरांना ठेका धरायला भाग पाडत असतो.

समोर आता मित्र-मैत्रिणी आणि मास्टर ऑफ सेरेमनी मिळून नवऱ्या मुला-मुलीच्या मागे लागलेले असतात. तुम्हाला माहिती होतं का रे हा पटवतोय तिला ते? या प्रश्नावर होऽऽऽऽ असा एक जोरदार कोरस होतो, कोणत्या कट्ट्यावर नेमकं काय झालं, कोणी कोणाला प्रपोझ केलं, किंवा ती एक भन्नाट ट्रिप कशी प्लॅन केली, मुलीच्या बाबाला कसं पटवलं वगैरे आठवणींची उजळणी होते.

नवऱ्या मुलीच्या गालावरची लाली आणखी गडद होत जाते, बाबाच्याही डोक्यात काही प्रसंग रिप्ले होतात आणि मुलीच्या आईच्या चेहऱ्यावर क्षणभर चमकून गेलेली हास्याची लकेर त्याला आणखी काही प्रसंग नव्याने उलगडून सांगते.

मग साक्षात होणारी सासू आणि होणारी सून, सासरा आणि मुलगा यांचे पदन्यास. उरलेल्या जगाकरता एक यशस्वी व्यावसायिक, अधिकारी किंवा यशस्वीबिशस्वी असणारा सासरा हौशी असेल तर संध्याकाळ आणखी बहरत जाते.

एखाद्यावेळी वरपिता किंवा वधूपिता थोडे नर्व्हसच असतात. तसंही गेल्या कित्येक वर्षांत त्यांना कधी कोणी मोकळेपणाने नाचल्याबिचल्याचं पाहिलेलं नसतं, पण इथे अपील नसतं.

आत्ता आत्ता सासऱ्याच्या भूमिकेत शिरलेले (बाहेरच्या जगाचे) साहेबही पाय मोकळे करून घेतात. सासरच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडण्याच्या तयारीत असलेली मुलगी अजूनही कशी बापाला नाचवते, याचं कौतुक मुलीच्या आईच्या डोळ्यांत वाचता येतं!

मुलाच्या, मुलीच्या वडिलांचे मित्र हा संगीत कार्यक्रमांमधला एक वेगळा प्रांत. आता काका झालेली ही मुलं आज्जींनी ‘जरा वाह्यात’ म्हणूनच पाहिलेली पहिल्यापासून.

आणि आजच्या संध्याकाळी तर सगळ्यांनीच अधिकाराच्या, यशाच्या आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या झुली उतरवून ठेवलेल्या.

खरं म्हणजे नाचता असं कोणालाच येत नसतं. पण उत्साह दांडगा असतो, आणि कार्य घरचं असतं. गेले एक-दोन आठवडे खूप प्रॅक्टिस करूनही दोनचार स्टेप्सनंतर सगळेच मनाने जणू गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गेलेले असतात.

कोरिओग्राफरच्या उत्साहाने एव्हाना सगळ्या कुटुंबाला गुंगवून, घेरून टाकलेलं असतं.

नवरी मुलगी किंवा कुटुंबातील कोणी जर नाट्य-नृत्य-गायनातले वगैरे असतील तर संगीत उत्तरोत्तर रंगतच जातं. घरातलीच माणसं असतात.

लेकी असतात, सुना असतात, मुलं असतात, पुतणे, भाचे, मित्र. कुटुंबातल्या कलाकारांचं टॅलेंट कुटुंबातल्या मंडळींनाही नव्यानेच जाणवत असतं.

आजूबाजूच्या जगासाठी प्रचंड शिकलेले, यशस्वी असलेले, अधिकार असणारे, त्याक्षणी फार मॅटर करत नसला तरी पैसा बाळगून असणारे, एरवी चेहऱ्याची इस्त्री न मोडू देता कडक असणारे, जरा ‘हेच’ असणारे, आपल्याआपल्यातच राहणारे/ राहणाऱ्या नाचत असतात, गात असतात.

अगदी नुसतीच सुगरण असणारी मामाची बायकोही एखाद्या फडकत्या गाण्यावर मुरडून जाते तेव्हा तिच्या सासूबाईंची कवळीच पडायची राहिलेली असते.

एरवी ज्याचा फक्त लांब आणि गंभीर चेहराच माहिती असतो असा तात्या किंवा अप्पाकाकासुद्धा दोन पावलं टाकतो तेव्हा संगीताने खऱ्या अर्थाने सूर पकडलेला असतो. डान्स इज लँग्वेज ऑफ हॅपिनेस, असं म्हणतातच ना नाहीतरी.

नाचायचं असेल तर आपलं अंग आपल्याला वाटतं तसं हलवता यावं लागतं, ही मूलभूत अट आपल्याला फक्त मनातल्या मनातच पूर्ण करता येऊ शकते याची खात्री असणाऱ्या मंडळींनाही मनातल्या मनात शम्मी किंवा हृतिक आपल्याकडे बघून बघूनच शिकलाय अशी ठाम समजूत करून घेऊन (त्याच शम्मी किंवा हृतिकला मनःचक्षूंसमोर ठेवून) चार पावलं टाकायची हौस चारचौघात भागवून घेण्याची आणि त्यासाठीही कौतुक करून घेण्याची ही हल्ली एक चांगली संधी असते.

बाबांबरोबर स्टेज शेअर करताना लेकीच्या डोळ्यातलं बापाबद्दलच प्रेम उतू जाताना दिसत असतं आणि केकवरच आयसिंग म्हणजे आता सत्तरीच्या आसपास असणाऱ्या आज्जीनं, कदाचित मनात दाटलेल्या हजार आठवणींसह, दुधावरच्या सायीसाठी टाकलेली दोन पावलं.

पहिल्या दिवसापासून हातांच्या ओंजळीत वाढलेल्या नातीच्या सळसळत्या आनंदानेच थकलेल्या त्या कुडीला हजार हत्तींचं बळ दिलेलं असतं. समोर एक परीकथा उलगडत असते.

दोन्ही कुटुंबातील आईसब्रेकिंग का काय म्हणतात ते व्हायला या संगीतचा उपयोग होत असेल का? होत असणार. जोडीला हौस होते, माणसंही मोकळी होत जातात, परीटघड्याही थोड्याबहुत मोडल्या जात असाव्यात.

‘आज मी यांना पहिल्यांदा पाहिलं इतकं खळखळून हसताना,’, ‘किती छान दिसतात हे हसताना...’ अशा भावना किती जणांच्या हृदयाला स्पर्शून जात असतील त्या तासादोन तासांत. ताल, सूर, नाद, संगीतापेक्षा संगीतमध्ये बांधला जातो एक नवा जिव्हाळा!

सगळ्यांच्याच कानात आता सनईचे सूर गुंजायला लागलेले असतात.

मग सुरू होतो चौथा अंक, आणि एक गाणं धड सबंध वाजवत नाहीत म्हणत म्हणत पायांनी सपने में मिलती है... किंवा झिंग झिंग झिंग झिंगाट...वर ताल धरलेला असतो. गाणी बदलली तरी तोच ठेका पायांत भरून राहतो, जैत रे जैतमधल्या नाग्याच्या ढोलाच्या ठेक्यासारखा.

कधीकाळी आळीतल्या/ चाळीतल्या/ वाड्यातल्या ‘डान्स पथकां’ची शान असलेल्या बंड्याकाकांनाही आपले नव्या नव्हाळीतले दिवस, नागीण डान्स, पतंग डान्स आणि आणखी बरंच काय काय आठवत राहातं.

आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलं. आजवर नवरा, दीर, नणदा, भाऊ, बहिणी, सून, जावई, भाचरं अशा नात्यांतून म्हणा किंवा पुढच्या पिढ्यांच्या मित्रमैत्रिणींच्या, क्वचित शेजारी वगैरे रूपात पाहिलेली माणसं एकदम नवं, हवंहवंसं रूप घेऊन अवतरतात; आज्जी डोळ्यांच्या कोपऱ्यात आपसूकच उभा राहिलेला अश्रूचा थेंब बोटाच्या कडेनेच टिपतात आणि नातीला/नातवाला, नातसुनेला/ नातजावयाला मनापासून आशीर्वाद देतात.

गणगोताची जत्राच ही. खाण्यापिण्याची, गाण्याबजावण्याची, फोटोबिटोंची रेलचेल असते, तालासुरांचा भूलभुलय्या असतो आणि नजरांचे पाळणेही.

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com