

Foreign Investment and Market Consolidation
esakal
ओमानच्या करारामुळे होर्मुझच्या विळख्याच्या बाहेर नवे समुद्री मार्ग विकसित करण्याच्या प्रयत्नास यश आलेले दिसते. त्याखेरीज मौल्यवान खनिजे व धातूंसाठी पेरू व चिली या देशांशी बोलणी सुरू आहे. बोलणी यशस्वी झाल्यास आपली बाजारपेठ पुन्हा आकर्षक वाटू लागेल व परदेशी संस्था पुन्हा मोठ्या संख्येने परततील.
गेले पाच महिने शेअर बाजाराचा टाइमपासच चालला आहे. त्याला तज्ज्ञांच्या भाषेत ‘कन्सॉलिडेशन’ म्हणतात. पण मंदीने गुंतवणूकदारांची दाणादाण उडण्यापेक्षा हे अधिक चांगले. शेअर बाजार वर गेल्यासारखे दाखवत आशा पल्लवित करतो, आणि पाठोपाठ विक्रीला सामोरे जात कुठेतरी आधार घेतो. मे महिना असाच आशा दाखवत निराशेकडे घेऊन गेला.
ता. २५ ते २९ मे या सप्ताहात ईदच्या सुट्टीमुळे झालेल्या चार दिवसांच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये निर्देशांक पुन्हा घसरले. खरा मार शुक्रवारच्या (ता. २९ मे) शेवटच्या तासाभरात बसला. पराभूत सैन्य हातातले शस्त्र सोडून पलायन करायला लागले, की जिंकणारा सेनापती त्यांचा संपूर्ण बँड वाजवतो तसे झाले. निमित्त होते एमएससीआयच्या निर्देशांकात अंतर्भूत शेअरची पुनर्रचना! या रीजीगमुळे फेडरल बँक, एमसीएक्स, नाल्को व इंडियन बँक या शेअरमध्ये जवळपास तेरा हजार कोटी रुपयांची खरेदी अपेक्षित होती. त्याचबरोबर ह्युंदाई मोटर्स, जुबिलंट फुड्स, कल्याण ज्वेलर्स, रेल विकास निगम हे शेअर निर्देशांकाच्या बाहेर पडणार होते, त्यात ६८२० कोटी रुपयांची विक्री होणार होती. त्याशिवाय लार्ज कॅपमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टीसीएस व अल्ट्राटेक सिमेंट वगैरे शेअरची विक्री झाली आणि शेवटच्या तासाभरात मुंबई सेन्सेक्स १००० अंशाने आणि एकूण १५०० अंशाने खाली आला. या रीबॅलन्सिंगमुळे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त निर्देशांकात (एमएससीआय) भारताचे वजन कमी झाले. ते २० टक्क्यांवरून जवळजवळ ११ टक्क्यांवर आले. त्याला बघून मोठी विक्री (किमान २० हजार कोटी रुपयांची) झाली. निफ्टी आपल्या आधारपातळीपाशी येऊन २३५४७ अंशावर थांबली. शुक्रवारी बाजाराने (निफ्टीने) २४००० अंशावर डोके काढले होते, पण शेवटच्या तासाभरात घात झाला. अचानक विक्री झाल्यामुळे असे होते. कारण बेसावध असल्यामुळे तेजीवाल्यांना सावरता येत नाही. पळता भुई थोडी होते. असो.