

Rabindranath Tagore and Maharashtra
esakal
महाराष्ट्र हे टागोरांचं असं प्रेमाचं ठिकाण होतं, जिथं ते प्रथम घडले, त्यांच्या साहित्याला प्रथम प्रेरणा मिळाली, टिळकांकडून त्यांना वैचारिक आव्हान मिळालं, महाराजांच्या चरित्रातून आणि मराठ्यांच्या इतिहासातून स्फूर्ती मिळत गेली, त्यांच्या कक्षा विस्तारल्या. ही ओढ दोन्ही बाजूंनी टिकून होती. म्हणून आजही टागोरांच्या साहित्यावर कलाकृती घडत असतात, त्यांच्या कवितांचं वाचन होत असतं, संगीताचे कार्यक्रम होत असतात. म्हणूनच महाराष्ट्र आजही टागोरांच्या स्मृती टिकवून ठेवतो.
रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्र यांचं नातं केवळ ऐतिहासिक संदर्भांपुरतं मर्यादित नाही, तर ते एका गहिऱ्या सांस्कृतिक आणि वैचारिक संवादाचं उदाहरण आहे. १८७८मध्ये तरुण टागोर मुंबईत आले, तेव्हा अन्नपूर्णा तर्खडकर (नलिनी) यांच्या सहवासातून त्यांना स्त्री-स्वातंत्र्य, आधुनिकता आणि सामाजिक उघडपणाचा नवा अनुभव मिळाला. पुढे टिळकांच्या राष्ट्रवादाशी झालेल्या संवादातून त्यांच्या विचारांना आव्हान मिळालं, तर शिवाजी महाराजांच्या इतिहासातून त्यांनी नेतृत्व आणि नैतिकतेचे व्यापक अर्थ शोधले. हा प्रभाव एकतर्फी नव्हता. महाराष्ट्रानंही टागोरांना आपल्या भाषांतर, रंगभूमी आणि सांस्कृतिक परंपरेत सामावून घेतलं. वैयक्तिक अनुभव, वैचारिक मतभेद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांतून घडलेलं हे नातं आजही जिवंत आहे ते एक सतत नव्यानं उलगडत राहणारा संवाद म्हणून.
एखाद्या थोर साहित्यिकाला साजेशी अशी टागोर आणि महाराष्ट्र ही कथा एका अगदीच अनपेक्षित वळणावर सुरू होते. ती ना शांतिनिकेतनमध्ये सुरू होते, ना कोलकात्याच्या सांस्कृतिक केंद्रांमध्ये. ती सुरू होते मुंबईमधल्या एका मराठी घरात; एक बंगाली, लाजरा तरुण आणि एका उच्चशिक्षित मराठी तरुणी यांच्यातल्या मैत्रीमधून.
सन १८७८मध्ये, वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी रवींद्रनाथ मुंबईला आले. त्यांचे भाऊ सत्येंद्रनाथ यांनी त्यांना इंग्लंडला जाण्यापूर्वी स्वतःला ‘घडवण्यासाठी’, इंग्रजी संभाषण शिकण्यासाठी, पाश्चात्त्य समाजात कसं वागायचं कसं बोलायचं, तिथल्या चालीरीती कशा असतात हे सारं शिकण्यासाठी त्यांना काही दिवस मुंबईमध्ये पाठवायचं ठरवलं. सत्येंद्रनाथ टागोर यांची आणखी एक ओळख अशी, की ते भारतीय वंशाचे पहिले सनदी अधिकारी. ते मुंबईला काही काळ कामाला होते. महाराष्ट्राची त्यांना उत्तम माहिती होती. त्यांनी संत तुकारामांच्या काही अभंगांचा मराठीत अनुवादही केला होता.