पावसाळा म्हणजे अलगद फुलणारे प्रेम..

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध; सगळ्या ज्ञानेंद्रियांना सुखावतो हा पावसाळा.
rain
rainsakal

मला तर पावसाळा हा ओळीने साजरा करायचा चवींचा उत्सवच वाटतो. पावसाळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे श्रावण महिना. श्रावण हा सणासुदीचा महिना. पावसाळ्यात येणारे सण यावेळी कोणता पदार्थ करून खायचा हे सुचवीत असतात...

-प्रा. विश्‍वास वसेकर

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध; सगळ्या ज्ञानेंद्रियांना सुखावतो हा पावसाळा. आपण त्याला पावसाळी खादाडीची जोड द्यायची. पावसात भिजणं सोपं असतं. खाण्याचा, चवींचा उत्सव साजरा करीत आपलं अंतरंगही भिजवता आलं पाहिजे

नेमेची येतो मग पावसाळा. आता ही उक्ती उत्साहानं भरलेली आहे का वैतागानं याचा निर्णय तुम्ही तिचा उच्चार कसा करता, यावर अवलंबून आहे. मला तर पावसाळा हा ओळीने साजरा करायचा चवींचा उत्सवच वाटतो. पावसाळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे श्रावण महिना. श्रावण हा सणासुदीचा महिना. पावसाळ्यात येणारे सण यावेळी कोणता पदार्थ करून खायचा हे सुचवीत असतात.

काही मंडळी चातुर्मासात कांदा खात नाहीत. त्यातही काही फक्त श्रावण महिन्यात कांदा खात नाहीत. कांदा जुनाही झालेला असतो म्हणा. चंपाषष्ठीनंतर येणाऱ्या नव्या कांद्याची चव विशेष सुंदर असते. काही लोक कांद्याबरोबर वांगीही खात नाहीत. एका दृष्टीने तेही योग्यच आहे. चंपाषष्ठीनंतर येणाऱ्या नव्या वांग्याचे आपण दीर्घ प्रतीक्षेनंतर भेटलेल्या प्रियकराप्रमाणे स्वागत करतो.

मला मात्र या मंडळींची क्षमा मागायची असते. माझ्या स्वयंपाकघरात आले आणि कांदा अनुपस्थित आहेत, असा एकही दिवस चालत नाही. आईला चालत नाही ना कांदा, तिची वेगळी एक जास्तीची भाजी करा. पण प्रत्येक पळभाजीत कांदा हवाच.

rain
Ambabai Mandir Kolapur : आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन

चार महिने कांद्यावर अन्याय करणारे आषाढ शुद्ध नवमीचा एक दिवस कांद्याचा महोत्सव साजरा करून मग कांदा वर्ज्य करतात. या नवमीचे नावच मुळी कांदेनवमी आहे. कल्पना करा, दाट, कुंद पावसाळी हवा आहे. डोक्यावर भुरभुरता पाऊस पडतोय पण आपण छत्री घेत नाही. आता आपण उभे आहोत खडकवासला धरणाच्या परिसरात.

पाऊस आणि गरमागरम कांदाभजी यांचे काय नाते आहे कुणास ठाऊक? पण खडकवासला धरणाशेजारी पावसात उभे राहून तुम्हाला जर खेकडाभजी खायची नसतील तर पुण्यातील उबदार घर सोडून इतके मैल लांब आलात कशाला?कुणी तरी एकविसाव्या शतकातल्या हिंदी चित्रपटगीतांना भज्यांची उपमा दिली आहे.

शिळी, थंड भजी खाववत नाहीत तशी ही गाणी नवी असतात तेव्हा एकेकदाच ऐकावीशी वाटतात.भजी गरम खाण्यातच मजा आहे. कांदा परतण्याला फार महत्त्व आहे. कांदा जितका जास्त परताल तितका त्याचा खमंगपणा वाढतो. गोलभज्यांपेक्षा खेकडाभज्यांत कांद्याचे प्रमाण जास्त आणि पिठाचे अत्यल्प असते म्हणून भज्यांत श्रेष्ठ भजी- खेकडाभजी. परतलेला खरपूस, स्वादिष्ट कांदा. सीकेपींमध्ये कांदा परतण्याला कांदा ‘सवताळणे’ असा सुंदर शब्द आहे.

rain
Akola Crime : बावरीया शिकारी टोळीचे १६ जण ताब्यात; वाघाचे पंजे, नखे, शस्त्र आणि ४६ हजार रुपये जप्त
corn
cornsakal

तुम्ही अजून खडकवासला धरणाच्या परिसरातच आहात ना? भजी तर खाऊन झाली. आता थोडं पलीकडे पाहा. तिथं मक्याच्या कणसांचा गाडा उभा आहे. पाऊस थांबायच्या आत मक्याचे गरम गरम कणीस खाऊन झालेच पाहिजे. माझ्या लहानपणी मका इतका सुंदर नव्हता.

आता तो ‘मधुमका’ झाला आहे आणि त्याचा स्वाद कसला सुंदर झाला आहे. दोन्ही हातात धरून मक्याची कोवळी कणसं खाण्यात मजा तर आहेच पण हॉटेलमध्ये जाऊन ‘स्टार्टर’ या प्रकारात ‘बेबीकॉर्न’ खाऊन पाहा. पुन्हा घरी आल्यावर मक्याचे पॅटिस खा, गरमागरम.

हॉटेलमध्ये सूप पिताना एखादा मक्याचा दाणा लागतो, कसला आनंद देतो तो. कोणत्या तरी देशात प्रत्येक पदार्थात मका वापरायची पद्धत आहे, असे सांगणाऱ्याने पुलंना विचारले, ‘तुम्ही या देशाला काय नाव द्याल?’ पुलं म्हणाले, ‘सर्वात्मका’. ही कोटी ऐकल्यापासून ‘सर्वात्मका सर्वेश्‍वरा’ ही ओळ ऐकली की मला मक्याची भूक लागते!

माझी आई आणि आजी श्रावणातल्या स्वयंपाकाला ‘पुरणावरणाचा स्वयंपाक’ म्हणायच्या. श्रावण महिन्यात जेवढे पुरण शिजते तेवढे वर्षभरात शिजत नसेल. भरीस भर माझ्या घरात श्रावणी शुक्रवार असत. दिवसभर उपवास आणि रात्री पुरणावरणाचे जेवण. कधी तर पाच शुक्रवार असायचे. पुरणाचा प्रारंभ व्हायचा नागपंचमीपासून.

सर्पदेवतांची आपल्या हातून चुकूनही हत्या होऊ नये म्हणून या दिवशी विळी, तवा, कढई यांचा वापर बंद असे. पुरणाची पोळी न करता उकडलेले पुरणाचे ‘दिंड’ केले जातात. साजूक तुपासोबत छान लागतात. बैलपोळा हा श्रावणाचा शेवटचा दिवस. या दिवशी छोटा मोठा, गरीब-श्रीमंत, शेतमालक आणि शेतमजूर (गडी) सगळे पुरणपोळी खातात.

पोळ्यानंतर चारच दिवसांनी येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीला कोकणात आणि पुण्यात उकडीचे मोदक करतात. बाकीच्या महाराष्ट्रात तळलेले मोदक. मोदकातील ओले वा कोरडे खोबरे, गूळ, तूप, साखर, खसखस, खारीक पूड यामुळे सर्वांना आवडणारा हा स्वाद निर्माण होत असतो.

rain
Satara : आधी वडिलांचं अपघाती निधन आणि आता 21 वर्षाची लेकही..; उदयनराजेंनी लिहिली हृदयद्रावक पोस्ट

पुण्यात तर चतुर्थीच्या आगेमागे कायम उकडीचे मोदक सेवन केले जातात. मोद म्हणजे आनंद. मोदक हा चवींचा आनंद देणारा गोड पदार्थ आहे. पावसाळ्यातला शेवटचा सण गौरीपूजनचा. मराठवाड्यात त्याला महालक्ष्मीचा सण म्हणतात. तोही प्रामुख्याने पुरणाची पोळी करण्याचा सण असतो.

भाद्रपदाच्या दुसऱ्या पंधरवड्यात पितृपक्ष येतो. पूर्वजांच्या पवित्र स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणे हा मुख्य हेतू असला तरी पितरपाटा काही वेगळ्या चवी घेऊन येतो. माझ्या वडिलांना दुधाचे सगळे गोड पदार्थ फार आवडत. पायस किंवा आटवून केलेली खीर. आईवडिलांना ज्या तिथीला देवाज्ञा झाली असेल त्या वद्य भाद्रपदातील तिथीला ‘पक्ष’ करतात.

सर्वपित्री अमावस्येला बाकीच्या पितरांना जेवू घालायचे. तिथे पुन्हा तांदळाची स्वादिष्ट खीर ऊर्फ पायस असे. पत्रावळीपासून श्राद्ध पक्षाच्या जेवणाचे वेगळेपण अधोरेखित होते. पितरं मोहाच्या झाडावर असतात म्हणून श्राद्ध पक्षाला पूर्वी मोहाच्या पानाच्या पत्रावळी करीत असत. पळसाच्या नाही.

श्राद्ध पक्षात सुकवडे नावाचा भज्यांचा प्रकार मला फार आवडायचा. सणावाराच्या आणि सोवळ्यात केलेल्या स्वयंपाकात कांदा कटाक्षाने वर्ज्य असे. तेव्हा कांदारहित भज्यांना बोंडं म्हणत. सोवळ्याच्या स्वयंपाकात एरवी बोंडं करत. मराठवाड्यात बटाटेवड्याला आलुबोंडा शब्द आहे, त्यात हे बोंड आले.

याच आकाराच्या कापसाच्या फळांनासुद्धा बोंड असे म्हणतात. मराठी कशी काव्यप्रतिमांची भाषा आहे पाहा. तर मी सांगत होतो सुकवड्यासंबंधी. उडदाची डाळ भिजवून वाटायची. त्यात थोडी कणीक आणि तीळ टाकून सुकवडे तळायचे. वेगळाच मऊपणा, लुसलुशीतपणा त्यात येतो. हे सुकवडे एरवी कधी करता येत नाहीत.

पण घरात पक्ष नसले तरी सगळे पंधरा दिवस करू शकतो. मला आवडायचे म्हणून आई पूर्ण पंधरा दिवस रोज सुकवडे करायची. श्राद्धपक्षातल्या जेवणाच्या चवी अलगच असतात. यात हरभऱ्याच्या वाटलेल्या डाळीची चटणी असते. आळू ऊर्फ चमकोरा, देवडांगर किंवा गवार या तीनच भाज्या चालतात.

rain
Jaipur-Mumbai Exp Firing: प्रवाशांसोबत वाद नव्हता, 'या' कारणामुळं कॉन्स्टेबलनं झाडल्या गोळ्या; रेल्वे पोलीस आयुक्तांची माहिती

भरडा घातलेले वडे चालतात व तांदळाच्या खिरीबरोबरचे हे पदार्थ जेवण अतीव सुंदर बनवितात. कधीतरी एक किस्सा ऐकला होता, एकाने म्हणे आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त आपल्या इंग्रज अधिकाऱ्याला प्रसादाला बोलावले. त्याला पायस, सुकवडे, वडे, अळूची पातळभाजी, देवडांगराची फळभाजी, हरभऱ्याच्या वाटलेल्या डाळीची चटणी हे कॉम्बिनेशन विलक्षण आवडले.

उत्साहाने तो यजमानांना म्हणाला, “तुमच्या वडिलांचे श्राद्ध मला फार आवडले. आता एकदा आपण तुमचे श्राद्ध करू, माझ्या पैशांनी.!”

पावसाळ्यात आषाढीसकट आठ एकादशा येतात. एकादशीला एरवीचे जेवण न करता जी माणसं उपवास करतात त्यांनासुद्धा एक वेगळा चवींचा उत्सव करता येतो. मी तर आषाढी एकादशी आपल्या खवय्येगिरीचा एक वेगळा आविष्कार मानतो.माझ्या घरात उपवासाचे पदार्थ करताना शेंगदाण्याचे तेल वापरलेले चालत नाही.

साबुदाण्याच्या खिचडीला फोडणी द्यावयाची ती साजूक तुपाची. साबुदाण्याचे साजूक तुपात तळलेले वडे कसला श्रीमंत स्वाद घेऊन येतात. (एरवीसुद्धा साजूक तूप हा माझा वीक पॉइंटच आहे. वरणफळात ते ओतून घ्यायचे असते म्हणून मी वरणाला फोडणीसुद्धा साजूक तुपाचीच द्यायला लावतो.) पुण्यात तीन-चार ठिकाणी साजूक तुपातले साबुदाण्याचे वडे मिळतात.

सोबत काकडीची कोशिंबीर असते. वड्यांचा तळून लाल आणि खरपूस झालेला पृष्ठभाग दाढेखालून जिभेच्या शेंड्याकडे जाताना एक अननुभूत सुखाची चव देतो!साबुदाणा पचायला जड असतो म्हणून मुद्दाम उपवासात वापरत असले पाहिजेत. टॅपिओका कंदापासून साबुदाणा तयार करतात. केरळमध्ये घराघरात हे कंद साठवलेले असतात.

साबुदाणा सेविल्यामुळे लवकर भूक लागत नाही, म्हणून उपवासाला त्याची खिचडी आवर्जून करतात. एकादशीला भगर खातात. भगर हे भरड धान्य आहे. अलीकडे त्याचे महत्त्व वाढले आहे. सगळ्यात मला आवडतात राजगिऱ्याचे पदार्थ. त्याची छान खीर होते. शिरा होतो आणि दशम्याही होतात.

rain
PM Modi Pune Visit : मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात ट्रॅफिक जाम? टेन्शन घेऊ नका 'हे' आहेत पर्यायी मार्ग

राजगिऱ्याचे महत्त्व सांगताना डॉ. कमला सोहनींनी राजगिऱ्यात इतर धान्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात प्रथिने, मेद, क्षार, चुना आणि स्फुरद यांचे प्रमाण अधिक कसे असते, याचा तक्ताच दिला आहे. त्यामुळे केवळ उपवासाला नाही तर एरवीही राजगिरा विपुल प्रमाणात आहारात वापरायला हवा.काही जण पावसाळ्याला स्वतंत्र ऋतूच मानत नाहीत.

आपले मॉन्सूनसाहेब विलक्षण लहरी आहेत ना. त्यामुळे त्यांच्या येण्याजाण्याचा आणि थांबण्याचा निश्‍चित काळ ठरवता येत नाही. म्हणून पावसाळ्यात थंडीच असते. उन्हाळ्यात गोड पदार्थ खावे वाटतात. तसे पावसाळ्यात उष्ण आणि तिखट पदार्थ खावे वाटते. तिखट म्हणजेही पुन्हा उष्णता निर्माण करणारे. म्हणून पावसाळ्यात चहा पिण्याचा आनंद काही औरच असतो.

चहा मात्र आले ऊर्फ अद्रक टाकलेलाच हवा. खिडकीजवळ उभे राहून पावसाकडे पाहत चहाचा एकेक घोट घ्यायचा. चहा कपात घेण्याऐवजी काचेच्या पेल्यात घ्या. दोन्ही हातात धरूनसुद्धा त्याचा गरम स्पर्श अनुभवता येतो. स्पर्श संवेदना बोटात एकवटा आणि डोळे भरून ढगांच्या हालचाली पाहा.

गडद निळे, गडद निळे, जलद भरून आले

शितल तनू चपलचरण अनिलगण निघाले...

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध; सगळ्या ज्ञानेंद्रियांना सुखावतो हा पावसाळा. आपण त्याला पावसाळी खादाडीची जोड द्यायची, गरमागरम पुरणाच्या पोळीबरोबर जिभेला चटका देणारी कटाची आमटी किंवा ताकाची कढी प्यायची. पावसात भिजणं सोपं असतं. खाण्याचा, चवींचा उत्सव साजरा करीत आपलं अंतरंगही भिजवता आलं पाहिजे.

श्रावणझड बाहेरी, अंतरी मी भिजलेला...

पाऊस आला म्हणजे दारं खिडक्या बंद करू नका. आधी अंगणात गाऱ्यागाऱ्या भिंगोऱ्या करा आणि मग स्कूटर किंवा मोटरसायकल काढून भिजत भिजत मक्याची कणसं आणि भजी खायला बाहेर पडा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com