साप्ताहिक सकाळ संपादकीय : हत्तीबाळाची गोष्ट!

अन्नमलाई व्याघ्रप्रकल्पातील भरकटलेल्या हत्तीबाळाला पुन्हा त्याच्या आईच्या कुशीत विसावता यावे यासाठी लाखमोलाची धडपड करणाऱ्या वनरक्षकांना सलाम
Elephant
ElephantSakal

नववर्षाची सुरुवात होत असताना समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका चित्रफितीने जगभरातल्या असंख्यांची ह्रदये जिंकली आहेत.

आईच्या कुशीत लेकराला किती सुरक्षित वाटते, आणि ढुश्या देत आपल्या कुशीत शिरणाऱ्या लेकरावरची आईची माया तिच्या अगदी छोट्याशा, सहज घडणाऱ्या हालचालींमधून कशी प्रकटते ते या छोट्याशा चित्रफितीतून सहज दिसते.

ही चित्रफित पाहणाऱ्या जगभरातल्या असंख्यांना भावुक केले ते कळपाबरोबरच्या पुढच्या भ्रमंतीला निघण्यापूर्वी पहुडलेल्या हत्तीआईच्या आश्वासक कुशीत स्वतःला गुरफटून घेण्याऱ्या हत्तीबाळाच्या निरागसतेने.

तमिळनाडूल्या अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात गेल्या आठवड्यात घडलेल्या एका ताटातुटीची आणि त्यानंतरच्या मिलनाची ही सुखद कहाणी.

काही काळ वनरक्षकांच्या जिवाला घोर लावणारी, पण त्यांनीच कौशल्याने हाताळलेली! कळपापासून तुटून मागे राहिलेल्या हत्तीबाळाला त्याच्या आईपर्यंत पोचवण्यासाठी तातडीने हालचाली करणाऱ्या वनरक्षकांच्या धडपडीला मिळालेले कदाचित हे सर्वोत्तम पारितोषिक असावे.

गोष्ट सुरुवातीपासूनच सांगायची तर पंधरा दिवसांपूर्वी वनरक्षकांना हत्तीचे जेमतेम चार ते पाच महिन्यांचे हे पिल्लू एकटेच भटकताना आढळले. पिल्लू दिसले तेव्हा बहुधा ते कळपापासून भरकटल्याला एक दिवस उलटून गेला असावा.

हरवल्याच्या जाणिवेचा पिल्लावरचा ताण स्पष्ट दिसत होता. हरवण्याच्या आधी त्याच्या पोटात काही गेले होते की नाही ते कळायला काही मार्ग नव्हता, म्हणूनच त्याच्या कळपाला शोधून पिल्लाला त्याच्या आईच्या-मावश्यांच्या हवाली करण्याची तातडी होती.

कळपातले एखादे पिलू भरकटले तर सर्वसाधारण परिस्थितीत त्याला हुडकल्याशिवाय कळप पुढे जात नाही.

काहीवेळा कळपातलेच काही हत्ती पिल्लाला शोधण्यासाठी मागे रेंगाळतात आणि बाकीचे हत्ती पुढे सरकतात, असा आधीचा अनुभव.

पण इथे जवळपास हत्तींचा मागमूसही नव्हता. ड्रोन वापरून त्या घनदाट अरण्यावर नजर टाकली तेव्हा अडीचएक मैलांवर हत्तींचा एक कळप आढळला.

मग हरवलेले हत्तीबाळ याच कळपातले होते याचीही वनरक्षकांनी खात्री करून घेतली.

भरकटून गेल्यावर माणसाच्या सहवासात राहिलेल्या पिल्लांना हत्ती किंवा अन्य काही प्राणी सहजपणे स्वीकारत नाहीत, असा अनुभव असल्याने या पिल्लाला त्याच्या आईकडे पोचविण्याआधी काही काळजी घ्यायला हवी होती.

पिल्लाच्या अंगावर रेंगाळणारा माणसाचा वास धुऊन टाकण्यासाठी वनरक्षकांनी पिल्लाला नदीवर नेऊन अंघोळ घातली, मग त्याला चिखलाने माखून टाकले आणि त्याच्या कळपाच्या जवळ नेऊन सोडले.

नंतरचे काही दिवस वनरक्षक हत्तींच्या त्या कळपावर लक्ष ठेवून होते. चार दिवसांनी पिल्लू आईच्या कुशीत विसावल्याचा फोटो मिळाल्यानंतर कळपाने पिल्लाला स्वीकारल्याची खात्री झाली.

Elephant
Oscars 2023: भारताच्या पदरी 'ऑस्कर'सुख.. The Elephant Whisperers या भारतीय शॉर्ट फिल्मला ऑस्कर!!

हत्तीबाळाची कहाणी इथेच संपत नाही. काही प्राणी प्रजाती, विशेषतः हत्ती, आपल्या पिल्लांची किती आणि कशी काळजी घेतात याची असंख्य निरीक्षणे अभ्यासकांनी आणि जंगलांमध्ये भ्रमंती करणाऱ्यांनी नोंदवून ठेवली आहेत.

ही सारी माहिती पाहता हरवलेल्या पिल्लाचा कळपाने शोध का घेतला नाही, किंवा शोध घेण्याचा प्रयत्न न करता कळप का पुढे गेला हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. हे मुद्दे माणूस आणि प्राण्यांदरम्यानच्या संघर्षावरही भाष्य करतात.

कळपातले पिल्लू हरवले तर हत्ती सहसा तसे पुढे जात नाहीत, पण एखाद्या परिसरात त्यांना माणसाबरोबरच्या संघर्षाचा धोका जाणवला तर मात्र सुरक्षेला प्राधान्य देऊन ते पुढे सरकतात.

कळपाचे नेतृत्व करणाऱ्या वयस्क हत्तीणीवर कळपाची सुरक्षा आणि हरवलेले पिल्लू यातून एकाची निवड करण्याची वेळ येते, असे मत वाइल्डलाइफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे या घटनेसंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे.

ज्या भागात ही घटना घडली त्या केरळ आणि तमिळनाडूदरम्यान पसरलेल्या अरण्याच्या पट्ट्यात अन्नपाण्याच्या शोधार्थ हत्तींचे स्थलांतर होत असते.

अनेकविध कारणांमुळे आक्रसत जाणारा अधिवास आणि अन्नपाण्याच्या तुटवड्यामुळे देशाच्या अनेक भागांत गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या हत्तींच्या स्थलांतराने माणूस आणि वन्यप्राण्यांमधील संघर्षाला आणखी एक नवे वळण दिले आहे.

Elephant
World Elephant Day 2023 : हत्तीची त्वचा असते इतकी जाड, या प्राण्याच्या खास गोष्टी नक्कीच जाणून घ्या

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या काही भागांत आणि विदर्भाच्याही काही भागांत २००२पासून हत्तींचा वावर आहे.

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात झालेली रानटी हत्तींची ही पहिली नोंद. उत्तराखंडात २०२०मध्ये झालेल्या एका अभ्यासात हिमालायाच्या पायथ्यापाशी असणारे हत्ती आणखी उंचीवर गेल्याचे लक्षात आले होते.

जगभरात अशा घटना नोंदल्या गेल्या आहेत. अडीचएक वर्षांपूर्वी म्यानमार, लाओस आणि चीनच्या सीमा जिथे मिळतात त्या प्रदेशातल्या अत्यंत घनदाट वर्षावनातून हत्तींच्या एका कळपाने थेट उत्तरेकडे प्रस्थान ठेवले होते.

(‘हत्तींचे उत्तरायण’ ः सकाळ साप्ताहिक –प्रसिद्धी ः २१ ऑगस्ट २०२१) युनानच्या हत्तींच्या या काहीशा गोंधळून टाकणाऱ्या प्रवासामागेही खाण्याचा शोध तसेच दुष्काळाबरोबरच वृक्षतोड आणि शेतीचा विस्तारामुळे होणारी अरण्याची हानी अशीही कारणं असावीत असे संशोधकांना वाटते आहे.

हत्तींचा आक्रसता अधिवास आणि बरोबरीने आक्रसणारे त्यांच्या येण्या-जाण्याचे मार्ग यांकडेही हत्ती अभ्यासक लक्ष वेधतात.

या पार्श्वभूमीवर, अन्नमलाई व्याघ्रप्रकल्पातील भरकटलेल्या हत्तीबाळाला पुन्हा त्याच्या आईच्या कुशीत विसावता यावे यासाठी लाखमोलाची धडपड करणाऱ्या वनरक्षकांना सलाम करतानाच;

त्या भरकटण्याने अगदी आपल्या परसापासून ते जगभरात अनेक ठिकाणी आता ताणल्या जात असलेल्या माणूस आणि वन्यप्राण्यांमधल्या नात्याचा काही संदर्भ पुन्हा अधोरेखित केला आहे का, हे नव्याने समजावून घ्यायला हवे.

-------------------

Elephant
Elephant Rescued Video: शेततळ्यात अडकलं हत्तीचं पिल्लू, बचावकार्य पूर्ण होताच...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com