Share Market : बाजार वर जाऊनही मला तोटा का होतो?

नुसते बाजारावर वेडे प्रेम असून चालत नाही, सुनीताबाईंसारखे त्यालाही कोणीतरी शिस्तीत बांधावे लागते. तरच ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे म्हणण्याऐवजी ‘आहे मनोहर आणि गमतो उल्हास’, असे म्हणता येईल..
Share market
Share marketEsakal

भूषण महाजन

आ हे मनोहर तरी हे पुलंवरचे पुस्तक सुनीताबाई देशपांडे ह्यांनी लिहून प्रसिद्ध केले. पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व! कलेच्या अनेक क्षेत्रांत लीलया संचार करणारा हा माणूस चार भिंतींच्या आत तुमच्याआमच्यासारखाच आहे, एक टिपिकल नवरा आहे – किंवा कुठलाही माणूस, नवरा तसाच असतो- हे काहीसे कटू सत्य या पुस्तकामुळे वाचकांपर्यंत पोहोचले.

त्यात लक्षात राहिला, तो सुनीताबाईंनी पुलंच्या आयुष्यात आणलेला व्यवहारीपणा, शिस्त आणि त्यामुळे पुलंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात पडलेला फरक. भारतीय शेअर बाजारही आज संपूर्ण देशाचा लाडका.

आठ वर्षे चालू असलेल्या तेजीमुळे अक्षरश: कोट्यवधी हृदयांची धडकन! तरीही बाजार वर जाऊनही मला तोटा का होतो अशी तक्रार ऐकताना असे लक्षात येते, की नुसते बाजारावर वेडे प्रेम असून चालत नाही, सुनीताबाईंसारखे त्यालाही कोणीतरी शिस्तीत बांधावे लागते. तरच ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे म्हणण्याऐवजी ‘आहे मनोहर आणि गमतो उल्हास’, असे म्हणता येईल.

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला वायद्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराने मोठी कोलांटउडी मारत तेजीच्या तोंडाला फेस आणला. आधीच तज्ज्ञांच्या इशाऱ्यांनी अर्धमेल्या झालेल्या काठावरच्या गुंतवणूकदाराला कधी एकदा हातातले शेअर विकून अंघोळ करतो, असे झाले असेल. २२२००च्या वर गेलेली निफ्टी तीनशे अंशांनी तर ७३ हजार पार गेलेला सेन्सेक्स ७९० अंशांनी कोसळला.

हात लावीन तिथे फक्त वेदना असाव्या तसे वाढलेल्या व घसरलेल्या शेअरचे प्रमाण एकास सहा होते. एक दिवस थांबून बघू म्हणणारे दुसऱ्या दिवशी परदेशी संस्थांनी केलेली ३५०० कोटींची खरेदी पाहून चकितच झाले आणि त्यावर कळस म्हणजे सर्व मरगळ झटकून टाकत १ मार्च रोजी शेअर बाजार नवा सार्वकालीन उच्चांक नोंदवून मोकळा झाला.

डिसेंबर तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्न ८.४ टक्के दराने वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केले खरे, पण परदेशी तज्ज्ञांनी त्याला दुजोरा देताच स्थानिक गुंतवणूकदारांना स्फुरण चढले.

मुडीज या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर वाढवला. परिणामतः शनिवारच्या (ता. २ मार्च) खास सत्रात व पाठोपाठ सोमवारी (ता. ४ मार्च) बाजार तेजीतच बंद झाला.

अशा या आशा निराशेच्या हिंदोळ्यावर बाजार हेलकावे खात राहणार, असे गृहीत धरून आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू.

शेअर बाजार खाली येताना आपण नर्व्हस का होतो? आणि मग शेअर घेतल्यावर दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत असूनदेखील माझी झोळी रिकामीच का राहते? कारण एकच, शेअर बाजाराच्या ‘मूड’प्रमाणे आपण बदलायला तयार नाही हेच!

केवळ स्वस्त आहे म्हणून मंदीतला शेअर घेताना; संपूर्ण चक्र फिरून बाजाराचा मूड बदलेपर्यंत तो शेअर सांभाळण्याचा संयम आपल्याकडे आहे का, याचा विचार करायला हवा.

एप्रिल २०२२मध्ये कुठल्याशा वृत्तवाहिनीवर ६०० रुपयांना विप्रोचा शेअर विकत घेण्याची शिफारस आली. ती शिफारस डे ट्रेडची होती, की डिलिव्हरीची याचा विचार न करता त्यात उडी मारलेले गुंतवणूकदार रोजच डोक्याला हात लाऊन बसत असत.

आमचा त्यांना एकच सल्ला होता, की हा शेअर वाईट नाही. मोठी संपत्ती येथेही निर्माण होईल, पण हे संपूर्ण क्षेत्र पुन्हा रंगात येईपर्यंत हा शेअर सांभाळावा लागेल. एक तर आज तोटा नोंदवा व पुन्हा ₹ १००/ २०० खाली विकत घ्या, किंवा प्रत्येक १०० रुपयांच्या फरकाने घसरणीत घेत राहा, दोन तीन वर्षांत सहीसलामत नफ्यात बाहेर पडाल.

(विप्रो खाली येत येत चक्क ३५० रुपयापर्यंत आला, तोपर्यंत त्या गुंतवणूकदारांचा विश्वामित्र झाला होता व त्यांनी तोटा खिशात टाकला होता) निर्णय योग्यवेळीच घ्यावा लागतो. पण हे तो चुकल्यावरच कळते. असो. आज विप्रोचा ₹ ५२० भाव पाहून त्यांची आठवण झाली इतकेच!

या उलट, स्वतःची मानसिकता शेअर बरेच वर्ष सांभाळण्याची असताना; वारेमाप तेजीत असलेला शेअर अल्पकाळासाठी हिंमत करून खरेदी करताना तो सतत एकसारखा वर जाणार नाही, किंबहुना आपण घेतल्यावर तो खाली येण्याचीच शक्यता जास्त, हा विचार खरेदीआधी आपण करतो का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. नव्वदीच्या पुढच्या आजोबांनी ट्रकांच्या वर्दळीच्या रस्त्यावरूनच फिरायला जाण्याचा हट्टच का करावा? घरातल्या घरात बागेत फिरले तरी चालते. असो.

सोमवारी निफ्टी, सेन्सेक्स तर तेजीत होतेच; पण त्याबरोबर ग्राहपयोगी टिकाऊ वस्तूंचा निर्देशांक, झालाच तर इन्फ्रा, पीएसई , निफ्टी २०० अल्फा, ऑइल आणि गॅस, एनर्जी हे सारेच निर्देशांक वाढले.

निफ्टीला हे बळ मिळत असताना मात्र वाढलेल्या व घसरलेल्या शेअरचे प्रमाण (अॅडव्हान्स /डिक्लाइन रेशो) दोनास तीन असे व्यस्त होते. तात्पर्य असे, की आतल्याआत मिड व स्मॉल कॅपची विक्री चालू होती. आपले धोरण सोपे आहे. वारंवार सांगूनही पुन्हा उद्‍धृत करतो -

‘ड’ दर्जाचे शेअर कितीही आकर्षक वाटले तरी दूर लोटावे. चालू भावापासून किमान ३० ते ४० टक्के खाली आल्यास विचार करू असे टीपस्टरला सांगावे.

खरेदी करताना स्टॉप लॉसची शिस्त अत्यावश्यक आहे. तसेच विक्री केल्यावरदेखील शेअर खाली येत नसेल, आपला अंदाज चुकत असेल तर आठवडाभर /महिनाभर आढावा घेऊन पुन्हा वरच्या किमतीला खरेदी करण्याचे धैर्य दाखवावे.

शक्यतो लार्ज कॅपचा (किंवा वयात आलेले, मोठे झालेले मिड कॅपचा) अभ्यास व विचार करावा.

फिक्स्ड इन्कम योजनांचा आढावा घ्यावा. त्यातही दीर्घ मुदतीचे गिल्ट किंवा गिल्ट फंड आकर्षक आहेत, त्याचा व्याजदर कमी होण्यास उशीर लागू शकेल कदाचित, पण ते येथून वाढणार तरी नक्की नाहीत, असा अंदाज आहे. तसे झाल्यास कॉर्पोरेट बॉण्ड फंड चांगला परतावा देऊ शकतात.

पुढील दोन तीन वर्षांत काही अघटित घडले नाही, तर मधले स्पीडब्रेकर वगळता शेअर बाजार वरच जाणार आहे. वरीलपैकी काहीही करायचे नसेल तर स्वस्थ बसावे. रोजरोज बाजारभाव बघू नये. किंवा बदल म्हणून मराठी मालिका बघाव्यात.

Share market
SIP : नवीन वर्षात गुंतवणूक करू इच्छिता?

इतक्या सगळ्या धोक्याच्या सूचना देऊनदेखील ज्यांचे मन शेअर बाजाराकडेच धावते, त्यांना अभ्यासासाठी एक शेअर सुचवतो. तो आहे जिलेट. अतिशय संयम ठेवून भांडारात जमा करावा असा हा महाग शेअर आहे.

किंमत मिळकत गुणोत्तर इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीसतोड ५४ आहे. पी अॅण्ड जी समूहाची ही कंपनी पुरुष व स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारी ‘ग्रूमिंग’ उत्पादने तयार करते. त्यात जिलेटची सँडविच ब्लेड, ओरल इलेक्ट्रिक टूथ ब्रश आदि नाममुद्रा लोकप्रिय आहेत. सचिन या ब्रॅण्डला विश्वासार्हता देतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी दहा टक्क्यांनी नफा वाढत आहे. लिव्हरच्या तुलनेत भांडवलावरचा उतारा अधिक आकर्षक आहे. आजकाल सिनेस्टार, क्रिकेटर व एकूणच तरुणाई ‘दाढी’ राखते/ ठेवते. त्यातून रोज चकचकीत दाढी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून कंपनीने ‘ट्रीमर’ नावाचे उत्पादन आणले आहे.

त्याचा खप चांगला आहे. गेल्या बारा महिन्यात ₹ २,५५० कोटींच्या विक्रीवर ₹ ५७० कोटी ढोबळ व ₹ ३९१ कोटी निव्वळ नफा झाला आहे. फॅशन बदलते, मूड बदलतात. पुढे एखादा चिकना हिरो लोकप्रिय झाल्यास तरुण पुन्हा आळस झटकून चकचकीत दाढी करायला लागतील.

तसे होवो अथवा न होवो, चालू नफ्यात अशीच वाढ चालू राहिली तर शेअरचे भवितव्य चांगले असेल. गेल्या ५२ सप्ताहाचा उच्चतम भाव ₹ ७,३३५ व खालचा भाव ₹ ४,१३५ आहे. आज ६५०० रुपयांना मिळतो.

शेअर बाजार जरी नवनवे उच्चांक करत असला तरी आम्ही सावधच राहणे पसंत करतो!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com