तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी 'सेटिंग' मध्ये करा हे बदल

smartphone
smartphone esakal

प्रा. डॉ. प्रमोद दामले

स्मार्टफोन नावाचं एखाद्या मोठ्या संगणकाएवढं शक्तीशाली उपकरण अक्षरश: आपल्या मुठीत आलंय. त्याचा वापर सावधपणे करायला हवा, अन्यथा दुर्दैवानं एखादा फटका बसतो. हे टाळण्यासाठी काय बंदोबस्त करता येईल? B.A.N.D.O.B.A.S.T. ही एकेक अक्षरं घेऊनच हा बंदोबस्त समजून घेऊया.

आजकाल स्मार्टफोनशिवाय आपलं पान हलत नाही. कुणाशी बोलणं असो वा निरोप धाडणं. सेल्फी असो वा साधा फोटो; बँकिंग वा ऑनलाइन खरेदी; वीजबिल वा भाजीचे पैसे देणं, प्रवासाचं बुकिंग वा फोनचा रिचार्ज ... अनेक कामांसाठी आपण तो सतत वापरतो. वापरणार्‍याच्या निष्काळजीपणाचा फायदा उठवत हॅकरनं त्या फोनद्वारे भलतेसलते प्रकार केल्याचं कधीकधी कानावर येतं. स्मार्टफोन चोरीला गेला तर हात मोडल्यासारखं सगळं अडून बसतं. स्मार्टफोन हॅक झाला किंवा चोरीला गेला तर ते निस्तरणं अत्यंत कष्टप्रद होतं. पण मुळात असं काही होऊच नये यासाठी काय करता येईल?

स्मार्टफोनचा सुरक्षित वापर आणि बंदोबस्त

स्मार्टफोनबद्दलच्या काही तक्रारी अनेकदा माझ्या कानावर येतात, तुम्हीदेखील त्या ऐकल्या असतील. त्यातल्या काही आता पाहूया. प्रत्येक तक्रारीपुढे कंसात दिलेल्या मुद्द्यावर थो ऽऽडा विचार करूया.

“आज ऑफिसला येताना मोबाईल हरवलाय, संध्याकाळी घरी जाताना पोलिस कंप्लेंट करतो.”

(तक्रार करायला काही तासांचा उशीर झाला, तर ते किती महागात पडू शकेल?)

“फोनचं नेमकं काय बिनसलंय कळत नाही. काहीतरी विचित्र रिस्पॉन्स येतायत.”

(फोनवरची सगळी अ‍ॅप आणि त्यांची सेटींग यावर आपण कधी बारकाईनं नजर टाकलीय?)

“माझी बँक पण अशी आहे ना; न मागता ओटीपी कशाला पाठवते कोण जाणे?”

(असा अनाहूत ओटीपी म्हणजे आपला फोन हॅक झाल्याच्या धोक्याची घंटा तर नाही ना?)

स्मार्टफोन म्हणजे जणू चालू जमान्यातली आखूडशिंगी, बहुदुधी गायच. पण केवळ भरपूर पैसे मोजून तो विकत घेतलाय म्हणून पुढे सगळं आपोआप सुरळीत चालू राहील? बिलकूल नाही! एखाद्या मोठ्या संगणकाएवढं शक्तीशाली उपकरण अक्षरश: आपल्या मुठीत आलंय. त्याचा वापर सावधपणे करायला हवा, अन्यथा दुर्दैवानं एखादा फटका बसतो आणि मग अचानक जाग येते. त्यावेळी मात्र पैसा, गैरसोय, मनस्ताप अशा स्वरूपात मोठा भुर्दंड सोसावा लागतो.

smartphone
Smartphone Tips : स्मार्टफोन हाताळताना या चूका कधीच करू नका, लाखोंचा गंडा बसेल!

हे टाळण्यासाठी काय बंदोबस्त करता येईल? B.A.N.D.O.B.A.S.T. ही एकेक अक्षरं घेऊनच हा बंदोबस्त समजून घेऊया.

B for Backup -बॅकअप म्हणजे आपल्या फोनवरचे फोटो, व्हिडिओ, फोन नंबर, तसेच इमेल, व्हॉट्सअॅप किंवा अन्य मार्गाने आलेले व पाठवलेले संदेश वगैरे सार्‍या माहितीची (म्हणजे डेटाची) एक कॉपी आपल्या पेनड्राइव्ह वा लॅपटॉपवर काढून ठेवणे किंवा वन-ड्राईव्ह, ड्रॉप-बॉक्स, गुगल-ड्राईव्ह अशा क्लाऊड सर्व्हिस वापरून इंटरनेटवर ती कॉपी ठेवणे. फोनची चोरी किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे हा डेटा जर आपल्या हातातून गायब झाला तर बॅकअप वापरून तो सारा डेटा पुन्हा फोनवर घेता येईल. आवर्जून लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपला डेटा इतका व्यक्तिगत असतो, की तो गहाळ झाला तर कितीही पैसा खर्चून वा उच्च तंत्रज्ञान वापरूनही पुन्हा मिळवता येईलच असं नाही, आपण वेळीच घेऊन ठेवलेला बॅकअप हाच त्यावर एकमेव तोडगा होय.

A for Anti-Virus -अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या फोनचा व्हायरसपासून बचाव करायला उपयुक्त आहे. व्हायरस अथवा मालवेअर हे सॉफ्टवेअर विधायक नव्हे तर विघातक कामासाठी तयार केलेलं असतं आणि न मागता ते उपटसुंभासारखं आपल्या फोनवर किंवा संगणकावर येऊ शकतं. एके काळी हा त्रास फक्त कॉम्प्युटरपुरता होता, पण आता ते लोण फोनपर्यंत येऊन पोहोचलंय. मग फाइल डिलीट होणं, माहितीची चोरी व त्याद्वारे ऑनलाइन बँकिंग वापरून अफरातफर अशी डोकेदुखी संभवते. याचा प्रतिबंध करण्यासाठी एखादं अँटी-व्हायरस आपल्या फोनवर असणं जरुरीचं आहे.

N for Network -आपल्याला फोनवर बोलण्यासाठी व काही मर्यादेत इंटरनेटचा वापर करण्यासाठी टेलिफोन सेवा देणार्‍या कंपन्या जे 3G/ 4G/ 5G नेटवर्क देतात ते पहिल्या प्रकारचं नेटवर्क. त्या नेटवर्कचे धोके तुलनेने कमी आहेत. पण अत्यंत जलद व त्यामुळेच लोकप्रिय असणारं वाय-फाय हे दुसर्‍या प्रकारचं नेटवर्क तितकंसं सुरक्षित नाही, कारण तिथं एकाहून अधिक फोन वा कॉम्प्युटर जोडलेले असू शकतात. त्यातही, घरातलं किंवा ऑफिसमधलं वाय-फाय ठीक आहे, पण रेल्वे-स्टेशन, विमानतळ, हॉटेल, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी दिली जाणारी हॉटस्पॉट सेवा मात्र खूप जोखमीची असते. शक्यतो अशी सेवा अत्यावश्यक कारणापुरतीच वापरावी.

D for Defence-in-Depth -सुरक्षेचं हे तत्त्व म्हणजे कोणत्याही एकाच उपायावर अवलंबून न राहता अनेक उपाय अमलात आणणे, जेणेकरून एक उपाय थकला तर दुसरा कामी येईल. तो बारगळला तर तिसरा असावा, तोही निष्प्रभ झाला तर चौथा वगैरे. स्मार्टफोन सुरक्षेसाठी हा ‘एक से भले दो’ न्याय लावून याआधीचे तीन मुद्दे पुन्हा एकवार पाहूया. सार्वजनिक ठिकाणचं नेटवर्क टाळलं की फोनमध्ये मालवेअरचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. त्यातून मालवेअरचा शिरकाव झालाच तर अँटी-व्हायरस कामी येईल. तेही निरुपयोगी ठरलं आणि त्यामुळे काही फाइल गायब झाल्या तर बॅकअप वापरून त्या पुनरुज्जीवित करणं शक्य आहे. बहुविध उपायांऐवजी एकावरच विसंबून राहिलं तर मात्र मोठा फटका संभवतो.

O for O.T.P. -ओटीपी म्हणजे एकदाच वापरण्याचा पासवर्ड. बँकांनी आपल्या ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी ओटीपी सुरू केला. आता त्या संकल्पनेचा वापर अनेक कंपन्या व काही सरकारी खातीही करतात. आपण जेव्हा काही संकेतस्थळांवर म्हणजे वेबसाइट वर जातो तेव्हा ती संकेतस्थळं आपल्या फोनवर एक ४ ते ६ आकडी संख्या पाठवतात. मग आपण ती संख्या त्या संकेतस्थळावर टाइप करायची व त्यांच्याकडे रजिस्टर केलेला फोन आपल्या हाती आहे याची आणि पर्यायानं आपल्या ओळखीची खातरजमा करून द्यायची. तोतयेगिरी टाळण्यासाठी पासवर्ड आहेच. त्याशिवाय अजून एक उपाय म्हणून ह्या ओटीपीकडे पाहिलं जातं. असा ओटीपी तोंडी वा लेखी स्वरूपात कुणालाही देऊ नये, केवळ संबंधित संकेतस्थळावर टाइप करावा. हॅकरकडून होणारी ओटीपीची चोरी टाळण्यासाठी आपण काही मुद्दे नीट हाताळायला हवेत, त्यात नेटवर्कसारखे याआधी पाहिलेले मुद्दे आहेत आणि अ‍ॅप व सेटिंग असे काही मुद्दे आपण पुढे पाहणार आहोत.

smartphone
Smartphone : स्मार्टफोन जवळ घेऊन झोपणे असुरक्षित

B for Blue Tooth -ब्लू टूथ या तंत्रज्ञानानं दोन स्मार्टफोन वा संगणक केबलनं एकमेकांना न जोडता, केवळ एकमेकांच्या जवळ ठेवून माहितीची देवाण-घेवाण करता येते. दहा मीटरपर्यंत कार्यकक्षा असणारं हे तंत्रज्ञान केवळ आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये वापरावं. त्याची गरज पडेल तेव्हा तेवढ्यापुरतं ते एनेबल करावं, वापरावं आणि नंतर लगेच डिसेबल करून टाकावं. रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास आजूबाजूच्या २५-३० फुटांमधलं कुणीतरी आपल्या फोनमध्ये ढवळाढवळ करू शकेल.

A for Apps - अ‍ॅप अथवा अ‍ॅप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअरचाच एक नवीन प्रकार. बहुपयोगी व आकर्षक अ‍ॅप सध्या उदंड आहेत. पण एखादं अ‍ॅप ज्या कामासाठी तयार केलंय अशी त्याची जाहिरात केली जाते, त्याखेरीज ते ॲप अन्य काही उचापती तर करत नाही ना, हे कळणं दुरापास्त आहे. भलतीच अ‍ॅप वापरल्यानं डेटा चोरी किंवा आर्थिक तोटा होऊ शकतो. कोणतंही अ‍ॅप घेण्यापूर्वी त्याची खरंच गरज आहे का ते पाहावं आणि घ्यायचं ठरलं तर अ‍ॅपल, गुगल या नामांकित कंपन्यांच्या अधिकृत स्टोअरवरूनच ते अ‍ॅप डाऊनलोड करावं. अनोळखी ठिकाणाहून आलेल्या ईमेलमधली किंवा व्हॉट्सॲपमधली लिंक वापरून अ‍ॅप डाऊनलोड करू नयेत.

S for Settings -टीव्हीचं चॅनल बदलण्याचं काम जसं आपण रिमोट कंट्रोल युनिटवरची बटणं दाबून करतो, तसं स्मार्टफोनवरचे विविध मेनू व ऑप्शन्स वापरून आपण त्या फोनच्या कार्यप्रणालीत छोटेमोठे बदल करू शकतो. यालाच फोनची सेटिंग बदलणे म्हणतात. नवीन फोन घेताना जी सेटिंग असतात ती बर्‍याचदा सुरक्षेपेक्षा सोयीला प्राधान्य देऊन केली जातात. सुरक्षेसाठी काही सेटिंग आपण लक्षपूर्वक करायला हवीत. उदंड संख्येनं अ‍ॅप असल्यानं व त्या प्रत्येकाची खूप सेटिंग असल्यानं, तसेच अशा अ‍ॅपच्या सुधारित आवृत्त्या वरचेवर येत असल्यानं सार्‍या सेटिंगची चर्चा इथं करता येणं अशक्य आहे. व्हॉट्सअ‍ॅप या एकाच अ‍ॅपचं फक्त एकच सिक्युरिटी सेटिंग आपण बारकाईनं पाहूया. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमधले मेनू अशा क्रमानं वापरता येतील: (१) सेटिंग, (२) अकाऊंट व (३) टू स्टेप ऑथेंटीकेशन. या तीन मेन्यूतून पुढे गेल्यावर ‘एनेबल’ हा पर्याय घेतला की पिन सेट करण्याची सूचना येईल. तिथे आपल्या पसंतीचा नंबर दिला की त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना अधूनमधून त्या पिनची विचारणा होईल. आपल्याला तो पिन माहीत असल्यानं आपण तो नंबर टाइप करून पुढं जाऊ. पण फोन चोरीला गेला तर चोराला हा पिन माहीत नसल्यानं आपले व्हॉट्सअ‍ॅपवरचे संदेश चोराच्या हाती लागण्याची शक्यता कमी होईल.

महत्त्वाच्या अशा काही सेटिंगची माहिती करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. इंटरनेटवर जरा शोध घेऊन, फोनच्या मजबुतीसाठी योग्य त्या टीप मिळवायला हव्या. त्यानुसार फोनवरचे मेनू हुडकून, त्यातील ऑप्शन निवडायला हवेत. थोडक्यात केवळ काही बटणं दाबून, सूचना टाइप करत, आपण स्वतःच फोनची सुरक्षा भक्कम करायला हवी. गरज पडेल तिथं त्यासाठी जाणकार परिचिताची मदत अवश्य घ्यावी; मात्र त्यासाठी मोबाईल दुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञाकडे जायची तशी गरज असतेच असं नाही.

T for Time -आपल्या आत्तापर्यंतच्या चर्चेवरून स्मार्टफोन सुरक्षा या विषयाची व्याप्ती, खोली आणि गांभीर्य लक्षात येईल. त्यात पुन्हा हे वारंवार बदलणारं, झपाट्यानं पुढं जाणारं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे एखाद्या माहीतगार माणसाच्या मदतीनं सगळे नवनवीन बदल आत्मसात करावेत, संबंधित वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवावी. मुख्य म्हणजे स्वतःच्या तब्येतीसाठी थोडा वेळ काढून आहार, व्यायाम वगैरे गोष्टी जशा आपण कटाक्षानं पाळतो तसंच मोबाईलच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. बहुविध कामं बसल्याजागी चुटकीसरशी करून देणारं हे यंत्र आपला केवढा वेळ वाचवतं! मग त्याच्या सुरक्षित वापराच्या खुबी जाणून घेण्यासाठी आठवड्यातून निदान पंधरा मिनिटं तरी काढायला नकोत का?

smartphone
Cyber Security: ‘ओटीपी’च्या संगे, ‘पासवर्ड’ भंगे, धोका हा तरंगे, इंटरनेटी..!!

स्मार्टफोन चोरी आणि संबंधित उपाययोजना

स्मार्टफोन चोरीला जाणं किंवा हरवणं यासारखा दुसरा मनस्ताप नसेल. परीकथेतल्या राक्षसाचा प्राण जसा पोपटात असतो, तसा आपला जीव त्या मोबाईलमध्ये अडकलेला असतो! त्याच्याविना आपलं पदोपदी अडून बसतं आणि त्याचा गैरवापर झाला तर आर्थिक नुकसान, गुप्त माहितीचा बभ्रा, अत्यंत खासगी फोटो नको त्या हातात पडल्यानं उद्‌भवणारे अनावस्था प्रसंग, प्रसंगी ब्लॅकमेल असे त्रास संभवतात. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक वॉलेट, बँकिंग, ऑनलाइन खरेदी अशा अनेक सुविधा ठप्प झाल्यानं काही काळ खूप गैरसोय होते. त्या सुविधा देणार्‍या कंपन्यांना फोन हरवल्याचं कळवणं (आणि फोन हाती पडल्यावर त्या सुविधा पुन:प्रस्थापित करणं), पोलिसात जाऊन तक्रार नोंदवणं अशा अनेक उठाठेवी करणं क्रमप्राप्त होतं.

याबाबत आपण दोन प्रकारे खबरदारी घ्यायला हवी; एक भाग आहे फोन हरवण्याची वाट न पाहता तो अजून आपल्या हातात आहे तोवरच काय पूर्वतयारी करून ठेवावी त्याचा, तर दुसरा भाग अर्थातच दुर्दैवानं फोन जर गहाळ झालाच, तर त्यावेळी काय करायचं त्याचा.

पूर्वतयारीमध्ये महत्त्वाचे मुद्दे

फोनद्वारे आपण ज्या ज्या सुविधा घेतो त्या देणार्‍या यच्चयावत सार्‍या कंपन्यांचे फोन व ईमेल आपल्या फोनशिवाय अन्य कुठेतरी हाताशी ठेवणं, मग ते घरातल्या दुसर्‍या कुणाच्या फोनवर ठेवता येतील किंवा डायरीमध्ये लिहून हाताशी ठेवता येतील. अशा कंपन्या म्हणजे बँका, टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्या, किराणा, खाद्यपदार्थ वा भाजी घरपोच देणार्‍या कंपन्या, इलेक्ट्रॉनिक वॉलेट, प्रवासी बुकिंगच्या सेवा वगैरे

आपल्या फोनची विशिष्ट माहिती, उदा. फोनच्या हँडसेटचा IMEI नंबर (एखादा फोन नंबर डायल करावा तसं *#06# ही पाच बटणं दाबून तो IMEI फोनवर पाहता येतो) हा फोनबाहेर कुठेतरी लिहून हाताशी ठेवणं

फोन विकत घेतल्याची पावती, जी पोलिसात तक्रार करायची वेळ आली तर लागू शकते, आणि

हरवलेल्या फोनशी संबंधित काही आधुनिक सोयी (उदा. हरवलेला फोन कुठे आहे ती जागा हुडकून काढणं, हरवलेला फोन लॉक करून टाकणं, जर सापडला नाही तर त्या फोनवरची संपूर्ण माहिती डिलीट करणं, इ.) फोन हाताशी आहे तोवरच या सुविधा अॅक्टिव्हेट करून ठेवणं.

smartphone
Cyber Security : सावधान! तुम्ही हे ॲप वापरत असाल तर बँक अकाऊंटमधून पैसे होतील गायब

फोन हरवल्यानंतर करायची ठळक कामं बघूया

त्यातील सिमकार्डचा गैरवापर रोखण्यासाठी आपल्याला टेलिफोन सेवा देणारी जी कंपनी असेल, त्यांच्याशी संपर्क साधायला हवा. हरवलेल्या फोनच्या सिम (SIM) कार्डचे सर्व व्यवहार रोखण्यासाठी हे जरुरीचं आहे. फोन चोरीला गेल्यापासून ते टेलिफोन सेवा कंपनीकडे अशी तक्रार करेपर्यंत जेवढा वेळ मधे जाईल तेवढं चोरट्यांचं जास्त फावणार आहे, त्यामुळे समक्ष जाण्यापेक्षा ईमेल वा दुसरा एखादा फोन वापरून हे पाऊल यथाशीघ्र उचलावं.

आपण ज्या बँकेत व्यवहार करत असू, तिथे मोठी ठेव असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून त्या बँकेशी संपर्क साधून खात्यावरचे सर्व व्यवहार काही काळाकरिता गोठवावेत.

बँकेसारखेच अन्य महत्त्वाचे सेवा पुरवठादार असतील तर त्यांनाही याबाबत कळवावं.

पुढची पायरी म्हणजे पोलिसात तक्रार करून त्यांच्याकडून एफआयआरची प्रत घेणं. त्यासाठी पोलिसांना फोनचा IMEI नंबर, फोन विकत घेतल्याची पावती, इ. द्यावं लागेल.

एफआयआर घेतल्यावर आपण हरवलेल्या हँडसेटची नोंद ऑनलाइन देखील करू शकतो. त्यासाठी सरकारच्या दूरसंचार खात्यानं सीईआयआर (Central Equipment Identity Register) सेवेचा भाग म्हणून https://www.ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp ही लिंक उपलब्ध करून दिली आहे.

नंतर टेलिफोन सेवा कंपनीकडे एफआयआर दाखल करून त्यांच्याकडे नवीन सिम कार्डची मागणी करावी.

ते सिम कार्ड मिळाल्यावर स्थगित केलेल्या सर्व सेवा पुन:प्रस्थापित करण्यासाठी संबंधित कंपन्यांना सांगावं.

हा सगळा खटाटोप अत्यंत किचकट, तापदायक व आपल्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारा असतो. यास्तव मुळात फोन हरवूच नये म्हणून तो कधीही नजरेआड होऊ न देणं हे उत्तम!

स्मार्टफोनचं तंत्रज्ञान आधीच खूप गुंतागुंतीचं! त्यात त्याची प्रगतीही झपाट्यानं होतेय. (उदा. पूर्वी स्मार्टफोनला केवळ IMEI असायचा; आता EID नामक तत्सम प्रकार येतोय. सध्या सिमकार्ड हे एक उत्पादन (Product) म्हणून मिळतंय त्याऐवजी हँडसेटमध्येच अदृश्य म्हणावं असं ई-सिमकार्ड आता सेवा (Service) म्हणून येऊ घातलंय, वगैरे.) हे सारं पाहता ह्या संदर्भातले कित्येक मुद्दे बदलत जातील, त्यात नवीन भरही पडत जाईल. स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचा असेल तर चौकसपणे नवनवीन गोष्टी सतत शिकत राहणं जरुरीचं आहे. स्मार्टफोन सुरक्षेअभावी काय दशा होते याची अगणित उदाहरणं आपण आजूबाजूला बघत आलोय. ती दिशा टाळायची तर आयुष्यभर विद्यार्थीदशेत राहावं हे उत्तम !

फोन झाला स्मार्ट, आम्ही मात्र आर्त, हॅकर्सचे डार्ट, मर्मभेदी

त्यासाठीचे पथ्य?, डीफेन्स-इन-डेप्थ, बॅकअप अगत्य, कर्म नित्य

ओटीपी ब्लुटुथ, सेटिंग अन अ‍ॅप्स, त्याचाही अभ्यास, नैमित्तिक

फोन हरवला?, नको फक्त शोक, सिम कार्ड ब्लॉक करू आधी

तक्रार करावी, ती विना-व्यत्यय, द्या आय.एम.ई.आय, पोलिसांना

ऑनलाइन तक्रार, लिंक सी.ई.आय.आर, देई सरकार, आपुल्याला

मोबाईलवाल्या, सार्‍या सेवा रोखा, त्यासाठीच राखा, लेखा-जोखा

राहू सावधान, फोन सन्निधान, दृष्टीआड तो न करू कधी

------

smartphone
Cyber Fraud : सायबर फ्रॉड मध्ये फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे परत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com