डिसेंबर-जानेवारी दरम्यान उणे पंचवीस ते तीस अंशापर्यंत तापमान.. कुठे आहे हे ठिकाण?

आपल्याकडील जंगलात असणारे वाघ, बिबटे, हत्ती असे प्राणी इथं नसतात...
Canada
Canada esakal

डॉ. राधिका टिपरे

यावेळी कॅनडामध्ये माझं येणं नेहमीपेक्षा थोडं लवकरच झालं. कॅनडातील अल्बर्टा राज्यामधील एडमंटन शहर तसं पाहिलं तर आर्क्टिक प्रदेशाच्या काठावर वसलेलं शहर. त्यामुळे नोव्हेंबर ते मेपर्यंत हे शहर संपूर्णपणे गोठलेलं आणि गारठलेलं असतं.

डिसेंबर-जानेवारीदरम्यान तर उणे पंचवीस ते तीस अंशापर्यंत तपमान खाली उतरलेलं असतं. आपल्यासारख्यांचं या थंडीत निभणं कठीणच असल्यामुळे मुलाकडे, सारंगकडे जायचं असेल तर जून महिन्यानंतरची तारीखच ठरवावी लागते; म्हणजे इथला उन्हाळा सुरू झाल्यानंतर.

पण यावेळी मात्र थोडं लवकरच येणं झालं. पण त्यामुळे इथल्या मावळत्या हिवाळ्याचा अनुभव घेता आला.

मी पोहोचले तेव्हा रस्त्यावरील बर्फ बऱ्यापैकी वितळलं असलं तरी झाडाझुडपावरील बर्फ तसंच होतं. मुख्य म्हणजे झाडं विना हिरवाई तुरकाट्यांसारखी दिसत होती. खूप थंडी होती. बाहेरील तपमान उणे दोन-तीन अंश सेल्सिअस असायचं.

इकडे हिवाळ्यात भयानक थंडी असल्याकारणाने घरातील तपमान बाहेरील तपमानापेक्षा उबदार ठेवण्यासाठी घरात विशिष्ट प्रकारची शेगडी असते, त्याला ‘सेंट्रल हिटींग सिस्टिम’ असं म्हटलं जातं. त्याद्वारे तपमान सोळा-सतरा डिग्री इतकं ठेवलं जायचं.

खरं सांगायचं तर आपल्यासाठी तेही थोडं थंडच असतं. त्यामुळे दोन दोन स्वेटर घातले तरी ऊब यायची नाहीच. शेवटी मी खोलीत वेगळा हिटर लावून घेतला. बाहेर पडताना कपड्यांचे चार थर घालावेच लागायचे. इथं आल्या आल्या आधी गरम कपड्यांची खरेदी करावीच लागली.

Canada
भारतीय स्वयंपाक शैली आणि टर्किश शैलीमध्ये नेमके कोणते साम्य?

तसाही कॅनडा हा आकाराने प्रचंड मोठा देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे आणि उत्तर दिशेला, आर्क्टिक सर्कलला खेटून आहे. त्यामुळे हा देश तसा बारा महिने थंडच असतो.

इथला ऑटम म्हणजे पानगळीचे दिवस... त्यानंतर सहा महिने कडाक्याचा हिवाळा असतो, आणि त्यानंतर येतो तो स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतू. आणि त्यानंतर समर म्हणजे उन्हाळा!

साधारणपणे सप्टेंबर सुरू होताच थंडी आणि बोचरे वारे सुरू होतात. वृक्षराजीवरील पानांचे रंग बदलू लागतात... वृक्षांवरील हिरवाई बघता बघता लाल, केशरी किंवा पिवळ्या रंगात रंगून जाते आणि मग हळूहळू पानगळ सुरू होते.

निसर्गातील हा बदल इतका विलक्षण सुंदर असतो, की पाहताना आपण दंग होऊन जातो. पानगळीनंतर अवघी वृक्षवल्ली काष्ठवत होऊन जाते. निसर्ग राखाडी रंग लेवून अक्षरशः उघडाबोडका होऊन जातो.

डोळ्यात घालायलाही कुठे हिरवा रंग उरत नाही. दिवस लवकर मावळतो.. आकाश राखाडी रंग लेवून उदासवाणं होऊन जातं. फक्त राखी रंगाचं निसर्गचित्र आपल्या नजरेसमोर असतं... अपवाद सूचीपर्णी वृक्षांचा!

हे कोनीफेरस वृक्ष मात्र पानगळीच्या जाचातून सुटतात. पण त्यांचीही अवस्था अगदी रया गेल्यासारखी असते. त्यानंतर हिमवर्षावाला सुरुवात होते. नोव्हेंबरनंतर हळूहळू इकडील निसर्ग बर्फाची पांढरी शुभ्र चादर पांघरायला सुरुवात करतो.

बर्फाची ही चादर इतकी जाड असते, की नद्या, नाले, तलाव, डोंगर-दऱ्या आणि पर्वत सर्व काही त्याखाली झाकलं जातं. सर्वत्र शुभ्र काही जीवघेणे ते... अशी परिस्थिती असते.

त्यानंतर येणारा वसंत म्हणजे वृक्षांचं फुलून येणं... हिरवाईची उधळण... रंगांचा उत्सव...सुगंधाची पखरण!

पाश्चात्त्य जगातील सगळंच वेगळं असतं. वेगळं आणि भुरळ पाडणारं! खूप छान वाटणारं! कारण इथं जगण्यातील आनंद घेण्याला खूप महत्त्व दिलं जातं. जगण्यासाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीकडे गरज म्हणून पाहिलं जातं आणि त्यानुसार सर्व सोयी हजर केल्या जातात.

सोयी असल्या की सगळंच कसं सुखाचं आणि मजेचं होऊन जातं, याचा अनुभव मी नेहमीच कॅनडातील माझ्या एडमंटन शहरातील वास्तव्यादरम्यान घेते.

इथं मुलाच्या घरी राहताना पदोपदी त्यांच्या रोजच्या जीवनातील वेगळेपण अनुभवताना थोडं नवल वाटत राहतं. इथं आल्यावर मन काही काळासाठी रमतं, पण नंतर ‘गड्या आपुला गाव बरा...!’ असं वाटायला लागतं.

एडमंटनमध्ये हिवाळ्यातील सहा महिन्यांच्या काळात प्रचंड बर्फ असतं. पण म्हणून जीवन थांबत नाही. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीतही रोजचं जीवन नेहमीप्रमाणे चालू असतं.

मरणाच्या थंडीत सकाळी शाळेत जाणाऱ्या नातवाला, आर्यनला पाहून माझा जीव कासावीस व्हायचा... पण तो मजेत निघून जायचा.

सूनबाई मरीना तिच्या कामावर जायची. बाहेरच्या यार्डात बर्फ साठलेलं असायचं. मला मात्र थंडीमुळे फिरायला जाण्याचं धाडस व्हायचं नाही. चार-चार कपड्यांचे थर अंगावर चढवून जाण्यापेक्षा घरातच बरं वाटायचं.

Canada
Konkan Rain : कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले; आंबा-काजूवर गडद संकट, देवगड हापूस हंगामावरही परिणाम

निसर्गाशी जुळवून घेत, त्यातून आनंद मिळवीत कसं सुखी राहायचं ते कॅनडामधील लोकांकडून शिकायला हवं असं म्हणावंसं वाटतं. कारण हिवाळा आहे म्हणून इथं कुणी घरात बसत नाहीत. थोडं खडतर असतं जीवन, पण त्यासाठी प्रत्येकजण तयार असतो.

उलटपक्षी येथील लोक हिवाळ्यात जास्त वेळ घराबाहेर असतात. बर्फात खेळले जाणारे वेगवेगळे खेळ सर्व स्तरातील लोक खेळतात.

बर्फात खेळण्याचे अनेक प्रकार कॅनेडियन लोकांना ठाऊक आहेत. माझी युक्रेनियन सून आधीपासूनच स्किइंग करायची. पण आता लहानगा नातू आणि माझा मुलगा दोघेही अतिशय छान स्किइंग करायला शिकले आहेत.

नातू अजूनही स्किइंगचं प्रशिक्षण घेतोय. इकडे पोहण्याचे तलाव हे बंदिस्त आवारात असतात. पोहण्यासाठी तलावातील पाण्याचे तपमान उबदार ठेवलं जातं. शिवाय हे पाणी समुद्राच्या पाण्यासारखं सलाईन म्हणजे खारट ठेवलेलं असतं.

त्यामुळे बाहेर हिमवर्षाव होत असला तरी तुम्ही पोहण्यासाठी पाण्यात उतरू शकता. हे सर्व पाहिल्यानंतर वाटतं, इथं जीवनात लागणारी सुखं जणू हात जोडून तुमच्या समोर उभी असतात.

कॅनडातील हे जीवन आता मुलाच्या चांगलंच अंगवळणी पडलंय. विकेंडला तो आता ‘स्की पेट्रोलिंग’ करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करतो.

पर्वतशिखरांच्या ठिकाणी स्किइंग करताना अनेक लहानमोठे अपघात घडत असतात. अशा वेळी स्वयंसेवकांची गरज असते. त्यासाठी असणारा खास ट्रेनिंग कोर्स त्यानं पूर्ण केलाय.

त्याचं आणि नातवाचं स्किइंग पाहण्यासाठी मी यावं अशी त्याची फार इच्छा होती. त्यामुळे विकेंडला आम्ही सर्वांनी कॅनेडियन रॉकी माऊंटनमधील जॅस्पर या अतिशय प्रसिद्ध जागी जायचं ठरवलं.

हे ‘जॅस्पर नॅशनल पार्क’ अल्बर्टा राज्यातच असल्यामुळे फार लांब जायचं नव्हतं. पूर्वीच्या कॅनडा भेटीत रॉकीजला दोन-तीन वेळा उन्हाळ्यात भेट दिली होती.

पण यावेळी हिवाळ्यात जॅस्परला भेट देणार असल्यामुळे मी हरखून गेले होते हे सांगणे न लगे!

Canada
Goa's Haveli : २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाणारे गोव्याच्या इंडो-पोर्तुगीज हवेल्यांचे विस्मयजनक जग

या परिसराचं वर्णन कुठल्या शब्दात करावं? निसर्ग सौंदर्याचं मोजमाप करण्याचं काही परिमाण अस्तित्वात असतं तर सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं परिमाण इथल्या देखण्या निसर्गाला लावता आलं असतं.

या पर्वताशिखरांच्या दऱ्याखोऱ्यातून हिरवाईनं भरलेले सपाट प्रदेशही आहेत. तसंच वितळलेल्या बर्फाच्या पाण्यामुळे खळाळत वाहणाऱ्या अगणित नद्या आहेत... सुंदर धबधबे आहेत...

निलमण्यांगत चमचम करणारे अनेक लहान मोठ्या आकाराचे देखणे तलाव तयार झालेले आहेत. आकारातील वैविध्यामुळे उठून दिसणारी अनेक बर्फाच्छादित शिखरं आहेत.

त्या शिखरांवर गिर्यारोहण करण्यासाठी गिर्यारोहकांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात.

अनेक ग्लेशियर आहेत आणि ते पाहण्यासाठी आपण अगदी काठापर्यंत चालत जाऊ शकतो. घनदाट जंगलातून भटकंती करण्यासाठी अगणित पायवाटा म्हणजेच ट्रेल निर्माण केले आहेत.

नद्यांच्या काठावर काही जागांची निवड करून त्या ठिकाणी कँपिंगची सोय केलेली आहे. तुम्हाला जंगलात किमान पंधरा दिवस कँप करून राहता येतं.

पाणी, टॉयलेटची सोय असते. लोखंडी शेगडी असते. त्यात तुम्ही हवं तेवढं लाकूड जाळून कँप फायर करू शकता. त्याच्यावर बार्बेक्यू करू शकता. यासाठी दर दिवसाला भाडं द्यावं लागतं.

कडाक्याच्या थंडीतही दुनियाभरातील लोक इथं स्किइंग करायला येतात. त्या काळात सगळीकडे केवळ आणि केवळ पांढरंशुभ्र बर्फ असतो.

स्किइंग करण्यासाठी पर्वतांच्या उतारावरील झाडं तोडून त्याठिकाणी स्की स्लोप किंवा स्किइंगसाठीचे उतार तयार ठेवलेले असतात. हिवाळ्यामध्ये भरपूर बर्फ (स्नो) पडल्यानंतर या उतारांवर भुरभुरीत बर्फाचे थर जमा होतात.

काही दिवसांतच या भुरभुरणाऱ्या बर्फाचं घट्ट बर्फात (आइस) रूपांतर होतं. त्यानंतर या उतारावरून स्किइंग करता येतं.

त्यात अडथळे नसतील याची खबरदारी घेतलेली असते. त्यामुळे या बर्फाच्छादित उतारावरून भन्नाट वेगानं स्किइंग करत खाली येणाऱ्यांना अवर्णनीय आनंद लुटता येतो.

नद्या, तलाव पूर्णपणे गोठलेल्या असतात. या आइस झालेल्या तलावांवर आइस स्केटिंग केलं जातं. आइस हॉकी खेळली जाते.

उंच उंच पर्वतांच्या कुशीत अनेक स्की रिसॉर्ट बांधलेले आहेत. या रिसॉर्टमध्ये स्किइंगसाठी लागणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधा पुरवल्या जातात.

स्किइंगसाठी पर्वतांच्या शेंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी गंडोला किंवा रोपवे बांधलेले असतात. या गंडोलामध्ये बसून आपापले स्की पायात घालून लोक स्किइंग करण्यासाठी वर जातात आणि स्किइंग करत खाली येतात.

मात्र उंच पर्वतशिखरांच्या उतारावरून स्किइंग करण्यासाठी या खेळात अत्यंत तरबेज असणारे खेळाडूच भाग घेऊ शकतात.

Canada
Video: एकीकडे प्राणप्रतिष्ठा, तर दुसरीकडे राहुल गांधी रस्त्यावर बसून 'रघुपती राघव राजाराम' का गात आहेत?

मुलांना लहान असल्यापासूनच स्किइंगचे धडे दिले जातात. अगदी लहान मुलंसुद्धा मजेत स्किइंग करताना दिसतात. पण ती कमी उंचीवरील उतारावरून. काही झालं तरी गिर्यारोहण, स्किइंग, आइस स्केटिंग हे सर्व प्रकार म्हणजे धाडसी खेळाचेच प्रकार.

या खेळांच्या जोडीला बर्फावरून घसरत खाली येण्याचा मजेशीर खेळही खेळता येतो. कॅनेडियन रॉकीजच्या अल्बर्टा राज्यात येणाऱ्या आकारानं प्रचंड, विस्तीर्ण जंगलांची विभागणी जॅस्पर नॅशनल पार्क, बांफ नॅशनल पार्क, यो हो नॅशनल पार्क, ग्लेशियर नॅशनल पार्क, माऊंट रॅव्हेलस्टोक नॅशनल पार्क, कूटनी नॅशनल पार्क आणि वॉटरटण लेक्स नॅशनल पार्क अशी नावं असलेल्या विविध राष्ट्रीय उद्यांनांमध्ये केलेली आहे.

मात्र नावं वेगळी असली तरी जंगल मात्र जोडलेलंच आहे. जंगलाचं रूपही साधारण सर्वत्र सारखंच आहे. यापैकी जॅस्परबद्दल बोलायचं तर कॅनडातील रॉकीज पर्वतमालेतील हे सर्वात मोठं आणि जगप्रसिद्ध उद्यान आहे.

या उद्यानाची स्थापना १९०७ साली करण्यात आली. जॅस्पर हावेस यांचं नाव या जंगलाला दिलं गेलं, कारण त्याकाळात या दुर्गम भागात त्याचं दुकान असायचं. १९८४ साली या जंगलाला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला.

तत्पूर्वी हा सर्व भूप्रदेश फिट्झह्यूज या नावानं सर्वसामान्य भूप्रदेश म्हणूनच ओळखला जात होता. तसंही अवाढव्य कॅनडाची लोकसंख्या फार कमी आहे आणि त्यामुळे लोकवस्ती खूप विरळ असते. रॉकीजमध्ये आजही अतिशय कमी लोकवस्ती आहे.

एखाददुसरं कमी लोकवस्तीचं गाव अधेमधे पाहायला मिळतं. त्यांची संख्यासुद्धा फार कमी, म्हणजे अगदी बोटावर मोजण्यासारखी आहे.

त्यामुळे मैलोनमैल प्रवास केला, तरी वस्ती नजरेस पडत नाही. लांबच लांब पसरलेला गुळगुळीत रस्ता आणि दोन्ही बाजूला कधी घनदाट वृक्षराजी, तर कधी गवताळ कुरणं, तर कधी हजारो एकर पसरलेली शेती... एवढंच काय ते नजरेला सुखावत असतं.

जॅस्पर उद्यानात निसर्गसौंदर्याची लयलूट तर आहेच, पण या जंगलात वन्यजीवनही भरपूर प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे जगप्रसिद्ध ग्रिझली अस्वलांचं वास्तव्य या जंगलात आहे.

त्यांच्या जोडीला काळी अस्वलं, तपकिरी रंगांची अस्वलं, मूस हे दांडग्या आकाराचे हरिण, एल्क हरणं, साधी हरणं, जंगली बकऱ्या, पहाडावर असणाऱ्या माऊंटन गोट असं वैविध्यपूर्ण वन्यजीवन आहे. जोडीला लांडगे, कोल्हे, कायोटी, बिव्हर, साळींदर हे प्राणीही आहेत.

आपल्याकडील जंगलात असणारे वाघ, बिबटे, हत्ती असे प्राणी इथं नसतात. शिवाय विषारी किडेमकोडे, विंचू आणि साप, सरडे नसल्यामुळे बिनधास्तपणे जंगलात वावरता येतं. फक्त ग्रिझली आणि काळ्या अस्वलांपासून दूर राहावं लागतं.

Canada
Night Jungle Safari India: भारतात या ठिकाणी होते रात्रीची जंगल सफारी, एकदा तरी अनुभव घ्यावाच...

यावेळच्या भेटीमध्ये आम्ही जॅस्परमधील एका लॉजमध्ये मुक्काम केला होता. हॉटेल छानच होतं. या हॉटेलमध्ये तुमच्या खोलीत तुम्ही कुत्र्याला ठेवू शकता.

रॉजर हा मुलाचा भलदांडगा कुत्राही आमच्याबरोबर प्रवास करीत होता. त्याला बरोबर ठेवता आलं ही फार मोठी सोयीची गोष्ट होती. हॉटेलपासून काही अंतरावर अॅनेट लेक नावाचा अतिशय सुंदर तलाव होता.

पूर्ण तलाव गोठलेला होता. सभोवती पाईन वृक्षांचं घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून सुरेखशी पायवाट होती. तलावाच्या काठानं चालताना निळ्या रंगाच्या विविध छटा पाहून मन अक्षरशः वेडावून गेलं. तो अवघा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ होता.

हॉटेलपासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्की रिसॉर्टमध्ये सारंगला दोन दिवस ‘स्की पेट्रोल’ची ड्युटी करायची होती. त्यामुळे मरीना आणि आर्यनसुद्धा तिथंच स्किइंग करण्यासाठी जाणार होते.

माझ्या दृष्टीनं हे सारंकाही नवलाईचं होतं. बर्फातून चालताना पडायची भीती वाटत होती. त्यासाठी बुटावर आइस क्लीट्स (रबरी जाळी) घालायला दिली होती.

माझा कॅमेरा घेऊन मी स्की रिसॉर्टमध्ये बाहेर असलेल्या खुर्च्यांवरती बसून राहिले. माझ्यासमोर असणारं बर्फातल्या खेळाचं ते जग खूप वेगळं होतं. समोर दोन-तीन उंच बर्फाच्छादित शिखरं होती. त्यांच्या शेंड्यापर्यंत घेऊन जाणारे दोन-तीन रोप वे होते.

त्यांना लोंबकाळणाऱ्या असंख्य गंडोला खुर्च्या वर जाताना आणि खाली येताना दिसत होत्या. उतारावर प्रचंड बर्फ होतंच. अधेमधे पाईन वृक्षाची झाडीसुद्धा होती. त्यामधून स्की स्लोप होते. स्की रिसॉर्टची फी भरल्यानंतर त्याठिकाणी स्किइंग करण्यासाठी परवानगी मिळते.

ती परवानगी असल्याशिवाय तुम्हाला गंडोलामधून वरती जाता येत नाही. मला माझ्या लाडक्या नातवाचे स्किइंग करतानाचे फोटो घ्यायचे होते. उतारावरून स्किइंग करत येणारे बरेच असायचे.

डोळ्यावर चेहरा झाकला जाईल असे मोठे गॉगल, डोक्यावर हेल्मेट आणि संपूर्ण अंग झाकणारं जॅकेट यामुळे आपलं माणूस कुठलं हे कळायचं नाही. तेवढ्यात सर्रर्रकन नातू पुढ्यात येऊन उभा राहायचा. मग फोटो काढताच यायचा नाही.

शेवटी नातू म्हणाला, ‘आजी... लुक फॉर माय हेल्मेट. इट इज ऑरेंज कलर्ड...’ मग मात्र त्याला ओळखून त्याचे काही फोटो घेतले. ते दृश्य खूप सुंदर होतं. अगदी तीन-चार वर्षांची लहान मुलंसुद्धा मजेत, स्वतःच्या तंद्रीत स्किइंग करताना पाहून गंमत वाटत होती.

उंच पहाडावरून झूमऽऽ करीत खाली येणारे स्किअर पाहिले की काळजात धस्स व्हायचं. एक वेगळाच अनुभव होता तो! तो अख्खा दिवस थंडी असूनही मी त्या रिसॉर्टमध्ये आनंदात घालवला. त्यानंतर मात्र एडमंटनसाठी निघायचं होतं.

रॉकी माऊंटनमधील बर्फाच्छादित शिखरं आणि त्यामधून सळसळत जाणारा रस्ता... आजूबाजूचा आगळा वेगळा निसर्ग डोळ्यात साठवून घेत मी मनोमन त्या परिसराचा निरोप घेतला.

गोठलेल्या नद्या... डोंगरांवरचं बर्फ... हिमाच्छादित शिखरं पाहून मनात आलं, शुभ्रधवल रंगातही किती सौंदर्य सामावलं आहे...!

------------------

Canada
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं राजस्थानातील ते ठिकाण कोणतं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com