अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करणारी डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची ही अखेरची कादंबरी होती..

याआधी त्यांच्या मद्यरात्र, गांधारीचे डोळे आणि काळोखाचे पडघम ह्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असल्या, तरी त्यांना अधिक मोठी आशयसमृद्ध कादंबरी लिहावयाची होती. ते त्यांचे स्वप्न त्यांनी ही महाकादंबरी लिहून साकार केले.
Dr. Nagnath kottapalle
Dr. Nagnath kottapalle Esakal

एक भव्य काळपट, आशयसमृद्ध जीवनचित्रण, पात्रचित्रणातील वैविध्य आणि घटना-प्रसंगांची विपुलता अशा अनेक विशेष असणारी कादंबरी म्हणजे काल-त्रिकाल.

प्रा. विश्वनाथ शिंदे

काल-त्रिकाल ही डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची अखेरची कादंबरी. ही कादंबरी त्यांनी लिहून हातावेगळी केली आणि त्यांचे देहावसान झाले. आता त्यांची कादंबरी प्रकाशित झाली, पण ते बघायला डॉ. कोत्तापल्ले आपल्यात नाहीत.

याआधी त्यांच्या मद्यरात्र, गांधारीचे डोळे आणि काळोखाचे पडघम ह्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या असल्या, तरी त्यांना अधिक मोठी आशयसमृद्ध कादंबरी लिहावयाची होती. ते त्यांचे स्वप्न त्यांनी काल-त्रिकाल ही महाकादंबरी लिहून साकार केले.

काल-त्रिकाल ही कादंबरी पावणेपाचशे पानांची आहे. या कादंबरीत १७व्या शतकाच्या उत्तरार्धापासून स्वातंत्र्योत्तर काळ अशा प्रदीर्घ कालखंडातील समाजजीवनाचे चित्रण आहे.

भारतीय समाज, संस्कृती, साहित्यव्यवहार ह्यामागील धर्मकारण, राजकारण, अर्थकारण ह्या गोष्टी त्यांनी बारकाव्याने समजून घेतलेल्या होत्या, विविध प्रकारच्या परिवर्तनाच्या चळवळींशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलेले होते.

डॉ. कोत्तापल्ले सर्जनशील लेखक असल्याने लेखक-कलावंतांच्या लेखनप्रक्रियेतील गुंतागुंत, लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादली जाणारी नियंत्रणे, बंधने, दबावांमुळे निर्माण होणारी भीती यासंबंधीच्या त्यांच्या सखोल चिंतनाचा आविष्कार ह्या कादंबरीत वाचायला मिळतो.

कादंबरीत कोणा मुधोळ नामक संस्थानातील राज्यकर्त्यांच्या सहा-सात पिढ्यांच्या इतिहासाचे चित्रण आहे. या मुधोळ संस्थानाचा अनेकांच्या हृदयात धडकी भरेल एवढा प्रचंड किल्ला आहे.

मुधोळवासीयांना आणि राज्यातील सगळ्याच प्रजेला किल्ल्याचा व संस्थानिकांचा धाक वाटतो. अनेक शतकांपासूनची गुलामी लोकांच्या अंगवळणी पडलेली असते आणि ती अधिकाधिक बळकट होत आहे, असे वर्णन कादंबरीच्या प्रारंभीच लेखकाने केले आहे.

संस्थानिकांचे राहणीमान, त्यांची सरंजामी मानसिकता, राजकुटुंबे, आपापसांतील भाऊबंदकी, त्यांच्यातील सुप्त संघर्ष, सेनापती, सरदार, जहागीरदार, मानकरी, दिवाण, दप्तरदार, रथ, घोडे, पालख्या, राजवाड्यातील वैभव, उंची दालने, कारभार इत्यादी गोष्टींच्या अनेक तपशिलातून कादंबरीमध्ये संस्थानातील वातावरणाचे चित्र लेखकाने रेखाटले आहे.

ब्रिटिशांच्या आगमनानंतर संस्थानिकांना मांडलिकत्व पत्करावे लागले. त्यामुळे मूळच्या व्यवस्थेत बदल झाला, रेसिडेंटचे नियंत्रण आले. त्या बदलाचे तसेच संस्थानिकांच्या बदलत्या वर्तनाचे चित्रणदेखील कादंबरीत आले आहे.

महात्मा जोतिराव फुले, त्यांची सत्यशोधक चळवळ, समाजसुधारकांच्या प्रबोधनाच्या चळवळी, प्रती सरकारचा लढा, स्वातंत्र्याची चळवळ, महात्मा गांधीजींचा लढा, सत्याग्रहाची चळवळ, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, वादळसेना, सनातन महासभेची मुधोळला स्थापना झाल्यानंतर ‘मनकर्णिका सेवक संघा’च्या लोकांनी सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी उभी केलेली संघटना ह्या व अशा कितीतरी गोष्टींचे कलात्मक चित्रण कादंबरीत आलेले आहे.

एका मोठ्या कालखंडातील घडामोडींचे, घटना-प्रसंगांचे चित्रण करीत असताना ते कुठेच रुक्ष, कोरडे वाटणार नाही; कादंबरीचे कलामूल्य हरवणार नाही याची काळजी डॉ. कोत्तापल्ले यांनी घेतलेली असल्याने कादंबरीच्या वाचनीयतेला बाधा आलेली नाही.

अर्थात, उपरोक्त गोष्टींचे चित्रण करणे हा काही कादंबरीचा प्रमुख उद्देश नाही. लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखकांच्या निर्मितीप्रक्रियेतील गुंतागुंत, निर्मितीप्रक्रियेवर असणारे दाब, धाक, नियंत्रण इत्यादी गोष्टींचा उलगडा करून सांगणे हेच कादंबरीचे आशयसूत्र आहे.

त्यासाठी लेखकाने माधव खारेपाटणकर ह्या पात्राची निर्मिती केलेली आहे. माधव हाच ह्या कादंबरीचा नायक आहे आणि कादंबरीअंतर्गत असलेला लेखकही आहे.

माधव खारेपाटणकर हा मराठवाड्यातील गंगाखेडचा. भिक्षुकी करणाऱ्या सामान्य ब्राह्मण घरातला मुलगा. ‘हैजा’च्या महासाथीत त्याचे आई-वडील, जवळच्या सगळ्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्याने तो भिक्षा मागून जगत असतो.

गावात त्याच्याशिवाय कोणी ब्राह्मण जिवंत नसल्याने आणि गावाला ब्राह्मणाची गरज असल्याने गावच्या पाटलांच्या सांगण्यावरून तो वेदविद्या, पूजाअर्चा, पोथीपुराणे यांचे अध्ययन करण्यासाठी पैठणला यज्ञेश्वरशास्त्री यांच्याकडे जातो.

अध्ययन पूर्ण व्हायच्या दरम्यान यज्ञेश्वरशास्त्रीकडे राजाराम पांडुरंग कानविंदे नावाचे पोथ्यांचे संकलन करणारे गृहस्थ येतात आणि ते माधव खारेपाटणकरला सोबत घेऊन मुधोळ संस्थानात जातात. मुधोळ संस्थानाच्या सहा-सात पिढ्यांचा इतिहास -बखर -लिहिण्याची जबाबदारी माधवकडे सोपविली जाते.

भिक्षुकी करणारा माधव अनपेक्षितपणे बखरकार होतो. हाच माधव कादंबरीअंतर्गत लेखक आहे. दरबारात वास्तव्य करून तो बखर लिहिताना मुधोळच्या राजघराण्याचा इतिहास तपशिलाने समजून घेऊ लागतो. त्या तपशिलातून त्यास मुधोळ राजघराण्यातील बऱ्याच बऱ्या-वाईट घटना ज्ञात होतात.

माधव त्याबाबतीत दरबारातील लोकांशी चर्चा करतो, तेव्हा ‘दिसत असलं तरी पाहिलेलं नाही, ऐकू आलं तरी ऐकलं नाही आणि जे ज्ञात झालं ते लिहायचं नाही’, असा सल्ला मिळतो. सत्य शोधण्याच्या धडपडीत त्याला अनेक फटी दिसतात. त्याचा विवेक जागा होतो तेव्हा सत्यकथनाची त्याची इच्छा प्रबळ होते.

पण असा विचार मनात येताच तो दचकतो, आपल्या मनात आलेले विचार कुणाला कळणार नाहीत ना! अशी भीती त्याला वाटते. त्यामुळे बखर लिहिताना उमगलेल्या सत्याशी त्याला सतत तडजोड करावी लागते.

सत्तेची भीती, धाक त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दडपून टाकतात. पण अखेरीला सत्य त्याच्यासमोर इतक्या प्रखरपणे उभे राहते, की त्या सत्याच्या दर्शनाने किंवा प्रखर सत्याची जाणीव झाल्याने तो निर्भय होतो, सत्याचा अंगीकार करतो.

लहानपणी गरिबीत वाढल्याने मानसिकदृष्ट्या खचलेला, मुधोळला आल्यानंतर संस्थानिकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला, सतत कोणत्या तरी दडपणाखाली वावरणारा माधव बदलतो. त्याच्यात प्रचंड परिवर्तन होते, सत्याची ताकद कळाल्याने तो सत्यकथनाचा मार्ग स्वीकारतो व तशी कृती करण्यास तो प्रवृत्त होतो.

Dr. Nagnath kottapalle
Sleep and Mood: रात्री झोप होत नाही, दुसऱ्या दिवशी चिडचिड होते, या चक्रातून सुटका कशी करावी?

कोत्तापल्ले यांच्या कथात्म साहित्यातील पात्रे विजिगिषू वृत्तीने उभी राहणारी, जगण्याच्या वाटा शोधणारी, जीवनसन्मुखी आहेत. दुःखाला, वेदनांना भिडणारी आहेत. सत्तेच्या धाक दाखवून अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध माधव उभा राहतो.

माधवमध्ये झालेले हे परिवर्तन कोत्तापल्ले यांच्या साहित्यातील अन्य पात्रांच्या वृत्तीशी सुसंगत ठरेल याच स्वरूपाचे आहे. ‘साहित्यातून जगण्याविषयीची, जीवनाविषयीची उन्नत समज व्यक्त करणे आणि वाचकांना त्या समजेपर्यंत नेत आश्वस्त करणे हा सर्जनशील लेखकाचा मूलधर्म असतो’ असे रवींद्र शोभणे यांनी एके ठिकाणी नोंदविलेले आहे.

डॉ. कोत्तापल्ले समाजभान असलेले सजग सर्जनशील लेखक तर होतेच, तसेच ते व्यासंगी अभ्यासक-समीक्षक आणि समाजचिंतक होते. त्यांचा स्वतःचा एक जीवनविषयक दृष्टिकोन होता. त्या सगळ्यांचा आविष्कार ह्या कादंबरीत दिसतो.

सकृतदर्शनी कादंबरीची खूप जागा मुधोळ संस्थानच्या चित्रणाने व्यापलेली आहे, बखर लेखनशैलीचा वापरही लेखकाने केलेला आहे, त्यामुळे ही कादंबरी इतिहासकाळाशी संबंधित असावी, असा समज होतो.

पण तो तपशील केवळ आनुषंगिक पार्श्वभूमी म्हणून आलेला आहे. लेखकाला मुख्यतः सध्याच्या काळाशी, समकाळाशी भिडावयाचे आहे. त्यामुळे कादंबरीमध्ये समकालीन जीवनातील अनेक घडामोडींचे, घटना-प्रसंगांचे संदर्भ आलेले आहेत.

एकेकाळी निष्ठापूर्वक काम करणाऱ्या संपादकांची आजच्या काळातील सोयीनुसार बदलेली भूमिका याचे प्रातिनिधिक उदाहरण ‘प्रतापविजय’च्या चित्रणात आहे. नागनाथअण्णा नायकवाडी, प्रा. एन.डी. पाटील, शेतकरी नेते शरद जोशी, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवणारे डॉ. दाभोलकर ह्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारे प्रसंग कादंबरीत आहेत.

ह्या आणि अशा प्रकारच्या अनेक संदर्भांमुळे कादंबरीतील जीवनचित्रण समकाल अधोरेखित करते. कोत्तापल्ले यांची एक स्वतंत्र लेखनशैली आहे; मिश्कील, उपरोध त्यांच्या सर्वच लेखनात प्रत्ययाला येतो. ह्या कादंबरीतही ती शैली दिसते.

या कादंबरीच्या निवेदनशैलीविषयी स्वतंत्रपणे लिहावे लागेल, अशी अनेक वैशिष्ट्ये कादंबरीत आढळतात. एक भव्य कालपट, आशयसमृद्ध जीवनचित्रण, पात्रचित्रणातील वैविध्य आणि घटना-प्रसंगांची विपुलता अशा अनेक विशेष असणारी अशी ही कादंबरी आहे.

-----------------------

Dr. Nagnath kottapalle
Sleep Disorder : तो चक्क १८-१८ तास सलग झोपतो.. झोपेचेही असतात का आगळेवेगळे आजार? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com