
ज्ञानेश्वर भोंडे
यशाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली, तरी मूलभूत संकल्पना साधारण सारखीच असते. स्त्रियांसाठी मात्र ही व्याख्या चाकोरीबद्ध आयुष्याची चौकट भेदून केलेलं एखादं कौतुकास्पद काम अशी असते. हिमतीनं परिस्थितीशी दोन हात करत मनापासून केलेलं काम त्यांच्या आयुष्यात यशाची चाहूल आणत असतं. याच चष्म्यातून यशाकडे बघणाऱ्या दै. सकाळच्या विविध आवृत्त्यांच्या प्रतिनिधींनी खास साप्ताहिक सकाळसाठी वेचलेल्या काही
अमेरिकेत भरभक्कम पगाराची नोकरी करत असलेल्या वीणा मोक्ताली एकीकडे तिथल्या जीवनशैलीचा, अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा अनुभव घेत होत्या; पण दुसरीकडे कर्करोगाच्या निदानाला उशीर झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांचे मृत्यू होताना पाहून त्यांचं मन पिळवटून निघे. कर्करोग झाल्यामुळे नवऱ्यानं घराबाहेर काढलेल्या, रस्त्यावर राहून टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेची अवस्था बघितल्यावर त्या आणखीनच अस्वस्थ झाल्या. या अस्वस्थतेतूनच प्राथमिक अवस्थेतच कॅन्सरचं निदान करणारं व वापरण्यास साधंसोपं असणारं उपकरण विकसित झालं. पुण्यातील ‘पेरिविंकल टेक्नॉलॉजीज’च्या वीणा मोक्ताली यांच्या स्मार्टस्कोपचा हा प्रवास.
मूळच्या कोल्हापूरच्या वीणा यांनी १९९६मध्ये सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली. परदेशात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर जवळपास दहा वर्षे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. दरम्यान त्यांचा अभियंता कौस्तुभ नाईक यांच्याशी विवाह झाला. सीझेरियन प्रसूती झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांनी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटसाठीचं थिसीस सादर केलं.
परदेशातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे प्रभावित झालेल्या वीणा यांची भारतातही अशा वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात अशी मनोमन इच्छा होती. या विचारातूनच त्यांच्या मनात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचे बीज रुजले. त्यासाठी हे दांपत्य नोकरी सोडून पुण्यात आलं. २०१३मध्ये डॉक्टरांच्या भेटी घेत समस्या जाणून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या जगभरातील एकूण महिलांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू भारतात होत असल्याचे लक्षात आले. पारंपरिक पॅपस्मीअर आणि कॉल्पोस्कोपी या चाचण्यांच्या मर्यादाही लक्षात आल्या.
अहवाल मिळण्यास अनेक दिवस लागणं, उपकरणे मोठी आणि महागडी असणं, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता अशा सर्व कारणांमुळे वेळेवर आणि सोपी तपासणी उपलब्ध होत नव्हती. ग्रामीण भागात या चाचण्या करणेही कठीण जात होते. त्यामुळे या अडचणींवर मात करण्यासाठी जलद, सोपे, स्मार्ट आणि परवडणारे उपकरण तयार करण्याची गरज वीणा यांनी हेरली. त्यातूनच ‘स्मार्टस्कोप’ची संकल्पना उदयास आली.
संशोधनाला बळ देण्यासाठी वीणा व कौस्तुभ दोघांनी २०१३मध्ये ‘पेरिविंकल’ची स्थापना केली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या व्हेंचर सेंटरचे डॉ. प्रेम नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली जैवतंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या निधीतून संशोधन सुरू ठेवले. उपकरणाचा आराखडा तयार करण्यापासून त्याची चाचणी, सुरक्षा तपासणी करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर अनंत अडचणींचे डोंगर त्यांच्यासमोर उभे राहिले. त्या सर्वांवर मात करून २०१७मध्ये उपकरण तयार झाले व महिलांवर चाचणीही सुरू झाली.
पुढे या उपकरणाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची जोड दिली गेली. त्यासंबंधी संशोधन करून सहा पेटंट्सही मिळवली. अखेर २०१९मध्ये शासनाची परवानगी मिळाल्यावर स्मार्टस्कोप सर्वांसाठी उपलब्ध झाले. खरे आव्हान होते ते गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याचे. त्यासाठी आधी साताऱ्यात आरोग्य विभागासोबत ३० हजार महिलांची प्रायोगिक स्तरावर तपासणी केली गेली. नंतर देशातील २० राज्यांत आणि आफ्रिका, आशिया खंडातील पाच देशांपर्यंत त्यांनी आपले उपकरण पोहोचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.