बाप रे, चाकणमधील या कंपनीत कोरोनाचे 120 रुग्ण  

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात आता कंपनी कनेक्शनमधून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, चाकणमधील एका कंपनीत १२० जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

खेड तालुक्यात आधी पुणे आणि मुंबई या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहावयास मिळत होते. त्यानंतर आता एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे कंपनी कनेक्शनचा धोका आता तालुक्याला सतावू लागला आहे. कामगारांकडून त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कंपन्यांमध्ये खेड तालुक्याच्या बाहेरचेही कामगार येत असून, त्यांची गणना तालुक्यात होत नाही. त्यामुळे या धोक्याची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र, आता एकाच कंपनीत एकाच दिवशी १२० जण बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातील ६० ते ७० जण तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खेड तालुक्यात आणि त्यातही चाकण परिसरात गेल्या आठवड्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे, ती कंपनी कनेक्शन मधूनच वाढत आहे. उद्योग चालू ठेवायचे मात्र कोरोनाही पसरू द्यायचा नाही, असे दुहेरी आव्हान कंपनी व्यवस्थापन आणि तालुका प्रशासनापुढे आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

दरम्यान आज सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी संबंधित कंपनीला भेट दिली व माहिती घेतली आणि व्यवस्थापनाशी चर्चा केली. गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक घटना व्यवस्थापक या अधिकाराने कंपनी बंद करण्यास सांगितले आहे. कंपनीतील ८०० लोकांची स्वॅब तपासणी केली होती. त्यातून १२० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कंपनीने नियमांचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, चौकशी करून कारवाई केली जाईल, असे खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 120 patients of Corona in a single company at Chakan