पुण्यात महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने तीस हजार रुग्णांना डायलिसिसचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

महापालिका, अरुणा नाईक डायलिसिस सेंटर आणि लायन्स क्‍लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सवलतीच्या दरात चालविण्यात येणाऱ्या संयुक्त प्रकल्पात गेल्या पाच वर्षांत ३० हजार रुग्णांचे डायलिसिस करण्यात यश आले आहे.

पुणे - महापालिका, अरुणा नाईक डायलिसिस सेंटर आणि लायन्स क्‍लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सवलतीच्या दरात चालविण्यात येणाऱ्या संयुक्त प्रकल्पात गेल्या पाच वर्षांत ३० हजार रुग्णांचे डायलिसिस करण्यात यश आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्येष्ठ समाजवादी नेते कै. भाई वैद्य व तत्कालीन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते कमला नेहरू रुग्णालयातील या सेंटरचे १ ऑक्‍टोबर २०१५ रोजी उद्‌घाटन झाले. लायन्स क्‍लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि प्रकल्पप्रमुख नितीन नाईक, ट्रस्टचे विश्‍वस्त रामदास पन्हाळे, डॉ. संजय भालेराव यांनी हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

पुण्यातील 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू 

नाईक म्हणाले, ‘‘सेवाभावी वृत्तीने हे डायलिसिस केंद्र सुरू केले. जागा, वीज, पाणी महापालिकेकडून आणि इतर सर्व यंत्रसामग्री, संचालन, व्यवस्थापन लायन्स क्‍लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे, असा हा ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’चा पहिला प्रकल्प आहे. ट्रस्टतर्फे १२ तर तत्कालीन आमदार मोहन जोशी यांच्या निधीतून तीन डायलिसिस यंत्रे येथे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यंत ३० हजार डायलिसिस सेशन केली आहेत. त्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त डायलिसिस सेशन कोरोना साथीच्या काळात एकही दिवस खंड न पाडता केली.’’

शहरी गरीब योजनेखाली प्रति रुग्ण, प्रति वर्ष एक लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा महापालिकेकडून होती. जानेवारी २०१८ मध्ये ती दोन लाख रुपये केली. त्यामुळे रुग्णाला वर्षभरात कोणताही खर्च द्यावा लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.

९५० रुपयांत डायलिसिस
एरवी इतरत्र एका डायलिसिससाठी २००० ते २४०० रुपये खर्च येतो. मात्र, या केंद्रात ९५० रुपयांत औषधांसह डायलिसिसची सुविधा रुग्णांना मिळते. त्यासाठी १५ ते १६ जणांची टीम येथे कार्यरत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30000 patients benefit from dialysis in Pune participation of Municipal Corporation and NGOs