शिरूरकरांचा वाढला ताप, कोरोनाबाधितांची संख्या पोचली..

नितीन बारवकर
मंगळवार, 7 जुलै 2020

शिरूर तालुक्यात सुरवातीच्या टप्प्यात विशेषतः शहरात कोरोनाचा धोका नसताना पुणे व मुंबई येथून आलेल्या पाहुणे मंडळींमुळे कोरोनाचा प्रवेश झाला.

शिरूर (पुणे) : शिरूर शहर व तालुक्यातील कोरोनाची व्याप्ती वाढत चालली असून, आज दिवसभरात आणखी सातजणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील दोघांचा समावेश आहे.  काल दिवसभरात गणेगाव खालसा, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी व रांजणगाव गणपती येथे नऊ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. डी. शिंदे यांनी दिली. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

केडगाव येथून शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात ये- जा करणा-या एका महिला लिपिकाला गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर या कार्यालयातील त्यांच्या संपर्कातील काहींचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर याच कार्यालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या 28 वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर त्यांची; तसेच त्यांच्या पतीची एक जुलै रोजी तपासणी करण्यात आली. त्यात त्या पाॅझिटिव्ह; तर त्यांचे पती निगेटिव्ह आले. तथापि, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पतीला ताप आला व इतर त्रास होऊ लागल्याने त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला. 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

शिरुर येथील सय्यद बाबा नगर परिसरातील 36 वर्षीय महिला गेल्या महिन्यापासून आजारी असून, ती येथील ग्रामीण रुग्णालयात वरचेवर उपचार घेत होती. एमआयडीसीतील कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारी ही महिला दीड महिन्यांपासून आजारी असल्याने कामावर जात नव्हती. दरम्यान, डॉक्टरांना शंका आल्याने त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातून आज त्या कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कातील व कुटुंबियांना क्वारंटाइन केले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. तुषार पाटील यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

रामलिंग रोडवरील शिवरक्षा काॅलनीतील दोन कामगार काल पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर आज याच परिसरातील जाधव मळ्यातील 53 वर्षीय कामगाराचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. काल गणेगाव खालसा येथील दोघा आडतदारांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर आजही तेथील 56 वर्षीय आडतदाराचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला. त्याचबरोबर शिक्रापूर, रांजणगाव गणपती व सणसवाडी येथील तिघांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले असून, तिघेही विविध कंपन्यांमधून कामगार म्हणून काम करतात.

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

शिरूर तालुक्यात सुरवातीच्या टप्प्यात विशेषतः शहरात कोरोनाचा धोका नसताना पुणे व मुंबई येथून आलेल्या पाहुणे मंडळींमुळे कोरोनाचा प्रवेश झाला. सुरवातीचे 15 रुग्ण हे पुणे- मुंबई कनेक्शनमधीलच होते. त्यांच्यामुळे संसर्ग वाढला. तथापि, चाळीस रुग्ण संख्येनंतर जवळपास महिनाभर शिरूरकरांनी कोरोनाला रोखले होते. परंतु, लाॅकडाउन शिथिलीकरणानंतर पुन्हा प्रादूर्भाव वाढला. 

कामगार कनेक्शन घातक
शिरूर तालुक्यात आज रुग्णसंख्या 81 झाली असून, 37 जण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांपैकी 25 जण कामगार असून, त्यांच्या कामाच्या ठिकाणी विविध कंपन्यात त्यांना संसर्ग झाल्याचा, आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. रांजणगाव एमआयडीसीबरोबरच सणसवाडी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा परिसरात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून, जवळपास सर्वच कंपन्या चालू झाल्याने पुण्यातील बाधित क्षेत्रातूनही कामगार येत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू लागल्याचा संशय आहे. औद्योगिकरणातील हे कामगार कनेक्शन तालुक्याला घातक ठरू पाहत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 more corona patients grew in Shirur taluka