चिकन, अंडी खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित

Bird-Flu
Bird-Flu

पुणे - पोल्ट्री उद्योगामध्ये जैवसुरक्षेचे नियम काटेकोर पाळूनच व्यावसायिक स्तरावर कोंबडीपालन केले जाते. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध होणाऱ्या मांसल कोंबड्या आणि अंडी पूर्णपणे सुरक्षित आहेत. खाद्य पदार्थ तयार करताना ते पूर्णपणे शिजवून घ्यावेत, असा सल्ला मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी दिला आहे.

‘बर्ड फ्लू’च्या प्रसाराबाबत अधिक माहिती देताना डॉ. रानडे म्हणाले, की बर्ड फ्लूचा विषाणू हा स्थलांतरीत पक्ष्यांमार्फत येतो. याबाबत जागरूकता आणली जात आहे. जेथे अर्ध बंदिस्त किंवा घरगुती स्तरावर मोकळ्या पद्धतीने कोंबडीपालन केले जाते, त्या ठिकाणी या स्थलांतरित पक्ष्यांच्या विष्ठेचा संपर्क या मुक्त पद्धतीने वाढविलेल्या कोंबड्यांना होऊ शकतो. परंतु आपल्याकडे पूर्णपणे जैवसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळूनच व्यावसायिक कोंबडीपालन केले जाते. त्यामुळे येथे या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही, तेथील कोंबड्या आणि अंडी पूर्ण सुरक्षित आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असतो, तेथे पूर्णपणे कोंबड्यांची मरतुक होते. तेथील सर्व कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते. परंतु ही संख्या फारच मर्यादित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली खाद्य संस्कृती. आपल्याकडे चिकन आणि अंडी १०० अंश सेल्सिअस तापमानाला शिजवली किंवा उकडली जातात. बर्ड फ्लूचा विषाणू हा ७० अंश सेल्सिअस तापमानाला मरतो. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका नाही. आपल्या राज्यात २००६ मध्ये नवापूर येथे बर्ड फ्लूचा पहिल्यांदा प्रादुर्भाव दिसून आला होता. परंतु तेव्हापासून आजपर्यंत आपल्याकडे माणसांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव दिसलेला नाही. 

गेल्या पाच वर्षांचा जागतिक पातळीवरील आढावा घेतला तर केवळ ४० ते ४५ लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झालेला आहे. ज्या देशात अर्धे कच्चे चिकन खाल्ले जाते, तेथे धोका जास्त आहे. परंतु आपल्याकडील शिजवलेले चिकन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अजिबात धोका नाही.

जैव सुरक्षेचे नियम अधिक काटेकोरपणे पाळा...
सध्याच्या काळात कोंबड्यांच्या व्यवस्थापनाबाबत डॉ. रानडे म्हणाले, की आपल्याकडे पहिल्यापासूनच काटेकोरपणे जैवसुरक्षेचे नियम पाळून ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. त्यामुळे कोंबड्या आणि अंडी पूर्णपणे सुरक्षित वातावरणात असतात. मात्र अर्धबंदिस्त किंवा परसबागेत अधिक कोटेकोरपणे कोंबड्यांचे व्यवस्थापन ठेवावे. स्थलांतरित पक्ष्यांच्या विष्ठेशी संपर्क आला, तर प्रादुर्भाव दिसू शकतो. जर मरतुक दिसली तर ताबडतोब पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.

अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारात उत्तम प्रकारच्या प्रथिनांची आवश्यकता आहे. अंडी आणि चिकन हे उत्तम प्रथिनांचा कमी खर्चिक आणि चांगला स्रोत आहे. 
- डॉ. अजित रानडे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com